आता कोरोनावाली बाई अशीच हाक कानावर पडते

कोरोनाने संपूर्ण मुंबईत कहर केलेला असतानाच लोकांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण होते. परिसरात जाऊन प्रत्यक्ष भेटून लोकांशी बोलणे सोपे नव्हते; पण शेवटी अनेकांसाठी आमचेच शब्द आधार झाले होते. मुंबईचे गल्लीबोळ पिंजून काढताना कोरोनावाली बाई ही आम्हाला मिळालेली नवी ओळख. बोलणे टाळणार्‍या लोकांपासून ते आम्ही दिसलो की दरवाजा लावणारे लोक…असे सगळ्या प्रकारचे अनुभव घेतले. कामाच्या ठिकाणचा त्रास आणि समाजाकडून येणारे मानसिक दडपण अशा कठीण परिस्थितीतही खचून न जाता खंबीरपणे सगळ्या परिस्थितीला सामोरे जायचे एवढीच जिद्द मनात ठेवली. आपली कुणाला तरी गरज आहे, आपल्या पोहोचल्याने परिस्थिती बदलेल एवढे मनाशी ठेवले आणि कोरोनाच्या संकट काळाचा सामना केला. मुंबईतल्या अनेक प्रभागांत सुरू असलेली मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेविकांची कोरोना काळातली लढाई सांगताना मला खूप अभिमान वाटत आहे.

डॉक्टर नर्सेस यांचं नेहमीच कौतुक होत असते. मात्र, आरोग्य सेविकांच्या वाट्याला ती कौतुकांची थाप फार कमी वेळा मिळते. याच आरोग्य सेविकांचं काम हे डॉक्टर नर्सेस यांच्या इतकेच महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या कठीण काळात कोणताही विचार न करता आम्ही लोकांसाठी वाहून गेलो, त्यांची सेवा केली. लोकांना कोरोनापासून काळजी कशी घ्याल इथपासून ते कोरोना पेशंट शेवटची घटका मोजत असताना पर्यंतचा प्रवास आम्ही पाहिला. किंबहुना त्यांच्यासोबत आम्ही जगलो. आमच्याकडे आलेला पहिला पेशंट आजही आम्हाला आठवतो. पेशंटला अ‍ॅम्ब्युलन्समध्ये बसवण्यापासून आम्ही सगळी कामं केली. पेशंटना धीर देणे, त्यांच्याशी बोलणे हे सगळं आम्ही त्या काळात करत होतो.

आलेल्या पेशंटना किंवा त्याच्या नातेवाईकांना धीर देणं आणि त्यांचा माईंड वॉश हे आमच्या समोरचे मोठे आव्हान होते. रूग्णांच्या घरच्यांची समजूत काढण्यातच आमचा अर्धा वेळ गेला. आपले एखाद माणूस आजारी असेल तर त्याबद्दल चिंता ही वाटणारच. त्यांना समजावणे आणि त्याच्या कलेने घेणे हेच महत्त्वाचं काम आमच्यासाठी होते. गेली बरीच वर्षे आरोग्य सेविका म्हणून आम्ही काम करतोय.पण कोरोनाच्या काळात घराबाहेर पडून काम करणे हे धोकादायक वाटायचे. गल्लोगल्ली जाऊन लोकांचे रिपोर्ट बनवणे, त्यांच्याशी बोलणे हे त्या काळात सोपे नव्हते; पण आपण ज्या क्षेत्रात काम करतो तिथे हार मानून चालणार नाही. आलेल्या संकटांना धीराने तोंड देण्याची गरज या काळात भासत होती.

आपल्यामुळे आपल्या घरच्यांना काही होऊ नये ही प्रार्थना करून रोज कामासाठी घराबाहेर पडत होतो. सुरुवातीचा काळ अत्यंत भीतीदायक होता. घरात आल्यावर मुले म्हणायची आई तू नीट काम कर, तुझ्यामुळे घरात कोणाला काही होता कामा नये. घरातून बाहेर पडताना इतर कोणाआधी घरच्यांची समजूत काढणे हे काम सर्वात आधी करावे लागले. या कामाला १५-२० दिवस लागले; पण त्यानंतर मोठा बदल झाला. जी मुले आम्ही घरी गेल्यावर दूर जायची किंवा काळजी पोटी बोलत होती तिच मुले आता आमची आई कोरोना योद्धा असे म्हणून आमचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत होती. आमच्या बद्दलचा अभिमान आता त्याच्या डोळ्यात दिसून येत होता. इथेच आमचे निम्म्याहून अधिक काम पार पडले होते. ते म्हणतात ना इतरांना शिकवण्याआधी त्या कामाची सुरुवात आधी आपल्यापासून आणि आपल्या कुटुंबापासून करावी.

आजही परिसरात गेल्यावर कोरोनावाल्या बाई अशाच नावाने लोक हाक मारतात. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात आम्ही घरी गेलो की शेजारी पाजारी घराची दारे लावून घ्यायचे. कस्तुरबा, सायन रूग्णालय अशा विविध रूग्णालयात आम्ही काम करायचो. तुमच्यामुळे आम्हालाही कोरोनाची लागण होईल या भीतीने लोक आमच्याशी बोलायचेही टाळत होते. मात्र, त्या होणार्‍या मानसिक त्रासाला धीराने तोंड दिले. काही झाले तरीही स्वत: मानसिक आणि शारीरिकरित्या खंबीर राहायचे, हे मनाशी पक्के ठरवले होते. कारण या काळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली होती की, आपल्यासाठी कुणीतरी तिथे थांबले आहे. आपण गेल्यावरच तिथे काही तरी बदल घडणार आहे हे ध्येय मनात होते.

जीवनात स्वत:ची इतकी काळजी आम्ही कधी घेतली असेल तर या कोरोनाच्या काळात. कोरोनाने आम्हाला दुसर्‍या सोबतच स्वत:ची काळजी घ्यायला शिकवले. सुरुवातीच्या काळात जगभरात मास्क आणि इतर गोष्टींचा तुटवडा होता. परंतु नंतरच्या काळात पालिकेनेही आम्हाला कोणत्याच गोष्टींची कमतरचा भासू दिली नाही. मार्च महिन्यात कामाला सुरुवात केल्यानंतर कोरोनाच्या काळात सुट्टी नावाचा शब्द आम्ही विसरलो. सुट्टी नाही मिळाली याची खंत कधी वाटली नाही. रूग्णांची सेवा करणे, त्यांच्याशी गप्पा मारणे यात हे दिवस कसे निघून गेले हे समजलेच नाही. लोकांसाठी, या देशासाठी तयार झालो आहोत याची जाणीव त्या काळात झाली होती. आरोग्य सेविका म्हणजे स्वत: विचार न करता दुसर्‍याची सेवा करणे. दुसर्‍याची सेवा करण्यासाठीच आरोग्य सेविका बनली आह,े याच ध्येयावर आजवर आम्ही इथे उभ्या आहोत. आम्ही कायम अशाच उभ्या राहणार आणि आपल्या देशासाठी इथल्या लोकांसाठी काम करणार.