घरफिचर्समायमहानगर ब्लॉगगॉडफादर काकासाहेब!

गॉडफादर काकासाहेब!

Subscribe

गेले सहा महिने उठाभाऊ वांद्रेकरांनी खूपच, प्रचंड, डोंगराएवढं काम केलंय. त्यातले दोन महिने लॉकडाऊन मध्ये गेले असं कुत्सित कोकण्यासारखं मध्येच नाक खूपसून बोलायची काही गरज नाहीये. काही अस्लं तरी त्यांनी मराठी मुलुखाचा गोवर्धन शिवबंधन बांधलेल्या आपल्या पातळश्या मनगटाच्या करंगळीवर लिलया पेललाय… एवढ्या त्यांच्या कामानं सगळेच जण भारावलेत… अगदी मोटाभाईंपासून ते मुकेश भाई…आणि कुशाभाऊ ते राजाभाऊ दादरकरांपर्यंत सगळेच. अलबत मग या सगळ्यांनी मिळून उठांना बिनविरोध आमदार केला. त्याचा नामतिलक समारंभ विधानभवनात पाच- सात मिनिटांतच उरकून उठाभाऊ निघाले…त्यांनी तडक मलबार हिलचं कुशाभाऊंचं गाजभवन गाठलं…त्यांना म्हणाले, मैं तो आप का ही हूं… ते ऐकून कुशाभाऊंचे खोल गेलेले डोळे भावना दाटल्यानं ओथंबले. त्यांनी सवयीप्रमाणे हात जोडले आणि म्हणाले, “अब होश्यारी नहीं…कोश्यारी करेगा वोही सही…” त्यांचं यमक ऐकून सगळेच दचकले आणि इकडे- तिकडे बघू लागले…मग कुशाभाऊंनीच सगळ्यांना हुश्श करण्याची संधी दिली…ते म्हणाले, वो कविराज आठवले तो नहीं आया है, लेकीन उनकी शोकल याद आती हैं तो कुछ मैं भी कर लेता हूं…!

मग काही क्षणातच मोटाभाईंच्या उपकारांची जाणीव करुन घेऊन उठाभाऊ निघाले… वांद्रे गडावर पोहचले. त्यांना आप्ल्यावरच्या जबाबदारीची जाणीव झाली म्हणून त्यांनी राजकीय वेशभूषा उतरवली. फॉर्मल्स चढवले आणि एमएमआरडीएनं नवनिर्माण केलेल्या कोविड रुग्णालयाची अष्टप्रधान मंडळासह पाहणी केली.

- Advertisement -

मूड छान होता नव्यानियुक्त आमदार-मुख्यमंत्र्यांचा… सोमवारीच त्यांच्या बिरबलाचाही बर्थडे होता. त्यांनी त्याला सकाळीच विश केलं होतं. तेव्हाच रात्री फेबुवर बोलायचंय याची कल्पना मिळाली होती. त्यामुळे अधिकाऱ्यांशी बोलून तिथे तरी तपशीलात आणि आकड्यांच्या चुका नको यासाठी प्रयत्न सुरू झाले. आणि च्यायनलांवर ब्रेकिंग आली रात्री आठ वाजता मुख्यमंत्री बोलणार… झालं. घरोघरी चर्चा सुरु…कश्यात सूट मिळणार आणि काय बंदच राहणार! सगळ्यांचे डोळे टिव्हीकडे लागले असतानाच पुन्हा फ्लॅश चालले…आठ नाही साडेआठ…ही कोरोनाची साडेसाती सुटावी या भावनेनं पुन्हा मनाची तयारी केली… पथ्थ्य असलेलं अळवाचं फदफदं खाण्याची…

आज ‘उठा’ काय सांगणार याची उत्कंठा असतानाच डोळ्यांत भरली ती त्यांच्या मागची छत्रपतींची मूर्ती…वाटलं राजे जाणते होते. आज सगळं त्यांच्या स्फूर्तीनं होणार म्हंजे शिवराज्याचा साक्षात्कारच की… पण कस्संच काय… त्यादिवशी जे मोटाभाईने केलं तेच सोमवारी उठाभाऊंनी केलं…पसरट, मुद्देहीन, विस्कळीत, बिनकामी, भावनिक. अगदी खोया-खोया ब्ला..ब्ला..ब्ला…! कधी नमोजींच्या मंत्रासारखं ‘आत्मनिर्भर’ बनायचंय सांगून त्यांच्या भक्तांनाही सुखावलं, तर कधी घाटी- कोकणी दोघांनाही भावनिकतेत गोंजारलं. कोकण्यांना तर भलतंच सेंण्टी केलं. तस्से कोकणी सेंण्टीच म्हणा. नाहीतर उगाच का मुंबैतल्या सत्तेत सेनेच्या ९२ नगरसेवकांपैकी ६० कोकणी आहेत. त्यांनाही इतकी वर्ष सेण्टी करुन ठेवणं ही थोरल्या गादीचीच पुण्याई, दुस्रं काय?

- Advertisement -

सगळा विस्कळीत मामला बघून प्रश्नच पडलाय. उठाभाऊंची तर संघटना आणि सरकारमध्ये, कोरोना आणि भूकेमध्ये, लॉकडाऊन आणि अर्थचक्रात सपशेल गल्लत तर होतं नाही ना? ही उठाभाऊंची चूक आपल्याला महागात तर नाही पडणार ना? या कल्पनेनचं घाम आला होता. अर्थात आपण काळजी करायची नाही. चूक असलीच तर ती पोटात घालायला काकासाहेब बारामतीकर आहेतच म्हणा! त्यांना चुका पोटात घालायचा खूप मोठाssss अनुभव आहे. मग ती सकाळीच सटकून जाऊन शपथ घेणाऱ्या दादा पुणेकरांची असो, की बंगल्यावर बोलवून इंजिनीयरला ठोकणाऱ्या जितूनाना ठाणेकरांची असो, मॅच फिक्सिंग करणाऱ्या क्रिकेटपटूंची असो किंवा जलसंधारणात हजारो कोटी हडप करणाऱ्यांची असो, स्टॅम्पपेपर घोटाळा करणाऱ्यांची असो की लॉकडाऊन मध्ये सहलीला जाण्यासाठी दोषी आरोपी बिल्डरांना पत्र देणाऱ्या प्रशासकीय अमिताभांची असो…सगळ्यांच्या चुका सायबांच्या पोटी. सायेब म्हंजे साक्षात देव माणूस. अंगी दैवी अंश असल्याशिवाय उगाच का कुणी दुसऱ्यासाठी धो धो पावसात भिजतं आणि मतं मागतं? ऐंशीव्या वर्षीही अजून लयजणांना घरी पाठवयाचं सांगून सभा ताब्यात घेण्याची किमया देवमाणूसच करु जाणे. आणि हो, त्यांच्या बोटात दैवी अंश असल्याशिवाय का ते पकडणारा देशाचा पंतप्रधान होतो?

आता अंगाखांद्यावर खेळणारा पुतण्या मुख्यमंत्री का होत नाही अस्ले कुटुंबभेदी प्रश्न विचारणं टाळता आलं तर बगा! आमच्यासाठी नाही निदान मराठ्ठी मुल्खासाठी तरी. या मुल्खाच्या चिंतेखातर दोन- चार जाणकारांकडून जाणून घ्यावं म्हणून प्रश्नकर्ते झालो, राज्यातून कोरोना कधी जाणार हो? तर लेकाचे म्हणतात कसे, काकासाहेब बारामतीकर घराबाहेर पडले की समजा कोरोना परतीला निघालाय…आणि अगदी तस्संच झालं बगा. काकासाहेब बाहेर आले, सख्ख्या पेक्षा मुंहबोल्या पुतण्याची पाठराखण करायला, त्याच्या चुका पोटात घालायला आणि त्याला पुढच्या वाटचालीला दिशा द्यायला…

पण कुणाचंही बोट पकडलं तरी वांद्रेकरांचा गोंधळ सुरुच आहे. त्या कन्फ्यूजन मुळेच ते म्हणतात ‘कोरोना बरोबर जगायला शिका, आम्ही तयार आहोत कोरोना बरोबर जगायला. पण कोरोना आहे का आमच्या बरोबर जगायला?’ हे असे बाळपणीचे प्रश्न उपस्थित करणं काय राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं थोडीच काम आहे. पण नाही, काकांचा आशिर्वाद आहे ना, चुका मोठ्या मनानं पोटात घालायला ते तयार आहेत ना, मग कसले का प्रश्न उपस्थित करा, कसले का निर्णय घ्या. काय प्रॉब्लेम आहे? अर्थात घ्या म्हंजे सीएस मोहतांना घेऊ द्या. आपण भलं आणि आपलं फेबु लाईव्ह भलं. नाहीतरी सरकार म्हणा ते मोहतां बाबूच चालवतात ना? तेही बारामतीकरांची शपथ घेऊनच, मोटाभाई- छोटाभाईंच्या आशिर्वादानं… असं दचकू नका, बघा ज्या खुर्चीवरनं अमिताभांनी गुप्तपणे वाधवांनाना आपल्या पत्रावर हिलस्टेशनला जाऊ दिलं त्यांना पुन्हा सक्तीच्या रजेवरुन तिथेच आणून बसवायचं, हजारो मजूरांना उपाशीपोटी तळवे रक्तबंबाळ होईपर्यंत आपल्या घरी परतावं लागतंय ही चूक पण मुखियां म्हणून उठाभाऊंचीच. अहो इतकंच काय मंगळवारी वांद्रेकरांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर परप्रांतिय मजूरांनी घरी जाण्यासाठी दुसऱ्यांदा तुफानी कल्ला केला ही चूक कोणाची? २५ वर्ष शहराच्या महापालिकेची सत्ता हातात असून कोविडग्रस्तांना ना बेड मिळत आहे ना स्वच्छतेच्या सोयी सुविधा, ही चूक कोणाची?

ते विघ्नसंतोषी मिडीयावाले बोंबलतायत. राज्य असो नाहीतर मुंबई-ठाणे, दोषांची धोंड उठाभाऊंच्याच गळ्यात. अगदी ते सरेंडर झाल्याचा शोध ही काहींना लागला. पन टेन्शन नहीं लेनेका… चुका झाल्याच आहेत आणि त्या पोटात घ्यायला काकासाहेब ही आहेत! कारण तेच आहेत मोटाभाईंचे पथदर्शक आणि उठाभाऊंचे ‘गॉडफादर’… तेच वांद्रेकरांना ‘उठा भाऊ’ सांगेपर्यंत तरी त्यांना टेन्शन नाही…! तो पर्यंत तुम्ही-आम्ही व्हायचं मूकदर्शक…कळलं का?

@बातमीवाला!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -