घरफिचर्समायमहानगर ब्लॉगBlog: धार्मिक भावना डिवचण्याची विकृती!

Blog: धार्मिक भावना डिवचण्याची विकृती!

Subscribe

फ्रान्सच्या संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असले, आणि कार्टुन्स काढायची परवानगी दिली असली तरी, ज्यामुळे एखाद्या धर्मियांच्या श्रध्देय भावनांना आणि आदरणीय स्थानाला धक्का लागेल, असे का करावे, तसे करणे योग्य‌ वाटत नाही. सारासार विचाराला पटत नाही. मी देव मानत नसलो, तरी जे देव मानतात, त्यांची टिंगलटवाळी किंवा हेटाळणी करण्याचे स्वातंत्र्य मला कुणीही दिलेले‌ नाही. मी तसे करुनही नये. ते मानवतेला धरून नाही.

महमद पैगंबर हे मुस्लिमांचे अत्युच्य श्रद्धास्थान आहेत, त्यांचे चित्र काढले जाऊ नये, अशी मुस्लिमांची भावना आहे. श्रद्धास्थानांचे व्यंगचित्र काढले तर ते अधिकच भयंकर आहे. व्यंगचित्र हे एखाद्या व्यक्तीमधील व्यंग दाखऊन त्याची खिल्ली उडविली जाते. महमद पैगंबर हे श्रद्धास्थान असताना त्यांची खिल्ली कशी काय उडवली जाऊ शकते?
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा चीड आणि राग आणणारच असतो. मग तो अतिरेक धार्मिकतेचा असो नाहीतर धर्मावर किंवा श्रध्दास्थानांवर टीका करण्याचा असो, दोन्हीही वर्ज्य आहेत.

- Advertisement -

पैगंबरांचे चित्र किंवा कार्टुन काढण्यावरुन मुस्लिमांचा उद्रेक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. असे यापूर्वी वेगवेगळ्या देशात झालेले आहे. यापूर्वी डेन्मार्कमध्ये पैगंबरांचे कार्टुन काढण्याचा प्रकार झाला. महमद पैगंबरांचे चित्र किंवा कार्टुन काढले नाही तर जगाचे खूप काही बिघडणार आहे का ? मग ते कार्टुन काढून मुस्लिमांना कशासाठी डिवचण्यात येते. निरिश्वरवादी लोक हे हेतुपुरस्सर करत आहेत का ? का, यामागे कुठली प्रतिस्पर्धी धार्मिक लाॅबी कार्यरत‌ आहे, की हा अल्पावधीत जगभर प्रसिध्दी मिळवण्याचा स्टंट आहे. पैगंबरांचे कार्टुन‌ काढले म्हणून करण्यात आलेल्या हत्या जशा समर्थनीय नाहीत, तसेच मुस्लिमांच्या श्रद्धा अशा जाणीवपूर्वक दुखावणे याचेदेखील समर्थन होऊ शकत नाही.

एम. एफ. हुसेन यांनी हिंदू देव-देवतांची नग्न चित्रे काढल्यामुळे हिंदूंनी त्या प्रकाराला विरोध केला होता. हुसेन यांचा तीव्र निषेध केला होता. हिच जर त्यांनी त्यांची व्यवस्थित चित्रे काढली असती तर भले ते मुस्लीम असले तरी कुणी आक्षेप घेतला नसता. राजा रवी वर्मा हे प्रसिद्ध चित्रकार होते आणि एम. एफ. हुसेन हेही प्रसिध्द चित्रकार होते. पण दोघांनी काढलेले सरस्वतीचे चित्र पहा. राजा रवी वर्मांनी‌ चितारलेले सरस्वतीचे चित्र पुजले जाते. चित्र कसे काढायचे हे त्या कलाकाराच्या मानसिकतेवर आणि पूर्वग्रहावर अवलंबून असते. कलाकाराला किंवा सामान्य माणसाला असलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे इतरांच्या श्रद्धास्थानांवर हल्ला‌ करण्याचा दिलेला मोफत परवाना नव्हे.

- Advertisement -

कुठल्याही धर्मातील अत्युच्य श्रद्धास्थानांवर अशोभनीय टीका केली, तर त्यांना राग येणे साहजिकच आहे. काहीजणांना दुसऱ्याची दुखरी नस दाबून त्याला विव्हळताना पाहण्याचा विकृत छंद असतो. ही माणसे कलास्वातंत्राच्या माध्यमातून आपली विकृत मानसिकता व्यक्त करत असतात.

हिंदू धर्मात श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोन्ही देव आहेत, पण कृष्णाची बरेच वेळा भरपूर खिल्ली उडवली जाते, पण ती कुणी फार मनाला लावून घेत नाही. कारण कृष्णाच्या व्यक्तिमत्त्वात खिल्ली सामावली जाते. श्रीरामांचे तसे नाही, त्यांच्यावर केलेली उलटसुलट टीका किंवा त्यांची उडवलेली खिल्ली खपवून घेतली जात नाही. कारण श्रीरामांचे व्यक्तिमत्त्व हे हिंदू धर्मियांसाठी आत्यंतिक आदरणीय आणि श्रद्धेय आहे.

प्रत्येक धर्मात श्रद्धास्थाने असतात. लोकांच्या मनात त्यांच्याविषयी दैवी भावना असते. याचा विचार कलाकार, चित्रकार, व्यंगचित्रकार यांनी करायला हवा. धार्मिक श्रद्धा सोडून इतर चित्रे किंवा व्यंगचित्रे काढायला त्यांचे हात कुणी बांधलेले नाहीत. महमद पैगंबरांची व्यंगचित्रे काढून फ्रान्समधील‌ आणि अन्य काही देशांमधील व्यंगचित्रकारांना काय साध्य करायचं आहे तेच कळत नाही ?

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -