घरफिचर्समनसेचा झेंडा आणि अजेंडा!

मनसेचा झेंडा आणि अजेंडा!

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेेनेचे पहिले महाअधिवेशन गुरुवारी गोरेगाव येथील नेस्को मैदानात पार पडले. या अधिवेशनात अपेक्षेप्रमाणे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाची भूमिका घेतली. आपण मराठी आहोतच पण हिंदूही आहोत, असे स्पष्ट करताना राज ठाकरे यांनी पक्षाची पुढील वाटचाल ही हिंदुत्त्वाच्या दिशेने होणार हे स्पष्ट केले. इतकेच नव्हेतर येत्या ९ फेब्रुवारी रोजी मुंबईत सीएए आणि एनआरसीच्या समर्थनासाठी मोर्चाची घोषणाही केली. राज ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे. शिवसेनेने कडवट हिंदुत्त्व सोडले असल्यामुळे त्यामुळे शिवसेनेचे मतदार आणि कडवट शिवसैनिक नाराज आहेत. त्यामुळे राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे.

ती पोकळी भरून काढण्याच्या हेतूने राज ठाकरे यांनी ही कडवट हिंदुत्त्वाची भूमिका घेतली आहे. आता हिंदुत्त्वासाठी रस्त्यावर येऊ इच्छिणार्‍यांना राज ठाकरे हेच केवळ आधार असणार हे वेगळे लिहायला नको. गेले दोन-तीन आठवडे मनसेचा झेंडा भगवा होणार किंवा त्यावर शिवमुद्रा असणार अशा बातम्या सुरू होत्या. त्यावेळीच शिवसेनेने हिंदुत्त्व सोडल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मनसे हिंदुत्त्वाचा अजेंडा हाती घेणार असे मानले जात होते. त्याच कालखंडात वादग्रस्त झालेल्या सावरकर विषयातही शिवसेनेने गळचेपी भूमिका घेतली होती. काँग्रेस आणि राहुल गांधींकडून जाणूनबुजून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अवमान करण्यात येत होता. त्याबाबत सावकर यांच्या वारसदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ इच्छिली होती, पण त्यांनाही उद्धव ठाकरे यांनी भेट दिली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री आणि सत्ता मिळालेली शिवसेना जी कधी सावरकरांबद्दल जाज्वल्य अभिमान बाळगत होती ती सावरकरांचा अवमान सहन करण्याची अगतिकता दर्शवत होती.

- Advertisement -

सावरकर ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. बहुसंख्य महाराष्ट्रवासीयाला सावरकरांचा देशासाठी त्याग आणि त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात केलेल्या कार्याचा सार्थ अभिमान आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हा अभिमान जाहीरसभांमधून प्रकट केला आहे. आपल्या शिवसैनिकांमध्येही सावरकर अभिमान रुजवला आहे, पण त्याच सावकरांबाबत सत्तेसाठी शिवसेना अगतिक झाली असताना मनसेने व्यासपीठावर नव्याने सावरकर यांचा फोटो ठेवला. त्यातून जिथे शिवसेना आपले कडवे वा आक्रमक हिंदूत्व सोडत जाणार आहे, ती पोकळी आपण भरून काढणार आहोत, असा संकेत राज ठाकरे यांनी एका फोटोतून दिलेला आहे. अर्थात आजच राज हिंदूत्ववादी झाले असेही मानण्याचे कारण नाही आणि त्यांच्या यापूर्वीच्याही अनेक भूमिकांची झाडाझडती घेता येईल.

शरद पवार यांच्या प्रेमात पडून राज ठाकरे यांनी नुकसान सोसलेले आहे आणि आता उद्धव ठाकरे त्यांचे अनुकरण करीत आहेत, पण त्याचवेळी आपली चूक सुधारून राज ठाकरे पुन्हा आपल्या पाळामुळांकडे वळायला निघालेले आहेत. मनसे हा मुळातच शिवसेनेतून फुटून निघालेला पक्ष होता आणि बाजूला होतानाही राज ठाकरे यांनी शिवसेनेच्याच मूळ भूमिकेचा वारंवार उल्लेख केलेला होता. त्यांना त्यामुळे नाराज शिवसैनिक व मतदारांचा प्रतिसादही मिळालेला होता, पण तेवढ्या यशाने फुशारलेले राज ठाकरे भरकटत गेले आणि त्यांना पूर्णपणे दिशाहीन करण्याचे उत्तम मार्गदर्शन शरद पवारांनी केले. अखेरीस आपण कोण व आपली भूमिका काय; त्याचेही स्मरण राजना उरले नाही.

- Advertisement -

मग पवारांनी मनसेकडे पाठ फिरवून शिवसेना नावाचा नवा तगडा मासा आपल्या गळाला लावलेला आहे. आता कुठे राज ठाकरे यांना जाग आलेली असून, त्यांनी आपला वारसा शोधून पुन्हा त्या दिशेने वाटचाल करायचे ठरवलेले आहे. त्यासाठी त्यांनी घेतलेला मुहूर्तच सूचक आहे. बाळासाहेबांच्या जन्मदिनी म्हणजे २३ जानेवारीला राज यांनी आपल्या पक्षाच्या झेंड्यात बदल केला आणि वेगळ्या भूमिकेचीही घोषणा केली. शिवसेनेने मुख्यमंत्रिपद मिळवल्यापासून आपल्या मूळच्या भूमिका व वारशाला फाटा देण्याचा सपाटा लावला आहे. साहजिकच त्यासाठीच सेनेकडे आकर्षित झालेला वर्ग बिथरलेला आहे. त्याला त्या वारसाच्या खाणाखुणा दिसतील अशा बाजूला त्याने वळणे स्वाभाविक आहे. मनसेने त्याच दिशेने वळण घेतले आहे आणि शिवसेनेची शक्ती खेचणे, हाच त्यांचा मनसुबा आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतून प्रथम राज ठाकरे यांनी माघार घेतलेली होती. कारण त्यांना अल्पसंख्य आमदारात सरकार स्थापन करायचे धडे नीट गिरवता आलेले नव्हते. तसे बघायला गेल्यास मागल्या दोन वर्षात त्यांनी पवारांकडून राजकीय धडे घेण्यास सुरुवात केली होती. पुण्यात पवारांची दीर्घ जाहीर मुलाखत घेऊन राज ठाकरे यांनी सुरुवात छान केली होती, पण हळुहळू त्यांच्या हातून बाजी सरकत गेली आणि मनसेच्या धोरणांचा रिमोट कंट्रोल बारामतीकडे गेल्याची चर्चा होती. त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकांचा मोसम सुरू होताच दिसू लागले. मधल्या तीन-चार वर्षांत राजकारणापासून व चळवळी आंदोलनातून बाजूला झालेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना, क्रमाक्रमाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जवळ सरकत गेली आणि पर्यायाने त्यांची दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत वर्णी लागेल, असे चित्र तयार झाले होते, पण काही उपयोग झाला नाही आणि स्वबळावर लढायची इच्छाही मनसे गमावून बसली होती. त्यामुळे लोकसभेत आपला वरचष्मा दाखवून विधानसभेत आघाडीकडून जागा मिळवायचा त्यांचा बेत असावा.

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आणि मनसेला साहेबांनी खड्यासारखे बाजूला केले. मनसेही आघाडीत जाणार अशा बातम्या पेरल्या गेल्या आणि ऐनवेळी काँग्रेस राजी नसल्याचे सांगत पवारांनी त्यातून अंग काढून घेतले, पण कार्यकर्त्यांच्या दबावामुळे अखेरच्या सहा-सात दिवसात राज ठाकरेंना मैदानात यावेच लागले. मात्र, त्याचा पुरेसा प्रभाव पडला नाही. त्यामुळेच आता मनसेचे राजकीय भवितव्य काय, असा प्रश्न उभा राहिलेला होता. त्याचे उत्तर खुद्द राज ठाकरे यांनीच शोधलेले आहे. ते त्यांनी मनसेच्या महाअधिवेशनात जाहीरही करून टाकले आहे. शिवसेनेने मराठी अस्मिता कधीच सोडली आहे. त्यामुळे मराठी अस्मितेला कोणीच वाली नाही. आता तर बाळसाहेबांचे हिंदुत्वही सेनेला नकोय. मग ती जबाबदारी पुतण्या म्हणून राज घेणार असतील, तर गैर काय? हिंदूत्वाची सर्व मक्तेदारी भाजपाला एकट्याला कशाला द्यायची? थोडक्यात राज यांनी आता शिवसेनेतील अशा नाराजांना आशेचा किरण दाखवण्याचा पवित्रा घेतलेला आहे.

राडा वा खळ्ळ खट्याक हा बाळासाहेब असेपर्यंत शिवसेनेचा अजेंडा राहिला आहे. ती क्षमता मनसेपाशी आहे. त्याला झेंड्याची जोड दिली म्हणजे झाले. शिवाय तसे केल्यास उद्या भाजपालाही मनसेच्या मतांची किंमत मान्य करावी लागेल. ज्यांना थेट सेनेतून भाजपात जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी आता मनसे पर्याय आहे. मनसेचा अजेंडा व झेंडा आता बदलला आहे. आगामी महापालिका निवडणुकांना आणखी दोन वर्षे शिल्लक आहेत. तितक्या वेळात झेंडा व अजेंडा लोकांपर्यंत घेऊन जायला राज ठाकरे यांच्याकडे भरपूर वेळ आहे. बहुधा तोच हिशोब मांडून राज ठाकरे यांनी २३ जानेवारीचा मुहूर्त शोधला. आता हा नवा अजेंडा मनसेला सत्तेपर्यंत नेतो का हे आगामी काळात दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -