नाराज महाराज

Subscribe

ठाकरे पिता-पुत्र दोघेही संसदीय प्रक्रियेत सहभागी झाल्याने संघटनात्मक वाढीकडे कोण, कसं आणि किती लक्ष देणार? यावर शिवसेनेला गांभीर्याने विचार करावा लागेल. कारण राष्ट्रवादीसाठी स्वत: शरद पवार त्यांचा नातू रोहित, कन्या सुप्रिया सुळे हे घडाळ्याची टिकटिक वेगाने करण्यासाठी धावपळ करतील. काँग्रेसची स्वत:ची व्यवस्था त्यांना हवी तशी आहे; पण सेनेचा संघटनात्मक डोलारा मात्र राज्यभरात नाराज महाराजांच्या हाती असणार आहे. ते खरंच मन लावून पक्ष वाढवण्यासाठी काम करतील का? यातही सेनेने बोलंदाजी करणारे कदम, रावते, जाधव, केसरकर, सरनाईक, सावंत यांना बाहेर ठेवलं आहे. ते खरंच गप्प राहून काम करतील का?

ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार तीस तारखेला झाला आणि तीन पक्षांनी मिळून बनलेल्या या सरकारमधील तिन्ही ठिकाणी विस्तारानंतरची नाराजी दिसून आली. कर्नाटकात जे झालं तेच विस्तारानंतर महाराष्ट्रात होऊ शकेल, अशी खूणगाठ बांधून भाजपमधली काही मंडळी दबा धरून बसलेली आहेत. तीन भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येणे शक्य नव्हतं ते पवारांच्या कलाकारीने शक्य झाल्यानंतर आता छोट्या-मोठ्या कुरबुरींनी आणि नाराजीने महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कोणताही अपशकुन होऊ नये यासाठी ठाकरे-पवार यांच्या जोडीनंच काँग्रेसचे दिल्ली ‘हायकमांड’ पण दक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेतील दिवाकर रावते-रामदास कदम, तानाजी सावंत, प्रताप सरनाईक, भास्कर जाधव, सुनिल प्रभू, रविंद्र वायकर, राऊत बंधू, भरत गोगावले आणि दिपक केसरकर नाराज आहेत. शिवसेनेनं या विस्तारामध्ये आपल्याला साथ देणार्‍या तीन अपक्षांना स्थान दिले आहे. त्यामध्ये बच्चू कडू, गडाख आणि राजेंद्र यड्रावकर यांचा समावेश आहे. यापैकी कडू हे सरकारच्या स्वास्थ्यासाठी आणि गडाख हे नगरमध्ये पक्षवाढीसाठी गरजेचे आहेत. त्यातही गडाख यांचा पवारांशीही दोस्ताना आहे. या अपक्षांना मंत्रिपद देताना पक्षातल्यांची नाराजी उद्धव यांना ओढवून घ्यावी लागली आहे.

स्वतः पक्षप्रमुख सरकारच्या प्रमुखपदी असल्यामुळे पक्ष वाढवण्याच्या कामासाठी आणि पक्षावर नियंत्रण मिळवून देण्यासाठी आदित्य ठाकरे यांना संघटनात्मक बांधणीतून शिवसेनेवर मजबूत पकड मिळवण्याची आणि सरकारी यंत्रणा फडणवीसांनी वापरली तशी वापरून पक्ष पसरवण्याची संधी होती. मात्र त्यापेक्षा आदित्य यांनी मंत्रीपद स्वीकारणं उचित समजलेलं आहे. अर्थात यामागे त्यांचा असलेला दृष्टिकोन आणि आराखडा लवकरच त्यांच्या कामामधून स्पष्ट होऊ शकतो. त्यानंतरच यावर सविस्तरपणे भाष्य करता येऊ शकतं. पश्चिम विदर्भातील सेनेची नाराजी पक्षाची डोकेदुखी वाढवू शकते. या भागातील संजय रायमुलकर, गोपीकिशन बाजोरिया यांना संधी मिळावी अशी शिवसेनेतील स्थानिक नेतेमंडळी खासदार भावना गवळी, प्रताप जाधव या मंडळींची अपेक्षा होती. मात्र यवतमाळच्या संजय राठोड यांच्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्यांच्या पदरी निराशा आलेली आहे. राठोड यांची मागील कामगिरी यथातथाच असूनही त्यांना झुकतं माप दिल्यामुळे सेनेतील नाराजी अधिकच वाढीला लागली आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे पुणे-भोरचे आमदार संग्राम थोपटे, कराडचे पृथ्वीराज चव्हाण, मुंबईचे नसीम खान,अमीन पटेल, कोल्हापूरचे काँग्रेस नेते पी.एन. पाटील ही काँग्रेसी मंडळी प्रामुख्याने नाराज आहेत. तर राष्ट्रवादीमध्ये बीडचे प्रकाश सोळंके, पिंपरी-चिंचवडचे अप्पा बनसोड, पालघरचे सुनिल भुसारा, सोलापूरचे बबन शिंदे यांची नाराजी लक्षणीय करू शकते. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तिन्ही पक्षांनी मिळून आपल्याला नियमानुसार मंजूर झालेला सगळा कोटा पूर्ण केलेला आहे. त्यातही राष्ट्रवादीकडून विस्तारावर पूर्णपणे पवारांचा तर सेनेकडून उद्धव ठाकरे यांचाच प्रभाव असल्याचं स्पष्ट झालं आहे. सगळ्याच पक्षातून घराणेशाही झाल्यामुळे अनेक निष्ठावंतांना पदरी नाराजी पाडून घ्यावी लागली आहे. ही नाराज मंडळी भाजपच्या हाताला लागणार की मन मारून पक्षात राहणार का? हे येणारा काळ ठरवेल. अर्थात सत्ता आणि त्यातून निर्माण होणारी मत्ता हाच सध्याच्या राजकारणाचा एकसूत्री कार्यक्रम असल्यामुळे याक्षणी काही भाष्य आणि भाकित करणं थोडंसं धाडसाचं ठरू शकतं.

सत्ताधारी पक्षांमध्ये असलेली नाराजी आपल्या पथ्यावर पडून आपण काहीतरी सकारात्मक घडवून आणू असं भाजपमधील एका गटाला सतत वाटतंय. अर्थात १०५ जागा जिंकून विरोधी बाकावर बसलेला आणि सत्ता संघर्षाची लढाई जिंकून तहात संधी गमावलेला भाजप दबा धरून बसला असेल तर नवल वाटायला नको. कर्नाटकात अशाच नाराजांनी सत्तेचा शकट पालटून दाखवला; पण ते महाराष्ट्रात घडेल का ते आत्ताच सांगणं थोडे कठीण आहे. कारण असा प्रयत्न करणार्‍यांच्या बाबतीत तीन पक्ष एकत्र आले तर अशा धाडसी मंडळींचं राजकीय आयुष्यच अडचणीत येऊ शकतं. त्यामुळे सध्याच्या दिवसात हे करण्यासाठी कोण धजावणार हा प्रश्न आहे? भाजपने सत्तास्थापनेसाठी हात घातला तर फडणवीस, खडसे, शेलार किंवा पाटील यांच्यात नेता कोण असेल ते ठामपणे कळत नसल्याने कुणीही धाडसाच्या वाटेला जायला तयार नाही. मागील पाच वर्षांत सत्तेसाठी भाजपत झालेलं इन्कमिंग निष्ठावंतांसाठी डोकेदुखी ठरली होती. आता हे जागोजागचे आलेले सत्तालोलुप सत्ता नसल्यामुळे कासावीस झालेले आहेत. त्यांना पुन्हा आपल्या पक्षाकडे जाण्याचे वेध लागले आहेत. तसे संकेत त्यांनी देवेंद्र यांना द्यायला सुरुवात केली आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांचे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी असलेली मैत्री अमृता फडणवीस आणि किरीट सोमय्या यांच्या व्यक्तिगत टिकाटिप्पणीमुळे दुरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांना आणि आमदारांना भाजपपासून सावध राहण्याचा आणि जबाबदारीचे भान ठेवून वागण्याचा सल्ला दिला आहे.

- Advertisement -

या तीन पक्षांच्या सरकारमधल्या मंत्रिपदामुळे नाराजी वाढू नये यासाठी या तिन्ही पक्षांच्या बरोबरीनेच मित्रपक्षांच्या मध्येही समन्वय साधण्यासाठी ठाकरे-पवार यांना ठोस पावले उचलावी लागणार आहेत. फडणवीस यांच्या काळात प्रशासनातल्या सनदी अधिकार्‍यांचा एक मोठा वर्ग नाराज होता. मुख्यमंत्र्यांनी दूर लोटलेल्या या नाराजांनी अनेक कामांमध्ये जाणीवपूर्वक घोळ घातला. यातल्या बर्‍याचशा फाईली पवार यांच्याशी संबंधितांच्या होत्या. ही कामं न झाल्यामुळे पाच वर्षे फडणवीसांबद्दलची नाराजी पवारांनी विधानसभेच्या निवडणुकीत सारं कौशल्य आणि सारे कष्ट एकत्र करत फडणवीसांवर उलटून लावली. त्यामुळे येणार्‍या काळात मुख्यमंत्री उद्धव यांना या पवारांच्या न झालेल्या कामांकडे जातीने लक्ष द्यावे लागणार आहे. इथे प्रश्न असा येतो फडणवीसांनी पवारांची किंवा त्यांच्या मित्र परिवाराची जी कामे अडकवून ठेवली ती कामे खरंच नियमांच्या चौकटीत बसणारी होती का? जी कायद्यात बसूनही ती केली गेली नाहीत? त्यामुळे मुख्यमंत्र्यांना काही अपाय होता का? या सगळ्याच गोष्टी बघाव्या लागणार आहेत. आणि अशी पाच वर्षे अडकलेली कामे मार्गी लावणे हे उद्धव ठाकरे यांना कितपत जमणार आहे, हा देखील या सरकार समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आतापर्यंत ‘मातोश्री’ आदेश देण्याच्या भूमिकेत असल्याचं आपण मनोहर जोशी- नारायण राणे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात पाहिलं आहे. आता उद्धव यांना स्वतःच विचार करून निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे तो पूर्ण जबाबदारीने घ्यावा लागेल. आणि तो निर्णय घेतल्यानंतर होणारी टीका, फाईलमधले खाचखळगे समजून घेण्यापर्यंतची जबाबदारी स्वतः ठाकरे यांना पार पाडावी लागणार आहे. हे करत असताना पवार नाराज होणार नाहीत हे प्रामुख्याने बघावे लागेल. कारण तीन पक्षांमधील मंत्रिपद न मिळाल्यामुळे होणारी जिल्हानिहाय महाराजांची नाराजी एका बाजूला आणि दुसर्‍या बाजूला सरकार असूनही आपल्या माणसांची आणि आपली कामं न होणं यामुळे ‘जाणता राजा’ची झालेली नाराजी, असा जर विचार केला तर ठाकरे सरकार तारेवरची कसरत करतानाच दिसून येईल.

फडणवीसांनी सरकारी यंत्रणेला वापरत चांदा ते बांदा भाजप पक्ष वाढवला. त्यासाठी बारा गावचे बारा बलुतेदार पक्षात आणले. ठाकरे पिता-पुत्र दोघेही संसदीय प्रक्रियेत सहभागी झाल्याने संघटनात्मक वाढीकडे कोण, कसं आणि किती लक्ष देणार? यावर शिवसेनेला गांभीर्याने विचार करावा लागेल. कारण राष्ट्रवादीसाठी स्वत: शरद पवार त्यांचा नातू रोहित, कन्या सुप्रिया सुळे हे घडाळ्याची टिकटिक वेगाने करण्यासाठी धावपळ करतील. काँग्रेसची स्वत:ची व्यवस्था त्यांना हवी तशी आहे; पण सेनेचा संघटनात्मक डोलारा मात्र राज्यभरात नाराज महाराजांच्या हाती असणार आहे. ते खरंच मन लावून पक्ष वाढवण्यासाठी काम करतील का? यातही सेनेने बोलंदाजी करणारे कदम, रावते, जाधव, केसरकर, सरनाईक, सावंत यांना बाहेर ठेवलं आहे. ते खरंच गप्प राहून काम करतील का? यांच्या तोंडाचा पट्टा सुरू राहिला तर कुणी सांगावं हे नाराज महाराज मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना कामाला लावू शकले नाहीत, तर त्यांच्या त्यांच्या पक्षाला स्थानिक पातळीवर ते नक्कीच तापदायक ठरू शकतील. तेव्हा ठाकरे-पवार हा ताप कसा उतरवणार हे पहायचं. हा ताप सहन करून तो उतारा देऊन उतरवण्यासाठी ठाकरे-पवार यांना नववर्षाच्या शुभेच्छा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -