घरफिचर्समायमहानगर ब्लॉगकरोना आणि कुक्कुटपालनवाल्यांचे रोना

करोना आणि कुक्कुटपालनवाल्यांचे रोना

Subscribe

करोना हा विषाणू नवा आहे आणि वेगळ्या प्रकारचा आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात सध्या तरी प्रतिबंधात्मक लस नाही. मात्र, लस विकसित होईपर्यंत तरी उपचारात्मक प्रयत्नांवरच भर द्यावा लागणार आहे. अशा वैद्यकीय आणीबाणीत अफवांना ऊत येतो. अफवा दूर करण्यापासून कार्यक्षमतेने उपचारात्मक यंत्रणा उभारण्यापर्यंतची पावले सरकारांना उचलावी लागतील. तसेच ज्या पद्धतीने शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याबाबत राज्य सरकारमध्ये सर्वच पक्षात एकवाक्यता दिसते तशी करोनामुळे संकटात सापडलेल्या कुक्कुटपालन व्यवसायाला उभारी देण्यासाठी सरकारने तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीने फडणवीस सरकारने शेतकर्‍यांचा भाजीपाला आणि फळे विकत घेण्यासाठी कित्येकवर्षे असलेली दलाल यंत्रणा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला त्याच धर्तीवर कुक्कुटपालनवाल्यांच्या कोंबड्या विकत घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. अन्यथा एकेका पोल्ट्रीफार्ममध्ये हजारच्या वर कोंबड्या असणार्‍या राज्यातील पोल्ट्रीफार्मवाल्यांना ठाकरे सरकार आपले सरकार वाटणार नाही.

चीनमध्ये करोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत हजारो बळी गेलेत, तर जगभरात हा आकडा तीन हजारांपेक्षा जात असून या विषाणूंचा संसर्ग जगभर पसरला आहे. जगात असा एकही देश शिल्लक नाही जिथे करोनाची दहशत नाही. जगभरात करोनावर प्रतिबंधात्मक लसीचा शोध सुरू असून संसर्गावर उपाय शोधण्यासाठी वैज्ञानिक रात्रंदिवस एक करत आहेत. परंतु १-२ महिन्यानंतरही करोनावर अद्याप औषध सापडलेले नाही. त्यामुळे यावर काळजी काय घ्यावी, याविषयी सकाळपासून रात्री झोपेपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व डीजिटल प्लॅटफॉर्मवर सूचनांचा महापूर आलेला आहे. सोशल मीडियाच्या या अफवारूपी गोंधळामुळे बळीराजा मात्र कासावीस झाला आहे. मागील तीन दशकांपासून शेतीसोबत राज्यभर आणि देशभरात जोडधंदा म्हणून कोंबड्या, शेळी पाळणे सुरू झाले आणि त्यातून चार पैसे शेतकर्‍याच्या हातात येऊ लागले. मात्र, कधी बर्ड फ्लू तर कधी विचित्र तापामुळे कोंबड्या मरायच्या, त्यामुळे अंडीही मिळत नव्हती. पक्षांमध्ये येणारे आजार हे उन्हाळ्यातच येत असल्याने ऐन सुट्टीच्या कालावधीत या जोडधंद्यातून हातात चार पैसे येतील, ही आशा धूसर होत असल्याचे दिसत आहे. चीनमध्ये करोनाचा उद्रेक झाल्यानंतर त्याचे परिणाम इतर देशातील उद्योग, व्यापार, व्यवसायांवर होताना दिसत आहेत. राज्यातील कोंबडीपालन व्यवसायावरही त्याचे परिणाम दिसत असून कोंबड्यांसह त्यांच्या खाद्यान्नासाठी होणारी खरेदीदेखील मंदावल्यामुळे संपूर्ण बाजारहाट थंडावला आहे. करोनाच्या धास्तीने कोंबड्यांचे दर विशेषतः ब्रॉयलर कोंबड्यांचे दर घाऊक बाजारात 100 रुपयांवरून 20 रुपयांपर्यंत खाली घसरले आहेत. काही ठिकाणी तर कोंबड्या किलोला 10 रुपये दराने विकल्या जात असल्याने कुक्कुटपालन व्यावसायिक डोक्याला हात मारत आहेत. मुद्दल राहिली दूर, पण तोटा सोसूनही कुणी कोंबड्या विकत घ्यायला तयार नाही, अशी त्यांची परिस्थिती आहे.

सध्या राज्यभरात लाखो पक्ष्यांच्या (कोंबडीचे पिल्लू) खरेदीसाठीची नोंदणी थांबवलेली आहे. एका पिल्लाचे 42 ते 49 दिवस पालन-पोषण करून 80 ते 100 रुपयांना विक्री होत असेल तरच हा व्यवसाय करणार्‍यांना परवडते. मात्र, सध्या बाजारात 20 ते 25 रुपयांपर्यंतचीच ब्रॉयलर कोंबडीची मागणी आहे. कोंबडीला वाढवण्यापर्यंतचा खर्च हा सुमारे 60 ते 65 रुपयांपर्यंत होतो. त्यामुळे एक कोंबडी वाढवण्यासाठी येणारा खर्चही सुटत नसल्याने कोंबड्यांचा व्यवसाय करणारे व्यवसायिक ‘अजून किती दिवस नुकसान सहन करायचे’, या विचारात आहेत. राज्यात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही कुक्कुटपालन केले जाते. कोंबड्या, शेळ्या यांचा व्यवसाय करण्यासाठी राज्य सरकारकडून अनुदान आणि कर्जही दिले जाते. त्यामुळे शेतीसोबत जोडधंदा करताना चिकन, अंडी आणि दूध विकून शेतकर्‍याच्या अर्थार्जनात वाढ होते. मात्र, मागील दीड महिन्यापासून कुठेही कोंबड्यांची मागणी होताना दिसत नाही. त्यामुळे तयार झालेली कोंबड्यांची पिल्ले अजून किती दिवस पोल्ट्रीत ठेवायची या विवंचनेने शेतकर्‍यांसह पोल्ट्री उद्योजकांना ग्रासलेले आहे.

- Advertisement -

एकीकडे करोना विषाणूच्या भीतीने नागरिकांनी कोंबडीचे चिकन खाणे कमी केल्याने कुक्कुटपालनवाल्यांच्या मागे शुक्लकाष्ट लागले आहे. तर दुसरीकडे करोना विषाणूंचा कुक्कुट पक्षी व उत्पादनांवर कसलाही परिणाम होणार नाही. राज्यातआजमितीला एकूण 9 कोटी 12 लाख इतकी कुक्कूट संख्या आहे. करोना विषाणू (इन्फेक्शिअस ब्राँकायटिस) मानवामध्ये संक्रमित होत नसल्याबद्दल शास्त्रीय संदर्भ आहेत, ही वस्तुस्थिती मांडली जात असतानाही व्हॉट्सअ‍ॅपवर चिकनमधून करोनाचा शिरकाव होत असल्याच्या अफवांवर आधारित संदेश फॉरवर्ड झाल्याने कुक्कुटपालनवाल्यांचे कंबरडे मोडले आहे. करोना व्हायरस आणि चिकन खाणे यांचा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे. चीनमधील वुहानमधून पसरलेल्या करोनाने कहर माजवला आहे. भारतातही करोनाची लागण झालेले काही रुग्ण केरळ, पंजाब, बंगलोर आणि पुण्यात आढळून आले आहेत. त्यातच आता करोनामुळे चिकन खाणेही धोकादायक असल्याची सोशल मीडियातून चर्चा सुरू झाली. याबाबत केंद्र सरकारने स्पष्टीकरण देत यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं. पोल्ट्री उत्पादन आणि करोना यांचा संबंध जोडल्याची अफवा देशभरात वार्‍यासारखी पसरली. त्यावर नागरिक बिनधास्तपणे पोल्ट्री चिकन खाऊ शकतात. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. जगभरातही करोना आणि पोल्ट्रीचा काही संबंध नाही. कोंबडीपासून हा रोग पसरल्याचे अजून कुठेही सिद्ध झालेले नाही, असे केंद्रीय पशुपालनमंत्री गिरीराज सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलेे. त्याचा काहीही परिणाम झाला नसून राज्यात आणि देशातही सध्या चिकनच्या दुकानात, पोल्ट्रीफार्ममध्ये शुकशुकाट आहे.

केंद्राप्रमाणे राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांनीही करोना आणि चिकनचा काहीही संबंध नाही असे जाहीर करूनही कुणीही चिकनवर ताव मारताना दिसत नाही. त्यामुळे सध्या मंत्रीमहोदयांना कुणीतरी चिकन फेस्टीवल भरवण्याचा सल्ला द्यावा अशी चर्चा बजेटच्या दिवशी विधिमंडळात सुरू होती. गंमतीचा भाग सोडा. मात्र, जर राज्यभरात सहा ते सात आठवडे वाढवून तयार झालेल्या कोंबडीच्या पिल्लाला बाजारात मागणीच नसल्यास त्याचे काय करायचे असा सवाल हजारो कुक्कुटपालनवाल्यांना नक्कीच पडणार आहे. बाजारात पुरेशा प्रमाणात मागणी नसल्याने सुमारे 10 लाख अंडी आणि लाखभर कोंबड्या पालघरच्या एका हॅचरी मालकाने जमिनीत पुरल्या. कोंबड्यांना अजून काही दिवस पोसणे आपल्याला परवडणारे नसल्याने आपण हा पर्याय निवडल्याचे त्या मालकाने सांगितले. कोंबड्यांची मागणी रोडावल्याने कुक्कुटपालनावर आधारित असणारे कामगार बेरोजगार झाले आहेत. यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील कामगार जास्त आहेत. दरवर्षी होळीच्या दिवसांत चिकनची मागणी वाढते. त्यामुळे तयार असलेले रेडिमेड चिकन हे फ्रिजरमध्ये ठेवावे लागते. त्यासाठी किमान 15 ते 20 रुपये किलोमागे फ्रिजरवाल्याला द्यावे लागतात. फ्रिजर आणि कुलरचे भाडे व्यावसायिकांना भरावे लागत असल्याने हजारो टन चिकन फ्रिजरमध्येच ठेवण्याची वेळ आली आहे. चिकनला मागणी नाही, भावात एका कोंबडीमागे सरासरी 60 रुपये नुकसान आणि फ्रिजरमध्ये ठेवण्याचा अतिरिक्त असा 20 रुपये खर्च पाहता कोंबडीच्या पिल्लांना वाढवण्यापेक्षा जमिनीत पुरण्याशिवाय पर्यायच उरलेला दिसत नाही.

- Advertisement -

संपर्काची साधने वेगाने वाढल्याने संपूर्ण जग जवळ येत आहे. त्यामुळे जगाच्या एका कोपर्‍यात एखाद्या नव्या विषाणूचा झालेला उद्रेक हा गतीने अन्य भागांत पोहोचू शकतो. असा उद्रेक स्थानिक राहण्याची शक्यता कमी असते. ‘करोना’च्या निमित्ताने आपण हे अनुभवतो आहोतच. हा विषाणू नवा आहे आणि वेगळ्या प्रकारचा आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात सध्या तरी प्रतिबंधात्मक लस नाही. मात्र, लस विकसित होईपर्यंत तरी उपचारात्मक प्रयत्नांवरच भर द्यावा लागणार आहे. अशा वैद्यकीय आणीबाणीत अफवांना ऊत येतो. अफवा दूर करण्यापासून कार्यक्षमतेने उपचारात्मक यंत्रणा उभारण्यापर्यंतची पावले सरकारांना उचलावी लागतील. तसेच ज्या पद्धतीने शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याबाबत राज्य सरकारमध्ये सर्वच पक्षात एकवाक्यता दिसते तशी करोनामुळे संकटात सापडलेल्या कुक्कुटपालन व्यवसायाला उभारी देण्यासाठी सरकारने तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीने फडणवीस सरकारने शेतकर्‍यांचा भाजीपाला आणि फळे विकत घेण्यासाठी कित्येकवर्षे असलेली दलाल यंत्रणा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला त्याच धर्तीवर कुक्कुटपालनवाल्यांच्या कोंबड्या विकत घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.

अन्यथा एकेका पोल्ट्रीफार्ममध्ये हजारच्या वर कोंबड्या असणार्‍या पोल्ट्रीफार्मवाल्यांना ठाकरे सरकार आपले सरकार वाटणार नाही. राज्याच्या कृषीविभाग आणि पशुसंवर्धन विभागाने लगेचच यावर तोडगा काढण्यासाठी उपाय सुचवावा आणि सर्वपक्षीय आमदारांनी जोडधंदा करणार्‍या नवउद्योजकांना मदत दिल्यास त्यांचे पुढील आयुष्य सुखकर होईल. अन्यथा कर्जाच्या बोजाखाली दबून जाताना कुक्कुटपालनवाल्यांनी आत्महत्या करण्याचा मार्ग अवलंबल्यास मग मात्र कठीण होवून जाईल. त्यानंतरही जर सरकारचे डोळे उघडणार नसतील तर झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी विरोधी पक्ष असलेल्या भाजपने रस्त्यावर उतरावे. तरच सरकारचे डोळे उघडतील आणि कुक्कुटपालनवाल्यांचे रडणे त्यांच्या कानावर जाईल. तसे होऊ नये म्हणून शेतकर्‍यांप्रमाणे हजारो कुक्कुटपालनवाल्यांना सरकारने भरघोस मदत जाहीर करावी हीच अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आहे.

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -