शक्तीस्थळ आणि श्रद्धांजली

सध्या शिवसेनेत जे इन्कमिंग सुरू आहे त्याची सूत्रं प्रामुख्यानं सचिव मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. सर्वाधिकार उद्धव ठाकरेंचा असला तरी त्याच्या प्राथमिक बैठका कराव्याच लागतात. अहीर यांची बैठक झाल्याचा तपशील दिसत नाही; पण त्यांच्या भाजप नेत्यांशी बैठका सुरू होत्या. अहीर यांच्या आलिशान घरात नार्वेकर यांची मैत्रीपूर्ण उठबस आहे. या बैठका अगदी भल्या सकाळीही होतात; पण तरीही अहीर हे नार्वेकरांपेक्षा वेगळ्या रस्त्याने सेनेत पोहोचलेत. आदित्य यांची मर्जी त्यांनी संपादन केली आहे. आदित्य ठाकरे यांना खेळ, बॉलिवूड आणि फॅशन आवडते. तसंच त्यांना सेनेच्या रावडी भाषेपेक्षा गोड-मधाळ बोलणारी मंडळी अधिक भावतात.

Mumbai

ठाण्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख स्व.आनंद दिघे यांची १८वी पुण्यतिथी २६ ऑगस्टला होती. खारकर आळीतील दिघेंच्या समाधीस्थळावर-शक्तीस्थळावर जाऊन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिघेंना श्रद्धांजली वाहिली. गेल्या दीड दशकात ठाकरे परिवारातील कुणा सदस्याने ठाण्याच्या शक्तीस्थळावर जाण्याची ही पहिली वेळ होती. आदित्य खरंतर ठाण्यात दुसर्‍या एका कार्यक्रमासाठी आले होते तो कार्यक्रम आटोपल्यावर त्यांनी शक्तीस्थळावर जाऊन दिघे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि निवडणुकीच्या वर्षात ठाणेकरांवर आजही असलेलं आनंद दिघेंचं गारुड मान्य केलं. गेल्या अठरा वर्षांत ठाणं विलक्षण बदललंय. सामाजिक, राजकीय आणि भौगोलिक दृष्ट्याही ठाण्यानं कात टाकली आहे. ठाण्यापासून सुरुवात केल्यानंतर अगदी पालघरपर्यंत आणि दुसर्‍या बाजूला सीबीडी बेलापूरपर्यंत एकूण 23 आमदारांची कुमक महाराष्ट्राच्या विधिमंडळाला देण्याची क्षमता या पट्ट्यात आहे. या संपूर्ण पट्ट्यावर कधी एकेकाळी आनंद दिघे या नावाची जादू चालायची. आता या संपूर्ण भागात अनेक नेत्यांच्या सुभेदार्‍या वाटल्या गेल्यात. कुणी रेती बळकावलीय, तर कुणी केबल…मात्र गेल्या काही काळात या सगळ्या सुभेदारांचा मुखिया म्हणून एकनाथ शिंदे नावारूपाला आले. स्वर्गीय आनंद दिघे यांचा चेला असलेल्या एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकौशल्याने या संपूर्ण पट्ट्यावर आपलं शासकीय आणि गैरशासकीय ही प्रभुत्व मिळवलेलं आहे. आनंद दिघे यांचं वैशिष्ट्य हे त्यांच्या योग्य निवडीत असायचं. मग ती निवड एखाद्या घटनेच्या आंदोलनाची असो अथवा एखाद्या शाखाप्रमुखाच्या निवडीची. दहापैकी आठ वेळा आनंद दिघे आपल्या निवडीत बिनचूक ठरायचे आणि त्यामुळेच खूप कमी वेळातच मातोश्रीने दिघेंच्या ‘साहेब’ बनण्याचा धसका घेतला होता.

अपघाताचं निमित्त झालं आणि दिघे अकाली निघून गेले. त्यानंतर दिघे यांच्या मृत्यूच्या अनेक सुरस कथा दबक्या आवाजात चर्चिल्या गेल्या. मात्र त्यात काही तथ्य नसल्याचं समोर आलं. नारायण राणे, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या मंडळींनीही त्यांचं जाणं हे आकस्मिक तरीही नैसर्गिक असल्याचं मान्य केलंय. जी गोष्ट आनंद दिघे यांची तीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची. त्यांची माणसांची, घटनांची, आंदोलनांची निवड बर्‍याच अंशी बिनचूक असायची. आपण निवडलेल्या व्यक्ती घटना यांच्याशी ही मंडळी ठाम असायची आणि या नेत्यांच्या निवडीने त्यांना मोठ्या प्रमाणात यशच दिलंय. हे दोन्ही मोठे नेते स्वतःला हवा तो निर्णय घ्यायचे. मात्र त्या निर्णयाच्या आधी एक मंथनही करायचे. त्या मंथनातून कधीच हे जाणवायचं नाही की त्यांनी केलेल्या मंथनातून हा निर्णय घेतला गेलाय. पण केलेला विचारविनिमय अत्यंत हळूवारपणे बाजूला सारत हा निर्णय आपण एकाधिकारशाहीने घेतलाय हे जनमानसावर बिंबवण्यात या दोन्ही नेत्यांचा हातखंडा होता. हे सांगण्याचं कारण इतकंच की १८ वर्षांनंतर दिघे यांच्या शक्ती स्थळावर पोहोचलेल्या आदित्य ठाकरेंना भविष्यात काही निर्णय घ्यायचेत. जे मराठी माणसांच्या संघटनेसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात; पण त्याच वेळी ते शिवसेना नावाच्या कार्यकर्त्यांच्या मोहोळला महत्त्वपूर्णही ठरू शकतात. तर दुसर्‍या बाजूला महाराष्ट्राच्या सत्तेत परिणामकारक ठरू शकणार्‍या संपूर्ण भागाचा सुभेदार असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आता त्यांच्या पक्षाचं आणि एका मोठ्या राजकीय वर्गाचं लक्ष लागलेलं आहे. कारण या पट्ट्यातून शिवसेना यशस्वी ठरली तर त्याची रणनीती ही शिंदे यांच्या थंड डोक्यात शिजलेली असेल. त्यामुळे आदित्य काय किंवा शिंदे काय या दोघांनाही आपल्या निवडीचे निकष तपासून घ्यावेच लागतील.(शिंदेंनाही वागळे इस्टेट बाहेरची मंडळी पालिकेच्या सत्तेत आपलीशी करावीच लागतील)कारण सत्तेत या दोन्ही पक्षांकडे सध्या सत्तापिपासू मंडळींचे इन्कमिंग सुरू आहे. त्यामुळे फायद्याचा आणि तोट्याचा कोण हे शिवसेनेकडून ज्या मंडळींना ठरवायचं आहे त्यात प्रामुख्याने हे दोघे आहेत.

१९९६ साली आनंद दिघे यांनी एका शाखाप्रमुखाची नियुक्ती करण्यासाठी काही मंडळींची मतं जाणून घेतली. त्यात रघुनाथ मोरे, मनोहर गाढवे आणि महापौर विजया देशमुख या मंडळींना आनंदमठात मध्यरात्री बोलावण्यात आलं. तिथे हेमंत पवार या तरुणालाही बोलावण्यात आलं. दिघेंनी पवार याची शाखाप्रमुख होण्याची इच्छा या नेत्यांना बोलून दाखवली. त्यानंतर या सगळ्यांनीच दिघे यांच्या प्रस्तावाला विरोध केला. रघुनाथ मोरे यांनी स्पष्ट शब्दांत कडाडून विरोध केला. देशमुख आणि गाढवे यांनी मोरेंची हलकेच का होईना पण री ओढली. दिघेंनी हे सगळं ऐकून घेतलं. तेव्हा ते धोबी आळीत राहायचे. मध्यरात्रीही त्यांच्याकडे पत्रव्यवहाराचं काम चालायचं. ज्ञानेश्वर गायकवाड या कार्यकर्त्यावर ही टायपिंगची जबाबदारी असायची. दिघेंनी त्याला फर्मान सोडलं. हेमंत पवारच्या शाखाप्रमुख होण्याचं नियुक्तीपत्र त्याला बनवायला सांगितलं आणि मध्यरात्री हेमंत पवार शाखाप्रमुख झाला. नेत्यांनी आपलं मत मांडलं होतं; पण दिघेंनी आपला निर्णय घेतला होता.

दुसर्‍या घटनेत सध्याचे पालकमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबावर एक खूप मोठा कठीण प्रसंग आला होता. राजकारण, समाजकारण सोडून शिंदे विषण्ण अवस्थेत गेले होते. त्यांनी सारं काही गमावल्यासारखी मनस्थिती होती. तेव्हा आनंद दिघे स्वतः शिंदे यांच्या घरी गेले. त्यांनी शिंदे यांच्या आई-वडिलांची, पत्नीची समजूत काढली आणि एकनाथ शिंदे यांना घरातून आणून पुन्हा सेनेच्या सामाजिक आणि राजकीय कामाला जुंपलं. तेव्हा जर दिघे यांनी पुढाकार घेऊन शिंदेंना तयार केलं नसतं तर त्यांनीच बांधलेला गड आज कदाचित राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या हाती असता. ठाणे जिल्ह्याची परिषद पन्नास वर्षे शिवसेनेला जिंकता आली नव्हती. अगदी दिघेंचा शब्द सबकुछ असतानाही… स्व.आनंद यांचा चेला असलेल्या शिंदे यांनी आपल्या डोक्याने तिथे भगवा फडवून दाखवला. या दोन संक्षिप्त गोष्टींतून आपल्याला कळू शकेल आनंद यांना ‘दृष्टी’ काय होती. त्यांच्या शक्तीस्थळावर जाऊन श्रध्दांजली वाहणार्‍या आदित्य आणि एकनाथ या दोघांनीही अशी दृष्टी आपल्याला मिळो अशी प्रार्थना करण्याची गरज आहे.

मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मुखिया असलेल्या सचिन अहीर यांना शिवसेनेत घेण्यात आलं. पंधरा वर्षे अहीर आमदार आणि राज्यमंत्री होते, कामगार नेते आहेतच. २०१४ साली सेनेच्या सुनील शिंदे यांनी त्यांचा पराभव केल्यानंतर ते विजनवासात गेले होते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाची त्यांच्या नेतृत्वाखालील कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची होती. राष्ट्रवादीला दुहेरी आकडाही गाठता आला नव्हता. गेल्या पाच वर्षांत अहिरांना मुंबईत पक्षाच्या झेंड्याखाली एकही मोठं आंदोलन करता आलं नव्हतं. त्यामुळे मुंबईत नेता बदलावा अशी राष्ट्रवादीत जोरदार मागणी होती तरी शरद पवारांच्या असलेल्या मर्जीमुळेच अहिरांना पुन्हा अध्यक्षपद मिळालं. पण संघटना उभारण्यापेक्षा संसदीय पदांमध्ये त्यांना अधिक स्वारस्य दिसत होतं. दुसर्‍या बाजूला विधानसभेत जाण्यासाठी आदित्य ठाकरे यांना वरळी आणि शिवडी या दोन मतदारसंघांचा विचार करायचा आहे. अहिर वरळीतून निवडणूक लढतात. त्यामुळे त्यांना पक्षात घेऊन प्रतिस्पर्धी आव्हान संपवून टाकावं ही खेळी मातोश्रीकडून खेळली गेली. विद्यमान आमदार सुनील शिंदे यांना दमदार कामगिरी करूनही दुसर्‍या मतदारसंघात वळतं करून आदित्य यांच्यासाठी जागा बनवण्यात येत आहे. खरंतर या भागातील सेनेची ताकद पाहता लोप पावलेली लोकप्रियता आणि शक्तीपात झालेले अहीर सेनेला आणि त्यातही आदित्य ‘ठाकरे’ यांना मुळीच आव्हानात्मक नव्हते. पण तरीही स्थानिकांना विचारात न घेताच अहीर पक्षात आले. असाच प्रकार राणेंबरोबर गेलेल्या रविंद्र फाटक यांच्याबाबत झाला होता. त्यांनी उध्दव यांना लंडन प्रवासात सेनेत घेण्याबाबत गळ घातली होती. तेव्हा उध्दव यांनी फाटकांना ठाण्यात एकनाथ शिंदेंबरोबर चर्चा करण्याच्या सूचना केल्या. शिंदेंना फाटक नको होते; पण तेव्हा फाटकांकडे १२ नगरसेवक होते. अहिरांकडे असं काहीच नाहीय.

सध्या शिवसेनेत जे इन्कमिंग सुरू आहे त्याची सूत्रं प्रामुख्यानं सचिव मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. सर्वाधिकार उद्धव ठाकरेंचा असला तरी त्याच्या प्राथमिक बैठका कराव्याच लागतात. अहीर यांची बैठक झाल्याचा तपशील दिसत नाही; पण त्यांच्या भाजप नेत्यांशी बैठका सुरू होत्या. अहीर यांच्या आलिशान घरात नार्वेकर यांची मैत्रीपूर्ण उठबस आहे. या बैठका अगदी भल्या सकाळीही होतात; पण तरीही अहीर हे नार्वेकरांपेक्षा वेगळ्या रस्त्याने सेनेत पोहोचलेत. आदित्य यांची मर्जी त्यांनी संपादन केली आहे. आदित्य ठाकरे यांना खेळ, बॉलिवूड आणि फॅशन आवडते. तसंच त्यांना सेनेच्या रावडी भाषेपेक्षा गोड-मधाळ बोलणारी मंडळी अधिक भावतात. अहीर जरी डॉन अरुण गवळीचे भाचे असले तरी अत्यंत गोड बोलणे हा त्यांचा स्वभाव आहे. ते जाहीरपणे कुणालाच दुखावत नाहीत; पण त्यांना जे घडवायचं असतं ते कसं घडवतात हे वरळीतल्या शिवसेनेच्या शाखेत डोकावलं की आपल्या लक्षात येईल. अहिरांच्या प्रवेशाला ३८ दिवस उलटून गेलेत. मात्र त्यांनी डिलाईल रोडची शाखा सोडून उरलेल्या सहा शाखांच्या उंबरठ्यालाही स्पर्श केलेला नाही. सेनेत आल्यावर त्यांनी एका रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं. हा रोजगार मेळावा ज्या एनएससीआयमध्ये आयोजित केला होता. त्याचं दिवसाचं भाडं 25 लाख रुपये आहे आणि इथे दिल्या गेलेल्या नोकर्‍यांमध्ये प्रामुख्याने कुरिअर बॉय, डिलिव्हरी बॉय आणि सुरक्षारक्षक अशाच पदांचा भरणा होता. त्यामुळे शिवसैनिकांनी आणि शिवसेनेला मानणार्‍यांनीही या मेळाव्याकडे पाठ फिरवली. त्यांच्याबरोबर काही मोजकी मंडळी पक्षात आलीत. त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी सेना भवनात एक बैठक बोलावली होती. या बैठकीकडे सर्व शाखाप्रमुखांनी पाठ फिरवली. आमदार आणि विभागप्रमुख यांना शेवटच्या क्षणाला निरोप मिळाला ते धापा टाकत पोहोचले. यावरून संघटना समजूनच न घेता कामकाज सुरू आहे.

परवाच मुंबई शहर कबड्डी असोसिएशनची निवडणूक पार पडली. दोन्ही बाजूला शिवसेनेचं प्राबल्य होतं. सचिन अहीर आणि भाई जगताप हे दोन कामगार नेते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. जगताप यांच्या पॅनेलमध्येही जवळपास नव्वद टक्केे शिवसैनिकांचा भरणा आहे. अहीर यांनी या निवडणुकीत उडी घेतली आणि आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण संघटना सचिन अहिर यांच्यासाठी मैदानात उतरवली. मात्र सचिन अहिर यांची भिस्त ज्या राजेश पाडावे या माजी खेळाडू आणि कबड्डी प्रशिक्षकावर होती त्याची कार्यशैली खूपच वादग्रस्त असल्याचं कबड्डी वर्तुळात बोललं जातं. या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता मैदानातल्या मंडळींशी चर्चा न करता शिवसेनेने शहरातले आपले सगळे नगरसेवक विभाग प्रमुख आणि शाखाप्रमुख या निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरवले. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. सचिन अहिर यांचं पॅनल सपशेल धारातीर्थी पडलं. त्यांचे सगळेच्या सगळे २५ उमेदवार पराभूत झाले. या निवडणुकीत ४९५ मतदारांचा प्रश्न होता तिथे अहिरांना सपशेल अपयश आलं. खरंतर खेळ आणि राजकारण यांची गल्लत करू नये असं म्हणतात; पण मातोश्रीकडून अशी गल्लत दुसर्‍यांदा झाली. काही वर्षांपूर्वी दिलीप वेंगसरकर यांच्यासाठी एमसीएमध्ये अध्यक्षपदासाठी शिवसेनेनं रान उठवण्याचा प्रयत्न केला. पण तिथेही तो अपयशी ठरला. वेंगसरकर आणि अहीर यांची तुलना होऊच शकत नाही. क्रिकेटच्या मक्केमध्ये म्हणजेच इंग्लंडमधील लॉर्ड्सवर लागोपाठ तीन शतकं झळकावण्याचा विक्रम दिलीप वेंगसरकर यांच्या नावावर आहे.ते भारताचे माजी कर्णधार आहेत; पण तरीही त्यांनी शिवसेना आणि एमसीए यांची केलेली गल्लत अनेकांना आवडली नव्हती. आणि त्याची किंमत त्यांनी चुकवली.

अहिर यांनी एखाद्या स्पर्धेचे आयोजन सोडलं तर विशेष काही खेळासाठी केल्याचं गेल्या २५ वर्षांत पाहिलेलं, ऐकलेलं आणि वाचलेलंही नाही. त्यामुळे साहजिकच जे झालं ते होणारच होतं. इथे मुद्दा हा आहे आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाचा आणि लोकप्रियतेचा. ते तिशीच्या उंबरठ्यावर आहेत. स्वतः फुटबॉल आणि क्रिकेट या दोन खेळांच्या संघटनांमध्ये ठळकपणे कार्यरत आहेत. त्यांच्या पक्षात त्यांचा शब्द प्रमाण आहे. त्यामुळेच सेनेचा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे आता काहींनी बघायला सुरुवात केली आहे. त्यांच्या कुटुंबात योग्य-अयोग्यतेची निवड करण्याची उत्तम जाण आहे. त्यांचे वडील उद्धव ठाकरे हे सेनेचे पक्षप्रमुख आहेत त्यांच्यावर त्यांचे विरोधक वेगवेगळ्या पध्दतीने टीका करत असतात; पण जे उद्धव यांच्या वडिलांना शिवसेना प्रमुखांना जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं… मुंबई, महाराष्ट्र आणि दिल्ली याठिकाणी सत्तेतला वाटा शिवसेनेकडे आहे याचं कारण उद्धव यांनीही काही अपवाद वगळता योग्य गोष्टींची आणि व्यक्तींची निवड केलेली आहे. सचिन अहिर यांच्यावर इथे व्यक्तिगत कोणताही दोषारोप किंवा सूडभाव व्यक्त करायचा नाही. तर शिवसेनेसारख्या पक्ष नुकत्याच साम-दाम-दंड-भेद यांनी प्रबल झालेल्या भाजपबरोबर मुकाबला करतोय. अशावेळी भावनेच्या आहारी जाऊन किंवा क्षणिक फायद्याचा विचार करून सेनेला चालणार नाही. शिवसेनेसाठी आदित्य ठाकरे यांच्याआधी ज्या दोन नेत्यांची नेतेपदी निवड करण्यात आली त्यामध्ये दिल्लीतले संजय राऊत आणि शिवसैनिकांमधल्या एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे. या दोन्ही नेत्यांनी आपापल्या मोहिमेवर लढाई फत्ते केलेली आहे. त्यानंतरच त्यांना सेनेचे नेते पद देण्यात आलेलं आहे. तळाच्या शिवसैनिकांचा सत्तेच्या दिवसांत छळ करून आपलं नेतेपद टिकवणार्‍या सचिन अहिर यांच्यासारख्या नेत्यांना सत्तेच्या दिवसांत पायघड्या घालताना आदित्य ठाकरे, शिंदे आणि नार्वेकर यांच्यासहित उद्धव यांनाही विचार करावाच लागणार आहे. सत्तेसाठी येणारी मंडळी हे पूर्णत: कमर्शिअल आहेत आणि म्हणूनच सुप्रिया सुळे म्हणतात,” ते पंधरा वर्षे आमच्याकडे वेगवेगळ्या मंत्रीपदावर होते आता सेना-भाजपमध्ये जाऊनही तेच मंत्रिपदावर असणार आहेत तर सत्ता खर्‍या अर्थाने आमचीच असणार आहे.” सुळे यांच्या विधानात खोलवर खूप मोठा अर्थ आहे. हा अर्थ जर आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर आणि त्यांचे ‘सुप्रीमो’ उद्धव ठाकरे यांनी शोधला तर ते शिवसेनेच्या फायद्याचेच आहे. आणि त्यांनी तो अर्थ शोधावा हीच स्वर्गीय आनंद दिघे यांच्यासारख्या एका कडवट शिवसेना नेत्याला श्रद्धांजली होऊ शकेल…