रात्रीस खेळ चाले…अर्थात नाईट लाईफ…!

जगात सगळ्याच देशांनी सध्या पर्यटनाला जास्त महत्त्व दिला आहे. आज मुंबईच्या पर्यटनाची भुरळ जगाला आहे पण त्यासाठी आपण त्यांना काय देऊ शकतो. कारण हा पर्यटक अ‍ॅव्हरेज 36 तासांसाठी मुंबईत थांबतो, त्यात तो आपली भ्रमंती करतो आणि खरेदीला वेळ न मिळाल्याने किंवा त्याच्या वेळेत खरेदी स्थळं बंद असल्याने तो खरेदीविनाच आपला प्रवास आटोपता घेतो. जर त्याला खरेदीसाठी त्याच्या वेळेनुसार सुरक्षित पर्याय मिळणार असेल तर तो दिवसा भ्रमंतीही करेल आणि रात्रीची खरेदीही. याचा अर्थ आपल्याला त्याचा दुहेरी फायदा घेता येईल.

Mumbai

मुंबई हे एका धावत्या शहराचं नाव. हे शहर सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र असं चारही प्रहारात नुसतं धावतचं असतं. हे धावणं असतं फक्त आपल्यासाठी आणि आपल्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी. माणसं या शहरात येतात, येथेच राहतात आणि या शहराच्या नियमाप्रमाणे पळूही लागतात. त्यांना मी सगळ्यांसाठीच आहे पण माझ्यासाठी कोण? असा स्वार्थी प्रश्न पडण्याचा अवधीदेखील हे शहर त्यांना देत नाही. याच लोकांच्या गरजांचा विचार करून ‘नाईट लाईफ’ ही संकल्पना या मुंबापुरीत अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारत हा जसा क्रांतिकारकांचा, नावीन्याची कास धरणा-यांचा, कष्टक-यांचा आणि स्वाभिमानातून जगणा-यांचा देश आहे, तसाच तो राजकारण्यांचा देखील देश आहे. आजच्या घडीला कोणत्याही गोष्टीवरून राजकारण करण्याचा जणू पायंडाच पडत चाललाय, मग ते युगपुरुषांच्या नावे असू देत नाहीतर रोजच्या घडणा-या घटनातून निर्माण होणा-या पेचप्रसंगांचे असू देत, आपल्याला काहीतरी खळबळजनक करायला मिळतंय ना यातच हे राजकारणी सुख मानत आहेत.

खरं पाहता नाईट लाईफ म्हणजे काय? तर नाइट लाइफ म्हणजे माणसांच्या ज्या गरजा (नैतिक/अनैतिक) दिवसा पूर्ण होत नाहीत, त्यांच्यासाठी रात्रीची केलेली तरतूद म्हणजे नाईट लाईफ..! ही एक साधी, सोपी आणि सरळ संकल्पना आहे.

आपल्याकडे आजच्या घडीला नाईट लाईफ या शब्दाचा अर्थ म्हणजे पब, बार डिस्कोमध्ये यांच्यामध्ये म्युझिकच्या तालावर बेधुंद थिरकणारी पाऊलं, मद्याचा आस्वाद घेत रात्र रंगीन करणा-या लोकांचा समूह, कॅसिनोमध्ये दौलतजादा करणारे अमीर लोकं, रात्री अपरात्री मद्याच्या अमलाखाली घरी धडपडत परतणारी माणसं… असंच काहीसं चित्र मिडियाने रंगवलेलं आहे.

खरंच ‘नाईट लाईफ’ ही संकल्पना आपल्यासाठी नवीन आहे का? नक्कीच नाही, अगदी अश्मयुगापासून आपल्याकडे ही रात्र नाचगाण्याच्या माध्यमातून रंगवली जायची. त्यावेळी त्या रात्रीचा अर्थ फक्त मनोरंजन आणि श्रम परिहार असाच होता.
पुढे आपण यशाचं साजरीकरण आणि दु:खाचं विस्मरण करण्यासाठी सणांची निर्मिती केली. भारत त्यातल्या त्यात महाराष्ट्र हा अनेक सणांच साजरीकरण करणारा प्रांत आहे. जेव्हढे सण आपल्याकडे साजरे केले जातात, तेव्हढे किंचितच कुठल्या देशात साजरे केले जात असतीलच. मग तो 10 दिवसांचा गणपती उत्सव असू देत, 9 दिवसांची नवचंडी (नवरात्र) यज्ञ असू देत, 1 महिन्यांचा रमजान असो वा 5 दिवसांचा ख्रिसमस हे सगळे सण बहुतांशी रात्रीच्या झगमगाटात आणि दिव्यांच्या रोषणाईमध्येच साजरे केले जातात. तरीही थोडंसं मागे वळून पाहून, महाराष्ट्रातील बहुतांशी खेड्यांमध्ये वर्षातून गावजत्रा/यात्रा हा दोन ते पाच दिवसांचा सण साजरा केला जातो. यात प्रामुख्याने दोन भाग असतात, एक यजमान आपल्या पाहुणे-रावळ्यांना, नव-या घरी गेलेल्या लेकीबाळा आमंत्रण देऊन बोलावून घेतात, यातून सर्वांची हौसेमौजही होते आणि सामाजिक बांधिलकी तसेच नातेसंबंधही दृढ केले जातात.

त्या दोन/पाच दिवसांच्या नियोजनामध्ये दिवसा बैलगाडा शर्यती, छकडा शर्यती, घोडा शर्यती, रेड्यांची झुंज त्याचप्रमाणे पैलवानासाठी मदुर्मकी दाखवणारे आखाडे किंव्हा स्थानिक कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी तयार केलेला मंच याची भरमार नियोजित केलेली असते. या निमित्ताने अनेक परगावचे लोक त्या यजमान गावांना फक्त व्यापाराच्या दृष्टीकोनातूनही हजेरी लावतात, या दोन दिवसांच्या सणातून त्या गावात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. दिवसभर पाहुणे-रावळ्यांचे खातिरदारी करून थकलेले जीव, रात्री मात्र भारुड अथवा तमाशा यासारख्या मनोरंजानाच्या साधनातून स्वत:ला वर्षभरासाठी ताजेतवाने करून घेतात. त्यावेळी गावातीलच नव्हे तर पंचक्रोशीतला माणूस देखील त्या फडाच्या आजूबाजूला रेंगाळतो, त्याचवेळी तिथे अनेक छोट-मोठे व्यापारी आपले ठेले लावतात, त्यांचा देखील जेव्हढा धंदा दिवसा होत नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने गल्ला हा रात्रीचा फुगतो. त्यासाठी त्याला कधी-कधी गावगुंडांच्या, तानाशाही करणा-या लोकांच्या रोषाला सामोरीही देखील जावं लागतं, परंतु सुरक्षितेची यंत्रणा त्या रात्री गावात असल्याने या गुंडापुंडांचं जास्त फावत नाही.

हे झालं गावाकडचं परंतु शहरात देखील पूर्वी पहाटेपर्यंत बुवांची कीर्तने रंगायची, कव्वालीचे सामने व्हायचे, गरबा-रास दांडिया खेळला जायचा (गेल्या काही वर्षात त्यावर बंदी आलेली आहे), पुण्यासारख्या सांस्कृतिक चेहरा असणा-या शहरात देखील बालगंधर्व महोत्सव रंगयाचाच ना. हेही देखील खर्‍या अर्थाने नाईट लाईफच आहे! पण त्याला सांस्कृतिक बाज दिल्याने आजच्या नाईट लाईफच्या टिपिकल व्याख्येत हे उपक्रम मोडत नाहीत म्हणून आपला त्या कल्पनेला विरोध असू शकेल.

मुंबई कधीच थांबली नाही तरीही 1982 ला संपामुळे बंद पडलेल्या कापड-गिरण्यांमुळे तीन पाळीचे भोंगे मात्र बंद पडले आणि मध्यरात्रीची हालचाल थोड्याप्रमाणात का होईना कमी झाली. नाहीतर मुंबई सातत्याने चालूच होती. त्यावेळी मिल गेटच्या आजूबाजूला खाण्या-पिण्याच्या (गरजेच्या) वस्तूंची रेलचेल असायची. मुंबई कधीच थांबत नाही फक्त रेल्वेमुळे थोडी 3-4 तासांची विश्रांती घेते. रेल्वेमुळे नुसता प्रवास थांबतो, त्यावेळीदेखील कितीतरी प्रवासी हे प्लॅटफॉर्मवर रेंगाळताना दिसतात. शिवाय खाण्या-पिण्याच्या वस्तू उपलब्ध नसल्याने त्यांना उपाशी रहावं लागतं अन्यथा जी महागडी हॉटेल्स रात्रभर चालू असतात तेथे तरी जास्त पैसे खर्च करावे लागतात.

तीन पाळ्यांमध्ये चालणारी मुंबई दोन पाळ्यांमध्ये चालू लागली कारण नोक-यांची नवनिर्मिती थांबली. आज भारतात येणा-या पर्यटकांमध्ये सर्वात जास्त पर्यटक मुंबईला भेट देतात, परंतु त्यांच्यावर वेळेची बंधनं असल्याने त्यांना पर्यटन तर करता येतं पण खरेदी मात्र राहून जाते. अशा वेळी जर त्यांना सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला तर तेही खरेदी करतील. परिणामी रात्रीची सुविधा मिळाल्याने जसे पर्यटक सुखावतील तसेच त्यांना सेवा पुरवणा-या संस्था (शासकीय अथवा वैयक्तिक) यांना देखील आर्थिक फायदा होऊ शकतो. त्याचवेळी किरकोळ दुकानदार, हॉटेल्स व्यावसायिक, चाट-मसाल्याचे ठेलेवाले ते अगदी रस्त्यावर चाय पाणी विक्रेत्यांना देखील रोजगार उपलब्ध होतील. याचमुळे आपल्या देशाच्या चलनात थोडी तरी वाढ होऊ शकते.

आज जेंव्हा माननीय पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील नाइट लाइफचे बिगुल राज्य सरकारने वाजवलंय तेंव्हापासून पुन्हा एकदा नाईट लाईफची जोरदार चर्चा रंगू लागलीये. काहींनी याच स्वागत केले, तर नियमांप्रमाणे विरोधी पक्षांनी याच्यावर टीकेची झोड उठवली आहे. कुणाला यात आर्थिक गणितांची मांडणी दिसली तर कुणाला बलात्कार घडणारे प्रसंग दिसले. हे सगळं हेतुपुरस्सर अथवा राजकीय पक्षाची बाजू मांडण्याचा प्रयत्न.

हे झाली नुसती उदाहरणं पण खरंच का आपल्याला नाइट लाइफ नको आहे का?. थोडंसं डोळसपणे विचार करायला हवा. आज मुंबई शहरातील बहुतेक कामगारांची कामाची वेळ ही 9-10 तास ही ठरलेली आहे, शिवाय 2-4 तासांचा प्रवास हा त्यासाठीच करावा लागतो. यातून त्याला ना घरच्यांना वेळ देता येतो ना त्यांच्या गरजेनुसार त्यांच्यासोबत उभं राहता येतं. त्यांच्या नशिबी फक्त रोजचं जाणं आणि येणंच लिहिलेलं असतं. जर त्याला त्याच्या मनोरंजनासाठी अथवा कौटुंबिक खरेदीसाठी जायचं असेल तर त्यासाठी सुविधा नाही किंवा जेथे सुविधा आहे तेथे तो कुटुंबाला घेऊन शकत नाही. याचाच अर्थ आज आपल्याला कुटुंबाविनाच जगता यायला हवं. आज वेळेअभावी कुटुंबातील बहुतेक लोकांचा (नवरा-बायको) एकमेकांशी संवाद तुटत चाललाय, त्यातून एकमेकांबद्दल भ्रम निर्माण होत आहेत. यामागची कारणं काय आहेत, तर योग्य वेळेला अथवा त्यांच्या गरजेला ही काम करणारी व्यक्ती त्यांच्यासोबत नसते.

गेल्या काही वर्षात पुन्हा एकदा रात्रीला डोळे फुटले जेंव्हा आपल्या या शहरामध्ये ‘कॉल सेंटर’ चं अस्तित्व निर्माण झालं. त्याने अमेरिकेच्या धर्तीवर काम करण्याच्या पद्धतीमुळे तरुणांच्या हातात पैसा खुळखुळू लागला आणि रात्री जगण्या-यांच्या संख्येत वाढ झाली. तेंव्हा देखील त्या कामाच्या ठिकाणी लोकांना खाण्या-पिण्याचे अनेक पदार्थ सहज उपलब्ध होऊ लागले आणि त्याच वेळी आपल्या पारंपरिक पदार्थापेक्षा पिज्जा, बर्गर, पास्ता अशा परदेशी पदार्थाचा शिरकाव आपल्या देशात मोठ्या प्रमाणात झाला. ती जशी एक क्रांती होती तशीच देशाच्या आर्थिक वाढीची देखील बाब असल्याने सरकारने त्या ठिकाणांना मोठ्या प्रमाणात सुरक्षितता प्रधान केली. हा त्यातून अप्लावाधीतच जास्त पैसा गाठीशी आल्याने, पैशांचं नियोजन चुकलं म्हणा नाहीतर परदेशी संस्कृती बोकाळली म्हणा पण तिथे काम करणारी माणसं (स्त्री-पुरुष दोघेही) व्यसनाधीन झाली अथवा मॉर्डन रहाण्याची नावाखाली त्यांना तसं करायला सुरवात केली आणि यातूनच पब या संस्कृतीचा शिरकाव आपल्या देशात झाला. तरीही तो व्यापारी दृष्टीकोनातून धरल्याने आज सरकारी तिजोरीत मोठ्या प्रमाणात तेथूनच चलन उभं राहत आहे ही देखील वस्तुस्थिती आहे.

आज आपण इंटरनेटच्या जाळ्यात गुरफटत चाललोय, नेटवर पूर्वी फक्त माहिती उपलब्ध होत होती पण आज गरजेच्या आणि मनोरंजनाच्या सगळ्याच गोष्टींची भरमार नेटवर 24 तासांसाठी उपलब्ध झाल्याने लोकांसाठी खरेदीचा एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. जेंव्हा शहरातली दिवसाची दुकानदारी बंद होते तेंव्हा देखील ऑनलाईनच्या नावाखाली चालणारी फसवणूक यंत्रणा चालूच असते. त्यांच्यावर वेळेची कोणतीही बंधनं नाहीत शिवाय वेळेच्या अभावा मुळे ग्राहकाला खरेदीचा तोच एक पर्याय उपलब्ध असल्याने नाईलाजास्तव गरजेच्या वस्तूंची खरेदी करावी लागते. शिवाय तेथे फसवणूक मोठ्या प्रमाणात होत असते पण दाद कुणाकडे आणि कशी मागणार.

जर समजा ही नाईट लाईफ चालू झाले तर नक्कीच काही जीव सुखावतील अर्थात यातून गैरफायदा घेणारेही असतील. तरीही खाण्या-पिण्याच्या गोष्टींव्यतिरिक्त घरगुती सामानांची दुकाने, कपड्याची दुकाने तसेच इतर सामानांची दुकाने जर रात्री उघडी राहिली तर नक्कीच आजच्या धकाधकीच्या जीवनात अडकलेल्या माणसाला आपल्या गरजांप्रमाणे खरेदी करता येईल. त्याला जे हवंय ते मिळवता येईल. शिवाय रात्री बाहेर पडणा-या माणसांमध्ये कुटुंबाला बाहेर घेऊन जाणा-या माणसांची संख्या देखील जास्त असेल. तीही स्वत:च्या सुरक्षतेची काळजी घेऊनच. कदाचित या रात्री फिरणा-या निशाचारांमुळे लोकांची सुरक्षितता धोक्यात येण्यापेक्षा तिला अजून बळकटी येईल. कारण जेथे सुरक्षितेची यंत्रणा नसते तेथेच अनधिकृत वा घातकी कृत्य घडवली जातात, पण तेथे माणसांचा वावर वाढल्याने तशी कृत्य घडणं बंदही होऊ शकतं.

जगात सगळ्याच देशांनी सध्या पर्यटनाला जास्त महत्त्व दिला आहे. आज मुंबईच्या पर्यटनाची भुरळ जगाला आहे पण त्यासाठी आपण त्यांना काय देऊ शकतो. कारण हा पर्यटक अ‍ॅव्हरेज 36 तासांसाठी मुंबईत थांबतो, त्यात तो आपली भ्रमंती करतो आणि खरेदीला वेळ न मिळाल्याने किंवा त्याच्या वेळेत खरेदी स्थळं बंद असल्याने तो खरेदीविनाच आपला प्रवास आटोपता घेतो. जर त्याला खरेदीसाठी त्याच्या वेळेनुसार सुरक्षित पर्याय मिळणार असेल तर तो दिवसा भ्रमंतीही करेल आणि रात्रीची खरेदीही. याचा अर्थ आपल्याला त्याचा दुहेरी फायदा घेता येईल.

आज जे आपण करू पाहतोय ते इतर देशांमध्ये केंव्हापासून रुजलेलं आहे. काही देश तर फक्त पर्यटनावर उपजीविका करत असल्याने त्यांच्याकडे पर्यटकांना प्राथमिक प्राधान्य दिलं जातं आणि त्यांच्या सोईनुसार सगळ्याच गोष्टींची उपलब्धता करून दिली असल्याने, पर्यटक पर्यटनाबरोबर भरपूर खरेदी करतात. शेवटी महत्त्वाचं काय तर देशीय आणि आंतरदेशीय चलन उपलब्ध होणे व आपल्या स्थानिकांना रोजगार मिळणे. नाइट लाइफमुळे त्या देशात या दोन्हीही गोष्टींची पूर्तता होते आणि देशाच्या आर्थिक उन्नतीला देखील हातभार लागतो.

जश्या नाण्याला दोन बाजू आहेत तश्या समाजातल्या प्रत्येक घटनेला दोन बाजू असतात. दिवसा काम करणं ही शरीराची गरज असली तरी रात्रीची झोप ही मनाची आणि शरीर यंत्रणेची गरज असते. हे निसर्ग चक्र आहे, जर आपण यालाच बदलवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा वाईट परिणाम हा आपल्या शरीरावर होत असतो. रात्रीचं जागरण करणा-यांना डायबेटीस आणि उच्च रक्तदाब यांचा सामना करावा लागतो. त्याच प्रमाणे सुरक्षेच्या यंत्रणेवर तेथील भार पडेल त्याच प्रमाणे अनुचित परका घडण्याची देखील शक्यता निर्माण होईल.

कोणत्यही गोष्टीचं नाविन्य टिकवण्यासाठी तिची उपलब्धता मर्यादित असायलाच हवी नाहीतर रोज मिळणा-या गोष्टितल नाविन्य आणि कौतुक संपुष्टात येतं. आज आपल्याकडे ग्रामीण असो वा शहरी भाग, आठवडे बाजार ही संकल्पना खूप वर्षांपासून यशस्वीरीत्या चालू आहे. रोजची उघडी असणारी दुकानं व त्यात मिळणा-या वस्तूंमध्ये आणि फक्त आठवडे बाजार उपलब्ध होणा-या वस्तूंमध्ये बरीच तफावत असली तरी लोकं आवर्जून आठवडे बाजाराची वाट पाहतात आणि दिवशी मुद्दामहून बाजारात जाण्याचा अट्टाहास धरतात. बरीच लोकं गरजेच्या वस्तू खरेदी करतात पण काही मंडळी फक्त मनोरंजनासाठी आणि काहीतरी नाविन्यपूर्ण बघण्यासाठी या बाजारात फेरफटका मारतात. तरीही अनाठाई का होईना पण दोन-चार खाण्याचे पदार्थ पोटात ढकलतातच.

जर हाच आठवडे बाजार रोज उघडू लागला तर नक्क्कीच त्यातलं नाविन्यपण मारून जाईल. याच धर्तीवर नाइट लाइफ ही संकल्पना जर विकएंड अर्थात शुक्रवारची आणि शनिवारची रात्र यामध्येच राबवली तर नक्कीच यात रोमांचकता आणता येईल. विदेशी पर्यटकांबरोबर स्थानिक देखील खरेदीसाठी अथवा निव्वळ जीवाची मुंबई करण्यासाठी बाहेर पडतील. एकदा हे का सुनिश्चित झालं तर देशीय आणि आंतरदेशीय पर्यटक देखील त्यांच्या वेळेचं नियोजन आपल्याला अपेक्षित तसचं करतील. म्हणजे गणेशोत्सवातलं 10 दिवसांचं नाविन्य असो वा रमजान मधील 30 दिवसांचं नाविन्य, हे जर वर्षाने सगळेच दिवस घडणारं असेल तर लोकं त्याला कंटाळतील. त्यामुळे नाइट लाइफ ही संकल्पना रोजची करण्यापेक्षा आठवडे बाजाराप्रमाणे दोन रात्रींची केली तर कदाचित आज जे उद्धिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन हे करायचा घाट घातला जातोय ते उद्धिष्ट पूर्ण होऊ शकतं कारण कोणत्याही गोष्टीतलं नाविन्य संपलं की ती गोष्ट अडगळीची अथवा अडचणीची ठरू शकते हेच खरं…!

-भानुदास तानाजी पानमंद
-प्राध्यापक – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (मुंबई)