घरफिचर्समासिक पाळी आणि रुढीवादी समाज

मासिक पाळी आणि रुढीवादी समाज

Subscribe

बायकांना अमुक एका मंदिरात प्रवेश नाही अशा बातम्या आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला नक्की काय वाटतं याचा विचार कधी केला आहे का ? स्त्रियांना ही अशी बंदी घालणं यामागचं खरं कारण तसं पाहिलं तर आपल्याला माहीत असतं पण न उच्चारण्याचे शब्द या किंवा न बोलण्याचे विषय या कॅटेगरीतला हा विषय असल्याने एकतर दुर्लक्ष करणे किंवा दुसरीच कारणं देऊन पळवाटा काढणे हे आपण करत असतो. मी जेव्हा मेन्स्ट्रुअल हेल्थ या विषयवार काम करते, तेव्हा अजूनही आपल्या समाजात एकूणच मासिक पाळी बाबत बोलणं निषिद्ध मानलं जातं हे दिसून येतं. मेन्स्ट्रुअल हेल्थ, मेन्स्ट्रुअल वेस्ट डिस्पोजल या विषयावर बोलताना वेळोवेळी मला हे जाणवतं की अजून महिन्यातील ते चार दिवस ह्यामध्येच स्त्रिया आणि समाज अडकून बसला आहे.

मासिक पाळी ही जशी आपल्याला जांभई येते, शिंक येते,शौचाला येते.. तितकी नैसर्गिक आणि सहज आहे. स्त्रीच्या शरीराचं विज्ञान आणि त्यात मासिक पाळीचं स्थान आज जवळपास सर्वांना ठाऊक असतंच. पण अगदी आजही त्याचा बागुलबुवा आपण करतो ते पाहून आश्चर्य वाटतं. शरीरातील काही संप्रेरकं वाढतात, काही कमी होतात, बीजांड बाहेर पडतं आणि चार दिवस रक्ताचा स्त्राव होतो. स्त्रीचं शरीर संतती प्रक्रियेसाठी तयार होतं हे इतकं बेसिक जरी लक्षात घेतलं तर मासिक पाळीला जे अवास्तव महत्व दिलं जातं ते कमी होईल. जेव्हा जेव्हा मासिक पाळी हा शब्द येतो तेव्हा तेव्हा दुर्लक्ष करणे ही मानसिकता विशेषतः पुरुषांची दिसून येते. मला खात्री आहे की या लेखाचा विषय मासिक पाळीभोवती असल्याने कित्येक पुरुष वाचक पहिल्या काही ओळी वाचून थांबले असणार. तुमची आई, बहीण, मुलगी, प्रेयसी, पार्टनर, मैत्रीण या सगळ्या जणींना येते मासिक पाळी. त्याबद्दल तुम्ही सजग असणं, प्रसंगी त्यांना समजावून घेणं, त्यातली शास्त्रीय माहिती देणं, रूढी आणि परंपरेच्या विळख्यातून त्यांना बाहेर काढणं, एक पुरुष म्हणून, समाजाचा भाग म्हणून तुम्ही केलं पाहिजे.

भारतामध्ये आजही कित्येक मंदिरं आहेत जिथे स्त्रियांना जाण्यास मनाई आहे. अगदी आजूबाजूला पाहिलं तर स्त्रिया स्वतःहून मासिक पाळी असताना मंदिरात न जाणं, देव – धर्माचं न करणं आणि ह्या प्रकारात मोडणार्‍या चालीरिती पाळताना दिसतात. पूजा करावी, करू नये, मंदिरात जावं- जाऊ नये हा ज्याच्या त्याच्या आस्थेचा प्रश्न. पण मासिक पाळी असताना हे करू नये ह्यावर मात्र आपण विचार करायला हवाय. मेन्स्ट्रुअल हायजिन म्हणजेच मासिक पाळी दरम्यान घ्यायची असणारी स्वछता हा कळीचा मुद्दा करून मंदिरात न जाणं,पूजा अर्चा न करणं किंवा देवाला चालत नाही हे ठरवणं ही दुर्दैवी बाब वाटते. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे २०१५-२०१६ च्या अहवाल नुसार १५ ते २५ वयोगटातील स्त्रिया ज्या मासिक पाळीच्या दरम्यान हायजिनिक पर्यायांचा अवलंब करतात त्यांची टक्केवारी शहरी 77.5 टक्के , ग्रामीण ४८. २ टक्के आणि अ‍ॅव्हरेज ५७. ६ टक्के इतकी आहे.

- Advertisement -

याउलट किती टक्के स्त्रिया मासिक पाळीच्या दरम्यान देवळात जातात किंवा पूजा वगैरे सारख्या गोष्टी ज्या त्या एरवी आपल्या दैनंदिन आयुष्यात करत असतात त्या करतात का असा प्रश्न विचारल्या गेल्यास टक्केवारी अतिशय कमी असणार ह्यात शंका नाही. स्वच्छ नसणं किंवा पवित्र नसणं ही चौकट इतकी पक्की आहे की सामान्य स्त्रियांना त्यातून बाहेर पडणं अशक्य होऊन जातं. जर पावित्र्य आणि स्वच्छता ह्या महत्वाच्या असतील तर स्वतःची योग्य काळजी घेणं, सॅनिटरी पॅड्स ची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणं, शक्य असल्यास सॅनिटरी पॅड्सऐवजी मेन्स्ट्रुअल कप्सचा पर्याय निवडणं हे अधिक महत्वाचं नाही का?

क्लीन इंडिया जर्नलमध्ये दिलेल्या अहवालानुसार ९००० टन सॅनिटरी वेस्ट म्हणजे साधारणतः ४३२ कोटी सॅनिटरी पॅड्स एका वर्षाला डम्प केले जातात. यातले ८० टक्के पॅड्स हे एकतर टॉयलेटमध्ये फ्लश केले जातात किंवा उघड्यावर फेकले जातात. साधारणतः एक बाई वर्षाला १८० किलो नॉन बायोडिग्रेडेबल ऍबसॉर्बन्ट मटेरियल पर्यावरणात डिस्पोज करते. हे पॅड्स आणि डायपर्स नॉन बायोडिग्रेडेबल असल्याने कचरा गोळा करणार्‍या कर्मचार्‍यांना स्वतःच्या हाताने हा कचरा वेगळा करावा लागतो. या कचर्‍यामुळे त्यातल्या कित्येकांना श्वसनाचे, त्वचेचे रोग होतात. मग खरं पावित्र्य कशात आहे? स्वतःची, पर्यावरणाची, ह्या स्वच्छता कामगारांच्या तब्येतीची काळजी घेण्यात की ते चार दिवस कधी आरामाच्या नावाखाली, कधी आपला बायकांचा जन्मच्या नावाखाली, कधी आमच्याकडे नाही बाई असं चालतच्या नावाखाली, कधी चार दिवस नाही केलं अमुक एक तर काय आभाळ कोसळणार आहे का च्या नावाखाली, कधी सगळं विज्ञानाला समजतं असं नाही च्या नावाखाली, कधी काहीतरी शास्त्र असलंच ना हे सगळं न करण्यात च्या नावाखाली, पॅड मी वापरते त्याची विल्हेवाट लावणं आणि पर्यावरणाचं नुकसान होणं ह्याच्याशी मला काही देणं ह्या नावाखाली , कधी तरुण मुलीने मेन्स्ट्रुअल कप वापरला तर तिच्या व्हर्जिनिटीचं काय त्यापेक्षा पॅडचं बरं अशी कारणं देण्याच्या नावाखाली… आणि अशा एकशे एकसष्ठ इतर नावांखाली आपण जे वागतो त्यामध्ये हा प्रश्न मला पडला आहे.

- Advertisement -

जग बदलतं आहे. प्रश्न बदलतं आहेत. आपण किती दिवस चौकटीत अडकून पडणार आहोत? मासिक पाळीबद्दल आपण आता इतक्या सहजपणे बोलत आहोत, जागरूक होत आहोत ही चांगलीच गोष्ट आहे. पण वापरलेले पॅड्स नुसते कचराकुंडीत फेकून, रस्त्यावर / उघड्यावर टाकून, प्लास्टिकच्या पिशवीत कोंबून , किंवा फ्लश करून जर आपण त्यांची विल्हेवाट लावणार असू तर हे असं लिहून, ते आपण वाचून, त्यावर भरभरून बोलून आपण किती मॉडर्न / मोकळे आहोत हे पटवून देण्यात काय अर्थ आहे? त्यापलीकडे जो सॅनिटरी वेस्टचा डोंगर वाढतो आहे.

त्याची विल्हेवाट लावणं, त्याबद्दल महिलांना प्रशिक्षण देणं, जागरूक करणं आणि मेन्स्ट्रुअल कपसारखे पर्यावरण स्नेही पर्याय अंगिकारणं हे देखील तितकंच महत्वाचं. जसं स्त्रीच्या अस्तित्वाचा पुरुष हा एक भाग आहे तसंच पुरुषाच्या अस्तित्वातला एक भाग स्त्री देखील आहेच . म्हणूनच आजच्या पिढीतील आई- वडील, स्त्री- पुरुष जर सॅनिटरी हायजीन बाबतीत सजग राहिले तर पुढच्या पिढीतील स्त्री आणि पुरुषही ह्या पुढे जाऊन स्वतःच्या तब्येतीचा आणि पर्यावरणाचा देखील विचार करू शकतील आणि तो कृतीत आणू शकतील. मग कदाचित एक समाज म्हणून आपल्या पावित्र्याच्या संकल्पना बदलतील आणि रूढीवादी विचार गळून पडायला सुरवात होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -