घरफिचर्समायमहानगर ब्लॉगअखंड भारत आणि संघ, भाजपची कोंडी!

अखंड भारत आणि संघ, भाजपची कोंडी!

Subscribe

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखंड भारताचे स्वप्न आणि दुसर्‍या बाजूला भाजपचे सत्तेचे राजकारण यामुळे दोघांचीही धोरणात्मक कोंडी होताना दिसत आहे. कारण मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजपच्या सरकारने संसदेत नागरिकत्व दुरुस्ती कायदा मंजूर करून घेतला; पण तो प्रामुख्याने देशातील मुस्लिमांच्या पचनी पडलेला दिसत नाही. त्याचेच पडसाद देशात ठिकठिकाणी पडताना दिसत आहेत. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान येथून आलेल्या मुस्लिमांना बाहेर काढायचे, अशी भाजपची भूमिका आहे, तर दुसर्‍या बाजूला पुढील कालावधीत पूर्वीप्रमाणे सभोवतालच्या देशांचा समावेश असलेला अखंड भारत साकार करायचा आहे, ही संघाची भूमिका आहे. त्यामुळे भाजप आणि संघासमोर हा पेच सोडवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

भारतीय जनता पक्ष ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय शाखा मानली जात असली तरी राजकारणात मात्र या दोन्ही घटकांची वैचारिक कोंडी होताना दिसत आहे. कारण संघाने नेहमी अखंड भारताचे स्वप्न पाहून त्याप्रमाणे स्वयंसेवकांची मानसिकता तयार केलेली आहे. भारतीय उपखंडात येणारे अनेक देश त्या अखंड भारतात येतात. एकेकाळी हे भोवतालचे देश ‘भारत वर्ष’ या संकल्पनेचे भाग होते. त्यामुळे पुढे कधी तरी ते पुन्हा भारताच्या पंखाखाली येतील असे संघाला वाटत असते. पण राजकीय सत्ता हाती आल्याशिवाय आपला विचार अधिक सक्षमपणे पुढे नेता येत नाही, याची संघाला कल्पना आहे. त्यामुळे संघ हा नेहमीच सक्षम नेत्यांच्या शोधात असतो. बर्‍याच कालावधीनंतर संघाला नरेंद्र मोदी यांच्यासारखा खणखणीत नेता मिळाला आहे. त्यामुळेच आपल्या विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार करण्यात संघाला अनुकूल वातावरण तयार झालेले आहे.

नरेंद्र मोदी केंद्रीय सत्तेत आल्यानंतर संघाच्या शाखांचाही विस्तार म्हणजेच संख्यात्मक वाढ झालेली आहे. कारण आपल्या विचारसरणीचे राजकीय नेतेच सत्तेत असले की, निर्भयपणे आपले कामकाज करता येते. त्यामुळेच जेव्हा कुणी सक्षम नेता दिसतो तेव्हा संघ त्याला प्रोत्साहन देतो. त्याच्यासाठी अप्रत्यक्षपणे समर्थन व्यवस्था निर्माण करीत असतो. संघाचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन त्या नेत्याचा प्रचार करतात, त्याचा उपयोग त्या नेत्याला राजकीय यश मिळवण्यात होत असतो. नरेंद्र मोदींच्या कारिश्म्यामुळे भाजप बहुमताने दुसर्‍यांदा केंद्रीय सत्तेत आला हे जरी खरे असले तरी निवडणुकीच्या काळात त्यांना संघाच्या स्वयंसेवकांकडून मिळणारे सहकार्य हे तितकेच महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचा नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय पातळीवर येण्याला विरोध होता. कारण त्यामुळे ते आपल्यापेक्षा वरचढ होतील. पुढे देशाचे पंतप्रधान होतील आणि आपले महत्त्व कमी होईल, अशी भीती त्यांना वाटत होती. त्या भीतीतून होणार्‍या विरोधावर मात करून मोदी राष्ट्रीय पातळीवर गेले आणि दुसर्‍यांदा पंतप्रधान झाले; पण या सगळ्यामागे संघाची मोदींना असणारी साथ अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे हे केव्हाही नाकारता येणार नाही. जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविणे, अयोध्येत राम मंदिर उभारणे, समान नागरी कायदा या तीन गोष्टी संघ आणि भाजपला घडवून आणायच्या होत्या. त्यातील पहिल्या दोन गोष्टी साध्य झालेल्या आहेत.

भाजपचे बहुतांश नेते आणि कार्यकर्ते हे संघाच्या मुशीतून आलेले असतात. त्यामुळे जे संघाला अपेक्षित असते तेच भाजपकडून केले जात असते. पण संघाच्या संस्कारात वाढलेले नेते आणि कायकर्ते भाजपमध्ये येतात, तेव्हा त्यांना राजकीय गणिते मांडावी लागतात. राजकीय सत्ता मिळवण्यासाठी खेळावे लागणारे डाव वेगळे असतात, ते संघाच्या शाखेवर खेळल्या जाणर्‍या खेळाइतके सरळ नसतात. त्यामुळे पुढे बरेच वेळा भाजपमधील नेते मंडळी सत्ता मिळवण्यासाठी विविध खेळी खेळतात, त्या संघाला मान्य होतात, असे नाही. त्यामुळे संघाची कोंडी होते. कारण आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी त्यांची अवस्था होऊन बसते. त्यामुळे हतबल होऊन शांत राहण्याशिवाय त्यांना अन्य पर्याय उरत नाही.

- Advertisement -

भाजपने पुढाकार घेऊन अलीकडेच नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेत मंजूर करून घेतला. त्या कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये धार्मिक छळामुळे हे हिंदू भारतात आलेले आहेत, त्यांना नागरिकत्व मिळणे शक्य होईल. त्याचसोबत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशातून जे मुस्लीम अनधिकृतरित्या भारतात येऊन राहत आहेत, त्यांना आपल्या देशात पाठवण्यात येईल, कारण त्यांचा धार्मिक कारणांवरून या देशांमध्ये छळ होत नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करत भारतातील प्रामुख्याने मुस्लिमांनी ठिकठिकाणी धरणे आणि आंदोलने सुरू केली आहेत. त्याला भाजपला विरोध असलेल्या राजकीय पक्ष आणि विविध संघटनांकडून पाठिंबा देण्यात येत आहे. त्यामुळे विविध ठिकाणी आझादीचे नारे देणारे तरुण तरुणी दिसत आहेत. त्यांच्यामध्ये मोदी सरकारविरोधात प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे. मोदी हटाव, यासाठीच जणूकाही ही मंडळी एकवटलेली दिसत आहेत. कारण आजवर ३७० कलम, राम मंदिर अशासारख्या संवेदनशील विषयांना देशातील मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसने कधी हात घातला नाही. पण या देशातील बहुसंख्य हिंदू असलेल्या लोकांच्या भावनाचा विचार करून आणि त्यांच्या भावनांना हात घालून भाजपने याचा उपयोग केंद्रात सत्ता आणण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी केला. मंदिर वहीं बनायेंगे हे त्याचे खास उदाहरण आहे.
आता नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात देशभरातील वातावरण ढवळून काढण्यात येत आहे. त्यात काही जण देशाच्या विभाजनाची भाषा करत आहेत. त्यातून परस्परांविषयीचे गैरसमज वाढत आहेत. एकाच समाजात राहणार्‍या लोकांनी देशाला हानीकारक ठरतील, अशा भूमिका घेणे हे केव्हाही योग्य नाही. भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष असल्यामुळे त्यांच्या हिंदुत्वाचा वाढत जाणारा प्रभाव हा समाजातील मुस्लीम आणि अन्य मागासवर्गीयांना मारक ठरेल, अशी भावना पसरत आहे. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात आंदोलने होताना दिसत आहेत.

या आंदोलनांचा एका वेगळ्या पद्धतीने भाजपला फायदा होऊ शकतो. कारण हा देश हिंदूबहुल आहे. अनधिकृतपणे या देशात राहणार्‍यांना या देशात थारा असू नये, ही एक सर्वसाधारण भावना असते. अर्थात, अशा लोकांना प्रत्यक्षात बाहेर काढणे किती शक्य होईल, हा एक तर्काचा विषय आहे. कारण बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढा, असा आवाज प्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता; पण त्यांच्या या आवाहनाला त्यावेळी विरोध झाला. पण सध्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे मतांचे ध्रुवीकरण झाले तर त्याचा फायदा भाजपला मिळू शकतो. कारण राम मंदिर उभारणी मोहिमेमुळे हिंदू मतांचे ध्रुवीकरण होऊन त्याचा फायदा भाजपला मिळाला होता. भाजप दोन खासदारांवरून थेट सत्तेपर्यंत पोहोचला होता.

एका बाजूला भाजपचा राजकीय दृष्टीकोन आणि दुसर्‍या बाजूला संघाचे अखंड भारताचे स्वप्न यात कुठेतरी अंतर्गत कोंडी होऊ शकते. कारण संघाला जर आगामी काळात अखंड भारताचे स्वप्न साकार व्हावे, असे वाटत असेल तर एकेकाळी भारताचाच भाग असलेले अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश येथील मुस्लीम लोकांना भारताबाहेर कसे पाठवणार? त्याचसोबत संघ भाजपचे काही नेते असा दावा करतात की, भारतीय उपखंडात राहणार्‍या सगळ्यांचा डीएनए सारखा आहे. जर अशी परिस्थिती असेल तर मग संघाला अधिक व्यापकतेने विचार करावा लागेल; पण ते भाजपच्या राजकीय गणितात बसणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे या अंतर्गत कोंडीतून मार्ग काढण्याचे दोघांपुढे मोठे आव्हान असेल.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -