कोंडलेला श्वास आणि मेट्रो!

Mumbai
संपादकीय

मेट्रो ३ प्रकल्प आणि आरे कारशेड हा विषय सध्या ऐरणीवर आला आहे. राज्य सरकार आणि मुंबई महापालिका एका बाजूला तर पर्यावरणवादी दुसर्‍या बाजूला आणि या दोघांच्या युक्तिवादावर लक्ष ठेवून असलेले न्यायालय, अशा त्रिकोणावर मुंबईकरांचा कोंडलेला श्वास अवलंबून आहे. मुंबईचे क्षेत्रफळ, लोकसंख्या आणि वाहतूक हा समतोल मिठीच्या बुजवण्यात आलेल्या नदीत केव्हाच लुप्त झाला आहे. देशाच्या कानाकोपर्‍यातून जगायला मुंबईत येणार्‍या लोकांचा लोंढा आजही थांबण्याचे नाव घेत नाही आणि आता या शहरात मोकळा श्वास घ्यायला एक इंचही जागा उरलेली नाही. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीमुळे श्वास घुसमटत असताना आता यावर सार्वजनिक वाहतुकीशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. स्वतःचे वाहन घेऊन मुंबईतून प्रवास करणे म्हणजे अग्निदिव्य झाले आहे. प्रवास नको, पण वाहने आवरा अशी परिस्थिती असल्यामुळे लोकप्रतिनिधीही गर्दीच्या वेळी रेल्वेने प्रवास करत आहेत. अशा विचित्र कोंडीत सापडलेल्या मुंबईला वाचण्यासाठी मेट्रो रेल्वेचा मोठा आधार निर्माण झाला आहे.
१९९५ साली युती सरकारच्या काळात मुंबईत फ्लायओव्हर ब्रिज उभारण्यावरून मोठा आक्रोश झाला होता, पण आज या फ्लायओव्हरचे महत्त्व लक्षात येते. तेव्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या नितीन गडकरी यांनी हे फ्लायओव्हर ब्रिज बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता आणि त्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पाठिंबा होता. तीच गोष्ट मुंबई पुणे एक्स्प्रेस महामार्गाची. आज मुंबई आणि पुणे हाकेच्या अंतरावर आले त्याला हा महामार्ग दिशा देणारा ठरला. तेव्हाही विरोध झाला होता आणि आता उभा राहिला आहे आरेतील मेट्रो कारशेडचा विरोध. पर्यावरणाचा विनाश होणार असेल आणि लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा त्याला कडाडून विरोध हा झालाच पाहिजे. पण, आवाज आणि धूर याने जीव घुसमटत असेल आणि रस्त्यावरून चालणेही शक्य नसेल तेव्हा मेट्रो रेल्वेचे महत्त्व लक्षात येते. अंधेरीवरून घाटकोपरला रस्तामार्गे प्रवास करताना होणार्‍या मरणकळा सोसणार्‍या लोकांना आज काही मिनिटांत कुठलाही त्रास न होता प्रवास करता येतो तेव्हा मेट्रो मोठी वाटते. आता खरा प्रश्न आहे तो या मेट्रोसाठी उभाराव्या लागणार्‍या कारशेडचा. गोरेगावच्या आरेत ही कारशेड प्रस्तावित असून त्यामुळे २६४३ झाडे तोडावी लागणार आहेत. यामुळे रणकंदन निर्माण झाले आहे. मेट्रो ३ साठी आरेचा परिसर हाच कारशेडसाठी उत्तम पर्याय असून अन्यत्र ही कारशेड हलवावी लागली तर हा प्रकल्प होणे शक्य नसल्याचे सांगत मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी हतबलता दर्शवली आहे.
आरेचा परिसर हा मुंबईचे फुफ्फुस असून आधीच कमी कमी होत चाललेला हा परिसर कारशेडला देणे म्हणजे गॅस चेंबरमध्ये कोंडून घेण्यासारखे आहे, असे पर्यावरण प्रेमींना वाटते. यात आता सत्ताधारी शिवसेनेने उडी घेऊन मेट्रो कारशेडला विरोध केला आहे. शिवसेनेला मेट्रो हवी आहे, पण कारशेड नको. कोस्टल रोड हवा आहे, पण कारशेड नको. ही डबल ढोलकी वाजवणे शिवसेनेने आधी बंद केले पाहिजे. शिवसेनेला वाटतो म्हणून एखादा प्रकल्प चांगला किंवा वाईट ठरत नाही. मुळात एखाद्या गोष्टीला ठाम विरोध किंवा संपूर्ण पाठिंबा असा असावा हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवून दिले होते, पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत मात्र तसे म्हणता येणार नाही. प्रत्येक वेळी त्यांनी बदलती भूमिका घेतली आहे. आरेला विरोध तर त्यांनी दुसरा पर्याय दिला पाहिजे, पण ते देत नाहीत आणि वर मेट्रोचे उत्तम काम करणार्‍या अश्विनी भिडे यांच्या तत्काळ बदलीची मागणीही आदित्य यांनी केली आहे. मुंबई महापालिकेची वर्षानुवर्षे सत्ता असूनही शिवसेनेने शहराच्या पायाभूत सुविधांचे तीन तेरा वाजवले आहेत. मात्र, आपल्या अपयशाचे खापर मेट्रोच्या माथी फोडण्याचा नवा उद्योग त्यांनी सुरू केला आहे. खरेतर युवराज आदित्य यांनी विरोध करताना कारशेडचे नेमके ठिकाण सांगायला हवे, पण तसे ते सांगत नाहीत. याउलट गडकरी यांनी ठाम भूमिका घेताना कारशेडला विरोध करून मुंबईकरांच्या जिवाशी खेळू नका, असे म्हटले आहे. प्रकल्प राबवताना वृक्षांचे स्थलांतर अशक्य असेल तर झाडे तोडावीच लागतात, अशा वेळी एका झाडाच्या बदल्यात १० झाडे लावण्यात यावीत, असा मार्ग सुचवताना हिमालयासह देशभर सुरू असलेल्या पायाभूत प्रकल्पांची माहिती दिली. मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करतानाही झाडे तोडली जाणार म्हणून धाय मोकळून रडणारे होते. पण, ही रडणारी मंडळी याच महामार्गावर वर्षाला ५ हजार माणसे अपघातात मृत्युमुखी पडत असताना आणि दुप्पट माणसे कायमची जायबंदी होत असताना अश्रू ढाळताना कधी दिसली नाहीत. शेवटी मुंबईच्या कोंडलेल्या श्वासावर मेट्रो हाच पर्याय आहे. आता कारशेड आरे की कांजूरमार्ग येथे उभारावी, हा प्रश्न लवकर निकाली लावायला हवा.