चीन, पाकिस्तानचे भारतासमोरील आव्हान!

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला यांनी सरळ सरळ भारताला धमकी दिली आहे. चीनच्या मदतीने आम्ही पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० लागू करू, असे फारूख अब्दुल्ला म्हणताहेत. त्यांच्या या वक्तव्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. चीनच्या मदतीने पाकिस्तानला जम्मू-काश्मीरवर हल्ला करायचा आहे. काश्मीर सीमा सतत धगधगत ठेवण्याच्या इराद्याने पाकिस्तानकडून दहशतवादी कारवायांमध्ये मागील काही दिवसांत वाढ झालेली आहे. चीनच्या मदतीने पाकिस्तान हे सर्व करतोय हे काही लपून राहिलेले नाही. तर दुसर्‍या बाजूला चीनचे आव्हान दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे.

चीनसोबतच्या लडाख सीमेवर परिस्थिती युद्धजन्य आहे. चीनकडून काढण्यात येणार्‍या खोड्या अद्याप थांबलेल्या नाहीत. चीन मोठ्या प्रमाणात सीमेकडील भागात सैन्य तैनात करत आहे. इतकेच नव्हेतर पाकिस्तानला सोबत घेऊन त्याने भारताविरोधात रणनीतीही आखण्यास सुरूवात केली आहे. अलिकडेच एक छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. त्यात चीनसैनिकांच्यासोबत पाकिस्तानी सैनिक स्पष्टपणे दिसत आहे. म्हणजेच एकाचवेळी चीनला भारताविरोधात दोन आघाड्या उघडायच्या आहेत. एका बाजूला हे सुरू असताना जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला यांनी सरळ सरळ भारताला धमकी दिली आहे. चीनच्या मदतीने आम्ही पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० लागू करू, असे फारूख अब्दुल्ला म्हणताहेत. त्यांच्या या वक्तव्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. फारूख अब्दुल्ला हे भारतीय असले तरी पाकिस्तानच्या मदतीवर जगत असल्याचा आरोप त्यांच्यावर वारंवार होत आलेला आहे. पाकव्याप्त काश्मीरशी त्यांचे विशेष संबंध असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे पाकिस्तानची मनिषा काय, हे फारूख अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावरून समजून येत नाही काय? चीनच्या मदतीने पाकिस्तानला जम्मू-काश्मीरवर हल्ला करायचा आहे.

काश्मीर सीमा सतत धगधगत ठेवण्याच्या इराद्याने पाकिस्तानकडून दहशतवादी कारवायांमध्ये मागील काही दिवसांत वाढ झालेली आहे. चीनच्या मदतीसाठी पाकिस्तान हे सर्व करतोय हे काही लपून राहिलेले नाही. तर दुसर्‍या बाजूला चीनचे आव्हान दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. १० सप्टेंबर रोजी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीच्या दरम्यान रशियाच्या पुढाकाराने भारत व चीन यांच्या परराष्ट्रमंत्र्यांची स्वतंत्र बैठक झाली. त्यामध्ये दोन्ही देशांतर्फे एक संयुक्त निवेदनही देण्यात आले. यानंतर चीन आपल्या बोलण्यानुसार प्रत्यक्षात रणभूमीवर वर्तन ठेवतो की नाही याकडे सगळ्यांचे बारकाईने लक्ष होते. यानंतर २१ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा लष्करी अधिकार्‍यांची बैठक झाली त्यामध्ये परराष्ट्र खात्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.२१ तारखेच्या बैठकीनंतर दोन्ही देशांद्वारे सध्या उपस्थित असलेल्या सैन्याच्या संख्येमध्ये व तयारीमध्ये आणखी वाढ केली जाऊ नये असा निर्णय झाला असल्याचे सांगितले गेले आहे. तसेच रणभूमीवरील परिस्थिती जैसे थे ठेवावी आणि अधिक चिघळू नये म्हणून काळजी घेतली जावी असेही जाहीर करण्यात आले आहे.

इतके होऊनही चीनच्या हेतूंविषयी शंका आहेत आणि उरतात. याला अर्थातच कारणीभूत आहे ते चीनचे प्रत्यक्ष वर्तन – त्याच्या विविध सरकारी निमसरकारी वा अन्य आस्थापनांद्वारे देण्यात येणारी निवेदने तसेच चीनचे भारतामधले हस्तक यांची विधाने लेख निवेदने इत्यादीमुळे चित्र स्पष्ट होत नसून त्यामधील धूसरता वाढत आहे. किंबहुना चीनलाही अशी धूसरता हवीच आहे की काय अशी शंका येण्याइतपत हे प्रयत्न होताना दिसतात. २६ सप्टेंबर रोजी भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी एका इंग्रजी चॅनेलला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीमध्ये सध्याच्या संघर्षमय काळात चीनकडून मनोवैज्ञानिक दबावतंत्राचा वापर होत असल्याचे सांगितले आहे. तेव्हा चीनला अशी धूसरता हवी आहे कारण त्याला ती फायद्याची वाटत असावी असा निष्कर्ष यातून काढला जाऊ शकतो.

खरे तर वाटाघाटीच्या टेबलावर एक भूमिका घ्यायची पण जाहीररीत्या मात्र आक्रमक भूमिका घेण्याचे चीनचे तंत्र राहिलेले आहे. सप्टेंबर ११ रोजी चीनचे मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’मध्ये त्याचे संपादक हु शीजिन यांनी जो लेख लिहिला आहे त्याने तज्ज्ञमंडळींच्या भुवया ताणल्या गेल्या आहेत. हु शीजिन म्हणतात की चीनच्या जनतेने आपल्या हितासाठी छेडल्या जाणार्‍या युद्धाला अत्यंत धैर्याने व संयमाने सामोरे जावे आणि त्याची जी असेल ती किंमत चुकती करण्याची तयारी ठेवावी. या विधानाचा अर्थ स्पष्ट आहे की चीन सरकारने आपल्या जनतेच्या मनोनिग्रहासाठी प्रचारयंत्रणा राबवण्याचे ठरवले आहे. अर्थात, एका बाजूला अशी युद्धाची तयारी तर करायची पण युद्ध छेडल्याचा ठपका मात्र आपल्यावर यायला नको म्हणून सारवासारव करताना हु शीजिन म्हणतात की जनतेची अशी दृढ तयारी असल्याचे दिसले तर बाहेरील जग युद्ध टाळण्यासाठी आपल्याला मदत करू शकेल. आपण नैतिकतेच्या बाजूचे आहोत हे जनतेला पटवणे चीनमध्ये अत्यंत महत्वाचे मानले जाते. असे युद्ध लढण्यासाठी जनता पाठीशी उभी राहू शकते हे जाणून हु पुढे म्हणतात की, केवळ छेडायचे म्हणून युद्ध खेळले जाऊ नये. त्यात उतरलोच तर जिंकायची तयारी करूनच आपण सुरूवात केली पाहिजे. एक तर शत्रूचा पाडाव करता आला पाहिजे आणि दुसरे म्हणजे आपण जगामधले सर्वाधिक शक्तिमान राष्ट्र आहोत, त्यामुळे नैतिकता सांभाळण्याकरिता या युद्धामध्ये पडलो अशी आपल्या मनाची खात्री पटली पाहिजे.

भारत पाकव्याप्त काश्मिरच नव्हे तर अक्साई चीन आणि पाकिस्तानने १९६३ मध्ये चीनला बहाल केलेले शक्सगम खोरेसुद्धा पुन्हा बळकावू पाहत आहे, असा समज झाल्यामुळेच आज चीन चवताळला आहे. कोरोना साथीमुळे जगभर चीनची निंदानालस्ती झाल्यामुळे कमकुवत बाजू असलेल्या चीनला खिंडीत गाठून मोदी सरकार हे तीन प्रदेश आपल्या हातून हिसकावून घेणार या धास्तीने चीनला पछाडले आहे. याची तयारी मोदी सरकारने कलम ३७० व ३५अ रद्दबातल करून केलेली होतीच. शिवाय आज १९५९ च्याच जागतिक परिस्थितीनुसार अमेरिकाही चीनसमोर शड्डू ठोकून उभी आहे. म्हणजेच १९५९ चीच परिस्थिती थोड्याफार फरकाने अस्तित्वात आली असल्याचे चीन सरकारचे याबाबतीमधले आकलन असावे. अमित शहा यांनी संसदेच्या व्यासपीठावरून निःसंदेह घोषित केल्याप्रमाणेच शक्सगम खोरेच नव्हे तर पाकव्याप्त काश्मीर व अक्साई चीन जर भारताच्या खरोखरच ताब्यात गेला तर मात्र या प्रदेशातील भूराजकीय समतोल आपल्या पूर्णत: विरोधात जाईल अशी चीनला सुप्त भीती आहे. कारण ही भूमी हातातून गेली तर अत्यंत प्रतिष्ठेचा मानला गेलेला त्याचा सीपेक हा प्रकल्पच बुडीत खाती जमा होईल. इतकेच नव्हे तर पाकव्याप्त काश्मिराच्या सीमेला लागून असलेल्या अफगाणिस्तानच्या वाखान कॉरीडॉरपर्यंत भारताची सीमा जाऊन भिडणार म्हणजेच भारताला मात्र अफगाणिस्तानमध्ये प्रवेश करण्याचा आणि पुढे थेट मध्य आशियापर्यंत पोचण्याचा खुष्कीचा मार्ग मोकळा होणार ही चीनची पोटदुखीच आहे असे नाही, त्या शक्यतेने त्याच्या पोटामध्ये गोळा उठला आहे. म्हणूनच आजसुद्धा चीन ग्लोबल टाईम्सला पुढे करून त्याच १९५९ च्या सीमारेषेच्या बाता करत आहे.

एकीकडे वाटाघाटीला बसल्यावर एप्रिलपासून जी घुसखोरी त्याने केली आहे तिथून माघार घ्यायची की नाही यावर चर्वितचर्वण करण्याचे नाटक वठवायचे आणि दुसरीकडे १९५९ च्या धमक्या द्यायच्या याच अर्थ न समजणारे मूर्ख सत्ताधारी आज दिल्लीमध्ये बसलेले नाहीत. चीनचे हस्तक खाजगी बैठकांमध्ये काय बोलतात यावर चीन सरकार जर मोदी सरकारचे मोजमाप घेऊ पाहत असेल तर ते स्वतःच शी जिनपिंगसकट जगामधले एक अत्यंत मूर्ख सरकार आहे यावर शिकामोर्तब करण्यासाठी धावत सुटले आहे,असे म्हणता येईल. तेव्हा वेळीच सावध होऊन पवित्रा बदलला गेला नाही तर त्याच्या कपाळी कपाळमोक्ष लिहिला जाईल हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. अर्थात मिचमिचे डोळे उघडायचे कष्ट घेतले तर तो प्रकाश डोळ्यातून मेंदूपर्यंत जाईल. अन्यथा चीनच्या डोळ्यासमोरची काळोखी न मिटणारी ठरेल. मग पॅनगॉन्गचे तळे कुठे आणि आसपासचे मळे कुठे हे शोधू म्हटले तरी हकालपट्टी झाल्यावर शोधता येणार नाही हे स्पष्ट आहे. पाकिस्तानची मजल मुळातच चीनपर्यंत आहे. पूर्वी भिकेसाठी अमेरिकेच्या पुढे वाडगे घेऊन बसणारा पाकिस्तान आज चीनपुढे लाळघोटेपणा करत आहे. मदतीसाठी चीन सांगेल ते करायला पाकिस्तान तयार आहे. त्यामुळे पाकिस्तानलगतच्या सीमारेषेवरील पाक सैन्याकडून होणार्‍या हालचाली या चीनच्या आदेशाने होतात हे वेगळे लिहिण्याची गरज नाही. एकदा का चीनला गप्प केले तर पाकिस्तानही गप्प होणार आहे. त्यामुळे सध्या तरी भारतीय राजनितिज्ञ आणि लष्कर हे चीनला वेसण घालण्याच्या व्यूहरचनेत व्यग्र आहेत.