घरफिचर्समायमहानगर ब्लॉगकाँग्रेसच्या राजकारणाचा परिपाठ

काँग्रेसच्या राजकारणाचा परिपाठ

Subscribe

ज्या घटनेने देशातील राजकारण, समाजकारण यामध्ये उलथापालथ घडली ती बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 रोजी उद्ध्वस्त करण्यात आली. त्यानंतर देशात काही ठिकाणी प्रचंड दंगल घडली. त्यात मुंबईत 2 महिने कर्फ्यू लावला होता, जाळपोळ करण्यात आली, हिंदू- मुस्लीम समुदायामध्ये झालेल्या दंगलीत दोन्ही समुदायांचे अतोनात नुकसान झाले होते. या घटनेने देशाच्या राजकारणाने कूस बदलली. भारतीय राजकारणात तेव्हा स्वातंत्र्यापासून 5 दशके काँग्रेसने राजकारण केले. मात्र, हे राजकारण करताना एकगठ्ठा मतांची संकल्पना भारतीय राजकारणात पेरली. ज्यामध्ये अल्पसंख्याक समुदायाला विशेषतः मुस्लीम आणि ख्रिस्ती समुदायाला झुकते माप देण्यात आले. त्यांना सवलती, निधी, सेवा-सुविधा पुरवण्यात येऊ लागल्या. मात्र, बहुसंख्याक हिंदूंना यापासून डावलण्यात आले.

या प्रकारच्या राजकारणामुळे हिंदूंच्या मनात कायम सापत्न वागणूक मिळाली. त्याला 1992 साली भाजपने राम मंदिर आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेसच्या राजकारणाला सुरुंग लावला. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी देशभर रथयात्रा काढली. या रथ यात्रेने हिंदूंचे संघटन निर्माण केले, त्या शक्तीला भाजपने राम मंदिर उभारणीचा कार्यक्रम लावून दिला. 6 डिसेंबर 1992 रोजी देशभर संघटित केलेला हिंदू जनसमुदाय अयोध्येत अवतरला आणि काही क्षणात बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली. या घटनेने देशातील समस्त हिंदू समुदायासमोर भाजप पर्याय निर्माण झाला. काँग्रेसच्या 5 दशकांच्या एकगठ्ठा मतांच्या राजकारणामुळे भारतातील बहुसंख्य हिंदूंच्या मनातील घुसमटीला वाट मिळाली. त्या जोरावर भाजप 2 वर्षांत भाजप राजसिंहासनावर बसला. तिथपासून भारतीय राजकारणात हिंदूंची मतपेटी ही संकल्पना रूढ झाली. याच मुद्याला महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही अंगावर घेतले.

- Advertisement -

तसेच अस्मितेवर राजकारण करणार्‍या शिवसेनेनेही कूस बदलली आणि कट्टर हिंदुत्ववादी बनली. हिंदूंचा पक्ष म्हणून देशात भाजप आणि महाराष्ट्रात शिवसेना असे चित्र निर्माण झाले. त्या जोरावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना झाली. 1999 ला रालोआ पुन्हा सत्तेत आली आणि पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 5 वर्षांचा काळ पूर्ण केला. 2014 साली यांना मिळालेले अभूतपूर्व यश आणि 2019 मध्ये त्यांना मिळलेले स्पष्ट बहुमत हेदेखील हिंदू मतपेटीच्या राजकारणाचाच भाग होता आणि आहे. जे काँग्रेसने 5 दशके अल्पसंख्याक समुदायाच्या एकगठ्ठा मतांचे राजकरण करून सत्तासोपान जपले, तेच भाजपने बहुसंख्याक हिंदूंच्या मतपेटीचे राजकारण करून काँग्रेसचा डाव काँग्रेसवर उलथवून लावला. तब्बल 22 वर्षे राम मंदिर हा विषय प्रलंबित राहिला आणि त्याचा शेवट नरेंद्र मोदी यांनी हिंदूंच्या मनाला सुखद संवेदना जाणवतील असा केला. भव्य राम मंदिर उभारणीचा पाया रोवला. त्यामुळे हिंदूंना आता हा देश हिंदूंच्या अधिकारात असावा अशी तीव्र इच्छा निर्माण झाली असून त्याचीही रणनीती मोदी यांनी ठरवली आहे, त्याप्रमाणे ते मार्गक्रमण करत आहेत.

त्यामुळे अयोध्येतील विवादास्पद जमीन श्री राम मंदिरासाठी देण्यात यावी, हा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय हिंदूंसाठी दिवाळीसारखा होता आणि आता आज बाबरी मशिदीचा विध्वंस केल्याप्रकरणी दाखल केलेल्या खटल्याचाही अंतिम निर्णय विशेष न्यायालयाने दिला. ज्यात लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, कल्याण सिंग, साध्वी ऋतुंबरा, साध्वी उमा भारती यांसह सर्व 49 जणांना निर्दोष ठरवले. या निर्णयाचेही भाजपला श्रेय मिळाले आहे. त्यामुळे भारतीय राजकारणात काँग्रेसने जी ठळक रेष एकगठ्ठा मतांच्या राजकारणाची ओढली होती तीच ठळक रेष भाजपने ओढली आहे. त्यामुळे आता भाजपला सत्तासोपानापासून दूर करणे काँग्रेसला इतक्यात जमेल हे शक्य नाही.

- Advertisement -

या प्रकरणाचा तपास करणार्‍या सीबीआयने न्यायालयापुढे 351 साक्षीदार आणि सुमारे 600 कागदपत्रे पुरावा म्हणून सादर केले होते. 48 जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते, 16 व्या शतकातील ही मशीद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचले आणि कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी फूस लावली, असा सीबीआयचा युक्तिवाद होता. लालकृष्ण अडवाणी यांनी 24 जुलैला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विशेष सीबीआय कोर्टात आपला जबाब नोंदवला होता. यावेळी त्यांना न्यायाधीशांकडून एकूण 100 प्रश्न विचारण्यात आले होते. त्याच्या एक दिवस आधी मुरली मनोहर जोशी यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. दोघांनीही आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते. भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ‘बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो.

या निर्णयामुळे रामजन्मभूमी चळवळीबाबत माझी वैयक्तिक आणि भाजपचा विश्वास आणि वचनबद्धता सिद्ध होते. नोव्हेंबर 2019 मध्ये अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने जो ऐतिहासिक निर्णय देऊन विवादित जमीन राम मंदिराला दिली, त्या निर्णयाचे पुढचे पाऊल म्हणजे आजचा निर्णय. श्री रामाचे भव्य मंदिर हे माझे स्वप्न असून त्याचे भूमिपूजन 5 ऑगस्ट रोजी झाले आहे. ‘जय श्री राम!’ अशी प्रतिक्रिया दिली. बुधवारी न्यायालयाने या ऐतिहासिक खटल्यावर अंतिम निर्णय दिला. ही घटना पूर्वनियोजित नव्हती, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली. तसेच आरोपींविरोधात कोणताही ठोस पुरावा नाही. केवळ छायाचित्रांच्या आधारे कोणालाही दोषी ठरवले जाऊ शकत नाही, विश्व हिंदू परिषदेनेही यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणतीही भूमिका बजावली नाही, असे विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. के. यादव यांनी त्यांच्या निकालपत्रात म्हटले आहे.

राम मंदिर आंदोलन एक ऐतिहासिक क्षण होता. कोर्टाने आज ऐतिहासिक निर्णय दिला आहे, ज्यांनी सुरुवातीपासूनच प्रत्येक स्तरावर न्यायालयात या प्रकरणात योग्य युक्तिवाद केला, त्यांच्या परिश्रमामुळे हा निर्णय आला. राम मंदिर आंदोलन हा अत्यंत महत्त्वाचा काळ होता, आता राम मंदिरही बनणार आहे. जय श्री राम!, अशी प्रतिक्रिया भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांनी दिली.

तर मागे घडलेली घटना आता आपण विसरली पाहिजे. बाबरी मशीद पाडलीच नसती तर श्री राम मंदिरासाठी भूमिपूजन आपण पाहिले नसते. मी आणि माझा पक्ष शिवसेना, या निकालाचे स्वागत करतो आणि अडवाणीजी, मुरली मनोहरजी, उमा भारतीजी आणि या प्रकरणात निर्दोष मुक्त झालेल्या सर्वांचे अभिनंदन करतो, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत.

या सर्व प्रतिक्रिया पाहता या निर्णयाने भाजप काय की शिवसेना काय सर्वांना आनंद झाला आहे, त्याचे राजकीय श्रेय मात्र भाजपने घेतले आहे.राम मंदिर उभारणीला सुरुवात झाली म्हणजे भाजपचे हिंदुत्वाचे राजकारण संपले असे म्हणणारे त्यांचे हे मत देशभरात पोहचत नाही तोच मथुरा येथील श्री कृष्ण जन्मस्थळाचा वाद सुप्रीम कोर्टात दाखल झाला आहे आणि त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे, हे भाजपच्या पुढील राजकारणाची दिशा असणार आहे.

एकगठ्ठा मतांची बेगमी करून ठेवण्याची पद्धत काँग्रेसने सुरू केली होती. उरलेली विरोधी पोकळी भाजपने भरून काढली. धर्माच्या मुद्यावर राजकारणात विरोधकांना शह देण्याचे तंत्रही भाजपाच्या आधीच्या काळातही सुरू झाले होते. देशाच्या स्वातंत्र्यापासून फाळणी झाल्यानंतरही दोन समुदायांमध्ये निर्माण झालेली भेग निवडणुकीच्या काळात रुंदावत गेली. देशाची फाळणी ही धर्माच्या आधारावर झाली असल्या कारणाने भारतात राहणारे हिंदू धर्मिय अशी स्पष्ट रेषा ठळक झाली. भाजपा आणि शिवसेनेच्या युतीने ही रेषा आणखी गडद केली. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्यावरील राजकारणाला राज्यातच नव्हे तर देशातही धार मिळाली. राज्यात त्याचा राजकीय लाभ शिवसेनेला झाला तर केंद्रीय पातळीवर त्याचा लाभ भाजपने घेतला. त्यामुळेच राममंदिराच्या मुद्यावरून आज फारकत झालेल्या या दोन्ही पक्षांमध्ये अधून मधून श्रेयाचे राजकारण समोर येत असते. याच विषयाभोवती मागील पाच दशके देशाचे राजकारण फिरते आहे. काँग्रेसने सुरू केलेल्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा परिणाम हा पुढील काळात भाजपच्या उदयातून स्पष्ट झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -