घरफिचर्समनसेच्या संक्रमणाला शुभेच्छा!

मनसेच्या संक्रमणाला शुभेच्छा!

Subscribe

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे जयंतीची तयारी शिवसेना पक्षातर्फे यंदा जोरदार सुरू असणार. कारण, शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवण्याचा दिलेला शब्द खरा केल्यानंतर स्व. बाळासाहेबांची ही पहिलीच जयंती आहे. त्यामुळे शिवसेनेचा उत्साहदेखील शिगेला पोहोचला असणार, यात शंकाच नाही. मात्र, महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात या जयंतीच्या दिवशी शिवसेनेपेक्षा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचीच अधिक चर्चा आहे. कारण या जयंतीचे औचित्य साधून मनसेने मुंबईत महाअधिवेशन ठेवले आहे. यानिमित्त मनसेने वैचारिक भूमिका बदलण्याचा निर्णय घेणे व त्यासाठी बाळासाहेबांच्या जयंतीचा दिवस निवडणे यामुळे महाराष्ट्रभर तो चर्चेचा विषय असून, या अधिवेशनानिमित्त राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबरच राजकीय विरोधकांचेही लक्ष लागले आहे. मनसेने त्यांच्या झेंड्यात केलेल्या बदलाबाबतही उलटसुलट चर्चा आहे. नुसता झेंडा बदलून काय साध्य होणार, असाही प्रश्न सोशल मीडियावर विरोधकांकडून विचारला जात आहे. त्यामुळे मनसेच्या या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे खरोखर भूमिका बदलणार आहेत किंवा नवीन इनिंग खेळताना त्यांच्यासमोर राजकीय संधी कशी उपलब्ध असणार, याचा विचार होणे गरजेचे आहे. राज ठाकरे यांनी आधीचा झेंडा बदलून त्याजागी केवळ भगवा रंग असलेला व त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असल्याचे सध्याच्या प्रसिद्ध झालेल्या त्यासंबंधीच्या बातम्यांवरून दिसत आहे. यात राज ठाकरे यांनी भूमिका बदलली असे म्हणण्याला काही अर्थ नाही. कारण मुळात राज ठाकरे यांचा जन्म ज्या ठाकरे कुटुंबात वा शिवसेना परिवारात झाला त्या पक्षाचा झेंडाच भगव्या रंगाचा आहे. त्यामुळे त्या रंगाचेच बाळकडू घेऊन जन्मलेल्या राज यांची वैचारिक भूमिका काही वेगळी होती, असे म्हणण्याला काहीही अर्थ नाही. राज ठाकरे यांचे शिवसेनेचे वैचारिक मतभेद झाल्याने ते बाहेर पडल्याचे त्यांनी स्वतः व त्यांच्या कुणाही समर्थकांनी अद्याप म्हटलेले नाही. म्हणजेच शिवसेनेतून बाहेर पडण्याचे कारण वैचारिक नव्हे तर वैयक्तिक होते. त्यामुळे तेथून बाहेर पडल्यानंतर मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी ही शिवसेनेची भूमिका त्यांनी कायम ठेवली. मात्र, शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका मनसेने सोडून मराठीपण अधिक व्यापक करण्यासाठी निळ्या व हिरव्या रंगाला स्थान देऊन नवीन झेंडा बनवला होता. पक्षाची स्थापना झाल्यानंतर अल्पावधीतच मनसेला मोठे यश मिळाले. मनसेने मराठी माणसांच्या हिताची भूमिका घेऊन शिवसेनेलाही बर्‍यापैकी अडचणीत आणले. एवढेच नाही तर मनसेच्या आक्रमकतेमुळे मुंबईतील मराठी माणूस शिवसेना व मनसेमध्ये विभागला जाऊन काँग्रेस राष्ट्रवादीला त्याचा फायदा झाला. तसेच, मनसेलाही राज्यात रुजण्याची चांगली संधी मिळाली. मात्र, पुढच्या काळात राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदी या नव्या नेत्याचा उदय झाला आणि सर्वच राजकीय समीकरणे बदलली. त्यात सुुरुवातीला राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांची स्तुती करून लोकसभा निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. नंतरच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा धुव्वा उडाला. त्यामुळे त्यांनी नरेंद्र मोदी यांची स्तुती करण्याची भूमिका सोडून भाजपवर टीका करण्याची भूमिका घेतली. मात्र, मधल्या काळात सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेला कुठेही स्थान न मिळाल्याने राज ठाकरे यांनी राजकीय स्पेस शोधण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. यामुळेच त्यांनी मागील लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सभा घेऊन मोदी-शहा यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. त्यातच विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने मनसेसोबत जाण्याचा विचार झुरळ झटकावा तसा झटकून टाकला. त्यातच राज ठाकरे यांनी मतदान यंत्राच्या विरोधात देशभर आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी दिल्ली, कोलकाता दौराही केला. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी ऐनवेळी का होईना पण विधानसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार उतरवले. पुढचा घटनाक्रम आपल्यासमोर आहे. निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस व राष्ट्रवादीची साथ घेऊन मुख्यमंत्रिपद मिळवले. या तीन पक्षांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील सर्वच समीकरणे बदलली आहेत. हे सरकार किती काळ टिकणार हा सार्वत्रिक प्रश्न असला तरी हे सरकार महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारे निर्णायक वळण ठरणार आहे, यात शंकाच नाही. या परिस्थितीत सर्वच राजकीय पक्षांनी जाहीर केले नसले तरी त्यांच्या त्यांच्या भूमिकांमध्ये बदल केला आहे. अशा परिस्थितीत मनसेनेही त्यांच्या भूमिकेतील बदल जाहीर करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याचे स्वागतच व्हायला पाहिजे. प्रश्न हा आहे की मनसेला ही भूमिका बदलावीशी का वाटली आणि त्यातून त्यांना काय साध्य करायचे आहे.? मुंबईमध्ये यश मिळवण्यासाठी निव्वळ मराठी हा मुद्दा सत्तेपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही, याची राज ठाकरे यांना जाणीव झाल्यानेच त्यांनी कदाचित काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सेक्युलर विचाराकडे झुकण्याचा विचार केला असावा. मात्र, काँग्रेसने त्यांना सोबत घेण्यास विरोध केल्याने त्यांचा तो प्रयत्न अपयशी ठरला. त्यातच शिवसेना काँग्रेससोबत गेल्याने मनसेला आयती संधी सापडली आहे. मात्र, केवळ भूमिका बदलल्याने यश मिळत नाही, हेही समजून घेण्याची गरज आहे. सभेला लाखो लोक येतात. मात्र, त्याचे मतात रूपांतरण होत नाही. याचे कारण भूमिका आवडली नाही, हे नसून मताचे विजयात रूपांतर होईल, याची मतदाराला खात्री नसते, हे आहे. याचा विचार करण्याची गरज आहे. तो विश्वास निर्माण करण्यात मनसे कमी पडली आहे. त्यासाठीं लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न हाताळण्याबरोबरच ते जनाधार असलेल्या कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याचेही मोठे आव्हान मनसेसमोर आहे. झेंडा बदलल्याने मते मिळत नसतात, तर लोकांमध्ये गेल्याने मिळतात. याची जाणीव ठेवून मनसेच्या पक्ष नेतृत्वाला तसे कार्यक्रम हाती घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून काढावी लागणार आहे. आपण केवळ मते काटणारा पक्ष नाही, तर जिंकणारा पक्ष आहोत, असे मतदारांच्या मनावर बिंबवावे लागणार आहे. यासाठी मनसेला २०२२ च्या महापालिका निवडणुकीपर्यंत पक्षाची संघटनात्मक बांधणी करून नवी भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवावी लागणार आहे. नाही तर शिवसेनेची हिंदुत्वाची संकुचित भूमिका सोडून व्यापक मराठीपणाची भूमिका स्वीकारूनही मनसेला राज्यात फारशी चमकदार कामगिरी करता आलीच नाही, ही बाब लक्षात ठेवून काम केल्यास मनसेला ही नवी पोकळी व्यापण्याची मोठी संधी आहे. मनसेच्या या नव्या भूमिकेबाबत भाजपकडून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत, यावरून नजिकच्या भविष्यात मनसे व भाजप यांची नवी युती राज्यातील जनतेला बघायला मिळाली तर आश्चर्य वाटू नये. भाजपची साथ सोडून गेलेल्या शिवसेनेबरोबर भविष्यातही युती करण्याची वेळ येऊ नये यासाठी भाजपलाही नव्या जोडीदाराची गरज होतीच. मनसेच्या रूपाने ती भरून निघणार असेल तर भाजपच्याही पथ्यावर पडणार आहे. शिवसेनेकडून भाजपला कायमच बाहेरचा पक्ष म्हणून संबोधले जाते. त्यामुळे मुंबईत शिवसेेनेशी सामना करून २०२२ मध्ये महापालिकेत सत्ता आणण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनाही मुंबईच्या मातीतील पक्षाची गरज होतीच. त्यामुळे मनसेने भूमिका बदलून प्रतिसाद दिला असेल व त्यांना शिवसेनेने त्यागलेल्या भूमिकेचा फायदा उठवायचा असेल तर भाजपसारखा दुसरा मित्र नाही. कारण काँग्रेस व राष्ट्वादीने व्यापलेल्या अवकाशात मनसेला जागा नव्हती. मात्र, येथे एकट्या भाजपसोबत जाताना शिल्लक असलेले भवताल व्यापण्यासाठीची संधी बघून घेतलेला निर्णय निश्चित फायद्याचा ठरणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्यातील नव्या वैचारिक बदलाला आणि भविष्यातील समीकरणाला शुभेच्छा देण्यास हरकत नाही!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -