घरफिचर्समायमहानगर ब्लॉगगांजा, चरस आणि सिनेतारका

गांजा, चरस आणि सिनेतारका

Subscribe

तरुण-तरुणींना जे आदर्श वाटतात, ते सिनेतारका वैयक्तिक जीवनात गलोगल्ली मिळणार्‍या गांजा, चरस, सीबीडी ऑईल, एमडी अशा अमली पदार्थांचे सेवन करून अक्षरशः लोळत असतात, याचे व्हिडिओ उघडकीस आले आहेत, त्यामुळे असाध्य व्याधी होऊन त्यांचे अकाली मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आता बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेट एनसीबी उद्ध्वस्त करेलच त्यासोबत या अमली पदार्थांच्या आहारी जाणार्‍या सिनेतारकांचे आयुष्यही उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे यातून सर्वसामान्य तरुण-तरुणींनी धडा घ्यावा आणि अशा व्यसनांच्या आहारी जाऊ नये.

सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनपर्यंत पोहचला आहे. केंद्र सरकारच्या अधिकारात येत असलेल्या एनसीबी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांनी कालपर्यंत केलेल्या खुलाशामध्ये सारा अली खान, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर या प्रसिद्ध सिनेतारकांसह तरुणांच्या ह्रदयाची धडकन बनलेली दीपिका पदुकोण हिचेही नाव समोर आले आहे. दीपिका आणि जया साहो यांच्यातील व्हॉट्स अ‍ॅपवरील संवाद उघड झाले असून यात दीपिका गांजाची मागणी करत आहे. बॉलिवूडमधील गांजाचे सेवन करणारे बरेच जण समोर येऊ लागले आहेत, तर श्रद्धा कपूर हिने सीबीडी ऑईल मागितले होते. हा देखील अमली पदार्थ हल्ली मोठ्या प्रमाणात वापरला जाऊ लागला आहे.

गांजाचा वापर भारतीय उपखंडात चार हजार वर्षांपासून होत आहे. शिवाय गांजा या वनस्पतीला आयुर्वेदिक महत्त्व आहे. पौराणिक ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आढळतो.‘भांग, गांजा या शब्दाचा उल्लेख अथर्ववेदात असून तेथे त्याचा ‘पवित्र’ गवत या अर्थी उल्लेख सापडतो. सोम, कुश जव व सह या हवनीय वनस्पतीत भांग या वनस्पतींचाही समावेश आहे. याचा औषधी वनस्पती म्हणून उल्लेख प्रथम सुश्रुतांत आहे. जो ८ व्या शतकांपूर्वीचा आहे. नंतरच्या चार शतकांत जंगली रोप म्हणून भांगेचा उल्लेख संस्कृत कोशांत आहे. १० व्या शतकांत भांगेचा मादक गुणधर्म सांगण्यात आला आहे.

- Advertisement -

भांगेचे झाड सुमारे तीन हात उंच वाढते. भांगेच्या झाडापासून मुख्यतः तीन प्रकारचे उत्पन्न काढले जाते, झाडाच्या सालीतून दोर, दोरखंड व जाडे भरडे कापड तयार होते, बीयापासून तेल, तर झाडाला येणारे तुरे, त्यातून गांजा तयार होतो. तो सुकविल्यावर जो चुरा राहतो त्याला भांग म्हणतात. गांजा चिलमीतून ओढल्याने नशा येते. तसेच भांगेच्या झाडाची पाने, दांडे, तुरे व फळ हे सर्व एकत्र करून कुटल्यावर राळेसारखा पदार्थ निघतो ज्याला चरस म्हटले जाते, जो भांग व गांजा यांच्यापेक्षा जास्त नशा देतो. एक एकर गांजाची लागवड केल्यास त्यातून एक टन जरी उत्पादन झाले तरी सध्याच्या जागतिक बाजारपेठेत त्याची किंमत दोन कोटी रुपये आहे.

१९८५ पूर्वी गांजाची लागवड भारतात अधिकृत सुरू होती. मात्र, त्यानंतर याच्या उत्पादनाला कायद्याच्या चौकटीत आणून त्यावर बंदी घालण्यात आली आहे. गांजा सेवन, तसेच गांजा उत्पादन, साठवण, वाहतूक, खरेदी, विक्री, आंतरराज्य आयात-निर्यात करणे या गोष्टी ‘मादक द्रव्ये आणि मनोवैज्ञानिक पदार्थ कायदा, १९८५’ याच्या अंतर्गत गुन्हा आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास 6 महिने ते २० वर्षांची सक्त मजुरी किंवा १० हजार ते २ लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही अशी तरतूद आहे.

- Advertisement -

गांजाचे दुष्परिणाम काय आहेत?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार गांजाचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. खासकरून मेंदू, चेतातंतू, पचनसंस्था, मूत्रजननसंस्था, जननसंस्था, रक्त, श्वसनसंस्था वगैरे. गांजाची मात्रा वाढल्यास प्रचंड झोप येणे, अगदी बेशुद्धीपर्यंत अवस्था येऊ शकते. निरनिराळे भास होणे, खूप आनंद वाटणे वगैरे परिणामांमुळे गांजा जास्त घेण्याकडे आणि नियमितपणे घेण्याकडे कल होतो. यामुळेच व्यसन वाढते. गांजाचे व्यसन खूप दिवस असल्यास भूक मंदावणे, अशक्तपणा, थरथरणे, गोंधळल्यासारखे वाटणे, लैंगिक इच्छा कमी होणे असे दुष्परिणाम होतात. वीर्य पातळ होणे त्यामुळे वंध्यत्व येऊ शकते. गांजामुळे बाधा झालेल्या रुग्णास श्वसनाचे आजार होतात व अचानक श्वसन थांबून मृत्यू येण्याचा संभव असतो. गांजाच्या वापराने रक्तदाब वाढतो आणि रक्तदाब वाढल्याने हृदयविकार होऊ शकतो. गांजाचे व्यसन खूप दिवस असल्यास फुफुसाचा कर्करोग, रक्ताचा कर्क रोग, मेंदूचा कर्क रोग होऊ शकतो.

गांजाचे असे भयंकर परिणाम असले तरी अमेरिकेत मात्र त्याचा सर्रास वापर होतो. अमेरिकेतील सन फ्रॅन्सिस्को येथे प्रसिद्ध योगा वर्ग चालतो, त्या वर्गात येणार्‍या प्रत्येकाला जाणीवपूर्वक गांजाचे सेवन करायला लावले जाते. हा अनोखा योगा क्लास योग गुरू डी डुसॉल्ट चालवतात. डुसॉल्टने 2012 मध्ये हा योग वर्ग सुरू केला आणि काही दिवसात तो प्रसिद्ध झाला. योगा क्लासमध्ये गांजाचे सेवन करूनच योगा आणि प्राणायाम केला जातो. क्लास सुरू होण्याआधी अर्धा तास अगोदर लोकांना गांजा दिला जातो. गांजा सेवन करण्याची कोणतीही पद्धत नाही. लोक आपापल्या सोयीने गांजा पिऊ शकतात. याबाबत डुसॉल्टचे म्हणणे आहे की, गांजा लोकांना आंतरिक आणि आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करतो. गांजाच्या नशेत जाताच त्या व्यक्तीचे मन शांत होते आणि व्यक्ती शांततेचा अनुभव करू लागतो. डुसॉल्ट सांगतो की, असा पहिला योगा वर्ग आहे जो लोकांना ‘गांजा योगा’साठी प्रेरित करतो.

काय आहे सीबीडी ऑईल?
सीबीडी ऑईल हे भांगेच्या झाडाच्या बियांमधून काढले जाते. हे पाण्यात न विरघळणारे अमली पदार्थ आहे. यातून मानसिक उत्तेजना मिळते. चिंताग्रस्त, नैराश्य, ह्रदयविकार, निद्रानाश आणि कॅन्सरच्या उपचारातून होणार्‍या असह्य वेदना असतात या सर्व व्याधींवर उपचार म्हणून काही प्रमाणात हे तेल वापरले जाते. या तेलाचे जास्त सेवन केले तर घसा सुकणे, डायरिया असे त्रास होतात. २०१४ मध्ये कायद्यात शेवटच्या सुधारणेनुसार सीबीडी तेलाचा वापर औषध निर्मितीसाठी करण्याकरता सूट दिली आहे. परंतु, यावर सरकारी नियंत्रण राहणार आहे. त्यामुळे सरकारच्या नियमावलीप्रमाणे या तेलाची विक्री आणि वितरण करणे बंधनकारक आहे. याचे अतिप्रमाणात सेवन केल्याने स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता आहे. याचे सेवन केल्याने याची नशा लगेच चढत नाही हळूहळू चढते व दीर्घकाळासाठी झोप लागते.

एमडीचा प्रभाव का वाढतोय?
‘एमडी’ अर्थात मेफेड्रॉन हे फोर मिथाईलमेथ कॅथिनॉन या रसायनापासून बनलेल्या मिश्रणाची पावडर आहे. ते अ‍ॅम्फेटामाईन रसायनाशी मिळते जुळते आहे. एमडी ही टिटामाइनसारखीच असली तरी अजूनही अमली पदार्थांमध्ये तिचा समावेश झालेला नाही. तसा समावेश होण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने केंद्राकडे अलीकडेच प्रस्ताव पाठविलेला आहे. सुरुवातीला सहज म्हणून जरी ‘एमडी’ची चव घेतली तर कायमचे तिच्या आहारी जाण्याची भीती असते. ती सेवन करणार्‍याला किमान अर्धा ते एक तास वेगळाच ‘उत्साह’ जाणवतो. झोप आणि भूकही लागत नाही. वजन कमी होते. हाडेही कमकुवत होतात. बर्‍याचदा शाळकरी किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ‘अरे घे रे जरा, उत्साह वाढेल,’ असा आग्रह करीत तलफ लावली जाण्याची शक्यता असते.‘एमडी’चा अंमल आणि डोस जादा होऊन आजारी पडून रुग्ण अवघ्या चार ते पाच महिन्यांतच दगावतो.

तरुण तरुणींना जे आदर्श वाटतात, ते सिनेतारका वैयक्तीक जीवनात गांजा, चरस, सीबीडी ऑईल, एमडी अशा अमली पदार्थांचे सेवन करतात. याचे व्हिडिओ उघडकीस आले आहेत. त्यामुळे असाध्य व्याधी होऊन त्यांचे अकाली मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आता बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेट एनसीबी उद्ध्वस्त करेलच, त्यासोबत या अमली पदार्थांच्या आहारी जाणार्‍या सिनेतारकांचे आयुष्यही उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे यातून सर्वसामान्य तरुण तरुणींनी धडा घ्यावा आणि अशा व्यसनांपासून दूर रहावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -