घरफिचर्स...सचिनदा!

…सचिनदा!

Subscribe

सचिनदा स्वत: गाणं छान गायचे. त्यामुळे आपली चाल हार्मोनियमवर वाजवून ते थांबायचे नाहीत. कोणता शब्द कोणत्या भावभावनेतून गायला हवा हेही ते गायक-गायिकांना समजावून सांगायचे आणि तसाच ते रेकॉर्डिंगला त्यांच्याकडून तसाच्या तसा घासूनपुसून गाऊन घ्यायचे. ‘वहाँ कौन हैं तेरा’, ‘प्रेम के पुजारी हैं हम’, ‘मेरी दुनिया हैं माँ’, ‘सफल होगी तेरी आराधना’ ह्यासारखी गाणी त्यांनी गायली. ऐकणार्‍याच्या आत कुठे तरी पोहोचवली.

संगीतकार सचिन देव बर्मननी एखाद्या सिनेमाचं काम हातात घेतलं की दिवसरात्र ते त्या सिनेमाचे होऊन जायचे. त्या सिनेमाची गाणी त्यांना चोवीस तास आपल्या नजरेसमोर दिसू लागायची. त्यातच त्या सिनेमातल्या एखाद्या गाण्याचा मुखडा आणि अंतरा नक्की झाला की त्या संपूर्ण गाण्यासाठी वाद्यं कोणती वापरायची ह्याचे वेध त्यांना लागायचे. सचिन देव बर्मन हे आपल्या गाण्यात कोणती वाद्यं वापरायची ह्याबद्दल बिलकूल चोखंदळ असायचे. शोबाजी करण्यासाठी अव्वाच्या सव्वा वाद्यं वापरण्याच्या ते विरोधात असायचे. वाद्यमेळाने गाणं सजवणं आणि स्त्रीने स्वत:ला सजवणं ह्यात एक साम्य आहे असं ते म्हणायचे. एखाद्या स्त्रीने तितकंच कुंकू, तितकीच पावडर, तितकाच सिंधुर, तितकेच दागिने वापरून तितकाच मेपअप केला तर ती सुटसुटीत दिसते आणि नेमकं त्याउलट केलं तर ती बटबटीत दिसते. गाण्याचंही तसंच आहे असं त्यांचं म्हणणं असायचं. त्यामुळेच असेल कदाचित, पण सचिनदांचं आपल्या भारतीय वाद्यांवर जास्त प्रेम असायचं. त्यांना आपल्या मातीतल्या संगीताची जास्त ओढ असायची. त्यात लहानपणापासून त्यांच्या कानावर बंगाली संगीताचे सूर पडले होते. त्यामुळे त्यांच्या संगीतवेड्या मनाची जडणघडण ही त्याप्रकारे झाली होती.

त्यांनी त्यांच्या गाण्यासाठी एकदा का म्युझिक अ‍ॅरेंजरला बोलावणं धाडलं आणि त्यांनी त्याला आपल्या गाण्याची रूपरेषा सांगितली की आपल्या गाण्यात तो कोणत्या वाद्यांची जंत्री वापरणार आहे ह्याच्याकडे सचिनदांचं काटेकोर लक्ष असायचं. मोजक्या वाद्यांच्या पलिकडे एक जरी वाद्य त्या यादीत आलं तर म्युझिक अ‍ॅरेंजरला ते वाद्य काढायला लावायचे. पण काही वेळा त्यांना ह्या आपल्याच तत्वाला मुरड घालावी लागली. एखादं गाणं आपल्याच ह्या नियमाला अपवाद म्हणून करावं लागलं. ह्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर ‘ज्वेल थीफ’मधल्या ‘होठो पे ऐसी बात’ ह्या गाण्याचं देता येईल. त्यात त्यांच्याकडे पूर्वांचलातलं, विशेषत: हिमालयन संगीत साकारण्याची संधी चालून आली. त्यासाठी निरनिराळी तालवाद्यं आणि तीही बर्‍याच प्रमाणात वापरण्यावाचून त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्या संपूर्ण गाण्यात अगदी सुरूवातीपासून त्यांना पूर्वेकडल्या संगीताचं वातावरण उभं करायचं होतं. त्यासाठी बांगला ढोल, बर्मिज ढोल, तबला तरंग, नेपाळी ढोल आणि आपल्याकडल्या इतरही नेहमीच्या वाद्यांचा ताफाच्या ताफा वापरायला लागला. त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी अवाढव्य ऑर्केस्ट्रेशन होतं. त्या गाण्याच्या त्यामुळे जरा जास्तच रिहर्सल्स कराव्या लागल्या आणि गाण्याच्या रेकॉर्डिंगलाही बराच वेळ लागला.

- Advertisement -

त्या एका काळात म्हणजे तीसेक वर्षांपूर्वी जेव्हा मनोरंजनाची साधनं कमी होती आणि त्यामुळे व्यावसायिक ऑर्केस्ट्रांचं पीक होतं तेव्हाही हे गाणं त्या ऑर्केस्ट्रांच्या यादीत शक्यतो नसायचं. ह्याचं एकमेव कारण होतं ते म्हणजे ह्या गाण्यासाठी वापरण्यात आलेला वाद्यांचा अवाढव्य ताफा. पण तरीही षण्मुखानंद हॉलसारख्या एखाद्या ठिकाणी झालेल्या तशाच एखाद्या महत्वाकांक्षी ऑर्केस्ट्रात जर हे गाणं सादर झालं तर त्या ऑर्केस्ट्राकडे तसा सगळ्या बाजूंनी सुसज्ज असा वाद्यांचा मेळावा असायचा. ऑर्केस्ट्रामध्ये हे गाणं जेव्हा पेश केलं जायचं तेव्हा त्या वाद्यांमुळे आणि एकूणच त्या गाण्याच्या रचनेमुळे श्रोत्यांमध्ये प्रचंड धीरगंभीर वातावरण निर्माण करून जायचं इतकं त्या गाण्यामध्ये सामर्थ्य असायचं. आजच्या टेक्नॉलॉजीच्या काळातही हे गाणं आणि ह्या गाण्याची रचना लोक विसरलेले नाहीत आणि नव्या पिढीलाही ह्या गाण्याला लाइक्स दिल्यावाचून राहवत नाही इतका ह्या गाण्यात अवीट गोडवा आहे.

…तर असे हे सचिनदा एकदा आपला मुलगा आर.डी. बर्मनबरोबर एक सिनेमा बघायला गेले. तो डेव्हिड लिनचा ‘ब्रिज ऑन द रिव्हर क्वॉय’ हा सिनेमा होता. सिनेमा संपला आणि हे दोघं बाप-बेटे आपल्या कारने घरी निघाले. आर.डींच्या मनात त्या सिनेमातली एक धून रेंगाळत राहिली. त्यांनी ती लक्षात ठेवली आणि ती शिटीवर वाजवत गाडीतल्या डॅश बोर्डवर ठेका धरला. सचिनदांचं आर.डींच्या त्या शिटी वाजवण्याकडे लक्ष गेलं. त्यांनी ती धून नीट ऐकली आणि त्यांना तिथल्या तिथे जी चाल सुचली त्यावरून जे गाणं झालं त्यावर पुढे शब्द बेतले गेले, ‘ये दिल ना होता बेचारा!’ हेही गाणं ‘ज्वेल थिफ’मध्ये घेण्यात आलं. पण त्यातही गंमत अशी की ‘ब्रिज ऑन द रिव्हर क्वॉय’ ह्या सिनेमातली जी धून आर.डींनी शिटीवर वाजवली आणि सचिनदांनी त्यापासून ‘ये दिल ना होता बेचारा’ हे जे गाणं केलं त्यात कुणालाही साधर्म्य आढळलं नाही. सचिनदांना ‘ये दिल ना होता बेचारा’ ह्या गाण्याची चाल सुचण्यासाठी आर.डींनी शिटीवर वाजवलेले ते सूर हा एक स्रोत ठरला. खरंतर ह्या गाण्याची चाल गुरूदत्तच्या ‘बहारे फिर भी आयेगी’ ह्या सिनेमासाठी सचिनदांनी तयार केली होती. पण त्यानंतर सचिनदा आजारी पडले. त्या आजारपणात त्यांचा बराच काळ गेला. पण गुरूदत्तकडेही ते आजारातून बरे होईपर्यंत त्यांची वाट पहाण्याइतका वेळ नव्हता. त्यांनी ‘बहारे फिर भी आयेगी’च्या संगीताची जबाबदारी ओ.पी. नय्यर यांच्याकडे सोपवली. त्यामुळे ते गाणं सचिनदांकडे तसंच पडून राहिलं. पण ‘ज्वेल थिफ’चं काम जेव्हा सचिनदांकडे आलं तेव्हा त्यांनी आपल्या मनात साठून राहिलेलं ते गाणं वापरायचं ठरवलं. दाने दाने पे लिखा हैं खाने वाले का नाम, असं जे म्हणतात त्याप्रमाणे ‘ये दिल ना होता बेचारा’ ह्या गाण्यावर देव आनंदचं नाव लिहिलेलं होतं, त्याप्रमाणे हे गाणं देव आनंदनेच पडद्यावर वाजवलं आणि गाजवलंही.

- Advertisement -

सचिनदा स्वत: गाणं छान गायचे. त्यामुळे आपली चाल हार्मोनियमवर वाजवून ते थांबायचे नाहीत. कोणता शब्द कोणत्या भावभावनेतून गायला हवा हेही ते गायक-गायिकांना समजावून सांगायचे आणि तसाच ते रेकॉर्डिंगला त्यांच्याकडून तसाच्या तसा घासूनपुसून गाऊन घ्यायचे. ‘वहाँ कौन हैं तेरा’, ‘प्रेम के पुजारी हैं हम’, ‘मेरी दुनिया हैं माँ’, ‘सफल होगी तेरी आराधना’ ह्यासारखी गाणी त्यांनी गायली. ऐकणार्‍याच्या आत कुठे तरी पोहोचवली. खरंतर कोलकात्यामध्ये आधी त्यांचं गायक म्हणून खूप मोठं नाव होतं. त्यामुळे आपण केलेली चाल ते खूप मनापासून गायक-गायिकांना ऐकवून दाखवायचे. आपण केलेल्या गाण्याचे सूक्ष्म कंगोरे उलगडून दाखवायचे. त्यांच्याकडून आपलं गाणं तसंच्या तसं गाण्याची अपेक्षा बोलून दाखवायचे. पण कित्येकदा गायक-गायिकाच म्हणायचे की दादा, ही तुमची चाल तुम्ही गाता आहात म्हणून सोपी आहे, पण आमच्यासाठी ती तितकी सोपी नाहीय, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ती जरा सोपी करा.

सचिनदा त्यांच्याकडे बघून किंचित हसायचे. थोडा वेळ विचार करून अखेर त्यांचं म्हणणं मानायचे. पण तरीही आपल्या गाण्याच्या मूळ गाभ्याला धक्का लावू द्यायचे नाहीत. आपलं गाणं आपल्याप्रमाणे गाऊन घ्यायचे. अगदी चोख गाऊन घ्यायचे. संगीतातला त्यांचा कलाव्यवहार कायम तसाच राहिला. सचिनदा तसेच होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -