घरफिचर्समेरे नैना सावन भादो!

मेरे नैना सावन भादो!

Subscribe

‘हे गाणं माझ्या आवाक्याबाहेरचं आहे असं मला वाटतं आहे!’, किशोरकुमारनी असं म्हणताच आर.डी. बर्मनच्या चेहर्‍यावरही प्रश्नचिन्ह उमटलं. पण आर.डी.बर्मन म्हणाले, ‘काही असो, पण हे गाणं तुच गाणार आहेस!’ नंतर हे गाणं पुढे सात दिवस किशोरदांनी ऐकलं. पुन्हा पुन्हा ऐकलं. गाणं स्वत:च्या कानामनात रूजवलं आणि ते स्वत:च्या आवाजात ‘मेरे नैना सावन भादो’ रेकॉर्ड करण्यासाठी तयार झाले. किशोरदांनीही तेच ‘मेरे नैना सावन भादो’ गायलं, पण स्वत:च्या स्टाइलमध्ये.

शक्ती सामंता राजेश खन्नावर भलतेच फिदा असायचे. राजेश खन्ना हे त्यांच्यासाठी चलनी नाणं असायचं. त्याचं कारणही तसंच असायचं. एकतर तो जमाना राजेश खन्नाच्या बाजूने होता. राजेश खन्नासाठी जीव टाकणारा होता…आणि तो हिरो असलेले शक्ती सामंतांचे सिनेमे हिट होत होते. आराधना, अमरप्रेम, कटी पतंग, अजनबी, अनुरोध अशा त्यांच्या पाच सिनेमात राजेश खन्ना हिरो होता. त्या सिनेमांची लोकांनी नुसती दखल घेतली नव्हती तर ते सिनेमे पुन्हा पुन्हा पहाणारा म्हणजे ज्याला रिपिट ऑडियन्स म्हटलं जातं असा एक प्रेक्षकवर्ग तयार झाला होता.

शक्ती सामंतांच्या डोक्यात नंतर ‘मेहबुबा’ नावाचा सिनेमा करायचं घोळू लागलं तेव्हा पुन्हा एकदा त्या सिनेमाचा प्रस्ताव घेऊन ते राजेश खन्नाकडे गेले. एव्हाना राजेश खन्नाची आणि त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली होती. त्या प्रेमकथेसाठी तर त्यांच्या डोक्यात आधीच एक गाणं होतं, जे अतिशय आर्त, हळवं असेल आणि ते स्त्रीच्या आवाजात असेल, तसंच ते पुरूषाच्या आवाजात असेल असं त्यांचं मत होतं. सिनेमाचं संगीत आर.डी.बर्मन करतील हेही त्यांनी आपल्या मनाशी पक्कं केलं होतं.

- Advertisement -

पुढे पटकथा, संवाद असं सगळं एकेक आकाराला येऊ लागलं तसं शक्ती सामंतांच्या मनातलं ते आर्त, हळवं, दर्ददिवाणं गाणं कसं असावं ह्याबद्दल शक्ती सामंतांनी एकदा आर.डी. बर्मनकडे विषय काढला. कथा पुनर्जन्मावर आधारित असलेल्या प्रेमकथेवर असल्यामुळे हे गाणं इतकं आर्त, इतकं हळवं, इतकं दर्ददिवाणं व्हायला हवं की सिनेमा पाहिल्यानंतर घरी निघताना प्रेक्षकाच्या मनात ते दाटून राहायला हवं, असं शक्ती सामंतांचं केवळ मत नव्हतं तर तो आग्रह होता.

यथावकाश हे गाणं कसं असावं ह्याबद्दल आर.डी.बर्मनदांचे खास आर.डी. स्टाइल प्रयोग सुरू झालेले असतानाच त्यांना एक चाल सुचली. ही चाल शिवरंजनी ह्या रागावर आधारित होती. त्या चालीवर बरंच चिंतन करून त्यातली एक चाल त्यांनी पक्की केली. आणि नंतर ती शक्ती सामंता आणि गीतकार आनंद बक्षींना ऐकवली. आनंद बक्षींनी त्या चालीला अनुरूप असे शब्द लिहिले – मेरे नैना सावन भादो, फिर भी मेरा मन प्यासा. आर.डी. बर्मनना ते पसंत पडले.

- Advertisement -

आनंद बक्षींकडून त्या गाण्याचे अंतरेही लिहून घेतले गेले. आता संपूर्ण गाणं तयार झालं. आधी स्त्रीच्या आवाजात हे गाणं करायचं ठरलं. साहजिकच ह्या गाण्यासाठी लता मंगेशकर ह्या नावाला दुसरा पर्याय नव्हता. लता मंगेशकरांनी हे गाणं असं काही गायलं की गाण्यातली आर्तता एका नव्या उंचीवर नेऊन ठेवली. विशेषत: त्या गाण्यातला अंतरा संपताना सरसर वर जाणारा तो आलाप इतक्या टोकाला नेऊन ठेवला की ऐकणार्‍याचं मन शहारावं! शिवरंजनी रागातली ती शोकात्म किनार त्या गाण्यात अगदी अचूक उमटली होती. शक्ती सामंतांना ‘मेहबुबा’साठी जसं गाणं हवं होतं तसं ते झालं होतं.

आता पाळी होती ती तेच गाणं पुरूषाच्या आवाजात करण्याची. पुरूषाच्या आवाजात हे गाणं करण्यासाठी आनंद बक्षींकडून नवे अंतरे लिहून घेण्यात आले. सुरांच्या मांडणीतही थोडे बदल करून घेण्यात आले. गाणं सुरू होण्याच्या आधीचं संगीत म्हणजे इंट्रो-पीसही बदलण्यात आला. पडद्यावर हे गाणं राजेश खन्नावर चित्रित होईल, असं शक्ती सामंतांनी सांगितल्यामुळे आर.डी.बर्मननी त्यासाठी किशोरकुमारचा आवाज वापरायचं ठरवलं.

झालं, त्यासाठी किशोरदांकडे ते गाणं गाण्याचा प्रस्ताव मांडला गेला. सिनेमाची कथा, त्या कथेला अनुसरून असलेलं हे हळंहळदिवं गाणं गायचं आहे वगैरे सगळी प्रस्तावना किशोरदांपुढे मांडण्यात आली. स्त्रीच्या आवाजातलं हेच गाणं लता मंगेशकरांच्या आवाजात रेकॉर्ड झालं आहे हेही किशोरदांना सांगण्यात आलं. किशोरदांनी ते मान्य केलं.

पुढच्या काही दिवसांतच किशोरदा आर.डी.बर्मनकडे पोहोचले. आर.डी. बर्मननी त्यांना लता मंगेशकरांनी गायलेलं ‘मेरे नैना सावन भादो’ ऐकवलं. किशोरदांनी ते पूर्ण गाणं ऐकल्यानंतर दोन मिनिटं ते स्तब्ध झाले. लता मंगेशकरांनी प्राण ओतून गायलेलं ते ‘मेरे नैना सावन भादो’ ऐकल्यानंतर किशोरदांनी भक्तिभावाने डोळे मिटले. लता मंगेशकरांनी ज्या शैलीदार पध्दतीने ते गाणं गायलं, ज्या अनामिक ताकदीने त्या अवघड वळणाच्या गाण्याचं शिवधनुष्य पेललं त्याला किशोरदांनी डोळे मिटून दिलेला तो प्रतिसाद होता. पण पुढच्याच क्षणी त्यांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा ते आर.डी.बर्मनना इतकंच म्हणाले, ‘यार पंचम, हे गाणं तू खासच केलंस, लतानेही ते गाणं अफाट गायलं आहे, पण खरं सांगू का! हे गाणं माझ्या आवाक्याबाहेरचं आहे असं मला वाटतं आहे!’

किशोरकुमारनी असं म्हणताच आर.डी. बर्मनच्या चेहर्‍यावरही प्रश्नचिन्ह उमटलं. पण आर.डी.बर्मन म्हणाले, ‘काही असो, पण हे गाणं तुच गाणार आहेस!’ नंतर हे गाणं पुढे सात दिवस किशोरदांनी ऐकलं. पुन्हा पुन्हा ऐकलं. गाणं स्वत:च्या कानामनात रूजवलं आणि ते स्वत:च्या आवाजात ‘मेरे नैना सावन भादो’ रेकॉर्ड करण्यासाठी तयार झाले. किशोरदांनीही तेच ‘मेरे नैना सावन भादो’ गायलं, पण स्वत:च्या स्टाइलमध्ये.

हे गाणं किशोरदांकडून गाऊन घेताना संगीतकार म्हणून आर.डींनी त्यात एक ठळक बदल केला. गाणं गिटारीच्या सुरांनी सुरू होताना किशोरदांकडून एक साधाचसा, पण कानवर हळुच मोरपिशी फुंकर घालणारा हुंकार गुणगुणून घेतला…आणि मग त्यातून संपूर्ण गाणं अतिशय सुंदर पध्दतीने उलगडत नेलं. किशोरदांनी त्यानंतर ते गाणं, त्या गाण्यातली प्रियकराची विरहातली संवेदना इतक्या हळूवारपणे पेश केली की संपूर्ण गाणं खोलवर घाव करत राहिलं. जे गाणं आपल्या आवाक्याबाहेरचं आहे असं ज्या किशोरदांना वाटत होतं त्यांनी त्या गाण्याचा आवाकाच बदलून टाकला होता.

पुढे किशोरदा ‘मेरे नैना सावन भादो’ ह्या गाण्याची त्यांच्या पहिल्या पाच पसंतीच्या गाण्यात निवड करत असत हा ‘मेरे नैना’ ह्या गाण्याचा महिमा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -