घरफिचर्सअनेक संदेश देणारी मोदी-पवार भेट

अनेक संदेश देणारी मोदी-पवार भेट

Subscribe

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू असतानाच शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अवकाळी पावसाने राज्यातील शेतकर्‍यांचे जे नुकसान झाले, त्याची भरपाई मिळावी म्हणून पवारांची ही भेट होती, पण ही भेट याच मुद्यापुरती मर्यादित असेल का? मुळात ज्या दिवशी दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक होणार होती, त्याच दिवशी मोदी भेटीचा मुहूर्त पवारांनी साधणे या बाबीला निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही. त्यामागे लौकिकार्थाने गहण राजकीय गणितं लपलेली आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीविषयीची भूमिका मोदी भेटीदरम्यान पवारांनी मांडली. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, हे पवारांनीही स्पष्ट केले, पण चर्चा न करताच पवारांनी अनेक संदेश राजकीय वर्तुळात या भेटीतून दिलेले दिसतात. मुळात राज्यात सत्तास्थापनेचा जो तिढा निर्माण झाला आहे, तो सोडवण्याची क्षमता सध्या तरी केवळ पवारांमध्येच असल्याचे दिसते. त्यामुळेच पवार सध्या ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आहेत. अर्थात सत्ता स्थापन करण्याचा निर्णय केवळ पवारांच्याच हातात असता तर आतापर्यंत शपथविधी होऊन नवीन ‘महाशिवआघाडी’ कामालाही लागली असती, परंतु काँग्रेस अद्याप निर्णायक स्थितीत पोहोचत नसल्याने हा तिढा दिवसेंदिवस लांबतच आहे. या सर्व मुद्यांवर शुक्रवारी चर्चा होऊन खातेवाटपाविषयीचा निर्णयही होऊ शकतो, पण या सर्वच घडामोडींमागे पवारांनी पंतप्रधानांची घेतलेली भेट हेच महत्त्वाचे कारण असल्याचे लक्षात येते. ही भेट म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीतील सलोख्याचे संबंध अधोरेखित करणारी नव्हती. तसेच राज्यासाठी एकमेकांचा पाठिंबा घेण्यासाठीही नव्हती, पण काही उथळ माध्यमांनी आता राष्ट्रवादी आणि भाजपची युती होईल आणि अशा नवीन समीकरणाला महाराष्ट्रातील जनतेला आता सामोरे जावे लागेल असा अर्थ लावत तसे वृत्त दाखवले. काही काळानंतर या गावगप्पाच ठरल्याचे लक्षात आले. खरे तर, काँग्रेसला जमिनीवर आणण्यासाठी ही भेट गरजेची होती. काँग्रेस व्यतिरिक्त आमच्याकडे भाजपचा मोठा पर्याय उपलब्ध आहे, असेच जणू शरद पवारांनी या भेटीतून दाखवून दिले. त्यानंतर काँग्रेसला भान येऊन पुढील राजकीय हालचालींना गती आलेली दिसते. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत शरद पवारांचे भरभरून कौतुक केले होते. राज्यसभेच्या २५० व्या ऐतिहासिक अधिवेशनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी सभागृहाला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक केले. सगळेच प्रश्न वेलमध्ये उतरून, आंदोलन करून सुटत नसतात, चर्चेतूनही ते सुटू शकतात हे राष्ट्रवादीसारख्या पक्षांच्या कामकाजावरून दिसते, असे सांगून मोदींनी पवारांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. मोदी- पवारांमध्ये अधून-मधून अशा पद्धतीने होणारा ‘सुसंवाद’ त्यांच्या विरोधकांच्या पोटात गोळा उठवतो आणि हे मोदी-पवारांनाही ठावूक आहे. त्यातूनच अशी वक्तव्ये अधून-मधून पेरली जातात. मुळात बुद्धीभेद करण्यात शरद पवारांचा हातखंडा आहे. शरद पवार समजून घेण्यासाठी शंभर जन्म घ्यावे लागतील हे संजय राऊत यांचे विधान म्हणूनच अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. पवारांच्या बाबतीत एका माजी मंत्र्याने भाषणात एक किस्सा सांगितला होता. हा किस्सा खरा की खोटा यावर वाद होऊ शकतो, पण त्यातून पवारांचे व्यक्तिमत्व नेमके कसे आहे हे पुढे येते. या माजी मंत्र्याने सांगितले की, एका लेखकाला पवारांच्या भूमिकेवर पुस्तक लिहायचे असते. मात्र, पवारांकडे भूमिका सांगत बसण्यासाठी वेळ नसतो. शिवाय भूमिका अशी जाहीर करायची नसते याचे बाळकडू पवारांनी घेतलेलेच आहेत. त्यामुळे पवार या लेखकाला नकार देतात. अखेर हा लेखक पवारांच्या कार्यालयाबाहेर जाऊन त्यांची प्रतीक्षा करत उभा राहतो. पवार येतात. ते लिफ्टमध्ये बसण्याआधी पवारांना तो भेटतो, पण तरीही पवार वेळ देत नाहीत. मात्र, हा बहाद्दरही मागे हटणारा नसतो. तो म्हणतो, तुम्ही लिफ्टमधून सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचेपर्यंत मला भूमिका सांगा. त्यावरून मी पुस्तक लिहीन, पण पवारही हजरजबाबी. ते म्हणतात, पहिल्या मजल्यावर माझी जी भूमिका असेल ती सहाव्या मजल्यावर गेल्यावर टिकून राहीलच याची मीदेखील शाश्वती देत नाही. त्यामुळे तुम्ही माझ्यावर पुस्तक न लिहिलेलेच बरे. पवारांची भूमिका समजून घेण्याच्या भानगडीत पडणार्‍यांसाठी हे उदाहरण मासलेवाईक ठरावे. त्यामुळे मोदी यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे जरी आज पवार म्हणत असतील तरी चर्चा न करताच त्यांनी राजकीय वर्तुळात दिलेला संदेश त्यांच्यातील परिपक्वता सिद्ध करतो. उद्यापर्यंत महाशिवआघाडीच्या बैठकांचे जे गुर्‍हाळ रंगेेल त्यात काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांना मोदी- पवार भेटीचे विस्मरण जर झाले तर नवल. या भेटीचा परिणाम पूर्णवेळ दिसत राहील. परिणामी कुठल्यातरी निर्णायक स्थितीपर्यंत ही मंडळी पोहोचतील असे दिसते.सत्ता स्थापनेचा तिढा जेव्हापासून सुरू झाला त्या दिवसापासून पवारांनी अवकाळीचा उपयोग अतिशय चपखलपणे करून घेतलेला दिसतो. एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून वाद शिगेला पोहोचलेला होता. त्यावेळी पवारांनी भरपावसात नाशिक आणि विदर्भातील अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना भेटून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यातून ‘शेतकर्‍यांचा कैवारी’, ‘जाणता राजा’ ‘मातीतला माणूस’ अशी विशेषणे काही मंडळींनी त्यांना लावली. आम्हाला सत्ताकारणापेक्षा शेतकर्‍यांच्या वेदना अधिक महत्वाच्या वाटतात, असा संदेश देत पवारांनी सर्वच नेत्यांना कामाला लावले. अवकाळीग्रस्त भागात पवारांनी काढलेल्या या दौर्‍यानंतर सर्वच पक्षांच्या नेत्यांची शेतकर्‍यांच्या बांधांवर रांग लागली. आताही शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आलेला असताना पवारांनी चक्क पंतप्रधान मोदींची भेट घेऊन शेतकर्‍यांच्या व्यथा मांडल्या आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपार्ई केंद्राकडून मिळावी, अशी मागणीही केली. यातून पवारांची शेतकर्‍यांविषयीच्या तळमळीची पुन्हा चर्चा झडलीच. शिवाय ज्यावेळी केंद्राकडून शेतकर्‍यांना मदत देण्याचा निर्णय घेतला जाईल त्यावेळी त्याचे ‘शतप्रतिशत’ श्रेय पवारांनाच मिळेल. दुसरीकडे सत्ता स्थापनेच्या मुहूर्ताला विलंब करणार्‍या काँग्रेसींनाही या भेटीच्या माध्यमातून चाप लावण्यास मदत झाली. एका दगडात केवळ दोन नाही तर अनेक पक्षी मारण्याची पवारांकडे असलेली कला यानिमित्ताने पुन्हा एकदा पुढे आली हे मात्र तितकेच खरे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -