पेपरवेटमध्ये बंद बालपण; सलाम बॉम्बे

सलाम बॉम्बेचा पडदा माणूसपणाच्या भेसूर विडंबनाने भरून गेलेला आहे. काचेरी तावदानापलीकडून गिर्‍हाईकासोबत आईला पाहणार्‍या छोट्या मुलीच्या नखांचे काचेवर पडणारे ओरखडे चित्रपट पाहणार्‍यांच्या मनावरही पडतात. मिरा नायरनं सलाम बॉम्बे बनवताना प्रेक्षकांना बिलकूल माफ केलेलं नाही, हे असंच अस्तं...तसंच पाहावं लागेल, त्यातून सुटका नसते, मनगटावरल्या चमेली गजर्‍यात कोवळ्या कलेजीची शिकार करून शेवटच्या बसची वाट पाहणारे लोक सलाम बॉम्बेच्या पडद्यावर अनेकदा भेटतात.

Mumbai
Salam Bombay

सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कारासह इतर अनेक पुरस्कार मिळवणार्‍या ‘सलाम बॉम्बे’मधल्या शफीक सय्यदचं नाव चित्रपटसृष्टी, प्रेक्षकांकडूनही आज विसरल्यात जमा आहे. डझनभर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरलेल्या सलाम बॉम्बेतल्या शफीकचंही त्यावेळी इंडस्ट्रीकडून फँड्रीतल्या जब्यासारखं मोठं कौतुक झालं होतं. राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा त्यावेळचा छोटा शफीक आता ४४ वर्षांचा झाल्यानंतरही बंगळुरूतल्या रस्त्यांवर रिक्षा चालवतोय. स्लमडॉग मिलेनियरशी जोडलेली ऑस्करपर्यंत मजल मारणारी गुलजार, ए. आर. रेहमान ही मोठी नावं आपल्याला माहीत असतात. त्यातल्या छोट्या देव पटेलला हॉलिवूडनं आपलंसं केलं तर सलाम बॉम्बेच्या शफीक नावाच्या ‘कृष्णा चायपाव’ला बंगळुरुतल्या गल्लीबोळांनी सांभाळलं….

सलाम बॉम्बेनं बालकांचं लैंगिक शोषण, बालगुन्हेगारी आणि लहान मुलांना भीक मागायला लावून त्यावर आपला धंदा करणार्‍या कमालीच्या काळ्या जगताचा भेसूरपणा मोठ्या पडद्यावर अचानक समोर आणला. मिरा नायरसारख्या संवेदनशील दिग्दर्शिकेच्या या चित्रपटाने राज्य आणि केंद्रातील बालविकास विभागालाही लहान मुलांच्या या शोषणाची दखल घ्यायला भाग पाडलं. ‘बाल शिवाजी’ आणि ‘सलाम बॉम्बे’ असे दोन चित्रपट शालेय विद्यार्थ्यांना दाखवले जावेत, अशी मागणी १९८८ मध्ये हा चित्रपट रिलिज झाल्यावर केली जात होती. त्यात सलाम बॉम्बेचा विषय बारगळला, मात्र तोपर्यंत चिमुकल्यांच्या विस्कटलेल्या विश्वाची ‘गंभीर चर्चा’ एअरकंडीशन्ड खोल्यांमधून सुरू झाली होती. त्यापूर्वी जवळपास तीन दशके आधी ‘बूट पॉलिश, जागृती, दो भीगा जमीन’ मध्येही रस्त्यावर वाढलेल्या मुलांचं भावविश्व पडद्यावर आलं होतं. पण त्याला सामाजिक संस्कार आणि नैतिकतेची उपदेशवजा किनार होती. सलाम बॉम्बे त्या तुलनेत कमालीचा अंगावर येणारा होता आणि दांभिक माणूसपणाची लाज थेट चव्हाट्यावर मांडणारा होता. त्यामुळेच हा सिनेमा भेसूर होताच तसंच तो अस्वस्थ करणाराही होता.

सर्कशीत हरकाम्या असलेल्या आठ, नऊ वर्षाच्या कृष्णा (शफीक सय्यद) ला बिडी बंडल किंवा खैनी तंबाखू आणण्यासाठी सर्कशीच्या मालकाकडून गावात पिटाळलं जातं. जिवाच्या आकांतानं पळणारा कृष्णा खैनी घेऊन परततो तेव्हा सर्कशीचा तंबू उचलून मालक पसार झालेला असतो. ‘सर्कशीतलं काम संपल्यावर’ कृष्णाची ब्याद मालकानं अशी सोडवलेली असते. भेदरलेला, घाबरलेल्या लहानग्या कृष्णावर बापानं दुसरं लग्न केलेल्या बाईचं कर्ज आहे. तिची दुचाकी कृष्णाकडून मोडली गेल्यानं तिनं घरातून त्याला हाकलून दिलंय, त्यामुळे कृष्णा रस्त्यावरच्या उकीरड्यावर फेकला गेला आहे. गावातला उकीरडा चरण्यासाठी पुरा पडत नसल्याने जनावराचं जगणं वाट्याला आलेला कृष्णा बड्या शहराचं तिकिट काढून मुंबई नावाच्या मायानगरीत दाखल होतो. मुंबईचा उकीरडा तालुक्याच्या ठिकाणापेक्षा मोठा आहे. मुंबईतल्या फॉकलंड लेनजवळच्या गल्लीबोळातल्या देहविक्री करणार्‍या महिलांना सकाळी सकाळी चहा पोहचवण्याचं काम कृष्णाला मिळालं आहे आणि ‘चायपाव’ हे नवं नावही…या छोट्या‘चायपाव’वर रेखा नावाच्या देहविक्री करणार्‍या अनिता कन्वरचा जीव आहे. डेढ गल्लीतल्या एका बोळात चालवल्या जाणार्‍या चकल्यात गिर्‍हाईकांच्या गराड्यात राहाणार्‍या रेखा चायपावची आईसारखी काळजी घेतेय.

सलाम बॉम्बेच्या पडद्यावर नामदेव ढसाळांच्या गोलपिठ्यातली दुनिया अस्तव्यस्त पसरलेली असते. इथला ढसाळांच्या कवितेतल्यासारखा प्रत्येक हंगाम बेदर्दीचा असतो, इथं माणसं माणसांना खातात आणि पाठीवरले वळ टॅल्कम पावडरनं लपवले जातात. इथं फसवून आणलेल्या मुलींचं लग्न, घर, नवरा हे स्वप्न असतं. असंच स्वप्न दाखवून बाबा (नाना पाटेकर) सोलहा साल ( चंदा शर्मा) हिला या कुंटनखान्यात बसवतो. सोळाव्या वर्षातच तिला ‘बाई’ बनवण्याची तयारी सुरू असतानाच छोटा चायपाव तिला तिथून सटकायला मदत करतो, मात्र बाबाकडून पकडला जातो. बाबा नावाच्या या धंद्यातील दलालाचा भयानक बेरकीपणा नानानं सूरमा लावलेल्या डोळ्यातून पडदाभर उभा केलाय. तर कोर्टाबाहेर पत्र टाईप करून देणारा काही सेकंदाचा इरफान खानही लक्षात राहतो.

सलाम बॉम्बेचा पडदा माणूसपणाच्या भेसूर विडंबनाने भरून गेलेला आहे. काचेरी तावदानापलीकडून गिर्‍हाईकासोबत आईला पाहणार्‍या छोट्या मुलीच्या नखांचे काचेवर पडणारे ओरखडे चित्रपट पाहणार्‍यांच्या मनावरही पडतात. मिरा नायरनं सलाम बॉम्बे बनवताना प्रेक्षकांना बिलकूल माफ केलेलं नाही, हे असंच अस्तं…तसंच पाहावं लागेल, त्यातून सुटका नसते, मनगटावरल्या चमेली गजर्‍यात कोवळ्या कलेजीची शिकार करून शेवटच्या बसची वाट पाहणारे लोक सलाम बॉम्बेच्या पडद्यावर अनेकदा भेटतात. दिग्दर्शक मिरा नायर त्यांच्या तावडीत आपल्या बालपणाला एकटं सोडून अंधारगल्लीतून बेमालूम पसार होते.

चिल्ड्रन होममध्ये बालगुन्ह्याखाली दाखल झालेला चायपाव कृष्णानं आपलं बालपण खिशात जपून ठेवलंय. त्याच्या खिशात दोरी बांधलेला एक भोवरा कायम जपलेला आहे. चिलीम चरसी (रघुवीर यादव) च्या सांगण्यावरून गल्लीतल्या भिंतीतल्या निखळलेल्या विटेमागे दिवसभर बालमजुरी करून मिळवलेले पैसे कृष्णाने जमा केलेले असतात. या बँकेचा कृष्णा एकटाच मॅनेजर असल्याचं चिलीम त्याला सांगतो. दक्षिण मुंबईतल्या एका पारशाच्या घरातच त्याला लुबाडून कृष्णा म्हणजेच चायपाव आणि त्याचे छोटे साथीदार पसार होतात ते थेट श्रीदेवीचा मिस्टर इंडिया पहायला. पडद्यावरची श्रीदेवी ही या चायपावसारख्या पाकिटमारी, भुरटी चोरी करणार्‍या टोळीची खास ‘हवाहवाई आयटम’ असते. चायपावला चेला बनवून गांजा आणि ड्रग्जची नशिली दुनिया चिलीम नावाच्या गुरूकडून दाखवली जाते. कायम अमली पदार्थाच्या नशेत असलेला चिलीम मरीन लाईन्स स्टेशनवर भीक मागून फलाटावरच मरतो. नशा न मिळाल्याने पोटातल्या आतड्यांना पीळ पडल्याने होणार्‍या वेदनेतून सुटका करून घेण्यासाठी लोकलखाली स्वतःला संपवण्याची त्याची तीव्र इच्छा असताना चायपाव त्याला वाचवतो. पण चिलीम त्यानंतरही मरणारंच असतो. मेलेल्या चिलीमला जाळायला बाबा (नाना पाटेकर) पैसे देत नाही. त्यामुळे चायपाव म्हणजेच कृष्णाला त्याचा राग आलेला असतो. त्याच रागातून आणि देहविक्री करणार्‍या रेखासोबत झालेल्या वादात चायपाव बाबाच्या पाठीत सुरा खुपसून त्याला संपवून टाकतो, त्यानंतर जिवाच्या आकांतानं पळून गेलेला कृष्णा म्हणजेच चायपाव मरीन लाईन्सच्या एका गल्लीतल्या कोपर्‍यात थांबून खिशातला भोवरा काढून त्याला दोरी बांधू लागतो.

सलाम बॉम्बेतली माणसं, मुलं मुंबईतल्या गल्लीबोळात आताही दिसतात. व्हाईटनर लावलेला रुमाल घेऊन बिस्लेरी पाणी पिऊन फेकून दिलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करणारे नशेत जड झालेले बारीक डोळ्यांचे चायपाव रेल्वेलाईनीवर, स्टेशनच्या पुलाखालच्या बोळात आजही सापडतात. तर फलाटावर आताही रोज एक चिलीम चरसी मरत असतो. एखादी सोलहा साल आजही लालबत्तीच्या गॅलरीतल्या स्टुलवर बसलेली दिसू शकते. पत्र्याच्या खोलीत जरीकाम करण्यासाठी पळवून आणलेल्या लहान मुलांना अपंग करण्याची फॅक्टरी मुंबईतल्या एखाद्या गलिच्छ अंधारबोळात आजही सुरू असल्याच्या शक्यता असू शकते. नामदेव ढसाळच्या कवितेतली भादरून पेपरवेटमध्ये बंद केलेली माणसं सलाम बॉम्बेच्या पडद्यावरून आजही नाहीशी झालेली नसतात.