घरफिचर्समुलांसाठी म्युच्युअल फंड योजना!!

मुलांसाठी म्युच्युअल फंड योजना!!

Subscribe

कोणतीही गुंतवणूक करताना दोन महत्वाचे निकष मानले जातात. एक म्हणजे आर्थिक लाभ आणि दुसरा म्हणजे भावनिक समाधान. आपण आपल्या मुलांसाठी करतो, आई-वडिलांसाठी काही करतो, पत्नीला अमुक डेची गिफ्ट देतो. याचपद्धतीने मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी किंवा आरोग्यासाठी पैसा जमा करणे वा गुंतवणे याला एक अनन्यसाधारण महत्व असते. हे ओळखून बँक्स, म्युच्युअल फंड यांनी ‘चिल्ड्रेन स्कीम्स’ आणल्या तर आश्चर्य नाही.

आजवर आपण आपले इन्कम आणि आपला इन्कम-कर याचाच अधिक विचार करत असतो. पैसे कसे वाचवायचे आणि कुठे कुठे गुंतवता येतील? हे पाहत असतो. अर्थात तेही अनेकांना जमत नाही, मग ऐनवेळी जो कोणी भला-बुरा सल्ला देत असेल, त्यानुसार कसेबसे पैसे इन्वेस्ट करत असतो. दरवर्षी आपली हीच कथा की व्यथा असते. या सर्व खटाटोपात आपण मुलांची गुंतवणूक कुठे पाहणार? मोठे होतील तेव्हा बघू? किंवा फार फारतर एखादी विमा पोलिसी काढली जाते. पण मंडळी, जमाना बदललेला आहे, जसे पुणे-मुंबई प्रवास करताना, ‘लवकर निघा-सुरक्षित प्रवास करा’, असे सांगितले जाते. तसे गुंतवणूकबाबतीत ‘लवकर गुंतवा-लवकर लाभ मिळवा’ हा मंत्र लक्षात ठेवून प्रत्यक्षात अंमलात आणला पाहिजे. मुलांसाठी गुंतवणे, चांगल्या स्कीममध्ये पैसे ठेवणे, विशेषतः म्युच्युअल फंडात खाते उघडता येईल का? त्यातून नेमके काय साधले जाईल? हेच आपण पाहणार आहोत.

पार्श्वभूमी – आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरीदेखील प्रौढ नागरिकांचे बँक-खाते असण्याचा प्रश्न पूर्णतः सोडवला जात नाही. कुठेतरी ‘जनधन’ने सुरुवात होते, पण तीही निष्कलंक नाही. संपूर्ण देश जसा साक्षर आहे असे आपण म्हणून शकत नाही,तशीच अवस्था आपल्या लोकसंख्येला बँकिंगच्या परिघात आणण्याबाबत आहे. तरीही परिस्थिती निराशाजनक नाही, एवढे निश्चित. अशा विषम पार्श्वभूमीवर, एकीकडे मूलभूत बँकिंगपासून वंचित असलेला घटक आणि दुसर्‍या बाजूला प्रगतशील बँकिंगची साधने वापरू पाहणारा घटक. दोन्हीमध्ये असलेला मध्यमवर्ग मात्र संख्येने वाढतो आहे, विस्तारतो आहे, परिणामी या ‘ग्राहक-वर्गाला’ आकृष्ट करण्यासाठी नवनवीन साधने बाजारात आणावीच लागतात.

- Advertisement -

खास मुलांसाठी म्युच्युअल फंड – हा एक प्रकारचा फंड हा अशाच ‘मागणी-पुरवठा’ न्यायाने तयार केला गेलेला आहे. फार पूर्वी आपल्या बँकांनी मुलांमध्ये बचतीची सवय लागावी म्हणून ‘पिगी बँक’ धर्तीवर छोट्यांची खाती सुरू केली होती. पूर्वी मुलांना खाऊचे पैसे मिळायचे, हल्ली ‘पॉकेटमनी’ तर ते बँकेत टाकण्याची शिस्त-आवड वेळीच लागणे जरुरीचे आहे. कारण आता पैसे खर्च करण्याचे अनेक मार्ग-प्रलोभन झालेली आहेत. मोठ्या पालकांना शॉपिंग-स्पेंडीगचा मोह होतो, तिथे किड्स म्हणजे बच्चे कंपनीचे काय? पण एक आहे आज दोन्ही पालक कमावते आहेत, शिवाय त्यांना अवघे एकच मूल परवडते (तेही न परवडणारे – डिंक्स हा सोसायटीत असतातच) ओन्ली सन किंवा डॉटरसाठी पैसे खर्च करण्याची मानसिकता त्यांच्याकडे अधिक प्रमाणात असते. ‘जे आपल्याला मिळाले नाही, ते ते देण्याची’ भारतीय मानसिकता अजूनही कायम आहे. याचाच फायदा मार्केटिंग करणारे अचूकपणे उचलतात. टूथपेस्ट असो किंवा फ्रीज विकताना हेच तंत्र वापरले जाते, मग बँकवाले -म्युचुअल फंडवाले का नाही वापरणार?

अर्थशास्त्रात असे म्हटले जाते की, कोणतीही गुंतवणूक करताना दोन महत्वाचे निकष मानले जातात. एक म्हणजे आर्थिक लाभ आणि दुसरा म्हणजे भावनिक समाधान. आपण आपल्या मुलांसाठी करतो, आई-वडिलांसाठी काही करतो, पत्नीला अमुक डेची गिफ्ट देतो. याचपद्धतीने मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी किंवा आरोग्यासाठी पैसा जमा करणे वा गुंतवणे याला एक अनन्यसाधारण महत्व असते. हे ओळखून बँक्स, म्युच्युअल फंड यांनी ‘चिल्ड्रेन स्कीम्स’ आणल्या तर आश्चर्य नाही. कारण आई-वडील हे स्वत:चा इन्कमटॅक्स वाचवण्यासाठी इन्व्हेस्ट करतात किंवा फ्युचरसाठी. त्याहीपलीकडे त्यांच्याकडील पैसे हमखासपणे गुंतवला गेला पाहिजे असे वाटत असेल, तर अशी काही ‘भावनिक केंद्र’ शोधावी लागतात. वास्तवात तशी खास योजना असतेच असे नाही, एक आकर्षक लेबल लावले तर घेणारे वाढतात. इतर अनेक फंड योजना-अधिक जोखमीच्या अधिक प्रमाणात नफा मिळवून देवू शकतात, मुलांच्या स्कीम्स तितका लाभ देतातच असे नाही. परंतु आपण मुलांसाठी नियमित गुंतवतो ही भावना प्रबळ असते, त्यातील मुलांसाठी -त्यांच्या भविष्यासाठी पैसा गुंतवला जातो.

- Advertisement -

मुलांच्या म्युच्युअल फंडाची ठळक वैशिष्ठ्ये -आज देशातील सर्वच अग्रणी म्युच्युअल फंड कंपन्या ‘चाईल्ड म्युच्युअल फंड’ योजना देऊ करीत आहेत. एक्सिस, एचडीएफसी, आयसीआयसी प्रुडेन्शियल, टाटा, युटीआय यांच्याकडे मुलांसाठी आकर्षक फंड योजना आहेत. त्याची नावे वेगवेगळी असू शकतात. उदाहरणार्थ -कोणती त्यांना चाईल्ड म्युच्युअल फंड म्हणतात, तर कोणती कंपनी चिल्ड्रेन गिफ्ट असेही संबोधते. आजच्या घडीला अशा सर्व म्युच्युअल फंड कंपन्यात मुलांच्या फंडातील एकूण गुंतवणूक ही सुमारे 7700 कोटींच्या घरात आहे. आणि नजीकच्या काळात ही वाढतच राहील यात काही शंका नाही.

मुलांसाठी कोण रक्कम गुंतवू शकतो – मुलाचे आई-वडील किंवा कायदेशीर पालक -गार्डियन -कोर्टाने पालक म्हणून नियुक्त केलेली व्यक्ती

सर्वसामान्य गुंतवणूक प्रकार – इतर म्युच्युअल फंड स्कीम्सप्रमाणे दोन प्रकारे पैसे गुंतवले जातात -1 इक्विटी -शेअर्स 2 डेब्ट म्हणजे रोखे -व्यवहार

कालावधी – किमान पाच वर्षांचा मुदतबंद -म्हणजेच लॉक-इन पिरियड असतो, त्याआधी पैसे काढता येत नाहीत.
मुदत-मुलगा/मुलगी सज्ञान होईपर्यंत-वयाची 18 वर्षे पूर्ण करेपर्यंत पालक असे खाते वापरू-हाताळू शकतात. त्यानंतर मात्र वय पूर्ण झाल्याचा योग्य पुरावा देवून सज्ञान मुलगा-मुलगी आपले खाते स्वत:च सांभाळू शकते, वापरू शकते.
अपवाद- तोवर चालू केलेल्या म्युच्युअल फंडाच्या स्कीम्सदेखील चालू राहू शकतात. त्यांना मध्येच खंडित करण्याची आवश्यकता नाही. उदाहरणार्थ- एसआयपी / एसटीपी किंवा एसडब्ल्यूपी स्कीम्स

इन्कम टॅक्सबाबत – पालकांच्या खात्यातून असे मुलांचे खाते असेल त्यात ट्रान्स्फर केलेले पैसे किंवा मुलाच्या स्कीममधून पालकांच्या खात्यात ट्रान्स्फर केलेल्या निधीवर आयकर लावला जात नाही. तसेच बक्षीस-करदेखील लावला जात नाही.

मात्र मुलांच्या म्युच्युअल फंडाद्वारे मिळालेले उत्पन्न हे पालकांच्या एकूण उत्पन्नात एकत्रितपणे घेतले जाते. म्हणजेच आयकरबाबत काही विशेष लाभ मिळत नाही.

मुख्य अट- अशा योजनेतील खात्यात पहिले नाव हे अल्पवयीन मुलगा किंवा मुलीचेच असले पाहिजे, पालकांचे नव्हे. कारण मुळात अशा स्कीम्स मुलांच्या नावे गुंतवणूक करण्यासाठी असतात. गैरवापर किंवा आडमार्गाने काळा पैसा बँकेत आणण्याचे साधना म्हणून वापरला जावू नये. म्हणून तर अशी खाती संयुक्त नावांची असता नाहीत. खाते सांभाळण्यासाठी -व्यवहार करण्यासाठी पालक हेच चालकाच्या भूमिकेत असतात.

अन्य कागदपत्रे आणि केवायसी-
1) मुलाच्या /मुलीच्या वयाचा पुरावा सादर करणे आवश्यक असते-जन्मदाखला
2) पालकांचा तसेच गार्डियन यांचा मुलगा/मुलगीशी असलेला नातेसंबंध प्रस्थापित करणारे लीगल कागदपत्रे ही आवश्यक असतात
3) पासपोर्ट / आधार कार्ड इत्यादी दस्तावेज
4) जेव्हा पहिल्यांदा म्युच्युअल फंडात मुलांच्या नावाने पैसे गुंतवले जातात, तेव्हाच वरील प्रकारची कागदपत्रे देणे जरुरीचे असते. तांत्रिक भाषेत सांगायचे तर पहिला फोलिओ उघडताना, मात्र पुढे त्याच फंडात अधिक पैसे गुंतवताना पुन्हा अशी कागदपत्रे देण्याची गरज नसते.
5) पालकांनी केवायसीची पूर्तता करणे अनिवार्य आहे

म्युच्युअल फंड एस.आय.पी. सुरु करता येते का?- हो, तर मुलांच्या खात्याला एसआयपी नक्कीच चालू करता येते. मात्र मूल जेव्हा सज्ञान होते, तेव्हा ही स्कीम तत्काळ खंडित होते. नंतरचा निर्णय मुलाने स्वतः घ्यायचा असतो.

मूल सज्ञान झाल्यावर काय करावे लागते ? त्याबाबत एक सूचना पाठवली जाते आणि मुलाने माहिती व कागदपत्रे म्युच्युअल फंडाकडे द्यावी व सज्ञान झाल्याचे कायदेशीर पुरावे केवायसी कागदे सादर करावेत अशी अपेक्षा असते.

चाईल्ड म्युच्युअल फंडचे फायदे-

1) मुलांच्या वाढत्या खर्चासाठी आर्थिक तरतूद केल्याचा नक्कीच फायदा होतो, बँकेत किंवा अन्यत्र कमी व्याजदरात पैसे ठेवण्यापेक्षा ही गुंतवणूक चांगली
2) गिफ्ट म्हणजे बक्षीस म्हणून देण्यासाठी उपर्युक्त अशी ही भेट
3) कोणतीही मालमत्ता निर्माण करणे हे केव्हाही चांगले, म्युच्युअल फंडात अशी वाढ होते. एसेट-वृद्धी हिताची असते असे अर्थतज्ञ -गुंतवणूक मार्गदर्शक सांगतात. विशेषतः शेअर्स-इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवत राहिल्याने अशी मालमत्ता वृद्धी होऊ शकते.
4) दीर्घकालीन मालमत्ता निर्माण करण्यासाठी अधिक सोयीचे
5) आपल्या गुंतवणुकीत एक प्रकारची शिस्त येऊ शकते

ज्यांना नित्यनेमाने म्युच्युअल फंड स्किमची अद्ययावत माहिती असते आणि ते जोखीम प्रकार ओळखून दीर्घकालीन गुंतवणूक करत असतात, त्यांना मुलांच्या एमएफचे कदाचित तितकेसे आकर्षण वाटणार नाही, कारण अशा विशेष स्किमधील लाभ/परतावा हा अन्य जोखीमयुक्त स्कीमच्या तुलनेत कमी असतो. मात्र ज्यांना ही बाजार-झिगझिग नको असते, शिवाय मुलांच्या नावे वेगळी गुंतवणूक करतो असे काही सामाधान मिळवायचे असेल, तर अशी चाईल्ड म्युच्युअल फंड इन्वेस्टमेंट जरूर करावी.आज अनेकांनी अशा प्रकारच्या योजनांना मुक्त हस्ते हातभार लावलेला आहे. कारण मुलांच्या शिक्षणाचा खर्च, पुढे हायर करिअर -प्रोफेशनल कोर्सेस त्यातून फॉरेन स्टडीज करायचा झाला तर विदेशी करन्सीमधला खर्च आणि त्यानंतर जॉब मिळून स्थिर होणे-लग्न-जागा अशा संसार-चक्रात अडकल्यावर पैसा लागतोच. म्हणून अर्ली इन्वेस्टमेंट ही केव्हाही चांगलीच. ज्यांना थेट शेअरबाजारात उतरून मोठे धोके पत्करायचे नसतात, शिवाय ज्यांना टिपिकल बँकिंगमधून मर्यादित पैसे कमवायचे नसतात, त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हा नक्कीच बेटर ऑप्शन आहे.

-राजीव जोशी – बँकिंग व अर्थ अभ्यासक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -