घरफिचर्समायमहानगर ब्लॉगनाथाभाऊ सांगा कोणाचे?

नाथाभाऊ सांगा कोणाचे?

Subscribe

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे खडसे इतक्या गाळात जाऊन रुतले की पक्षालाही त्यांची पाठराखण करणे अशक्य झाले. त्यानंतर ते पक्षात मागे पडले. अधूनमधून आपल्या अस्तित्वाची जाणीव खडसे करून देत राहिले असले तरी त्यांच्याकडे पक्ष नेतृत्त्वाने सरळसरळ दुर्लक्ष केले होते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी वारंवार बंडाचा इशारा देऊनही पक्षनेतृत्त्वाने त्यांची दखल घेतली नाही. त्यांना विधानसभेचे तिकीट दिले नाही. त्यामुळे खडसे अधिकच नाराज झाले होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाने त्यांना नाही. पण, त्यांची मुलगी रोहिणी यांना विधानसभेचे तिकीट दिले. पण, त्याही निवडून येऊ शकल्या नाहीत. आता पक्षांतर्गत बंडखोरी करून आपल्या मुलीला पाडण्यात आले, असा आरोप खडसे यांनी केला आहे. त्यामुळे ते सध्या पक्षही सोडायला तयार आहेत.

सध्या देशाच्या राजकारणात दोनच गोष्टींची सर्वाधिक चर्चा आहे. एक म्हणजे भाजप आणि दुसरे भाजपचे नेते एकनाथ खडसे उर्फ नाथाभाऊ. दिल्ली असो की महाराष्ट्राची गल्ली, भाजप आणि नाथाभाऊंनी प्रत्येकाला चर्चेचे, वादाचे, विवादाचे कारण दिलेले आहे. भाजपने लोकसभेत पारित करून घेतलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाने देशभरात खळबळ उडाली असताना नाथाभाऊंनी महाराष्ट्रात तितकाच मोठा चर्चेचा धुरळा उडवून दिला आहे. विधेयकाचे राज्यसभेत काय होणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली असताना नाथाभाऊ भाजप सोडून शिवसेनेत जाणार का, हा प्रश्नही लाखमोलाचा होऊन बसला आहे. नाथाभाऊंनी राज्यातील पक्षनेतृत्वाशी सरळसरळ बंड पुकारले असून राज्यात नव्हेतर चक्क दिल्लीत जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणातील महर्षी शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. त्यानंतर त्यांचे विमान थेट दिल्लीतून मुंबईला उतरले असून मातोश्रीच्या चरणी ते विराजमानही झाले. आता नाथाभाऊ स्वत: बाहेर पडणार की भाजपला महाराष्ट्रातील सत्तेतून कायमचे बाहेर ठेवणार याचीच सर्वांना प्रतीक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला दोन वर्षे पूर्ण होत असताना भाजपने केलेला सर्वात मोठा दावा होता भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा! पण, महाराष्ट्रात त्यालाच तडा गेला. कारण त्या दुसर्‍या वाढदिवसाचे सूर हवेत विरून जाण्यापूर्वीच, ज्येष्ठ नेते व मंत्री एकनाथराव खडसे यांच्या विरोधातले वादळ घोंगावू लागले. आधी त्यांना थेट कराचीतून दाऊद इब्राहीमने फोन केल्याची खळबळजनक बातमी आली आणि तिचा इन्कार होत असतानाच त्याचे कागदोपत्री पुरावे समोर आणले गेले. त्यावरून खुलासे दिले जात असताना, पुण्यानजीक भोसरी या औद्योगिक नगरीमध्ये करोडो रुपयांचा भूखंड खडसे यांनी आप्तस्वकियांच्या नावाने बळकावल्याचा धक्कादायक आरोप सुरू झाला. यात गंमत अशी की, खडसे व भाजपच्या प्रवक्त्याने एका आरोपाचा इन्कार करावा आणि दुसर्‍या दिवशी भक्कम पुरावे समोर आणले जावेत, अशा गतीने नाटक रंगले आहे. कोळ्याच्या जाळ्यात जसा किटक सुटायची धडपड करताना अधिकच गुरफटत जातो, तशी अवस्था खडसे यांची होऊन गेली आहे. हेच गृहस्थ कुठल्याही आरोपासाठी सत्ताधार्‍यांचे राजीनामे मागत होते आणि खुलासे फेटाळून लावत होते. त्यानंतर मुंबईतून खडसे तडकाफडकी जळगावला निघून गेले. तिथूनच त्यांनी सर्व सूत्रे हलवित भाजपात सुंदोपसुंदी असल्याचे चित्र निर्माण केले होते.

तसे बघितले तर खडसे यांच्या एकूण कार्यपद्धतीत त्यांनी काहीही वेगळे केलेले नाही. विरोधी नेता म्हणून त्यांनी जे कर्तृत्व गाजवले होते, त्यानुसारच सत्तेत आल्यावर त्यांची कार्यशैली राहिलेली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी गृहमंत्री, दिवंगत आर आर पाटील यांनी नाथाभाऊंच्या कार्यशैलीचे विश्लेषण जाहीर सभेतच केलेले होते. नाथाभाऊ विधानसभेत भ्रष्टाचारावर जीव तोडून बोलतात आणि रात्री बंगल्यावर फायली घेऊन येतात, असे आबांनी कशासाठी म्हटले होते? खडसे विरोधी नेते असताना राज्यात प्रचंड भ्रष्टाचार झाला आणि त्यासंबंधी विधानसभेत गदारोळही खूप झाला. पण, नाथाभाऊंनी कधी त्यावर अन्य आक्रमक आमदारांना बोलूही दिले नाही. खडसे यांच्या अशा विरोधी कार्यामुळे सत्ताधारी निर्वेधपणे गैरकारभार करत होते. त्यावर मनसेचे राज ठाकरे यांनी नेमके बोट ठेवले होते. विधानसभेत खडसे प्रत्येक वेळी वादाच्या विषयात उभे राहून इतका वेळ घेतात की, विरोधी आमदारांना कुठल्याच विषयावर बोलण्याची संधी मिळत नाही. अधिकाधिक वेळ खाऊन खडसे प्रत्यक्षात सत्ताधार्‍यांचा भ्रष्टाचार पाठीशी घालतात, असा आक्षेप राज ठाकरे यांनी घेतला होता. अर्थात त्याची परतफेडही राष्ट्रवादी काँग्रेसने ऐन निवडणुकीत केलेली होती. मतदान विरोधात जाणार हे ओळखलेल्या राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांना भाजपत आणून पुन्हा निवडून आणायची व्यवस्था नाथाभाऊंनीच केली. इतक्या राष्ट्रवादी आमदारांना सामावून घेण्यासाठी शिवसेनेशी असलेली युती मोडण्याला पर्याय नव्हता. पण, तितकी हिंमत भाजपाच्या अन्य कुणा नेत्यामध्ये नव्हती. ती हिंमत आपण दाखवली, अशी शेखी खडसे त्यांनी अनेकदा मिरवलेली आहे.

- Advertisement -

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे खडसे इतक्या गाळात जाऊन रुतले की पक्षालाही त्यांची पाठराखण करणे अशक्य झाले. त्यानंतर ते पक्षात मागे पडले. अधूनमधून आपल्या अस्तित्वाची जाणीव खडसे करून देत राहिले असले तरी त्यांच्याकडे पक्ष नेतृत्त्वाने सरळसरळ दुर्लक्ष केले होते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी वारंवार बंडाचा इशारा देऊनही पक्षनेतृत्त्वाने त्यांची दखल घेतली नाही. त्यांना विधानसभेचे तिकीट दिले नाही. त्यामुळे खडसे अधिकच नाराज झाले होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाने त्यांना नाही पण त्यांची मुलगी रोहिणी यांना विधानसभेचे तिकीट दिले. पण, त्याही निवडून येऊ शकल्या नाहीत. आता पक्षांतर्गत बंडखोरी करून आपल्या मुलीला पाडण्यात आले असा आरोप खडसे यांनी केला आहे. त्यामुळे ते सध्या पक्षही सोडायला तयार आहेत. पक्ष सोडून मात्र ते जाणार कुठे तर शिवसेनेत जाणार असे म्हटले जाते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्यावतीने कळवळा दाखवत खडसे आमचे जुने स्नेही आहेत असे म्हटले आहे. पण, त्यासाठी शिवसेना खडसेंशी असलेले आपले जुने वैर विसरायला तयार झाली आहे. शिवसेनेशी युती मी तोडली, असे जाहीरपणे कबूल करणार्‍या खडसेंना याच शिवसेनेने २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत खलनायक ठरवले होते. आज तीच शिवसेना खडसेंसाठी सॉफ्टकॉर्नर दाखवत आहे.

२०१४ साली विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपने अल्पमताचे सरकार बनवले; तेव्हा नाथाभाऊ काय बोलत होते? आणि कसे वागत होते? त्यावेळी लागोपाठ युती व आघाडी मोडली होती. आधी युती मोडीत निघाली व नंतर तासाभरात आघाडीही राष्ट्रवादीने मोडीत काढली होती. त्यामुळे स्वबळावर मेगाभरती केलेल्या भाजपाला सर्वात मोठा पक्ष म्हणून यश संपादन करण्याचा मार्ग शरद पवार किंवा राष्ट्रवादीनेच मोकळा करून दिलेला होता. त्यावेळी युती मोडण्यामागे आपला किती मोठा पराक्रम वा धाडस होते, त्याची रसभरीत कथा नाथाभाऊच पत्रकारांना रंगवून सांगत होते. पण, अशा कथाकथनातून दीर्घकालीन मित्रपक्ष शिवसेनेला आपण खिजवतो आहोत, याचे भान त्यांना नव्हते. इतकेच नाहीतर महसूलमंत्री असताना नाथाभाऊंनी शिवसेनेला खिजवणारी एकही संधी सोडलेली नव्हती. खडसे यांनी महसूलमंत्री असताना दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांबद्दल एक आक्षेप घेतला होता. मोबाईल वापरून त्याची बिले वेळच्यावेळी भरणार्‍यांना, विज बिले भरायला पैसे कशाला नसतात? मोबाईल कनेक्शन तोडले जाईल म्हणून ते बिल वेळीच भरता. मग विजेची बिले का नाही भरणार, असा सवाल खडसे यांनी केला. त्यावरून शिवसेनेने खडसे यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी भुईमूग जमिनीवर येतो की जमिनीखाली हे माहीत नसलेल्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोला खडसे यांनी हाणला होता. त्यानंतर आपण ही टीका शिवसेनेवर नाहीतर पत्रकारांवर केली होती, अशी सारवासारवही त्यांनी केली होती. मुद्दा इतकाच ही शिवसेनेसोबतची युती तोडून भाजपला राष्ट्रवादीच्या दावणीला बांधायला निघालेले खडसे आज पुन्हा शिवसेनेच्या दावणीला जात आहेत. अर्थात राजकारणात काहीच अंतिम नसते. परिस्थितीनुसार तत्वे, आदर्श बदलत असतात त्यामुळे खडसे हे काही मुलाखावेगळे करत आहेत असेही नाही. त्यामुळे आगामी काळात खडसे शिवसेनेत जाऊन भाजपवर तोफ डागणार की स्वपक्षातच राहून दिवाळीच्या फटाक्यांची बंदुक चालवत राहणार हे काळच ठरवेल.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -