घरफिचर्समायमहानगर ब्लॉगअरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली !

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली !

Subscribe

समाजाचा आरसा बनून समाजाचे प्रबोधन करणार्‍या वृत्तपत्रसृष्टीवर गेल्या वर्षभरातील कोरोना महामारीने जीवघेणा हल्ला केलेला आहे. त्यामुळे अनेक वर्तमानपत्रांनी आपल्या काही आवृत्या बंद केल्या. काहींनी पत्रकार आणि अन्य कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले. मोठी पगार कपात झाली. कागदामधून कोरोना पसरतो, या अफवेमुळे वर्तमानपत्रांवरच लोकांनी बंदी घातली. त्यामुळे वर्तमानपत्राशी संबंधित असलेल्या सगळ्याच लोकांची आर्थिक स्थिती खूपच खालावली. ‘सिंहासन’ चित्रपटातील पत्रकार दिघू टिपणीस डोके चालेनासे झाल्यावर वेडा होतो. तशीच सध्याची काहीशी स्थिती आहे, पण खचून न जाता सगळ्यांनी आयुष्याच्या मशाली पुन्हा पेटवून कोरोनामुळे जीवनात आलेला अंध:कार दूर करावा लागेल.

कोरोना महामारीने गेल्या वर्षभरात अनेकांना पार उद्ध्वस्त करून टाकलेले आहे. कोरोना विषाणूचा संपर्कात आल्यानंतर वेगाने होणारा फैलाव रोखण्यासाठी आणि हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी जगभरातील विविध देशांनी लॉकडाऊन लागू केले. मागील दशकात दोन महायुद्धे झाली. जगभरात अनेक युद्धे झाली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तान आणि चीनविरोधात काही वेळा युद्धे झाली. इतकेच नव्हे तर यापूर्वीही साथीचे रोग आले. असा कोरोना महामारीमुळे करण्यात आलेला लॉकडाऊन यापूर्वी कधीच कुणी पाहिला नव्हता. कोरोनाने केवळ माणूस मारला नाही तर माणसाला माणसापासून तोडले. आपले परके झाले. लॉकडाऊनमुळे उलाढाल थांबल्यामुळे अनेकांचे रोजगार गेले. ज्यांची हातावर पोटे होती, त्यांचे तर अतोनात हाल झाले.

पोटापाण्यासाठी आलेल्या या लोकांना या लॉकडाऊनमध्ये जास्त काळ शहरांमध्ये राहणे शक्यच नव्हते, त्यामुळे त्यांनी बायका मुलांना घेऊन मिळेल त्या साधनांनिशी नाही तर चालत आपल्या गावचा रस्ता धरला, पण गावातही काही परिस्थिती ठिक नव्हती. त्यांना गावाच्या वेशींवर थांबवण्यात आले. अशा सगळ्या हालअपेष्टांचा दाहक अनुभव या वर्षाने सगळ्यांना दिला आहे. हा अनुभव पुढील काळात लोक कधीच विसरणार नाहीत. त्यावर पुढे अनेक वर्षे विचार होत राहील. चिंतनमंथन होत राहील. कारण या कोरोना महामारीमुळे मानवी जीवनावर काय काय परिणाम झाले आहेत, हे हळूहळू बाहेर पडणार आहे. चीनमध्ये उद्भवलेल्या कोरोनाने गेले वर्षभर जगभरात धुमाकूळ घातला. त्यात आता लंडनमध्ये कोरोनासारख्याच नव्या विषाणूने डोके वर काढल्याचे समोर येत आहे. त्यामुळे तेथे लॉकडाऊन करण्यात येत आहे. तेथील लोक स्थलांतर करत आहेत. त्यामुळे पुढील वर्षात काय वाढून ठेवले आहे, हे येणारा काळच सांगू शकेल.

- Advertisement -

कोरोना महामारीमुळे जगभरातील अनेक उद्योगांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. त्यामुळे त्यांनी कर्मचार्‍यांची मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. सुरुवातीला कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात आला. पुढे कोरोनाची काळी छाया इतकी गडद होत गेली की, कंपन्यांनी अनेकांना आता घरीच बसा, पण विदाऊट वर्क अशी वेळ आणली. जगभरात समाजजागृती करता छापील वर्तमानपत्रांचे मोठे महत्व आहे. सकाळी वर्तमानपत्र पाहिल्याशिवाय अनेकांना चहा गोड लागत नाही. वर्तमानपत्र हा ज्यांना लिहिता वाचता येते त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. कारण अनेक गोष्टी वर्तमानपत्रातूनच लोकांना कळत असतात. टीव्ही आणि ऑनलाईन बातम्यांचा काळ आला असला तरी वर्तमानपत्र वाचन हा अनेकांच्या सवयीचा भाग बनलेला होता. म्हणजे टीव्हीवर बातमी ऐकली आणि पाहिली तरी ती वर्तमानपत्रात वाचण्याचे एक वेगळेच समाधान वाचकांना मिळत होते. मिळत होते, असे म्हणण्याचे कारण कोरोनामुळे आता वर्तमानपत्र वाचणार्‍यांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. असे काही होईल याची कधी कल्पनाही कुणी केली नव्हती, पण कोरोनाने जगात अनेक अकल्पित गोष्टी घडवून आणल्या आहेत.

कागदातून कोरोना पसरतो अशी अफवा पसरल्यामुळे लोकांनी वर्तमानपत्रांचा इतका धसका घेतला की, त्यांनी ती आपल्या घरी घेणेच बंद केले. वर्तमानपत्र घरोघरी टाकणार्‍या मुलांना इमारतीत प्रवेश बंद झाला. वर्तमानपत्रे कुणी घेत नाही, म्हटल्यावर स्टॉलवर त्यांची जी विक्री होत होती, तीही कमी झाली. त्यामुळे वर्तमानपत्रे चालवायची कशी अशी समस्या चालकांना पडली. त्यामुळे कोरोना लॉकडाऊन काळात कर्मचार्‍यांना कामावरून काढू नका, असे सरकारने सांगूनही अनेकांना कामावरून काढून टाकण्यात आले. जिथे मोठ्या आणि आर्थिकदृष्ठ्या सक्षम, तसेच राजकीय पाठबळ असलेल्या वृत्तसमूहांचे धाबे दणाणले तिथे छोट्या वृत्तपत्रांची फारच बिकट परिस्थिती झाली. तिथे कर्मचार्‍यांच्या पगारात मोठी पगार कपात करण्यात आली, तर काहींना कामावरून काढण्यात आले. काही वृत्तपत्रांनी आपल्या आवृत्या बंद केल्या. काही मोठ्या वृत्तपत्रांमधून अनेक अनुभवी आणि नावाजलेल्या पत्रकारांना कामावरून कमी करण्यात आल्यामुळे अनेकांना धक्का बसला. पत्रकारांव्यतिरिक्तही वर्तमानपत्रांमध्ये विविध विभागांमध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी असतात. त्यांच्यावरही बेकारीची कुर्‍हाड कोसळली.

- Advertisement -

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली. ब्रिटिशांविरुद्ध भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत, तसेच अनेक सामाजिक चळवळींमध्ये वर्तमानपत्रांची भूमिका अत्यंत महत्वाची राहिलेली आहे. स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते लोकमान्य टिळक यांचा ‘केसरी’, महात्मा गांधीजींचा ‘यंग इंडिया’ यांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात आली. अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ने अवघा महाराष्ट्र ढवळून काढला आणि महाराष्ट्र पेटून उठला. दररोज प्रकाशित होणारी वृत्तपत्रे अनेक लोक वाचत असतात. त्यामुळे व्यापक लोकशिक्षणाचे कार्य होत असते. जगभरात घडणार्‍या घटनांची मााहिती आणि त्यावरील तज्ज्ञांचे विश्लेषण वृत्तपत्रांतून केले जाते. ते वाचल्यावर विचारांना चालना मिळते.

अनेक प्रतिभावंतांच्या साहित्यकृतींना वर्तमानपत्रातून प्रसिद्धी मिळते. त्यामुळे लोक त्यांच्या साहित्यकृतींचा शोध घेऊन त्या वाचतात. वर्तमानपत्रे ही मुक्या आणि अन्यायाने पिचलेल्या गांजलेल्या जनतेचा आवाज आहेत. हा आवाज जेव्हा सरकारच्या कानी जातो, तेव्हा सूत्रे हलू लागतात आणि गरजूंना मदत मिळते. सरकारच्या विविध योजना आणि विकासकामे वर्तमानपत्रे लोकांपर्यंत पोहचवत असतात. त्यामुळे सध्या वर्तमानपत्रे आणि त्यात काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा आवाज समाज आणि सरकारने ऐकण्याची गरज आहे. पत्रकार हा जगला पाहिजे, त्याचे जगणे समाजासाठी आवश्यक आहे. पत्रकारिता हा समाजाचा आरसा म्हणून पत्रकार भूमिका पार पाडत राहिले. समाजात ज्याला कुठेच न्याय मिळत नाही, तो शेवटी वर्तमानपत्रांकडे येतो. वर्तमानपत्र ही अन्यायग्रस्त माणसाची शेवटची आशा मानली जाते. ती आशा संपली की, मग सर्वच पर्याय संपतात. पण ही शेवटची आशा असलेल्या वर्तमानपत्रांवर कोरोना विषाणूने जीवघेणा आघात केला आहे. त्यातून सावरण्याचे अवघड आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले आहे.

आपण हे लक्षात घ्यायला हवे की, क्रायसिस आणि क्रिएटिव्हिटी यांचा जवळचा संबंध असतो. काळ कूस बदलत असतो, नवे बदल घडत असतात, ते आपण स्वीकारून नव्या काळाचे आव्हान स्वीकारायला हवे. हेही दिवस जातील, हा जीवनमंत्र आपण लक्षात ठेवायला हवा. परिस्थितीला जर आपण काच होऊन सामोरे गेलो, तर ती आपल्या ठिकर्‍या उडवेल. पण जर आपण लोखंड होऊन सामोरे गेलो तर तीच परिस्थिती आपल्याला नवा आकार देईल. आपल्याला नवा आकार आणि नवी दिशा मिळेल, ही आशा मनात ठेवूनच पुढील वाटचाल करावी लागेल. सरकारनेही वर्तमानपत्रांच्या कठीण काळाचा त्यांचा विचार करायला हवा. तरच वर्तमानपत्रे चालवणार्‍यांना ती चालू ठेवणे शक्य होईल. त्यासाठी मदत करायला हवी. राज्य, जिल्हा, तालुका पातळीवरच्या पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन या समस्येवर विचारमंथन करून पुढचा मार्ग ठरवायला हवा. सध्या ऑनलाईन बातम्यांचा आणि २४ तास चालणार्‍या वृत्तवाहिन्यांचा नवा जमाना आलेला आहे. पण त्यात वर्तमानपत्रे आपली विश्वासार्हता टिकवून राहिली आहेत. ऑनलाईन मजकूर माणसाला माहिती देईल, पण वर्तमानपत्राच्या कागदाचा जिव्हाळा त्यात नसतो. वर्तमानपत्रातून जशी स्पर्शानुभूती मिळते तशी टीव्ही किंवा ऑनलाईन माध्यमातून मिळत नाही. ती मिळवण्यासाठी वर्तमानपत्रांचा वर्तमान शाबूत राहायला हवा. कारण ती इतिहासजमा झाली तर बर्‍याच मौलिक गोष्टी आपल्यासोबत घेऊन जातील. ते नुकसान कधीही भरून न येणारे असेल.

जेव्हा काळोख गडद होतो, तेव्हा लक्षात ठेवावे की, लवकरच पहाट होणार असते. जेव्हा मुंबईतील हजारो मिल बंद पडल्या त्यावेळी लोकांनी कशी तग धरली आणि आपला घरसंसार कसा सांभाळला असेल त्याची सगळ्यांनीच आठवण करण्याची गरज आहे. ‘सिंहासन’ या राजकारणावर बेतलेल्या चित्रपटात राजकारणाचे विविध खेळ पाहून शेवटी त्यातील समाजहितासाठी वाहून घेतलेला पत्रकार दिघू टिपणीस वेडा होतो. कारण सगळी परिस्थिती पाहून लोकांना मार्गदर्शन करणार्‍या या पत्रकाराचे डोके चालेनासे होते. सध्या कोरोनाने वृत्तपत्रसृष्टीवर हल्ला करून तिलाही अर्धमेले केले आहे. यातून मार्ग काढून तिला नवसंजीवनी द्यावी लागेल. त्यामुळेच ‘सिंहासन’ चित्रपटातीलच गाणे आपल्याला प्रेरणादायी ठरणारे आहे, उष:काल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -