घरफिचर्समीना भाय!

मीना भाय!

Subscribe

मीनाच्या वडिलांना तीन मुली. पहिल्या दोन मुली मुलींसारख्या. पण तिसरी मुलगी मीना मुलगी असून मुलग्यासारखी. शाळेत असल्यापासून तिला कधी मुलींमध्ये फिरताना कधी कोणी पाहिले नाही. तिला मुलींचा सहवासच आवडायचा नाही. क्रिकेट, कबड्डी खेळायला ती मुलांमध्ये आणि मारामारी करायला मुलांपेक्षा सर्वात पुढे. खेळताना, मजामस्ती करताना मित्रांचा कोणाचा चुकून तिच्या अंगाला हात लागला तर तिला त्याचे काहीच वाटत नसे. ती मुलांच्या एक पाऊल पुढे होती.

सायन चुनाभट्टीचा परिसर मिल कामगारांनी व्यापलेला. कुर्ल्याकडे जाताना लागणारी स्वदेशी मिल हे चुनाभट्टीचे पोट. याशिवाय लालबागच्या गिरणगावातही आमच्या वडील आणि काकांसह असंख्य माणसे कामाला. गिरणीच्या भोंग्यानी दिवस सुरू व्हायचा आणि संपायचा. आगरी आणि कोळी आपापले पारंपरिक व्यवसाय सांभाळून होते. भागात फार गजबजाट नव्हता. मोठा बाजार करायचा असेल तर कुर्ल्याला जायचे. गुजराती वाण्याची दोन तीन किराणा मालाची दुकाने होती आणि मारवाड्याचे सोन्याचे एक दुकान होते. माझ्या या सत्यकथेत गुजराती वाण्याच्या एका मुलीची गोष्ट आहे. मीना तिचे नाव. पण, चुनाभट्टीच नव्हे तर कुर्ला आणि सायनला मीना मुलगी असली तरी तिला मीना कधीच कोणी म्हटल्याचे मला आठवत नाही… ती मीना भाय होती! देवाने शरीर बाईचे दिले होते.

नाकी डोळी नीटस. पण, आपण लांबून अरे मीना भाय कुठे आहे तू…असा आवाज दिला की ती आहे त्या जाग्यावरून अशा काही दणदणीत आवाजात बोलायची की बाजूचे तिच्या त्या पुरुषी आवाजाने घाबरून जायचे. अरे, संज्या है किधर तू. कॉलेज में आज कल लडकी पटाया क्या. साले मजा कर… त्यावर तुझे पटाके क्या फायदा. तू थोडी लडकी है! असे तिला बोलल्यावर, छोड यार लडकी बिडकी. भगवान अपनेको जैसा बनाया, वैसेच रहनेका… नाटक नही करनेका, असे सांगत मीना पोलक्याला असलेल्या खिशातून तंबाखू आणि चुना काढणार आणि गप्पा मारत ते मळणार. तोंडात टाकताना म्हणणार, साल्या, तूसुद्धा दाब ना ओठाखाली. बरा असतो जीवाला. तुला माहीत आहे ना मी नाय खात म्हणून… असे बोलल्यानंतर मीना अशी काही पुरुषी आवाजात हसायची की तिला न ओळखणारे तिचे बाईचे शरीर आणि पुरुषाचा आवाज बघत चकित होऊन बघत राहायचे… यावर मीनाचा डायलॉग ठरलेला, ‘क्या रे, भडवे मेरी छाती देखता है. आ नजीक पुरी दिखाती हू. मीनाच्या या डायलॉगवर आजूबाजूचे पसार होत आणि मीना पुन्हा एकदा जोरात हसून तिच्या मर्दानी हाताने माझ्या पाठीवर जोरात थाप मारलेली असे… आणि चल मिलते है, असे सांगून आपल्या वडिलांना दुकानात मदत करायला निघालेली असे….

- Advertisement -

मीनाच्या वडिलांना तीन मुली. पहिल्या दोन मुली मुलींसारख्या. पण तिसरी मुलगी मीना मुलगी असून मुलग्यासारखी. शाळेत असल्यापासून तिला कधी मुलींमध्ये फिरताना कधी कोणी पाहिले नाही. तिला मुलींचा सहवासच आवडायचा नाही. क्रिकेट, कबड्डी खेळायला ती मुलांमध्ये आणि मारामारी करायला मुलांपेक्षा सर्वात पुढे. खेळताना, मजामस्ती करताना मित्रांचा कोणाचा चुकून तिच्या अंगाला हात लागला तर तिला त्याचे काहीच वाटत नसे. ती मुलांच्या एक पाऊल पुढे होती. उलट पोरींचे नखरे, गॉसिपिंग याची तिला प्रचंड चीड होती. शाळेत, परिसरात एखाद्याला कोणी आवडत असेल आणि तो तिच्यासाठी मरत असेल तर मीनाचा पुढाकार ठरलेला, कशाला मजनू बनून फिरतोस. टाक ना विचारून.

असेल मनात तर सांगेल, नसेल तर गेली तेल लावत… सोड यार, एक नही, और सही. साल्या दम नाय छातीत आणि पोरगी पटवायला चाललाय. आणि मीना आपणच पोरगा असल्यासारखा बोलणार, मी विचारू काय तुझ्यासाठी. आपला हिसाब सरळ… होय की नाय. असेल तर बोल. ये चिट्ठी बिठ्ठी, गुलाब बिलाब छोड. नाटक है सब. लडकी लोग तुमको घुमाता है! और तुम साले पागल के माफिक मजनू बनके फिरते हो…अशी वाक्य तोंडावर फेकून मीनाने प्रेम व्यक्त करू न शकणार्‍या असंख्य आपल्या दोस्तांच्या जोड्या जमवल्या. त्याही पुढे जाऊन जे मीनाने आत्मविश्वास देऊनही फाटू निघाले त्यांची ती भाई बनली आणि आपणहून मुलींकडून हो की नाही, हे तिने बोलून घेतले… मीनाला उपजत डेरिंग मिळाली होती. भीती हा शब्द तिला माहीत नव्हता.

- Advertisement -

मीनाच्या वडिलांना मात्र आपल्या मुलीची हीच डेरिंग भीतीदायक ठरत होती. वयात आल्यानंतर मीना मुलगी असूनही मुलासारखी वागत असल्याने आधी वडिलांनी तिला नीट समजून सांगितले. तिची आई तिला नेहमी सांगायची. आपली मुलीची जात. पोरांमध्ये सारखी सारखी राहू नको. उद्या काय झाले तर. घरच्यांनी एवढे बोलण्याची खोटी की मीना उसळून उठे, ‘माझ्या अंगाला हात तर लावू दे कोणाला. नही साले की हड्डी तोडी तो मेरा नाम मीना नही. मोठ्या बहिणींनी तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला; पण ती त्यांचा मोठा भाऊ असल्यासारखा बोले. तुम लडकी के माफिक मुझ से बात मत करो. मी आहे तशी आहे. उलट तुमच्याकडे कोण वाईट नजरेने बघत असेल तर सांगा. डोळे काढते बाहेर त्याचे. मीनाचा हा भरवसा मोठ्या बहिणींना भावासारखा आधार वाटे आणि त्यानंतर तिला त्या समजवण्याच्या भानगडीत कधी पडल्या नाहीत. मला माहीत असल्यापासून मीना एकसारखे कपडे घाली. शर्टासारखा असलेला पोलका आणि त्याखाली स्कर्ट. पोलक्याला दोन खिसे आणि स्कर्टलाही मोठे खिसे. वरच्या खिशात सिगारेट, तंबाखू, चुना आणि खाली पैसे आणि मोठा चाकू, रामपुरी! दहावीतून शाळा सोडल्यानंतर तिने वडिलांना सरळ सांगितले. मी आता पुढे शिकणार नाही.

तुम्हाला दुकानात मदत करेन आणि काम झाल्यानंतर आपल्या दोस्तांबरोबर राहणार. माझ्या मागे पिरपीर करायची नाही. आणि हो लग्नाचा विषय तर दूर राहिला. ताईंची लग्न करा, विषय संपवा. कोण काय बोलतं, फाट्यावर मारा… मीनाचा हा पुरुषीपणा वडील म्हणून काळजी करणारा असला तरी चित्र क्लिअर असल्याने त्यांनी ती हळूहळू स्वीकारली होती. मुख्य म्हणजे वडिलांसाठी मीना मोठा आधार होती. दुकानात नोकरांना मदत करण्यापासून ते मार्केटला मीना जात असे. प्रसंगी गोण्या उचलायची तिची तयारी असे. वडील फक्त पैशाचे काम करत असत. दिवसभर दुकानातून काम केले की रात्र तिची असायची. जिवाभावाच्या मित्रांकडे तिचा ओढा असायचा. मात्र मित्रांबरोबर रात्र जागवताना कधी ती चुकीची अनैसर्गिक वागली नाही. पुरुषांबरोबर पुरुषांसारखी राहताना एका मर्दासारखी राहिली. त्यामुळे तिला परिसरातल्या दादा लोकांबरोबर आमच्यासारख्या दोस्तांमध्ये मोठा मान होता. तिच्या डायरीत नाही हा शब्द नव्हता.

चुनाभट्टीत सत्तर-ऐंशीच्या दशकात दादा लोकांच्या गँग होत्या. महेश मांजरेकरचा ‘वास्तव’ बघितला असेल किंवा विनोद खन्ना-शत्रुघ्न सिन्हा असलेला ‘मेरे अपने’ सिनेमा पाहिला असेल तर तुम्हाला गँगचे राडे काय असतात ते लगेच लक्षात येईल. त्यावेळी चुनाभट्टीत संजय दत्तच्या वास्तवमध्ये दाखवली तशी फ्रॅक्चर भाई आणि त्याची गँग होती. ही चुनाभट्टी स्टेशनजवळील गँग. मीना राहत असलेल्या खजुरीभट्टीजवळ श्यामभाईची टोळी होती. मीनाचे सर्व दोस्त याच टोळीतले. तिकडे स्वदेशी मिल जवळ ताडवाडी आणि प्रेम गल्लीच्या दोन गँग होत्या. या चार गँगचे परिसरावर वर्चस्व मिळवण्यासाठी राडे हे ठरलेले. मटके, दारूचे धंदे तसेच भागातील फेरीवाल्यांकडून हप्ते वसुली तसेच खंडणीसाठी चार गँगमध्ये वर्षाला मोठे राडे व्हायचे. दोन एक वर्षात फुल, हाफ मर्डर ठरलेल्या असायच्या. या चार गँगमधले सॉलिड डेरर पोरे पुढे चुनाभट्टी सोडून मुंबईतल्या मोठमोठ्या गँगमध्ये गेली. मीनाही आरामात तिथे जाऊ शकली असती; पण तिला पैसा, छानशौकी नको होती. श्यामदादा आणि चुनाभट्टी बरी वाटायची. श्यामदादा मटका चालवायचा.

पोलिसांना हप्ते जात होते आणि आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास नव्हता. एकदा ताडवाडीतील गँगने ठरवून फिल्डिंग लावून मटक्याच्या धंद्यावर कोणी पोरे नसताना श्यामदादाचा गल्ला लुटला. चुनाभट्टीत बातमी वार्‍यासारखी पसरली. दुपारी बारा एकची वेळ होती. गँगच्या लोकांना फटाफट निरोप गेले. मीना दुकानात पुड्या बांधत होती. मीना भाय, श्यामदादाने बोलावलंय. राडा झालाय. मीनाला सांगण्याची खोटी, हातातील पुडी टाकून मीना घरात माडीवर धावत गेली आणि हातात हॉकी स्टिक घेऊन आली… पोरांच्या हातातही चाकू सुरे होते. मीनाकडे खिशात रामपुरी धार काढून तयार होता. ‘तेरी मा का… असा आवाज देत मीना आणि वीस एक पोरं ताडवाडीच्या दिशेने सुसाट पळत सुटली. हे गँगवार मी डोळ्यांनी पाहिले आहे. शाळेतून आम्ही दुपारी सुटलो होतो. तर रस्त्यातून श्याम भाईची गँग धावत सुटलीय. मीनाला हाक मारायची संधी तिने दिली नाही, इतक्या वेगात पळत होती. काही पोरांनी हातात गोटी सोड्याच्या बाटल्याही घेतल्या होत्या. पहिला ताडवाडीवर बाटल्यांचा वर्षाव झाला. लोकांचे घरांचे दरवाजे पटापट बंद झाले.

मीना आणि तिच्या दोस्तांना माहीत होते, ताडवाडीचा बारक्या भाई आणि त्याची पोरे कुठे लपली आहेत. थेट त्या घरात घुसून मीना आणि गँगने आधी बारक्याला फोडून काढला. समोरच्या गँगच्या पोरांनी प्रतिकार केला; पण मीनाचा अवतार भयानक होता. तिची हॉकी स्टिक एका तलवारीसारखी चालत होती. मध्येच तिने रामपुरी काढला आणि बारक्या भाईच्या पायात असा काही आरपार घुसवला की फक्त पायाचे दोन तुकडे व्हायचे बाकी होते. मीनाचा भयंकर अवतार पाहून समोरच्यांनी पळायला सुरुवात केली. त्यांनाही पकडून मीनाने असे काही हॉकी स्टिकचे फटके मारले की त्यांच्या हातातील शिगा, ट्यूब लाईट, नान चाकू गळून पडले. काही मिनिटांचा हा थरार आजही माझ्या डोळ्यासमोर एका सिनेमातील सीनसारखा उभा आहे. यानंतर पोलीस केस झाली, मीना आणि तिचे दोस्त काही दिवस तुरुंगात जाऊन आले. श्यामदादाने त्यांची सर्व सोय केली होती. मीनाचा आपल्या भाईवर विश्वास होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर घरच्यांनी तिचे डोके खाल्ले; पण तिला त्याची पर्वा नव्हती.

मीना संध्याकाळी खजुरीभट्टीला नाक्यावर दहा वीस पोरांच्या टोळक्यात उभी असायची. छाती पुढे काढून. श्यामदादा हा गँगचा प्रमुख असला तरी मीना ही पोरांची लाडकी होती आणि तिचा गँगवर धाक होता. मीनाच्या या गँगने कधी पोरीबाळीची छेड काढली नाही की गरीब सरीबाला त्रास दिला. श्यामदादाकडून महिन्याला खर्चा पाणी मिळत असल्याने टेंशन नव्हते. पाकीटमनी सुटत होता. रात्री देशी-विदेशी बाटल्यांसोबत शान-ए-मैफिल रंगत होती. मीना दोस्तांबरोबर दोन पेग मारायची, सिगारेटचे झुरके ओढायची. पण, सर्व कंट्रोलमध्ये. उलट आऊट ऑफ कंट्रोल दोस्तांना घरी सोडायला ती पुढे असायची. मीनामुळे श्यामदादा निर्धास्त होता. मीनाला समोरून भिडायला कोणाची हिंमत नव्हती. एका वेळी चार पाच पोरांना सहज लोळवू शकेल, अशी तिच्यात डेरिंग होती. ताकद जेमतेम असली तरी डेरिंग करताना तिच्यातील मर्द असा काही जागा होई की पुरुषही तोंडात बोट घालतील, असे काही जगावेगळे देवाने तिला बनवले होते.

बारक्या भाई बरा होऊन पुन्हा तयार झाला होता आणि त्याच्या डोक्यात मीनाला ढगात पाठवून श्याम दादाचा मटका आणि ताडवाडीसह खजुरी भट्टीवर राज्य मिळवायचे होते. त्याच्या गँगने खबर काढली की मीना दुकानात कधी एकटी असते आणि कोणाला हासभास नसताना तिच्या दुकानावर हल्ला केला. पण, ती मीना होती… भीती हा शब्द तिच्या डायरीत नव्हता. एकटीने समोरच्या गँगच्या पोरांचा मुकाबला केला. रामपुरी सोबत असला तरी अचानक झालेल्या हल्ल्याने तिला पटकन सावरता आले नाही. तिने आपल्या आक्रमक फाईटने समोरच्यांना थोपवून धरले खरे, पण हत्यारे घेऊन आलेल्या बारक्या भाईच्या लोकांनी पाठून एक मोठी शिग मीनाच्या डोक्यात घातली. मीना रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर दुकानाची मोडतोड करायला घेतली आणि ही बातमी मीनाच्या दोस्तांच्या कानी पडताच पोरे धावत आली. त्यांनी बारक्या भाईच्या लोकांना चांगले धुवून काढले. वाचलेली पोरे पळून गेली. दोस्तांना वाटले मीना गेली की काय… पण तिचा श्वास सुरू होता. हॉस्पिटलमध्ये तिला नेले खरे; पण ती वाचेल की नाही याची काही खात्री नव्हती. पण, मीना एक असामान्य रसायन होते, तिने यमालाही रिकाम्या हाताने परत पाठवले. बर्‍याच महिन्यांनी ती ठीक झाली.

वर्षे उलटून जात असताना आता गँग आणि भाईगिरीचे निकष बदलले होते. हातात हॉकी स्टिक, शिगा, ट्यूबलाईट, सोडा वॉटर बाटल्या, रामपुरी हे जाऊन देशी-विदेशी बंदुका आल्या होत्या. पैसे मिळवण्याचे मार्ग बदलले होते. अमली पदार्थाची विक्री, अपहरण, बिल्डरकडून खंडणी आणि हवाला अशासाठी गँग कामे करू लागल्या होत्या. श्यामभाईची काही पोरे अशी कामे करणार्‍या गँगमध्ये निघून गेली. पण, आपल्या श्याम आणि दोस्तांच्या प्रेमासाठी गँगमध्ये असलेल्या मीनाला हे पैशासाठी स्वतःला विकून टाकणे मान्य नव्हते. ती आता दुकानात अधिक वेळ काढू लागली. कधी वाटले तर नाक्यावर जाई. आता ती म्हातारी झाली. केस साफ पिकलेत. शरीर थकल्यासारखे झालंय… आई वडील या जगात नाहीत आणि बहिणी लग्न करून गेल्यात. मीना एकटी आहे, टुकटुक दुकान चालवते. मी कधी चुनाभट्टीला गेलो तर तिच्याकडे आवर्जून जातो. अरे, संज्या बाल सफेद हो गया. कैसा है… आणि चहा घेता घेता मीनाशी दिलखुलास गप्पा होतात. साले कभी दारू को हात नही लगाया. पर तेरा बार बार च्याय पीने का आदत अभीभी शुरू है… असे हसत हसत बोलताना तिचा हात जुन्या प्रेमळ मित्रासारखा माझ्या खांद्यावर आलेला असतो… निरपेक्ष मैत्रीची अतूट कहाणी सांगणारा!

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -