घरफिचर्सइंदुरीकर, तुमचा मुद्दा चुकला अन् टायमिंगही

इंदुरीकर, तुमचा मुद्दा चुकला अन् टायमिंगही

Subscribe

इंदुरीकर महाराजांकडून अनावधानाने हे वक्तव्य केलं गेलं असेल तर त्यांनी त्यांच्याच स्टाईलमध्ये ते दुरुस्त करावं. खुल्या दिलानं हे वक्तव्य चुकीचं होतं हे सांगून मोकळं व्हावं. त्यातून इंदुरीकर लहान होणार नाहीत. त्यांच्यावर विश्वास ठेवणारी असंख्य मंडळी आहेत. मात्र, आजही ते शिरजोरपणे आपल्या वक्तव्याचं समर्थन करत आहेत आणि त्यांचे समर्थकही त्यांचीच झिल धरत आहेत. मुलगाच हवा हीच अंधश्रद्धा आहे. आज मुली कोणत्याही बाबतीत मुलांच्या मागे नाहीत. तरीही त्या वंशाचा दिवा होऊ शकल्या नाहीत. त्या वंशाचा दिवा कशा होऊ शकतील यावर खरंतर कीर्तनातून प्रबोधन अपेक्षित आहे!

‘मुलगी ही सरस्वती असते. लक्ष्मी असते. तिच्या जन्माने घरात समृद्धी येते…सुख येते…’ असं कीर्तनाच्या माध्यमातून प्रभावीपणे सांगणारे इंदुरीकर महाराज अर्थात निवृत्ती देशमुख हे अचानक काहीबाही बोलून बसले. अर्थात इंदुरीकरांचं काही चुकलं असं म्हणणार्‍यांची संख्या तशी कमीच आहे. माध्यमांनी त्यांचं वक्तव्य तोडून-मोडून दाखवलं, प्रसिद्ध केलं असा युक्तीवाद करून या मंडळींनी त्यांच्या समर्थनार्थ मोहीमच उभी केलीय. त्यामुळे त्यांनी आपल्या कीर्तनात काय म्हटलं होतं हे प्रथमत: बघणं क्रमप्राप्त ठरतं.‘कपाळ म्हणजे काय याचं उत्तर सांगतो. स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होत असतो. स्त्रीसंग जर विषम तिथीला झाला, तर मुलगी होत असते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते. याचा पुरावा विचाराल तर पुलश्य नावाच्या ऋषीने कैकशी नावाच्या स्त्रीसोबत सूर्य अस्ताला जाताना संग केल्याने रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आले आणि आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केल्याने त्याच्यापोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला.

हिरण्यकश्यपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला. कोणत्याही प्रकारे ‘एडिटिंग’ न करता इंदुरीकरांनी सांगितलेल्या या बाबी. त्यातून इंदुरीकरांनी गर्भलिंगधारणेविषयीच वक्तव्य केलं हे निश्चित होतं. केवळ स्त्री-पुरुष लिंगधारणेविषयीच नव्हे तर अशुभ वेळात संबंध आले तर होणारे अपत्य हे राक्षसारखे विकृत वृत्तीचे होते असादेखील त्यांनी दावा केला. इंदुरीकरांच्या वक्तव्यावर टीका व्हायला लागल्यानंतर आणि त्यांना अहमदनगरच्या गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायदा समितीने नोटीस पाठवली. खरंतर, ग्रामीण भागातील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या इंदुरीकरांच्या कीर्तनाचा प्रभावही मोठा आहे. त्यांचं कीर्तन ऐकून मुली शिकायला लागतात. मुलांना कुटुंबाचं महत्त्व पटतं. व्यसनापासून ते दूर जातात, मोबाईलचा अतिरेकी वापर कमी करतात, जातीभेदाच्या भिंती पडायला मदत होते वगैरे वगैरे सांगितलं जातं. त्यात बहुतांशी तथ्यही आहे. त्यांच्या प्रत्येक वाक्याला टाळ्या आणि हशांची दाद मिळते. वेळप्रसंगी ते समोरच्या लोकांना भावूक करून डोळे पाणवायलाही भाग पाडतात. इतका सारा प्रभाव असलेल्या महाराजांनी आपलं प्रत्येक वाक्य तोलून-मापून बोलायलं हवं. त्यांच्या कीर्तनातून प्रभावित होणारी आणि त्यांचे अनुकरण करणारी मंडळी असंख्य असते. त्यामुळे अशावेळी इंदुरीकरांवरची जबाबदारी आपसूक वाढते. त्यांचं व्यक्तिमत्व हे समाजाभिमुख आहे असं बोललं जात असलं तरीही त्यांनी केलेला गुन्हा त्यांच्या समाजकार्यामुळे माफ व्हावा, असंही कसं म्हणता येईल? कायदा हा सगळ्यांसाठीच समान असतो. त्यामुळे इंदुरीकर जर कायदेभंग करणारे विधान करत असतील तर त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई होणे गरजेची आहे, पण मूळ विषयाला बगल देत विषयांतराने चर्चेला वेगळ्याच बाजूने घेऊन जाण्यात आज ‘सोशल यूजर्स’ तरबेज झाले आहेत.

- Advertisement -

समाज माध्यमांचे कोलित हातात आहे, म्हणून कुठंही आग लावत सुटावं का? इंदुरीकर महाराजांचे समर्थन करणारे असंख्य हॅशटॅग, ग्रुप्स आणि मेसेजचं अक्षरश: पीक येत आहे. पण या मंडळींनी या गोष्टीचं भान राखायला हवं की आपण नक्की कशाचं समर्थन करतोय. आज वादाचा मुद्दा त्यांनी केलेलं वक्तव्य आहे. या वक्तव्याला खतपाणी घालून साध्य काय होणार? पुन्हा एकदा मुलगा-मुलगी असा भेदभाव वाढीस लागणार, स्त्री- भ्रूणहत्येचं प्रमाण वाढणार आणि एकूणच स्त्रीला दुय्यमस्थानी टाकलं जाणार.

इंदुरीकरांचं हे वक्तव्य गुरुचरित्रातल्या ३७ व्या अध्यायातील आहे, असा दावा करण्यात येत आहे. मात्र, मुळात गुरुचरित्राला धार्मिक वा अध्यात्मिक आधार असू शकतो. मात्र, गुरुचरित्र म्हणजेच विज्ञान आहे, शास्त्र आहे असा दावा कुणीही करू शकत नाही. त्यामुळे त्यातील संदर्भांमुळे जर कायद्याचे उल्लंघन होत असेल तर त्याची वाच्यता करणार्‍यांना शास्ती होणं गरजेचंच आहे. आयुर्वेदात अशा प्रकारची गर्भधारणेची उपचारपद्धती अस्तित्वात आहे, असाही युक्तीवाद केला जातो. यात तथ्य असते तर तथाकथित आयुर्वेदाचार्य ‘मुलगा होण्यासाठी’चेे सल्ले चोरून-लपून का देतील? ते अधिकृतपणे का यावर बोलत नाहीत. त्याचे कारणच हे आहे की, गर्भधारणा निश्चितीच्या बाबतीत जे काही दावे केले जाताहेत ते केवळ ठोकताळेच आहेत. कुणीही छातीठोकपणे अशा उपचारपद्धतीचे समर्थन करत नाही. त्यातूनच या पद्धतीला शास्त्रीय आणि नैतिक आधार नसल्याचं स्पष्ट होतं. आयुर्वेदाच्या पदवी अभ्यासक्रमात अशा प्रकारच्या बाबी शिकवल्या जात असतील तर त्या तातडीने बदलायला हव्यात. विशिष्ट वनौषधींच्या माध्यमातून माणसाला कसे मारावे हे शिकवणे वर्ज्य आहे. त्याचपद्धतीने स्त्री वा पुरुष लिंग ठरवण्याच्या बाबींचाही अभ्यासक्रमात उहापोह होणे चुकीचे आहे.

- Advertisement -

वारकरी संप्रदाय हा महिलांच्या कर्तृत्वाला मानणारा आहे. म्हणूनच ‘कुळी कन्या पुत्र होती सात्विक, तयाचा हारिक माता- पिता’ असं एका अभंगात म्हटलं आहे. प्रत्येक अभंगाच्या संदर्भात ज्या वेळी स्त्री-पुरुष असा उल्लेख करायचा असतो त्यावेळी स्त्रीचा उल्लेख प्राधान्यानेच केला जातो. याचंतरी भान इंदुरीकरांनी ठेवणं गरजेचं होतं. शिवाय, वारकरी संप्रदायात कीर्तन मर्यादा आहे. या मर्यादांचेही उल्लंघन इंदुरीकर महाराजांच्या या वक्तव्यातून झालंय. यात म्हटलंय की,

सगुण चरित्रें परम पवित्रें सादर वर्णावीं ॥ सज्जनवृंदें मनोभावें आधीं वंदावीं ॥१॥
संतसंगें अनंतरंगें नाम बोलावें । कीर्तनरंगी देवासान्निध सुखेंचि डोलावें ॥२॥ भक्तिज्ञानाविरहित गोष्टी इतरा न कराव्या । प्रेमभरें बा वैराग्याच्या युक्ती विवराव्या ॥३॥
जेणें करूनि मूर्ति ठसावी अंतरी श्रीहरिची । ऐशी कीर्तनमर्यादा आहे संताच्या घरची ॥४॥

संतांचे दाखले देऊन कीर्तन करावे असे यात म्हटले असले तरी कालानुरुप कीर्तनाच्या पद्धतीत बदल होणं वावगं नाही. मात्र, त्यातील सत्संगाच्या भावाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. इंदुरीकर प्रकरणात नेमके तेच झाले आहे. दुर्दैवाने आज ज्या चर्चा सुरू आहेत त्या राजकारणाच्या अंगानेच झुकताना दिसताहेत. या प्रकरणात भाजपच्या आमदारांचं काय मत आहे वा अन्य पक्षांचं काय म्हणणं आहे हा चर्चेचा मुद्दाच नाही. इंदुरीकरांचं विधान हे शास्त्राला धरून नाही आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारं आहे या मुद्याभोवतीच चर्चा होणं अपेक्षित आहे. मात्र, तसं न करता मूळ चर्चेला बगल देत विषयांतर केलं जातंय. कीर्तनाच्या पैशांतून अनाथाश्रम चालविणार्‍या महाराजांचं कौतुक मोकळेपणानं केलं जातं. तसंच ते जेव्हा स्त्रीला दुय्यम दर्जा देऊन तिचा जन्म कसा रोखता येईल याचे चुकीचे उपाय सांगतात तेव्हा त्यांचा निषेध होणंही तितकंच संयुक्तिक ठरतं. अर्थात इंदुरीकर महाराजांकडून अनावधानाने हे वक्तव्य केलं गेलं असेल तर त्यांनी त्यांच्याच स्टाईलमध्ये ते दुरुस्त करावं. खुल्या दिलानं हे वक्तव्य चुकीचं होतं हे सांगून मोकळं व्हावं. त्यातून इंदुरीकर लहान होणार नाहीत. त्यांच्यावर विश्वास ठेवणारे असंख्य मंडळी आहेत. मात्र, आजही ते शिरजोरपणे आपल्या वक्तव्याचं समर्थन करत आहेत आणि त्यांचे समर्थकही त्यांचीच झिल धरत आहेत. मुलगाच हवा हीच अंधश्रद्धा आहे. आज मुली कोणत्याही बाबतीत मुलांच्या मागे नाहीत. तरीही त्या वंशाचा दिवा होऊ शकल्या नाहीत. त्या वंशाचा दिवा कशा होऊ शकतील यावर खरंतर कीर्तनातून प्रबोधन अपेक्षित आहे!

इंदुरीकर, तुमचा मुद्दा चुकला अन् टायमिंगही
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/hemant-bhosale/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -