भाजप कर्तृत्ववान उमेदवारांच्या शोधात

राज्यात भाजपचीच सत्ता येणार असून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असा भाजप नेतृत्वाला विश्वास आहे. हा आत्मविश्वास वाढला असताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी या निवडणुकीत विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देताना कर्तृत्व हा निकष असल्याचे स्पष्ट केले आहे. नव्यांना उमेदवारी देतानाही अर्थात हाच निकष असणार आहे. प्रदेशाध्यक्षांच्या या भूमिकेमुळे विद्यमान आमदारांना धडकी बसणार हे साहजिक आहे. मात्र, जनमत चाचणी कौल पक्षाला अनुकूल असतानाही उमेदवार देताना केवळ कर्तृत्व हाच निकष ठेवण्याची भूमिका कौतुकास पात्र आहे.

Mumbai

काँग्रेस-राष्ट्रवादी या विरोधी पक्षांना महाराष्ट्रात लागलेल्या महागळतीमुळे राज्यात विरोधी पक्ष गलितगात्र झाल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या कल चाचणीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असे ५५ टक्के जनतेला वाटत असल्याचेही जाहीर झाले आहे. यामुळे सक्षम विरोधी पक्षाचा अभाव आणि परावलंबी झालेला मित्रपक्ष यामुळे भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा आत्मविश्वास प्रचंड वाढल्याचे दिसत आहे. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर तीन दिवसांनी महाराष्ट्रात आलेले पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीही राज्यात भाजपचीच सत्ता येणार असून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास व्यक्त केला. यामुळे मुख्यमंत्र्यांसह त्यांचे मंत्रिमंडळ व विद्यमान आमदार यांचाही आत्मविश्वास वाढला असताना, प्रदेशाध्यक्ष चंद्रकातदादा पाटील यांनी या निवडणुकीत विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देताना कर्तृत्व हा निकष असल्याचे स्पष्ट केले आहे. नवीन उमेदवारी देतानाही अर्थात हाच निकष असणार आहे. प्रदेशाध्यक्षांच्या या भूमिकेमुळे विद्यमान आमदारांना धडकी बसणार हे साहजिकच आहे. मात्र, जनमत चाचणी कौल पक्षाला अनुकूल असतानाही उमेदवार देताना केवळ कर्तृत्व हाच निकष ठेवण्याची भूमिका कौतुकास पात्र आहे.

आता राजकारणासाठी पैसा गुंतवायचा व राजकीय पदांमधून गुंतवलेला पैसा वसूल करायचा, असा राजकारणात सर्रास ट्रेंड वाढला आहे. निवडणुकीच्या राजकारणात प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करायचा आणि नंतर तो वसूल करायचा या पद्धतीला कंटाळूनच आठ वर्षांपूर्वी जनतेने समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या जनआंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्या आंदोलनातून राजकीय शुद्धीचे स्वप्न दाखवले गेले होते. मात्र, त्या आंदोलनाची भरकटलेली दिशा आणि त्यातून जन्माला आलेला राजकीय पक्ष यामुळे लोकांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळेच नंतर गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून विकासात्मक नेतृत्व म्हणून कारकीर्द गाजवलेल्या नरेंद्र मोदी यांना लोकांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देऊन देशाच्या पंतप्रधानपदी बसवले. मोदी यांनी लोकांच्या अपेक्षांप्रमाणे काम केल्याच्या भावनेतूनच लोकांना त्यांनाच आणखी अधिक बहुमत देऊन पुन्हा निवडून दिले. हे सर्व विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे राजकारणात कर्तृत्ववान व्यक्तीचा शोध घेऊन मतदार त्यांच्या पाठीशी उभे राहतात, हे गेल्या काही दिवसांत दिसून येत आहे.

मतदानाची टक्केवारी दिवसेंदिवस वाढत असल्याने ठराविक मतदारांना प्रलोभने देऊन किंवा जात-धर्माच्या नावाने प्रभावित करून मते मिळवून विजय मिळवण्याचे दिवस आता हळूहळू संपत चालल्याचे दिसत आहेत. यामुळे लोकांना गृहित धरून कुणाही पक्षाने त्यांच्यावर उमेदवार लादले म्हणून लोक स्वीकारत नाहीत, हेही अलिकडच्या काळात दिसले आहे. भारतीय मतदार हा प्रत्येक ठिकाणी सत्ताधार्‍यांना पर्याय शोधण्याच्या मनस्थितीत आहे, फक्त त्याच्यासमोर योग्य पर्याय दिला पाहिजे एवढेच. मागील वर्षी मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांमधील निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वापेक्षा सरस नेतृत्वाचा पर्याय काँग्रेसने दिल्यानंतर लोकांनी तीनही राज्यांमध्ये काँग्रेसकडे सत्ता दिली होती. त्याच राज्यांनी लोकसभा निवडणुकीत मात्र, पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पूर्वीप्रमाणेच विश्वास व्यक्त केला. यामुळे लोक चांगले लोकप्रतिनिधी व चांगल्या सरकारच्या शोधात आहेत. प्रत्येक निवडणुकीत मतदान करताना मतदारांचा हा शोध सुरू असून, लोकांना चांगले पर्याय देण्याची जबाबदारी ही राजकीय पक्षांची आहे. लोकांची ही गरज ओळखून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकादादा यांनी कर्तृत्ववान उमेदवारांनाच उमेदवारी देण्याची घोषणा निश्चितच स्वागतार्ह आहे. लोकांच्या मनातील भावना विचार करून भाजपने कर्तृत्ववान म्हणजे लोकांची कामे करणार्‍या उमेदवारांचा विचार सुरू केला असेल, तर इतर पक्षांनीही तशीच भूमिका घेणे गरजेचे आहे. यातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात चांगले काम करणार्‍या उमेदवारांमधून लढत होऊन त्यातील अधिक चांगल्या उमेदवाराची निवड करण्याची संधी मतदारांना उपलब्ध होऊ शकेल.

मागील निवडणुकीत ऐनवेळी भाजप-शिवसेनेची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांवर सर्व जागा लढवण्याची नौबत आली. यामुळे ऐनवेळी दिसेल त्याला उमेदवारी देण्यात आली. त्यात चौरंगी लढत, भाजपची संघटनात्मक व्यूहनीती आणि मोदींचा करिश्मा यात भाजपचे बर्‍याच उमेदवारांना विजयाची लॉटरी लागली. मात्र, अनुभवाचा अभाव असल्यामुळे त्यातील अनेकांना निवडून आल्यानंतर जनतेसाठी काय कामे करायचे ही बाब गेल्या वर्षात समजू शकली नाही. शहरी भागामध्ये हा प्रकार घडला आहे. यामुळे भाजपने आता उमेदवारी देताना कर्तृत्व हा निकष लावण्याचे जाहीर केले आहे. स्वपक्षाच्या उमेदवारांचे मूल्यमापन पक्ष म्हणून भाजप करत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. इतर पक्षांनीही असा निकष लावण्यास हरकत नाही. कारण त्यामुळे कर्तृत्ववान लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी कर्तृत्ववान उमेदवारांमध्ये लढत झाल्यास त्यातून निश्चितपणे चांगले उमेदवार निवडून येतील.

जनतेची कामे वा विकासकामे करण्याची तळमळ असणारे, काम करण्याची इच्छा असण्याबरोबरच ती कामे कशी करायची याची माहिती असणार्‍या लोकप्रतिनिधींची गरज आहे. त्यातून मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न विधिमंडळाच्या माध्यमातून मार्गी लावण्याबरोबरच भविष्यकाळाचा वेध घेऊन दीर्घकालीन प्रकल्पांची मुहूर्तमेढ करणे त्यांच्याकडून अपेक्षित असते. मात्र, एकदा निवडून गेल्यानंतर जनतेची मागणी असो वा नसो केवळ निधी आणायचा व त्यातील मलई ओरबाडणे म्हणजे कर्तृत्व अशी अनेक लोकप्रतिनिधींची धारणा झाली आहे. अशा ‘कर्तृत्ववान’ उमेदवारांना आपला विद्यमान पक्ष उमेदवारी नाकारत असेल, तर प्रतिस्पर्धी पक्ष पायघड्या टाकून उभाच आहे. यामुळे कर्तृत्ववान उमेदवारांची निवड करताना भारतीय जनता पक्ष जनतेचे काम करण्याच्या कर्तृत्वाचा विचार करणार की, भलत्याच कर्तृत्वाचा हे आणखी आठ-दहा दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे. राजकीय पक्षांनी खर्‍या कर्तृत्ववान उमेदवारांचा विचार करण्यात टाळाटाळ केल्यास मतदार त्यांचे कर्तव्य बजावून कर्तृत्ववान उमेदवारांना विजयी करून ते काम पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत, हे सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे. कारण मतदार गृहित धरणार्‍यांना नाही, तर अपेक्षा पूर्ण करू शकणार्‍यांना कौल देतात!