घरफिचर्समायमहानगर ब्लॉगचंद्रकांत दादा, गोंधळ जादा...

चंद्रकांत दादा, गोंधळ जादा…

Subscribe

राज्यात भाजपची सत्ता न येण्याचं कारण उघड आहे. मुख्यमंत्री होईन तर मीच. या स्वार्थाने सत्तेची गणितं बिघडली. या बिघडत्या समिकरणात विरोधी पक्षाची ताकद अधिक मजबुत करण्याचाच कोणी विचार करेल. बदलत्या परिस्थितीत जुने आणि नवे असला भेद करण्याची आवश्यकता नव्हती. उमेदवारी द्यायचीच नव्हती तर ते आधीच स्पष्ट करायला हवं होतं. आता उमेदवारी न देण्यामागची कारणं सांगताना चंद्रकांत पाटलांची होणारी दमछाक ही त्यांनी आजून वायफळपणा सोडला नाही, अशाच तर्‍हेची आहे. एकनाथ खडसे यांना, त्यांची सून आणि मुलीला दिलेल्या उमेदवारीचा हिशोब मांडत पाटलांनी मुक्ताई नगरमध्ये बोलावून मुस्कटात मारण्याची भाषा केली. घरचं भांडण घरात ठेवा, असं सांगण्याचा प्रयत्न केला. घर फिरलं की घराचे वासेही फिरतात, असं म्हणतात. चंद्रकांत पाटलांची भूमिका याच तर्‍हेची दिसते.

भारतीय जनता पक्षात सगळंच काही आलबेल नाही. सत्ता असताना जसं आलबेल नव्हतं, तसं आताही नाही. सत्तेच्या नेतृत्वात कोणी वाटेकरी नको, म्हणून कट्टर कार्यकर्त्यांना दूर ठेवलं. तसं विरोधी नेतृत्वातही कोणी स्पर्धक नको, म्हणून याच हाडाच्या कार्यकर्त्यांना दूर ठेवलं जात आहे. पक्षच एककल्ली होऊ लागल्याने स्पर्धक नको, अशी विचित्र मानसिकता त्या पक्षात निर्माण झाली आहे. सत्तेच्या नेतृत्वात असा वाटेकर नसावा, असं एका भाजपमध्येच घडतं असं नाही. सगळ्याच पक्षात ते काही प्रमाणात सुरू आहे. मुख्यमंत्री बनणारा आपल्या वाट्यात निर्माण होणारे काटे आपसूक बाहेर काढत असतो. काँग्रेसच्या आजवरच्या सत्तेमध्ये असंच घडत आलं. मात्र काँग्रेस अथांग समुद्र समजला जायचा. तेव्हा इतक्याशा लुटूपुटीकडे फारसं लक्ष दिलं जात नसे. पण काँग्रेस म्हणजे भाजप नाही. पार्टी विथ डिफरन्सचा नारा देणारा तो पक्ष काँग्रेस पक्षाहून स्वतंत्र विचाराचा आणि लोकशाहीची मुल्य जपणारा म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेत आला आहे. वास्तवात स्वतंत्र विचार आणि लोकशाहीची मुल्य ही केवळ जप करण्यापुरती असतात ती प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी नसतात तसंच धोरण भाजपने अंगिकारलं आहे. यामुळेच पक्षाच्या कारभारात एककल्लीपणा आणि हम करेसो पध्दत रुजली आहे.

भारतीय जनता पक्षातील हा प्रश्न अर्थातच सुरू असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत आला आहे. राज्य विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत उमेदवार कोण असावेत, यावरून हा वाद उफाळला. उमेदवार कोण असावेत, हा सर्वस्वी त्या त्या राजकीय पक्षांचा विषय आहे. त्यात कोणी नाक खुपसण्याचं कारण नाही; पण याच कारणासाठी जेव्हा नेते आणि कार्यकर्ते नेतृत्वाला जाब विचारतात तेव्हा तो सामान्य कार्यकर्त्यांच्या आणि माध्यमांच्या चर्चेचा विषय होणं स्वाभाविक आहे. स्वत:ला शिस्तीचा पक्ष समजल्या जाणार्‍या भाजपमध्ये दुफळीची वायफळ चर्चा कधी ऐकायला मिळत नसे. देश पहिला, नंतर पक्ष ही भूमिका घेऊन भाजपचा आजवरचा प्रवास होता. आज ती परिस्थिती राहिलेली दिसत नाही. सांगायला देश पहिला. पण सारा आपमतलबीपणा. सारं काही आपल्याकडेच असलं पाहिजे, अशी मानसिकता पक्षाला पोखरू लागली आहे. त्या पक्षाच्या प्रसार बहाद्दरांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्तेला बदनाम करण्याचा चांगला फायदा भाजपला झाला त्यात एकनाथ खडसे, विनोद तावडे यांच्यासारखे नेते पक्षासाठी सारी शक्ती पणाला लावत होते. यातून काँग्रेसची सत्ता जाऊन शिवसेनेच्या मदतीने भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली. ही सत्ता जणू आपली जहागिरीच असल्याचा काहींचा समज झाला आहे. सत्तेचा वारू आज आहे तो अनंत काळ टिकणारा नसतो. सत्तेत असेस्तोवर ती मिजास असते. सत्तेवरून पायउतार झाल्यावर होणारी अडचण खायला उठते. मिजाशीत वागणार्‍यांना तेव्हा तोंड दाखवणंही अवघड जातं.

- Advertisement -

राज्यात सत्ता येईपर्यंत पक्षाला एकनाथ खडसे चालले, विनोद तावडे चालले, पंकजा मुंडे चालल्या. पण सत्ता आल्यावर ते नकोसे होऊ लागले, हा माणूसघाणा प्रकार झाला. विधान परिषदेच्या निमित्ताने सुरू असलेल्या चर्चेचा केंद्रबिंदू हेच तीन नेते आहेत. या तिन्ही नेत्यांवर होत असलेल्या अन्यायामुळे हा पक्ष बहुजनांच्या कल्याणासाठी नव्हे तर त्यांना पायाखाली घेणारा ठरू लागला आहे. महादेव शिवणकर, मधू देवळेकर असोत किंवा ना. स. फरांदे वा अण्णा डांगे असोत. या बहुजन नेत्यांची पक्षात झालेली गोची सर्वकाही सांगून जाते. आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून स्पर्धेत असलेल्या बहुजन नेत्यांचे पंख छाटले जात आहेत. नेतृत्व करण्याच्या तोडीचे खडसे, मुंडे आणि तावडे पक्षात न्याय मागताहेत. खरं तर पक्ष उभा राहिला तो याच कार्यकर्त्यांच्या जोरावर. पण हेच कार्यकर्ते आता नकोसे झाले आहेत. त्यांच्याऐवजी गिरीष महाजन, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम कदम, किरीट सोमय्या यांच्यासारखे होयबे लागतात. नेत्याने काहीही करो. त्याला जाब विचारण्याची हिंमत या होयब्यांमध्ये नाही. जाब विचारलाच तर याच बहुजन नेत्यांसारखं आपल्यालाही घरी बसवलं जाऊ शकतं, अशी त्यांना भीती असावी. पण मग पार्टी विथ डिफरन्सचा नारा हे नेते लावूच कसा शकतात? राज्यात भाजप कसा उभा राहिला हे या ठिकाणी सांगायची आवश्यकता नाही. देशात दोन खासदारांच्या जोरावर लालकृष्ण अडवाणींनी देश पिंजून काढला आणि सत्ता मिळवून दिली. त्याच अडवाणी, मुरली मनोहर यांना अडगळीत टाकलं जात असेल तर खडसे, मुंडे आणि तावडेंना विचारतं कोण? हे नेते आपल्या वाटेतील काटे बनतील, या भीतीपोटीच त्यांना दाबण्याचा प्रयत्न झाला. तसं खडसे विरोधी पक्षनेते फडणवीस आणि महाजन यांच्यासारख्या आमदारांना त्यांच्या आगेपिछे करताना काहीही वाटलं नाही. आता तेच फडणवीस सत्तेचे मोहरे बनल्यावर त्यांनी या तिन्ही नेत्यांचे पत्ते पध्दतशीर कापले. स्वत:ला काही करता येत नसल्याने काही ठिकाणी गृहविभागाची तर काही ठिकाणी विरोधी पक्षनेत्याची गुप्त मदत घेतली गेली. मान वर काढू नये, असा यामागचा कुटील हेतू लपून राहिला नाही.

विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना संधी नाकारून फडणवीस यांनी त्यांच्या चांगूलपणाचा फायदाच घेतला असं म्हणता येईल. असं का झालं यावर उत्तर देणं अवघड बनल्यावर प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील यांनी खुलासे करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न म्हणजे बेताल बडबड म्हणता येईल. नखं नसलेल्या वाघाची उपमा पक्षातल्या नेत्यांनी चंद्रकांत पाटलांना दिलीच आहे. पक्षातील आपलं महत्त्व वाढावं म्हणून ते कधी काय बोलतील हे सांगता येत नाही. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तर त्यांच्या तोंडाला मर्यादा राहिली नव्हती. आपण काय बोलतो, याचं भानही त्यांना नव्हतं. अजित पवारांची सिंचन चौकशी करणारे अधिकारी त्यांच्या अंगणात पोहोचलेत, असं चंद्रकांत पाटील बेलाशक सांगत होते. इतकंच नव्हे तर पवारांची जागा तुरुंगातील असल्याचंही त्यांनी वक्तव्यं केलं. शरद पवारांचा दिल्लीतील बंगला राहणार नाही, असं बालिश वक्तव्यं त्यांनी केलं होतं. माज आलेला वारू सुटावा तसं चंद्रकांत पाटील सुटले होते. ना अजित पवारांचं काही झालं ना पवारांचा बंगला गेला. देवेंद्र फडणवीस यांच्या एकाधिकारशाहीचा जसा फटका पक्षाला बसला तसा चंद्रकांत पाटील यांच्या अतिबोलण्याचा परिणामही पक्षाला महाराष्ट्रात भोगावा लागला आहे. एव्हाना २८८ पैकी २३५ जागा एकहाती जिंकण्याच्या गमजा मारणार्‍या चंद्रकांत पाटलांसारख्या नेत्याला जनतेने १०५ वर आणून ठेवलं याची जराही फिकीर या दोन नेत्यांना नाही. इतकं असूनही पक्षाच्या भल्याचा जराही विचार त्यांच्याकडून होत नाही, असंच विधान परिषदेच्या निवडणुकीवरून दिसतं. राज्यातील सत्ता हातून गेली तरी हे नेते स्वत:त सुधारणा करण्याचं नाव घेत नाहीत, देशाहून आणि पक्षाहून स्वत:ची ताकद वाढवण्याकडेच या नेत्यांचा कल आहे, हे लपून राहत नाही.

- Advertisement -

राज्यात भाजपची सत्ता न येण्याचं कारण उघड आहे. मुख्यमंत्री होईन तर मीच. या स्वार्थाने सत्तेची गणितं बिघडली. या बिघडत्या समिकरणात विरोधी पक्षाची ताकद अधिक मजबुत करण्याचाच कोणी विचार करेल. बदलत्या परिस्थितीत जुने आणि नवे असला भेद करण्याची आवश्यकता नव्हती. उमेदवारी द्यायचीच नव्हती तर ते आधीच स्पष्ट करायला हवं होतं. आता उमेदवारी न देण्यामागची कारणं सांगताना चंद्रकांत पाटलांची होणारी दमछाक ही त्यांनी आजून वायफळपणा सोडला नाही, अशाच तर्‍हेची आहे. एकनाथ खडसे यांना, त्यांची सून आणि मुलीला दिलेल्या उमेदवारीचा हिशोब मांडत पाटलांनी मुक्ताई नगरमध्ये बोलावून मुस्कटात मारण्याची भाषा केली. घरचं भांडण घरात ठेवा, असं सांगण्याचा प्रयत्न केला. घर फिरलं की घराचे वासेही फिरतात, असं म्हणतात. चंद्रकांत पाटलांची भूमिका याच तर्‍हेची दिसते. खडसे यांच्या उमेदवारीची चर्चा करणार्‍या पाटलांनी मुंडेंची उमेदवारी नाकारण्यात लोकांचा नकार हे कारण दिलं. मग गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीचं काय, याचंही उत्तर पाटलांनी दिलं नाही. मग पक्षाच्या पाहुणचाराचा हिशोब त्यांना दिल्यावर त्यांची बोलती बंद झाली. इतरांसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडण्याचं अवलक्षण पाटलांना सोसावं लागतं, हे पाटलांना कळून चुकलं असेल.

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -