घरफिचर्समुंबई, नवी मुंबई, ठाण्यातील झोपड्या झाल्यात बांगलादेशी घुसखोरांचे अड्डे!

मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातील झोपड्या झाल्यात बांगलादेशी घुसखोरांचे अड्डे!

Subscribe

1985 च्या सुमारास कांदळवने तोडून प्रगती शाळा आणि त्याच्या मागे वीसेक झोपड्या होत्या. पुढे 5 वर्षांत ही संख्या 400 ते 500 च्या घरात गेली. लोकांच्या दबावाखाली सतत झोपड्या तोडल्या जात असूनही त्या पुन्हा बांधण्याचा वेग काही थांबत नव्हता. 2000 नंतर झोपड्यांचा हा आकडा वाढत गेला तो थेट 3 ते 5 हजारच्या आसपास जाऊन पोहचला. आता ही नवीन धारावी गजबजू लागली. शांत कन्नमवार नगर दिवसा ढवळ्या आणि रात्री बेरात्री मारामार्‍या, चोरीमारी, छेडछाडी आणि शरीरविक्रीच्या धंद्यापर्यंत भयानक गतीने पुढे सरकत होते. कन्नमवार नगर, दहिसर, कळवा, मुंब्यात कांदळवनांची केली जाते राजरोस कत्तल

कन्नमवार नगर, विक्रोळी येथे आम्ही 1986 ला राहायला आलो. चुनाभट्टीच्या चाळीमधून येथे राहायला येताना मिल कामगार असलेले माझे बाबा मागेपुढे करत होते. मिलच्या पगारात तीन मुलांचे शिक्षण आणि गावची जबाबदारी खांद्यावर असताना इमारतीत राहायला जाणे, परवडेल की नाही, ही भीती त्यांच्या भोवती कायम फेर धरून नाचत असावी. म्हणूनच 1973 मध्ये मिल कामगार म्हणून कन्नमवार नगरमध्ये घर मिळूनही 12 वर्षे येथे राहायला माझ्या बाबांची हिंमत होत नव्हती. कायम भाड्याने खोली देऊन ते वेळ मारून नेत होते. मात्र, गरिबीबरोबर हात धरून आलेला अंगभूत प्रामाणिकपणा म्हणा. आमच्या विक्रोळीच्या घरात एक भला माणूस दहापेक्षा जास्त वर्षे राहिला होता. दक्षिण भारतीय आणि इंजिनियर असलेला हा देवमाणूस वडील भाडे आणायला गेले की त्यांना न चुकता पैसे तर द्यायचा, पण विश्वास द्यायचा. ‘परब कधीही तुम्ही सांगा मला राहायला यायचे आहे, मी खोली खाली करतो. पण, तुम्ही येईपर्यंत मीच येथेच राहणार.

मी कुठेही जाणार नाही. मात्र तुमची खोली मी बळकावेन, असा विचारही कधी मनात आणू नका’. कारण हा भागच शांतपणे जगण्यासाठी अतिशय उत्तम होता. रहदारीचा गजबजाट नाही, उत्तम नागरी सुविधा आणि चारी बाजूंनी झाडेच, झाडे! आम्ही राहत असलेल्या इमारती शेजारून वाहणारी खाडी आणि त्याच्यापलीकडे कांदळवन. इतके बहरलेले की थेट वाशीच्या खाडीपर्यंत पसरलेले. अनेकविध पक्षी आणि वाशीहून रोज मासेमारी करण्यासाठी येणारे कोळी बांधव हे चित्र सुखावणारे होते. पावसाळ्याआधी कष्टकरी महिला पार लांबून ठाणे आणि त्याच्यापलीकडून लाकूडफाटा जमा करण्यासाठी पहाटे कांदळवनात येत. तिवरांच्या वरच्या फांद्या मारून त्याच्या मोळ्या करून दिवस उजडताच परतीचा रस्ता धरत… एकूणच निसर्ग आणि नागरी वस्तीचा एक छान कोलाज असे चित्र म्हणजे माझे कन्नमवार होते! मात्र 2000 पासून हे निसर्गचित्र खरडवून काढायला सुरूवात झाली.

- Advertisement -

आधी आमच्या मागे पाच इमारती सोडून कांदळवन तोडून प्रगती विद्यालय उभे राहिले. 1986 च्या आसपास असेल. एक दोनदा या अनधिकृत शाळेच्या खोल्या तोडल्या. पण, त्या पुन्हा उभ्या राहत असल्यामुळे परिसरातील झोपडपट्टीदादांनी झोपड्या बांधायला सुरुवात केली. रातोरात झोपड्या बांधल्या जाऊ लागल्या. टेम्पोमधून रात्री पत्रे, बांबू, ताडपत्री सामान यायचे आणि सकाळी झोपडी तयार. 20-30 हजारांपासून ते पुढच्या किमतीत झोपड्या विकल्या जात होत्या. कुठलीच सुविधा नाही, तेथे राहणारे पाण्यासाठी दिवसभर कन्नमवार नगरात फिरत असत. याचा फायदा घेऊन काही लोकांनी पाणी विकण्याचा धंदा सुरू केला. काही माणसे माणुसकीच्या नात्याने एक दोन हंडे असेच देत होते. तसेच चोरून लाईटही घेतली गेली. कन्नमवारच्या लोकांच्या नाकावर टिच्चून एक नवीन धारावी झोपडपट्टी उभी राहत होती. या विरोधात रहिवाशांनी पेपर, पोलीस, कलेक्टर, महापालिका यांच्याकडे सातत्याने तक्रारी केल्या. याची दखल घेऊन कारवाई होत होती, पण तोडलेल्या 50 झोपड्यांच्या जागी डबल 100 झोपड्या बांधल्या जात होत्या. भयानक संक्रमणातून कन्नमवार चालले होते. स्थानिक मंडळे आणि रहिवाशांनी उपोषण, मोर्चे काढले खरे, पण त्याचा काही परिणाम होत नव्हता.

1985 च्या सुमारास कांदळवने तोडून प्रगती शाळा आणि त्याच्या मागे वीसेक झोपड्या होत्या. पुढे 5 वर्षांत ही संख्या 400 ते 500 च्या घरात गेली. लोकांच्या दबावाखाली सतत झोपड्या तोडल्या जात असूनही त्या पुन्हा बांधण्याचा वेग काही थांबत नव्हता. 2000 नंतर झोपड्यांचा हा आकडा वाढत गेला तो थेट 3 ते 5 हजारच्या आसपास जाऊन पोहचला. आता ही नवीन धारावी गजबजू लागली. शांत कन्नमवार नगर दिवसा ढवळ्या आणि रात्री बेरात्री मारामार्‍या, चोरीमारी, छेडछाडी आणि शरीरविक्रीच्या धंद्यापर्यंत भयानक गतीने पुढे सरकत होते. दोन चार दिवस घर बंद करून कोणी गेले की इमारतीमधील त्याचे घर साफ केलेले असायचे. पोलीस नावापुरते उरले होते. मुंबई महापालिका कलेक्टरकडे आणि कलेक्टर वन विभागाकडे बोट दाखवून हात वर करत होते. मनसेचे त्यावेळचे आमदार मंगेश सांगळे यांनी हा विषय थेट विधानसभेपर्यंत नेत सरकारचे डोळे उघडले आणि सर्व शासकीय यंत्रणांनी मिळून 8 वर्षांपूर्वी 400 च्यावर झोपड्या तोडल्या आणि कामात हलगर्जीपणा करणार्‍या काही अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले.

- Advertisement -

याचबरोबर कलेक्टर आणि वन विभागाची हद्द निश्चित करून झोपड्या यापुढे वाढू नयेत म्हणून कांदळवनात मोठे खड्डे मारण्यात आले. खाडीचा परिसर असल्याने या खड्ड्यात भरतीचे पाणी भरून तेथे वस्ती उभी राहणार नाही, अशी ही व्यवस्था होती. पण, झोपडपट्टीतील लोक अतिशय चिवट होते, त्यांच्या अनधिकृत झोपड्या तोडल्या गेल्यानंतर त्यांनी थेट रस्त्यांवर मुक्काम ठोकला. 10 ते 15 दिवस ही माणसे उघड्यावर बिनधास्त राहत होती. इमारतीतील लोकांच्या समोर बसून आपली सगळी कामे करत होती. कसलीच लाज लज्जा नव्हती. याच दरम्यान झोपडपट्टीतील एका राजकीय कार्यकर्त्याच्या मुलाचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला आणि हे कारण वातावरण पेटण्यास कारणीभूत ठरले. कलेक्टर आणि वनविभागाविरोधात उपोषण आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे उपोषणकर्त्या झोपडपट्टीवाल्यांच्या बाजूने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर उभ्या राहिल्या आणि खड्डे मारणार्‍या अधिकार्‍यांना निलंबित करत नाही तोवर उपोषण मागे न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मेधा पाटकरांमुळे आंदोलनाची धग वाढली आणि शेवटी काही शासकीय अधिकारी निलंबित झाले.

या प्रकारामुळे सरकारी यंत्रणा बॅकफूटवर गेली ती आजतागायत. कोणीच काही कारवाई करायला तयार नाही. 8 वर्षांपूर्वी झालेल्या या प्रकारानंतर प्रचंड वेगाने झोपड्या वाढल्या आणि आता 5 हजारांवर जाऊन पोहचल्या आहेत. मेधा दोन दिवस येऊन आणि चार अधिकार्‍यांना निलंबित करून गेली खरी, पण एका नवीन धारावी झोपडपट्टीची निर्मिती होऊन गेली! नर्मदा आंदोलन ते मुंबईतील झोपडपट्ट्या आणि एसआरए प्रकरणे हा मेधाचा आंदोलन प्रवास डोके बधीर करणारा आहे. एखाद्या पंतप्रधानाने नगरसेवकाच्या निवडणुकीला उभे राहण्यासारखे आहे. आधी पुनर्वसन, मगच धरण हा विषय जागतिक स्तरावर नेऊन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे नियम बदलून टाकत भूमीपुत्रांना मोठा आधार देणार्‍या मेधाला कन्नमवार नगरचे मूळ रहिवासी जे कर भरत आहेत, त्यांच्या अडचणी, प्रश्न कधी दिसले नाहीत. त्यांच्या बोडक्यावर बसलेल्या अनिधिकृत झोपडपट्टीवाल्यांचे मगरीचे अश्रू मात्र दिसले. कन्नमवारची दुसरी धारावी होण्यात राजकीय पक्षांचा जेवढा हात आहे, तितकीच या सगळ्याला मेधाही कारणीभूत आहे.

माझे एकेकाळचे पत्रकार सहकारी आणि गेली काही वर्षे जनता दलाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी मेधासह सर्वत्र विखुरलेल्या समाजवादी कार्यकर्त्यांना एका झेंड्याखाली एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्तरीच्या दशकाप्रमाणे आश्वासक पुरोगामी वातावरण तयार करण्याचे आवाहन केले होते. विशेष म्हणजे प्रभाकरने मेधाला राजापूर या एकेकाळच्या समाजवाद्यांच्या बालेकिल्यामधून उभे राहण्याची विनंती केली होती, पण मेधा काही ऐकली नाही आणि इतरही समाजवादी कार्यकर्ते फक्त प्रचंड विचारांची घुसळण करत काहीही निर्णय न घेता बाहेर पडले. नंतर प्रभाकरला राजापूरमधून निवडणुकीला उभे राहण्यासाठी नकार देणारी मेधा 2014 च्या निवडणुकीत मात्र आमच्या ईशान्य मुंबईतून योगेंद्र सिंह यांच्या पुढाकाराने उभी राहिली. मात्र ती काही जिंकू शकली नाही. विक्रोळीमधून तिला लोकांनी अजिबात मतदान केले नाही. समाजवादी विचारांची बांधिलकी मानत असतानाही मीसुद्धा अनधिकृत झोपड्यांचा राग मनात ठेवून तिला मत टाकले नाही.

2010 नंतर वेगाने वाढत चाललेले कन्नमवार नगर या झोपडपट्टीचा पुढे एक वेगळा नगरसेवक वॉर्ड तर होईलच, पण तो आणखी काही वर्षांनी एक वेगळा विधानसभा मतदारसंघ होईल. सर्वात भयानक म्हणजे या झोपडपट्टीत मोठ्या संख्येने बांगलादेशी आहेत. मानखुर्द, गोवंडी, वांद्रे, कळवा, मुंब्रा, नवी मुंबई, दहिसर आणि सायन धारावीमध्ये सध्या राहत असलेल्या घुसखोर बांगलादेशी लोकांचे हे नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. कोलकात्यातील ही घुसखोर मंडळी असून एका सर्व्हेनुसार पश्चिम बंगालमधील सत्ताधार्‍यांच्या आशीर्वादाने काही ग्राम पंचायतींमध्ये ठरवून बांगलादेशी घुसखोरांच्या वस्त्या वसवण्यात आल्या. ग्रामपंचायतींमध्ये त्यांच्या जन्म-मृत्यूच्या नोंदी घालण्यात आल्या. त्यांना भारताचे नागरिक बनवण्यात आले. आसामप्रमाणे आता पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरांचे मतदारसंघ तयार केले जात आहेत. हेच आता आपल्या ताकदीने कोणाचे सरकार बनवायचे हे ठरवणार आहेत. विक्रोळी, कन्नमवारही त्याच दिशेने चालले आहे. दहिसर कांदरपाडाही आधीच त्या वाटेवर गेला आहे.

या सर्व घुसखोरांना आपल्या भ्रष्टाचारी व्यवस्थेमुळे झटपट रेशनकार्ड,आधारकार्ड, इलेक्शन कार्ड झटपट मिळत आहेत आणि ही कीड वाळवीसारखी पसरत चालली आहे. आता तुम्हाला कुठलीही हत्यारे पाहिजे असतील तर दहिसर कांदरपाड्याचे गणपत पाटील नगर गाठा. पिस्तुलपासून तलवारीपर्यंत सर्व काही मिळणार. पुढची भयानक बाब म्हणजे ही हत्यारे बनवण्याचे येथे कारखाने आहेत. हे कमी म्हणून की काय कोकेन, गांजा, अफू, नशेच्या सर्व प्रकारच्या गोळ्या येथे मिळतात. एका अराजकतेची ही सुरुवात आहे. शिवसेना, भाजप, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं अशा सगळ्याच पक्षांचे लोक झटपट श्रीमंत होण्यासाठी विक्रोळी,दहिसर,कळवा,मुंब्रा,नवी मुंबईत झोपडपट्ट्या बांधत आहेत. त्यांना कसलाच धरबंद उरलेला नाही. कांदळवने तोडणे हा गुन्हा आहे. त्यासाठी न्यायालयाने शिक्षेची तरतूद केली असतानाही या सर्वोच्च न्याय व्यवस्थेच्या निकालाचा आदेश धुडकावून लावत तिवरांच्या झाडांच्या जागी झोपड्या उभ्या राहत असतील तर मुंबई ज्वालामुखीच्या तोंडावर उभी राहत आहे आणि भविष्यात त्याचा स्फोट होऊन ती बेचिराख होईल…!

 सर्वात भयानक म्हणजे कन्नमवार नगरमधील या झोपडपट्टीत मोठ्या संख्येने बांगलादेशी आहेत. मानखुर्द, गोवंडी, वांद्रे, कळवा, मुंब्रा, नवी मुंबई, दहिसर आणि सायन धारावीमध्ये सध्या राहत असलेल्या घुसखोर बांगलादेशी लोकांचे हे नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -