घरफिचर्समोनालिसाचं हास्य !

मोनालिसाचं हास्य !

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे दोन्ही मोठे नेते आहेत. गंमत बघा. यातला एक सगळ्यात छोट्या पक्षाचा.ज्याच्याकडे एकही आमदार-खासदार या क्षणाला नाही.तर दुसरा राज्याच्या सगळ्यात छोट्या (सिंधुदुर्ग) जिल्ह्यातून येतो.पण दोघांनी स्वत:ला नीट बातमीत ठेवलं आहे.अर्थात फक्त बातमीत न राहता राजकीय पटलाच्या केंद्रस्थानी राहण्याची क्षमता असणार्‍या या दोन ‘फायरब्रँड’ नेत्यांची ही अवस्था का झाली हाही एक अभ्यासाचा विषय आहे. राजकीय सारीपाटावर बादशहा व्हायला एक बिरबल मात्र लागतो.राज-राणे यांनी अशाच एका बिरबलाचा शोध घ्यायला हवा. नाहीतर या दोन्ही धडाकेबाज नेत्यांना भविष्यात चेहर्‍यावर सतत मोनालिसाचं हास्य ठेवावं लागेल.ते गूढ हास्य आनंद व्यक्त करतंय की दु:ख हे फक्त मोनालिसाचं जाणते…

गेल्या रविवारी सतराव्या लोकसभेसाठी निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी केली.मागच्या निवडणुकीपेक्षा ही लोकसभा निवडणूक अधिक भव्य आणि खर्चिक आहे.अख्खा देश निवडणूक कार्यक्रमाची चर्चा करत असताना दुसरी महत्वाची बातमी काही मिनिटांतच आली.बातमी होती मराठी मुलखातील ‘क्राऊड पुलर’नेत्याच्या प्रचाराची… अर्थात राज ठाकरे यांच्या ‘राष्ट्रवादी’ प्रचाराची. याच राज ठाकरे यांनी २०१४ च्या लोकसभेला सर्वात आधी नरेंद्र मोदींना पसंती दिली होती. ‘मनसेला मत म्हणजेच मोदींना साथ’ असा नारा त्यांनी दिला होता.इतकंच काय तर गुजरात राज्याचे ‘स्टेट-गेस्ट’ होऊन आल्यापासून मोदींच कसे पंतप्रधान व्हायला हवेत हे राज आपल्या सभांमधून सांगत होते.त्याच राज यांनी आपल्या पक्षाच्या तेराव्या वर्धापनदिनी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याऐवजी मोदींच्या लक्तरांना वेशीवर टांगने पसंत केले. या भाषणातील राज यांचे मुद्दे किती खरे आणि किती खोटे हे त्या त्या संबंधित क्षेत्रातील जाणकारांना अभ्यासाला चालना देणारे आहेत.पण राज यांच्या शैलीमुळे मोदी विरोधकांना आशेचा नवा किरण दाखवणारे आहेत.राज यांना भाषणाची विलक्षण शैली आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांना होती तशीच.राज यांचे विरोधक त्याला ‘साहेबांची नक्कल’ म्हणतात तर त्यांचे समर्थक त्यात आपल्या ‘साहेबांची अक्कल’ शोधतात.

- Advertisement -

मामला कसलाही असूद्या सध्या तरी मराठी मुलखात लाखोंची गर्दी आपल्या सभेला खेचणारा एकमेव नेता आहे तो म्हणजे राज ठाकरे.शिवसेनेत असताना आपल्याला फक्त निवडणुकीच्या प्रचारासाठी बाहेर काढले जाते आणि निवडणुका संपल्या की, अडगळीत टाकले जाते.निर्णय प्रक्रियेत घेतले जात नाही याला कंटाळून राज यांनी शिवसेना सोडून स्वत:चा पक्ष काढला त्याला तेरा वर्षे झाली.या काळात त्यांचे अनेक नगरसेवक, आमदार निवडून आले.राज यांना कुणाचं मांडलिक होणं मान्य नव्हतं. त्यामुळेच त्यांना स्वत:चा पक्ष काढून नवनिर्माण करायचं होतं. हे नवनिर्माण करताना आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य हवं म्हणून पक्षाचे सब कुछ आपणच असू याची काळजीही राज यांनी घेतली.साहजिकच पक्षांचं जे काही होईल त्याची जबाबदारी सर्वस्वी त्यांचीच होती.त्यामुळे आज जे काही पक्षाचं झालं त्याला राज आणि त्यांचे निर्णय कारणीभूत आहेत.

शिवसेनेत असताना आणि तिथून बाहेर पडून स्वत:चा पक्ष बनवल्यानंतरही राज यांची एका नेत्याशी घट्ट मैत्री राहिली तो नेता म्हणजे नारायण राणे. निवडणूक ही फक्त भाषणं करुन जिंकता येत नाही.त्यासाठी योग्य उमेदवार निवडीपासून, उमेदवारांचा प्रचार, प्रचाराच्या सभा, निवडणुकीसाठी लागणारी सामुग्री, बूथ प्रतिनिधींची निवड, त्यांची व्यवस्था, मतदानाचा टक्का वाढवणं ते विजयी उमेदवाराच्या मिरवणुकी पर्यंत असंख्य गोष्टींचं नियोजन करावं लागतं. त्यासाठी आर्थिक व्यवस्था ठोस करावी लागते.हे सगळं करण्याची नारायण राणे यांची स्वत:ची एक शैली आहे.तिला आक्रमकतेची जोड आहे. त्या सगळ्या प्रक्रियेला सेनेत असताना शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद मिळाले त्यामुळेच राणे एक कार्यकर्ता-शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री हा प्रवास करु शकले.संसदीय,कायदेशीर आणि घटनाबाह्यही आयुधं वापरुन आपल्या प्रतिस्पर्ध्याला नामोहरम कसं करायचं याचं नारायण राणे यांचं स्वत:चं विद्यापीठ आहे.

- Advertisement -

२००५ साली उध्दव ठाकरे हे आपले सचिव मिलिंद नार्वेकर आणि सुभाष देसाई यांच्या माध्यमातून राज आणि राणे यांना भंडावत होते.तेव्हा बाळासाहेबांसारखं भाषण करणारे राज आणि पक्षासाठी सब कुछ करु शकणारे राणे एकत्र येतील असं अनेकांना वाटत होतं. पण तेव्हाही ‘बॉस’ कोण हा मुद्दा होताच. २००५ साली सेनेतला प्राधान्यक्रम होता.नंबर एक बाळासाहेब त्यानंतर उध्दव मग राज आणि राणे. पण तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावरच्या नेत्यांना पहिला क्रमांक खुणावत होता.त्यातून जे घडलं ते सर्वश्रुत आहेच.पण एक गोष्ट घडली ती म्हणजे दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावरच्यांनाही राज्याच्या पहिल्या क्रमांकावरील नेत्याला भेटायला ‘वर्षा’वरच्या सोफ्यावर प्रतीक्षा करावीच लागतेय. राज आणि राणे हे दोन्ही मोठे नेते आहेत. गंमत बघा. यातला एक सगळ्यात छोट्या पक्षाचा.ज्याच्याकडे एकही आमदार-खासदार या क्षणाला नाही.तर दुसरा राज्याच्या सगळ्यात छोट्या (सिंधुदुर्ग) जिल्ह्यातून येतो.पण दोघांनी स्वत:ला नीट बातमीत ठेवलं आहे.अर्थात फक्त बातमीत न राहता राजकीय पटलाच्या केंद्रस्थानी राहण्याची क्षमता असणार्‍या या दोन ‘फायरब्रँड’ नेत्यांची ही अवस्था का झाली हाही एक अभ्यासाचा विषय आहे.

*बॅडपॅच की….*
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असणार्‍या मनोहर जोशी यांना १९९९ साली पदावरून दूर करुन हे सर्वोच्च पद शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना दिले. हा राणेंच्या आयुष्यातला ‘गोल्डन पाईंट’. राणेंना या पदावर जेमतेम आठ महिन्यांचा कालावधी मिळाला.त्यांनी आपली छापही पाडली.त्यानंतर मुदतपूर्व निवडणुका झाल्या आणि युतीची सत्ता आणि राणेंचं मुख्यमंत्रीपद गेलं. ते विरोधी पक्षनेते झाले. त्यावरही त्यांनी सर्वोत्तम काम केलं.बजेटवरची त्यांची भाषणं कौतुकास्पद होती. पण त्यांचा जीव पायउतार झालेल्या मुख्यमंत्री पदातच अडकला होता.दुसरीकडे उध्दव ठाकरे कुटुंबीयांची राजकीय महत्त्वाकांक्षा मोहरत होती.साहजिकच आपण आता मुख्यमंत्री होऊ शकण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याची कल्पना राणे यांना येत होती. त्यामुळे राणे यांनी थेट उध्दव यांच्याशीच पंगा घेतला. २००५ ला नारायण राणे यांना पक्षातून काढायला बाळासाहेब यांना उध्दव यांनी भाग पाडलं. राणेंवर अन्याय झाला अशी अनेकांची भावना झाली. त्यात कोकणी माणसांचं प्रमाण अधिक होतं.राणेंबरोबर १० समर्थक आमदारांनी सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. त्यातले शंकर कांबळी, सुभाष बने, गणपत कदम आणि विनायक निम्हण पुन्हा सेनेत परतले.

माणिकराव कोकाटे, प्रकाश भारसाखळे आणि कालिदास कोळंबकर भाजपात गेलेत. विजय वडेट्टीवार यांनी राणेची साथ सोडली.सुरेश नवले राणेंसोबत नाहीत.शाम सावंत यांचा अपवाद वगळता कुणीही आमदार आता राणेंचा समर्थक नाही.तसा सावंत यांना स्वत:चा जनाधारही नव्हता. आता तर ते संपूर्णपणे राजकीय विजनवासात गेलेत.राणेंसोबत अनेक कार्यकर्ते सेनेतून बाहेर पडले.त्यात ठाण्यातील रवींद्र फाटक आणि कोकणातील राजन तेली यांचा उल्लेख करायला हवा. रवींद्र फाटक आता एकनाथ शिंदेंच्या आशीर्वादाने आणि उध्दवकृपेने सेनेचे विधान परिषद आमदार आहेत तर राजन तेली देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतूनच भाजप कार्यकारिणीवर आहेत.हे राजन तेली एकेकाळी राणेंचे एकदम खास होते.म्हणूनच पुरेसे आमदार नसतानाही राणेंनी त्यांना परिषदेवर आमदार केले. नारायण राणे कार्यकर्ते सांभाळतात, त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होतात. मग हे आमदार -सहकारी त्यांना सोडून का गेलेत? दुसर्‍या आणि तिसर्‍या फळीतील अनेकांनी राणेंची साथ का सोडली? राणेंचे निर्णय का चुकले? त्यांना अतिआक्रमकता महाग पडली की अति महत्त्वाकांक्षा? हा राणे आणि राज यांचा बॅडपॅच आहे की राजकीय वैफल्यग्रस्तता ? याप्रश्नांची उत्तरं शोधायला मी थेट त्यांचं ‘होमपीच’ गाठलं.

राणे ‘माहीत’ असणार्‍या अनेक भिडूंना भेटलो.कुणालाच आपलं नाव कोट करायचं नाहीये. पण सगळ्यांनाच राणेंचे ‘स्ट्रोक्स’खूप कंन्फ्युझ करतायत. एरव्ही एक गोष्ट अनेक कसोट्यांवर तपासून निर्णय घेणार्‍या नारायण राणेंनी २०१४ साली कणकवली-देवगड ऐवजी कुडाळ मतदारसंघाची निवड केली.याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांचे मताधिक्य सेनेच्या विनायक राऊतांसमोर कुडाळ मतदारसंघात घटले होते.तरी राणेंनी धोका पत्करून सुरक्षित जागा नितेश राणे यांना दिली.याच वर्षी राजन तेली आणि काका कुडाळकर यांनी राणेंना सोडलं होतं.वारं बदललं होतं पण त्याची नेमकी दिशा सांगणारे त्यांच्यापासून दुरावले होते.राणे ‘वरच्या’ राजकारणात व्यस्त असायचे तेव्हा जिल्ह्याची सूत्रं राजन तेली यांच्याकडे असायची. एक छोटा दुकानदार ते आमदार-नेता असा तेलींचा प्रवास थक्क करणारा आहे.जे बाळासाहेबांकडून मनोहर जोशींनी मिळवलं तसंच तेलींनी राणेंकडून मिळवलं. म्हणूनच त्यांना ‘कोकणचा मनोहर जोशी’ असंही म्हटलं जातं. बहुधा त्यामुळेच तेली व्यक्तिगत हल्ले होऊनही राणेंच्या बाबतीत टीकेची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडत नाहीत.पण तीच गोष्ट दीपक केसरकरांनी स्वत:ला लागू करुन घेतली नाही.आपला सालस चेहरा,डोळ्यांची खोबण सोडून नाकावरच असणारा चष्मा, ढिगाळलेली वेशभूषा आणि राणेंना कमालीची जेरीस आणणारी टीका या जोरावरच केसरकर आज मंत्रिमंडळात आहेत.चिपी विमानतळाच्या बाबतीत त्यांची झालेली फजिती त्यांचा प्रशासकीय आवाका किती भुसभुशीत आहे हे सांगायला पुरेसा आहे.

पण हे केसरकर कोकणी प्रगतीच्या बोडक्यावर बसायलाही राणें हेच कारणीभूत आहेत. सावंतवाडी नगर परिषदेचे नगराध्यक्ष होण्यासाठी काँग्रेस नगरसेवक दिलीप नार्वेकर केसरकरांना अर्ज भरु देत नव्हते.राणे नागपूर अधिवेशनात होते.तिथून नार्वेकरांना शांत करण्याची ‘व्यवस्था’ राणेंनी केली.शिवसैनिकांच्या संरक्षणातच केसरकर नगराध्यक्षाच्या खुर्चीत बसले. इतकंच काय तर २००९ साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार्‍या दिपक‘भाईं’ना काँग्रेस आणि राणे समर्थक जुमानत नव्हते. केसरकरांसाठी शरद पवारांनी राणेंना गळ घातली. राणेंनी पवारांना शब्द दिला खरा, पण तो पाळून केसरकरांना विजयी करणं सोपं नव्हतं. राणेंनी तडक हेलिकॉप्टरने सावंतवाडीचं बॅ. नाथ पै सभागृह गाठलं.‘दादांनी’ तडकाफडकी सावंतवाडी गाठल्यानं कार्यकर्ते, मीडिया आणि पोलीस सगळेच जमले.पोलीस आणि मीडियाला राणेंनी बाहेर जायला सांगितलं, कार्यकर्त्यांचे फोन बंद करुन आपल्याला हव्या त्या समोरच्यांना समजेल त्या भाषेत शाळा घेतली. केसरकर निवडून आले.आणि राणेगडाच्या पडझडीचा पहिला सुरूंग लागला.आपण एकटे राणेंना थोपवू शकत नाही हे जाणून ‘मातोश्री’ने केसरकरांना हाताशी धरुन राणेंचा पोलिटिकल एन्काउंटर केला. २०१४ विधानसभा हरल्याने राणेंचे विरोधी पक्षनेतेपद गेले.आणि काँग्रेसला विधानसभेत कमालीच्या नेभळट आणि लिबलिबीत राधाकृष्ण विखे-पाटील यांना विरोधी पक्षनेतेपद द्यावं लागलं.परवा तर त्यांच्या पोटच्या पोरानंही त्यांचं ऐकलं नाही.आणि भाजपात प्रवेश केला तिथे इतरांचं काय?

२००८ ची ‘ज्ञानेश्वरी’वरील नारायण राणेंची पत्रकार परिषद, त्यातील काँग्रेस श्रेष्ठींवरचं तोंडसुख, त्यामुळे ७२ दिवसांचं निलंबन ओढवून घेणं, पक्षाच्या मुख्य प्रवाहाशी स्पर्धा करणारा ‘स्वाभिमान’चा प्रवाह चालवणं, २०१४ साली सुरक्षित कणकवली सोडून कुडाळला जाणं, तिथे सुमार क्षमतेच्या वैभव नाईक यांच्याकडून पराभूत होणं पर्यायाने विरोधी पक्षनेतेपद गमावणं, सतत अगदी 24 x 7 मुख्यमंत्री पदाचंच स्वप्न पाहणं, माध्यमांमधल्या मित्रांपेक्षा खुशमस्कर्‍यांनाच गांभिर्याने घेणं, विधानसभा हरल्यावर कोकणी आमदाराच्या (बाळा सावंत-शिवसेना)निधनानंतर वांद्य्रात त्याच्या विधवेसमोर निवडणूक पोटनिवडणूक हरणं, भाजपकडून राज्यसभेत जाणं, त्यानंतरही भाजपला लक्ष्य करणं,आपल्या पुढच्या राजकीय पिढीची इन्स्टंट सोय करणं आणि आता तर भाजपच्या कथित सल्ल्याने महाराष्ट्र स्वाभिमान या राजकीय पक्षाची १४ वर्षांनंतर स्थापना करणं या एक ना अनेक गोष्टींच्या चक्रव्युहातच राणे अडकले.त्यामुळेच त्यांच्यासारख्या स्कॉलर राजकारण्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पेपरही जड जायला लागलाय.जिल्हा परिषदेतील 51 जणांचं त्यांचं संख्याबळ निम्म्यानं घटलंय. यातच सगळं आलं. आणि हो राजकारण हा तर आकड्यांचा खेळ आहे.

राज ठाकरे-नारायण राणे यांचा दोस्ताना सर्वश्रुत आहे. याच दोस्तीपाई राज यांनी आपला कोकण गड राणेंना आंदणच देऊन टाकलाय.खरंतर स्व. बाळासाहेब यांनीच कोकणाचा ७/१२ राणेंच्या हाती सोपवल्यामुळे राज यांनीही शिवसेनेत असताना आणि आजही कोकणाला आऊटफोकसच केले. पण त्यांनी मुंबई-महाराष्ट्राच्या बाबतीत अनेक गोष्टींबाबत फक्त आरंभशूरताच दाखवली.२००७ साली मुंबई महानगर पालिकेत २७ संख्याबळ मिळूनही मनसे ‘खळ्ळ खट्याक’मध्येच अडकली. विधानसभेत २००९ साली १३ आमदारांची ताकद मिळूनही नवनिर्माणाचा सूर सापडलाच नाही. राज यांच्या पक्षाचा झेंडा सोडला तर त्यांच्या सगळ्याच गोष्टी सेनेशी साधर्म्य साधणार्‍या आहेत.अगदी पक्षरचनेपासून ते कार्यकर्त्याच्या कारवाईपर्यंत…राज थोरल्या ठाकरेंची नक्कल करतात अशी त्यांच्यावर टीका होते.काकाची पुतण्यावर छाप असू शकते, पण कार्यकर्ते नेत्याचीच नक्कल करायला लागले तर काय करायचं.राज यांना ‘इसिमियाके’ परफ्युम आवडतो.अनेक मनसैनिकांनी तोच वापरायला सुरुवात केली.राज हातातल्या पांढर्‍या नॅपकिनने विशिष्ट पद्धतीने नाक-तोंड पुसतात.

प्रवासात, कार्यक्रमात हा नॅपकिन सांभाळायला एका व्यक्तीची नेमणूक केलेली असते.याची कॉपी करताना चेंबूरमधल्या एका वादग्रस्त पदाधिकार्‍याने तसाच नॅपकिन आणि ‘दत्तू’ यांची नक्कल सुरू केली आहे. (स्व.बाळासाहेब शाल वापरायचे, पाईप ओढायचे म्हणून कुठल्या सेनानेत्याने पाईप ओढल्याचं ऐकिवात नाही की शाल लपेटल्याचं पाहण्यात नाहीय) इथे सांगायचा मुद्दा हा आहे की, राज यांचा दरारा संघटनेवर कमी पडलाय. महिनोंमहिने कार्यकर्त्यांकडे राजकीय कार्यक्रम न देणे, पक्षीय नेमणुका वेळेवर न करणे, मित्र आणि संघटनात्मक पदाधिकार्‍यांची गल्लत करणं, हाती घेतलेले आंदोलनात्मक कार्यक्रम अर्धवट सोडणं,आपल्या भूमिकेने कार्यकर्त्यांना बुचकळ्यात टाकणे अशा अनेक गोष्टींनी मनसैनिकांची कुचंबना करुन टाकली.

राज यांच्या पक्षात शेकडो सेना कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. पण त्यातल्या अनेकांच्या पदरी हिरमोड आला. दिगंबर कांडरकर, शिशिर शिंदे, मोहन रावले, दिलीप लांडे असे अनेक बिनीचे शिलेदार पुन्हा मातोश्री दारी परतले.तर राजमार्ग पकडून झटपट आपलं उखळ पांढरं करुन घेणारे मंगेश सांगळे, राम कदम यांच्यासारखी मंडळी फक्त सत्तेसाठीच होती याची प्रचितीही राज यांना आलीय.

मायकेल जॅक्सनचा कार्यक्रम असू द्या की गुढीपाडवा किंवा मोदीविरोध त्याचा ‘इव्हेंट’ कसा करायचा याची हातोटी राज यांना छान आणि नेमकी जमलीय.पण राज यांच्या पक्षाची सद्य:स्थिती पाहिली की त्यांची सपशेल गल्लत झाल्याचं दिसून येतंय.राज यांना सेनेचा प्रचारीपोपट व्हायचं नव्हतं, त्यांना सेनेतून बाहेर पडून कुणाचं मांडलिक व्हायचं नव्हतं,कुणाच्या युती आघाडीतही जायचं नव्हतं.पण आता नेमकं त्याच्या उलटंच सगळं त्यांच्या वाट्याला आलंय.राज बाहेर पडल्यापासून अनेकजण दोन भावांनी एकत्र येण्याची टिमकी वाजवत आहेत.बाळा नांदगावकरांसारखे दोन्ही कडे ‘स्पेस’ असणारे काही हितचिंतक यासाठी प्रयत्नरत आहेत.ते अपयशी ठरलेत आणि ठरतील. राज-उध्दव यांचं मनोमिलन ही कैतरिनाच्या अभिनयाइतकी कठीण गोष्ट आहे. यावर ठाकरेंच्या तीन पिढ्यांचा हितचिंतक असलेला कौटुंबिक उद्योजक मित्राची प्रतिक्रिया चपखल आहे, तो म्हणाला, “सगळे भावांचा मामला मिटवतायत, पण तो प्रत्यक्षात जावांचा प्रश्न आहे मग तो कसा मिटणार?”

मनसेचे एकमेव जुन्नरचे आमदार शरद सोनावणे शिवसेनेत गेलेत. त्यांची प्रतिक्रिया राज यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरु शकते.त्यांनी इतरांसारखे काही खोटे बोलण्यापेक्षा ‘आता मनसेत राहून राजकीय भविष्य अडचणीचं ठरु शकतं म्हणून सेनेत जातोय’ असं सांगून टाकलं.एखाद्या रेषेच्या फराट्याने अर्कचित्रात नेमका अर्थ आणणार्‍या राजना आपला स्वत:चा कॅनव्हास कळलाच नाही असं म्हणणं धाडसाचं आहे.

२००५ ला राणे आणि राज यांना आपल्या अंगावर घेऊन उध्दव यांना पक्षप्रमुख करण्यासाठी मिलिंद नार्वेकर यांनी मुख्य खलनायकाची भूमिका चोख बजावली. ह्या दोन्ही ‘फायरब्रँड’ नेत्यांना बाहेरच्या वाटेला लावण्यात उध्दव यांच्या आदेशानुसार रणनीती बनवण्याचं काम नार्वेकरांनी पार पाडलं.या दोघांना मानणारे असंख्य कार्यकर्ते नेते पक्ष सोडून गेले.सेनेला सेटबॅक बसला.त्यानंतर त्यातल्या अनेकांना उपरती झाल्यावर माघारी परतायचं होतं. उध्दव यांच्याकडे अशा अनेकांसाठी शब्द टाकून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम सेनेच्या याच चाणक्यानं केलंय.राज-राणे यांची आक्रमकता उध्दव यांच्यापाशी नाही तरीही गेल्या दहा वर्षांत शिवसेनेचा सत्तेचा आलेख चढताच आहे.दोन पावलं मागे जाऊन, कधी मित्रपक्षाला हूलवर घेऊन, कधी मुखपत्र कौशल्याने वापरुन सत्तेतला सहभाग उध्दव नावाच्या बादशहाने कायम ठेवला आहे. त्याच्या मागे दरबारी नवरत्नं आहेतच, त्यात मिलिंद नार्वेकर नावाच्या बिरबलाचा खूपच मोठा वाटा आहे. त्याने आपला मालक ‘सेफ-झोन’ मध्ये पोहचल्यावर युवराजावरही काम सुरू केलंय. राज-राणे राजकीय संकटात आहेत.

दोघांचे समर्थक पुरते हवालदिल आहेत.पण राजकारणात कुणीच संपत नसतं. राजकीय सारीपाटावर बादशहा व्हायला एक बिरबल मात्र लागतो.राज-राणे यांनी अशाच एका बिरबलाचा शोध घ्यायला हवा. नाहीतर या दोन्ही धडाकेबाज नेत्यांना भविष्यात चेहर्‍यावर सतत मोनालिसाचं हास्य ठेवावं लागेल.ते गूढ हास्य आनंद व्यक्त करतंय की दु:ख हे फक्त मोनालिसाचं जाणते…

-राजेश कोचरेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -