जग बदलेल पण…

Subscribe

करोनानंतर जग बदलणार आहे. पण हा बदल सर्वांगीण स्वरुपाचा असेल का, या बदलामुळे माणसाला त्याची हतबलता लक्षात येईल. इतरांना ओरबाडण्याच्या मानवी प्रवृत्तीत बदल होणार का, माणसांकडून माणसांचे वापरा आणि फेकून द्या, हे धोरण बदलणार आहे का, हे बदल केवळ आर्थिक स्वरुपाचे असतील का त्याचे सामाजिक, राजकीय आणि जमातवादी परिणामही वेगवेगळे असतील, आदी अनेक प्रश्नांची उत्तरे येणार्‍या काळात मिळतील. दुसर्‍या महायुद्धाच्या काळानंतर जग असेच बदलले होते. तरीही माणसांनी त्यातून पुरेसा धडा घेतलेला दिसत नाही. निसर्गाला ओरबाडण्याची आणि माणसांना जिंकण्याची ही प्रवृत्ती समाजाच्या स्थापनेपासूनच माणसांमध्ये आहे. जगातील महायुद्धे ही जिंकण्याच्याच इर्षेतून झालेली आहेत. या इर्षेला अधिकाराचे नाव देऊन हातात तलवारी घेतलेल्यांचा इतिहास आपल्याला देदीप्यमान परंपरा म्हणून शिकवलेला आहे...करोनामुळे ही घातक परंपरा खंडीत होणार नाही.

समुहातून जगणार्‍या माणसाला समाजाची गरज होती. एका विशिष्ट जागेत कुंपण ठोकून त्या जागेवर मालकी सांगणारा समाजाचा संस्थापक असल्याची व्याख्या समाजशास्त्रज्ञांनी केली. मात्र ती पुरेशी नव्हती. या व्याख्येतच मालकी हक्क दाखवणारा मूलभूत दोष होता. त्यामुळे समाजवादी समूहाचे समाधान करण्यासाठी या व्याख्येचा उपयोग झाला नाही. समाजात मूलभूत फरक असतोच, हा फरक निसर्गनियमानुसार असतो, हा फरक हाच समाजाचा पाया असतो, अशी व्याख्या जमातवाद्यांनी केली. ही व्याख्या करण्यामागे जमातवाद्यांच्या शोषणाच्या सिद्धांताचा पाया रोवण्याचा हेतू स्पष्ट होता. तर समाजात आर्थिक गटांमधील दरी कमी करण्याचा भर आणि सर्वहारा समुदायांच्या आर्थिक हक्कांचा विचार करणारे मत त्याविरोधात नाही रे गटाकडून मांडले जात होते. जगाची एकूणच रचना या दोनच प्रमुख भेदांवर आधारीत असल्याचे मत अलिकडच्या काळात सामाजिक शास्त्रांनी मांडले होते. मात्र भारतातील परिस्थिती वेगळी होती आणि आहे. भारतात जात आधारित समाजरचना असल्यामुळे त्याची व्याप्ती, त्याचा विचार आणि होणारा परिणामही या जातीय, धार्मिक गटभेदानुसार वेगवेगळा आणि प्रमाणात असतो, हे स्पष्ट आहे. करोनानंतर बदलणार्‍या जगाचा अंदाज घेताना हे बदल प्रामुख्याने लक्षात घ्यावे लागणार आहेत.

जग बदलणार म्हणजे नेमके काय बदलणार तर जग स्वतःच्या आरोग्याविषयी आणखी सजग होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे, व्यक्तिगत अंतर राखणे, सार्वजनिक आणि व्यक्तिगत स्वच्छता आदी विषयांबाबत माणूस आणखी काळजी घेईल, नव्हे त्याला ती घ्यावीच लागेल. करोना हा जगण्याचा भाग म्हणून स्वीकारण्याची तयारी माणसाला करावी लागणार आहे.सद्य स्थितीत ज्या चर्चा केल्या जात आहेत त्या अशा स्वरुपाच्या आहेत. निश्चितच जिवंत राहण्यासाठी माणसाला हे सर्व करणं गरजेचं आहे. माणसा माणसातील योग्य अंतर हा करोनापासून वाचण्याचा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. मात्र हे अंतर भौतिक स्वरुपाचे आहे. माणसा माणसातील भौतिक अंतराची शिकवण देणारी व्यवस्था इथे पूज्यनिय होती. हा इतिहास असल्याने हे देशातील बांधवांना अंतर कसे ठेवले जाते हे शिकवणे कठिण नाही. मात्र हे वैयक्तिक अंतर इथे खर्‍या अर्थाने ज्याला अर्थाअर्थी सामाजिक अंतर अशी संज्ञा दिली जाते तसे असणार आहे. अंतर असेल, पण ते गटांमध्ये असेल त्याची सुरुवातही आधीच झाल्याचे चित्र आहे. ऐरवी स्वच्छतेच्या नावाने देशभर संदेश देणारे जमातवादी गट करोनाच्या या आक्रमणात आपापल्या घरात क्वारंटाईन होऊन लपून बसले आहेत. सफाई कर्मचार्‍यांवर फुले उधळून, टाळ्या, थाळ्या वाजवून आपले इतिकर्तव्य पार पाडण्याचा सरकारी अविर्भावकर्‍यांनी लॉकडाऊनच्या काळातही किंबहुना त्याआधी कित्येक दशकांपासून डम्पिंग ग्राऊंडवर राबणार्‍यांच्या देहाची चाळण करणार्‍या दारिद्य्राचा विषाणू निगेटिव्ह होण्यासाठी इथल्या व्यवस्थेने काय पावले आजपर्यंत उचलली आहेत, हे सर्वश्रुत आहे.

- Advertisement -

संकटात देवाचा धावा करणार्‍या मानवाचे देवही करोनाने देवस्थानात बंद केले आहेत. करोनाच्या विषाणूला या अतुलनीय शक्तीची धास्ती बिलकूल नाही. आजपर्यंत दगडांना देवत्व देणार्‍या व्यवस्थेला आणि माणसांना करोनाच्या काळात अचानकच माणसातल्या देवाचा साक्षात्कार होऊ लागला आहे. त्यामुळेच माणसांच्या देवत्वावर फुले उधळून आपल्या आजपर्यंत जाणीवपूर्वक जपलेल्या सामाजिक लबाडी लपवण्याचा हा प्रकार आहे. करोनाच्या साथीमुळे माणसांची ही वर्षानुवर्षांची परंपरागत दांभिकता उघडी पडली आहे. ज्या जमातवादी समुदायांनी माणसांच्या सेवेमध्ये आपल्या पिढ्यान्पिढ्या खपवल्या माणसांच्या साळसूद दांभिकतेला बळी पडलेले ते समुदाय अचानक देव असल्याचा साक्षात्कार दैववादी अधिकार ठेवणार्‍यांना झाला आहे. सफाई कामगारांचे पाय धुण्याचा काही महिन्यांपूर्वी देशात झालेला प्रकार आणि रुग्णालयात, गलिच्छ ठिकाणी स्वच्छतेची सेवा देणार्‍यांचे होणारे कौतुक सारखेच दांभिकतेने भरलेले आहे.

करोना काळ संपल्यानंतरही या दांभिकतेत बदल होणे संभवत नाही. आजपर्यंत अशा अनेक साथी आल्या आणि गेल्या, परंतु संकटात देव आठवणार्‍यांना करोनानी तीसुद्धा सोय ठेवलेली नाही. म्हणूनच बंद असलेल्या धर्म आणि देवस्थानातील देणगीरुपी सोने, निधीचा वापर आर्थिक संकटात सापडलेल्या देशासाठी करावा, अशी सूचना केल्यानंतरही त्याबाबत संबंधित यंत्रणा साळसूदपणे मूग गिळून बसल्या होत्या. लॉकडाऊन हटल्यानंतर पृथ्वीवरील संकटाला अनाकलनीय शक्तींनी कसे दूर सारले त्यासाठी संशोधक, डॉक्टर, आपत्कालीन कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आणि सफाई कामगार आदी देवांनी कसे मानवरुप धारण करून पृथ्वीवरील करोना नावाच्या राक्षसाचा कसा वध केला याची चलतचित्रे येत्या काळात उत्सवात साकारली जातील. यावेळी या देवरुपी कर्मचारी असलेल्या या माणसांनीच माणसांपासून माणसात अंतर ठेवण्याचा सामाजिक संदेश दिला होता. अनाकलनीय शक्तीच्या आदेशाचे तत्कालीन नागरिकांनी केवळ पालन केले, असा कांगावाही काही दशकांनंतर मोठमोठ्या धार्मिक पुस्तकांच्या नावाने खपवल्या जाणार्‍या कागदांमध्ये केला गेलेला असेल. त्यामुळे अस्पृश्यता हा मुळात समाजव्यवस्थेतील दोष नव्हताच. तो सदृढ आणि आरोग्यदायी समाजव्यवस्थेचा पाया असल्याचा शोधही तत्कालीन धर्मग्रंथाचा संदर्भ देऊन बदलणार्‍या माणसांकडून लावला जाऊ शकतो. तर अनाकलनीय शक्ती या काळात सुप्तावस्थेत होत्या, देवस्थानांची बंद होणारी दारे ही माणसाला सक्षम करण्यासाठीच त्या परमपित्यानेच केलेली योजना होती. या चर्चेच्या विषयावर कथित धार्मिक विद्वानांकडून जाहीर परिसंवाद घेतले जातील.

- Advertisement -

डॉक्टरांना देवरुप मानणारा भारतीय समुदाय अध्यात्मिकतेमध्ये सर्वोच्च पातळी गाठलेला कसा होता यावर चर्चासत्रे घेतली जातील. त्यावेळी दिवसाला डॉक्टरांवर होणार्‍या हल्ल्यांचा आकडेवारीचा विषय खिजगणतीतही नसेल. रुग्णालयात विशेष करून करोना वॉर्डात काम करणार्‍या परिचारिका, डॉक्टर्स, सफाई कर्मचार्‍यांच्या कुटुंबांतील माणसांना माणसांच्या सोसायटीने कसे वाळीत टाकले होते, यामागील त्या कुटुंबाच्या विलगीकरणाचा हेतू साधार स्पष्ट केला जाईल. अगदी डॉक्टरांवर थुंकणार्‍यांनीही डॉक्टरांना आपल्या शिंतोड्यांतून कसे पवित्र केले यावर ठाम विश्वासगाथा लिहिली जाईल. ओडीसामध्ये करोनाचे संकट टळावे म्हणून माणसाचा बळी देण्याची नुकतीच घडली, ही हत्याच होती. हत्येला बळीचे आणि वधाचे नाव देऊन आपली विकृती लपवण्याच्या प्रवृत्तीतही करोनामुळे तसूभरही फरक पडणार नाही. करोनानंतर जग नक्कीच बदलेल..ते सजग होईल, जागरुकही होईल, सतर्कही असेल; पण व्यक्तिगत स्वरुपात, हा बदल जमातवादी, गटवादी माणसात होईल…अखिल मानव ही संकल्पना अजूनही या बदलापासून कोसो दूर आणि अनभिज्ञच असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -