घरफिचर्समायमहानगर ब्लॉगटीकाकारांनी आत्मक्लेषाची तयारी ठेवा!

टीकाकारांनी आत्मक्लेषाची तयारी ठेवा!

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूच्या प्रकरणात महाराष्ट्राला बदनाम करणारे आता कितीजण आत्मक्लेष करून घेणार आहेत, ते पाहावं लागेल. राजपूत याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्याचं केलेलं राजकारण पाहिलं की महाराष्ट्राच्या चांगुलपणाचा लोक किती गैरफायदा घेतात ते दिसून येतं. महाराष्ट्राची मान शरमेने खाली कशी नेता येईल, या राज्याची शान कशी मातीत मिळेल असं घाणेरडं राजकारण या प्रकरणाचं केलं गेलं. आज या प्रकरणातील वास्तव बाहेर येऊ लागल्यावर महाराष्ट्राला दोष देणारे सगळेच बिळात जाऊन बसले आहेत. महाराष्ट्रातल्या उद्धव ठाकरेंच्या सरकारची त्यानुषंगाने महाराष्ट्राची बेअदबी करणारे गेल्या सहा महिन्यांपासून तुटून पडले होते. सुशांतच्या मृत्यूचं त्यांना आयतं निमित्तं मिळालं. सुशांतचा मृत्यू ही घडवून आणलेली हत्या होती, असं सांगणारे हे सगळे अतिशहाणे आज मौनीबाबा बनले आहेत. राज्याला आणि राज्यातल्या सरकारला दोष देण्यासाठी एकेकामध्ये अशी काही स्पर्धा लागली होती की महाराष्ट्र राज्य हे जणू या देशाचं सावत्र अपत्य असावं. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, किरीट सोमय्या, राम कदम, अशिष शेलार, नारायण राणे असे धुरंधर यात होतेच. सुशांतचा मृत्यू ही घटना दुर्दैवीच होय. पण ती का झाली याची शहानिशा न करणारी गिधाडं तुटून पडावी तशी त्याच्या मृत्यूचं राजकारण करत होती. त्याच्या मृत्यूनंतर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव गोवण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. अभिनेत्यांबरोबरच्या मैत्रीचा गैरफायदा घेत आदित्यला यात अडवकण्यामागचं कारस्थान सहज शिजलं असं मानणं वेडेपणाचं होय. यासाठी पद्धतशीर हालचाली झाल्या. कट केले गेले. गैर माहितीचा आधार घेत या मृत्यूचं घाणेरडं राजकारण केलं गेलं.

मुंबईत घडलेल्या या घटनेच्या चौकशीत सुशांतचा मृत्यू हा हत्येमुळे नव्हे तर गळफास घेतल्याने म्हणजेच आत्महत्येने झाल्याचा निष्कर्ष ऑल इंडिया मेडिकल सायन्सेस (एम्स) ने काढल्याने सार्‍या शंका दूर झाल्या. हे काम राज्याच्या कोण्या संस्थेने केलं असतं तर संशयाचं धुकं अधिकच वाढलं असतं. एम्सनेच अहवाल दिला म्हणून ठीक, अन्यथा पुन्हा महाराष्ट्राची बदनामी देशभर करायला ही गिधाडं मोकळी होती. ही बदनामी महाराष्ट्राबाहेरच्या व्यक्तींनी केली असं नाही. जे महाराष्ट्रात राहतात, या राज्यात कमावतात, इथेच खातात आणि निश्चिंत राहतात त्या निलाजर्‍या माणसांनी हे कृत्य केलं. आपलंच घर वेशीवर टांगणार्‍या या माणसांना बेईमानीतच मोजलं तर त्यात गैर काय? सुशांतचा मृत्यू झाल्यावर पहिली प्रतिक्रिया देणार्‍या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी राज्याच्या बदनामीचा किल्ला लढवला. मुंबई राहण्यालायक राहिली नसल्याची आरोळी ठोकून या बाईंनी मुंबई पोलिसांनाही अविश्वासात मोजलं. मॉबलिंचिंगच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त करणार्‍या अमीर खान यांची पत्नी किरण राव यांना भारतातून चालते होण्याचे इशारे देणार्‍या भक्तांची दातखिळी अमृता बाईंच्या वक्तव्याने कशी बसली हे सार्‍या महाराष्टाने पाहिलं. कोणी त्यांना हेही विचारलं नाही, ज्या मुंबई पोलिसांना दोष देतो त्याच मुंबई पोलिसांच्या गराड्यात आपण पाच वर्षे सहज फिरत होता, तेव्हा कुठे होता तुमचा धर्म?

- Advertisement -

देवेंद्र फडणवीसांचे निस्सीम समर्थक समजल्या जाणार्‍या आमदार अतुल भातखळकर यांनी तर कमालच केली. काही बाही टीका केली की आपल्याकडे नेत्यांचं लक्ष जातं, असं भातखळकरांना वाटत असावं. त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सुशांतच्या मृत्यू प्रकरणात दोष देत त्यांना बडतर्फ करण्याची मागणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. भातखळकर यांच्या या प्रतापाचा त्यांच्या पक्षाच्या राज्यातल्या नेत्यांनी जाब विचारल्याचं ऐकीवात नाही. पुढे तर कंगना राणावत हिने काय थयथयाट केला हे जगाने पाहिलं. घरचेच वासे पोकळ म्हटल्यावर कंगना सारख्यांनी मागे का म्हणून रहावं? तिने मुंबईची अवस्था पाकिस्तानव्याप्त काश्मीरशी करून आपली लायकी सिद्ध केली. इतकं करूनही या बाई थांबल्या नाहीत. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या नावाने बोटं मोडली. राज्याचं राजभवन हे आता सरकारवर टीका करणार्‍यांसाठी मुक्तद्वार बनलं आहे, हे कंगनाच्या प्रवेशाने दाखवून दिलं. याआधी सरकारवर टीका करण्यासाठी भाजपचे नेते राजभवनाचा वापर करायचे. टीका झाल्यावर त्यांनी थोडं आवरतं घेतलं. तोच मार्ग कंगनाने चोखाळला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन कंगनाने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.

या सगळ्या प्रकरणात कंगनाच्या बेकायदा बांधकामावर हातोडा पडला म्हणून गळे काढणारे गुजरातमध्ये संजीव भट्ट या आयपीएस अधिकार्‍याचं घर पाडलं जात असताना मौनी बनले होते. कारण ती कारवाई पंतप्रधानांच्या हट्टाखातर झाली होती. मृत्यूच्या घटनेवर टीका करणं एक आणि जाणीवपूर्वक एखाद्याला सुळावर चढवणं दुसरं. या सगळ्यांनी थेट उद्धव ठाकरेंपासून पोलीस आयुक्तांपर्यंत सगळ्यांनाच शिक्षा देण्याचा पवित्रा घेतला. एकांगी विचार करणार्‍यांची सारासार विचार करण्याची पातळी लोप पावते असं म्हणतात. उद्धव ठाकरेंच्या या टीकाकारांचं असंच झालंय. विरोधासाठी कोणतीही घटना त्यांना पुरेशी ठरते. मोदींचा उदोउदो करणार्‍यांनी या घटनेचा गैरफायदा घेतला. महाराष्ट्रावर, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर, देशाला सुबत्ता मिळवून देणार्‍या मुंबईवर उघड टीका करणार्‍यांची भलामण करणार्‍यांची टोळी या टीकाकारांच्या ओंजळीतून पाणी पित होती. महाराष्ट्रातील सत्तेतला अनपेक्षित बदल त्यांना शांत बसू देत नव्हता. अर्णवसारख्या पत्रकारिता काखोटीला मारलेल्या बूमवाल्यांनी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर इतक्या खालच्या पातळीवरील टीका केली, की हा पत्रकार आहे की कोणाचा सांगकाम्या, हे कळायला वेळ लागत नव्हता. पत्रकार कितीही मोठा असला तरी त्याने आपली मर्यादा पाळलीच पाहिजे. ही मर्यादा अर्णवने केव्हाच ओलांडली. महाराष्ट्रातल्या सत्तेवर एकट्या भाजपचंच लक्ष आहे असं नाही तर अर्णवसारखेही त्यात तेल ओतण्याचं काम करत होते, हे या सगळ्या घटनाक्रमातून स्पष्ट झालं. मुंबई पोलिसांवर अविश्वास व्यक्त करणार्‍यांनी या घटनेची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी केली. कधी नव्हे त्या नियमाचा आधार घेत सर्वोच्च न्यायालयाने ती सीबीआयकडे दिली.

- Advertisement -

आता सुशांतच्या मृत्यूचा अहवाल एम्सने दिला आहे. याच अहवालाला केंद्रस्थानी धरून सीबीआय आता आपला अहवाल तयार करण्याची शक्यता आहे. एम्सच्या अहवालाने सुशांतच्या मृत्यूचं राजकारण करणार्‍यांचा पुरता हिरमोड झाला असल्यास नवल नाही. यासाठी त्यांनी केलेली मेहनत वाया गेली, हे खरं असलं तरी याने महाराष्ट्राची झालेली अवहेलना संपणार नाही. महाराष्ट्राची, महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीची आणि त्यानुषंगाने मुंबई पोलिसांची बदनामी करणार्‍यांचं ईप्सित साध्य झालं. आता खरा अहवाल येऊ घातल्याने राज्याची बदनामी करणार्‍यांना आत्मक्लेष करून घ्यावा लागणार आहे. सुशांतच्या मृत्यूशी राज्यातल्या सरकारचा, सरकारचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आणि मुंबई पोलिसांचा काहीही संबंध नाही, हे स्पष्ट होऊ घातल्याने या अत्यंत हीन टीका करणार्‍यांनी या सगळ्यांची जाहीर माफी मागितली पाहिजे. हा प्रश्न एकट्या मुख्यमंत्र्यांपुरता मर्यादित नाही. तो पुरोगामी महाराष्ट्राच्या अवहेलनेचा विषय आहे. या राज्याला काही परंपरा आहेत. महाराष्ट्र ही थोर संतांची भूमी आहे. हे राज्य म्हणजे देशाचा कणा आहे. देशाची शान आहे. मुंबई ही या राज्याची कर्मभूमी आहे अशा महाराष्ट्राची, मुंबईची बदनामी करणार्‍यांनी आत्मक्लेष करून घेऊन आपली चूक कबूल केली तर ठीक अन्यथा अशांच्या आणि त्यांची पाठराखण करणार्‍या भाजपच्या बोलण्याला आणि करण्याला काडीची किंमत राहणार नाही, याचं भान त्यांनी आणि भाजपने राखावं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -