घरफिचर्समायमहानगर ब्लॉगनको तो आजार, औषधोपचार आणि रूग्णालयंही! एका कोरोनाग्रस्ताची आपबिती!

नको तो आजार, औषधोपचार आणि रूग्णालयंही! एका कोरोनाग्रस्ताची आपबिती!

Subscribe

गेली अनेक वर्षे म्हणजे जवळ जवळ ३२ वर्षे मी नाना पालकर स्मृती समिती, परेल या संस्थेशी रुग्ण सेवक म्हणून कार्यरत आहे. समाज उपयोगी कार्य करताना, रुग्णांची सेवा करताना मला १.५.२०२० तारखेला साधारण अंग गरम झाल्याचे लक्षात आले. त्यावेळेला क्रोसिन घेऊन बरे वाटले. पण नंतर सतत रोज थोडा थोडा ताप येत असल्याने दिनांक ७.५.२०२० रोजी के. इ. एम. रुग्णालय, परेल येथे जाऊन करोना ची टेस्ट करून घेतली. तेव्हा ८.५.२०२० रोजी रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे असे समजले आणि मग अॅडमिट होण्यासाठी अनेक हॉस्पिटलमध्ये संपर्क साधला असता वेटिंग लिस्ट आहे म्हणून सांगण्यात आले. नंतर जवळच असलेल्या नायर रुग्णालयात जाण्याचे ठरविले. ब्लड डोनेशनसारख्या अनेक सेवा कार्यात नायर हॉस्पिटलशी संबंध असल्याने मला अॅडमिट होण्यास त्रास झाला नाही.

पण दाखल झाल्यानंतर पेशंट आणि हॉस्पिटल यांचा खऱ्या अर्थाने संबंध सुरू झाला..मी म्हणेन संघर्ष सुरू झाला. नायर हॉस्पिटलमध्ये दिनांक ८.५.२०२० रोजी रात्री ९.३० च्या दरम्यान अॅडमिट झालो. पण तिथे कोणत्याही प्रकारे सोयी उपलब्ध नव्हत्या. साधी बेडशीटही बेडवर नव्हती. तरीही आपण रुग्ण सेवक आहोत, सर्व सांभाळून घेतलं पाहिजे म्हणून सहकार्य करण्यासाठी काहीही न बोलता बेडचा ताबा घेतला.

- Advertisement -

डॉ. माझी तपासणी करण्यास आले त्यांनी तपासल्यावर तिथल्या पारीचारीकेला माझ्या औषधोपचाराबद्दल माहिती दिली आणि माझे औषधोपचार सुरू झाले. मला आयव्ही किट लावण्यात आले. तेही थोडे लूजच होते. असे मी का म्हणतो तर १०.५.२०२० रोजी मी सायंकाळी शौचालयात गेलो असता ते किट निघाले आणि सर्व ठिकाणी रक्त सांडू लागले. त्यावर मला एक कापसाचा तुकडा देण्यात आला आणि घट्ट धरून रहा असे सांगण्यात आले. मी बऱ्याच प्रयत्नाअंती रक्त थांबवू शकलो.

त्यां नंतर जे काही झालं तो धक्का मी या जन्मात तरी विसरू शकणार नाही!

- Advertisement -

मी ज्या विभागामध्ये दाखल होतो तेथील एका डायलिसीस कोरोना पॉझिटिव्ह पेशंटचा काळाने घात केल्याने अंत झाला. माझ्या समोर काही तास त्याचा मृतदेह पलंगावरच होता. रूग्णालय कर्मचाऱ्यांनी मृतदेह हलवण्याची तसदी तर घेतली नाहीच, पण साधा पडदाही ओढून घेतला नाही.

मित्रांनो विचार करा. ह्या परिस्थितीत मनात काय काय थैमान माजलं असेल. तिथे मी मनाने एकटाच होतो. कोणी बोलायला मन मोकळं करायला जवळचं कोणी नाही. जो आजार आपल्याला झालाय तशाच प्रकारच्या आजाराने एक व्यक्ती आपल्या डोळ्या देखत दगावली आहे. आणि तो मृतदेह काही तास पडून आहे. अगदी असहायपणे तो बघत रहाणे हेच हातात आहे. कारण डोळे मिटले तरी डोळ्यांसमोर तेच तरळत आहे.. आणि ह्या मृतदेहाबरोबर किती वेळ काढायचा ह्याचं काहीच ज्ञान नाही. एक एक क्षण तासांचा वाटत होता. अक्षरश: मनाची घालमेल होत होती. मनातले विचार मी नाही तुम्हाला सांगू शकत. माझ्या ३२ वर्षांच्या रूग्ण सेवकाच्या कारकिर्दीत मी असंख्य मृतदेह बघितले. त्यांचं क्रियाकर्म करण्यास मदत केली..

माणूस आजाराने नाही पण ह्या वागणुकीमुळे नक्की हाय खातो.

मला सांगण्यात आलं की तुम्ही आता हा बिछाना रिकामा करा व दुस-या बिछान्यावर जा. (दुसरा बिछाना म्हणजे तोच ज्या वरचा पेशंट मृत पावला होता आणि चार तास त्याचं शव त्याच बिछान्यावर होतं!)

या वेळी मी खऱ्या अर्थाने मानसिकदृष्ट्या खचलो. त्याचे कारणही तसेच होते. तिथे असलेल्या लेडी डॉ. ने मला सांगितले की तुम्हाला ऑक्सिजन द्यावा लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्या बेडवर जावे लागेल. खरंतर मी ज्या बेडवर होतो तिथेही ऑक्सिजनची सोय होती. तरीही जराही संयम न सोडता सहकार्य करायचं म्हणून मी त्या बेडवर शिफ्ट झालो.

मित्रांनो त्या रात्री मात्र मी झोपू शकलो नाही. मनाने अक्षरश: उद्ध्वस्त झालो, कोडमडलो आणि माझी तब्बेत अधिकच त्रास देऊ लागली. नाही नाही ते विचार रात्रभर मनात येत होते. आपल्या वैऱ्याच्या मनात नाही येणार ते विचार आपल्या मनात येतात. ह्या उक्तीचा मी रात्रभर अनुभव घेतला.

त्या रात्रीचं वर्णन करण्यास आजतरी मी आणि माझे शब्द असमर्थ आहेत. कधी पुढे धीर झालाच तर पुन्हा लिहीन. (एक रात).

मी भोगलेल्या मानसिक नरकयातना माझा पुतण्या तन्मय करलकर याला बोलावून सांगितल्या व माझे भोग त्याच्या निदर्शनास आणून दिले. मग मात्र कुटुंबाने मला ग्लोबल हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचे ठरविले. त्यातच १०.५.२०२० रोजी माझा स्वॅब रिपोर्ट घेण्यात आला त्याचा रिपोर्ट अद्याप मला मिळाला नाही.

मला १३.५.२०२० रोज रात्री ९ – ९.३० च्या दरम्यान ग्लोबल हॉस्पिटल, परेल येथे शिफ्ट करण्यात आले. तेव्हा घरातील सर्व मंडळी आणि मी ही थोडा रिलॅक्स झालो कारण ग्लोबल हे एक अतिशय नावाजलेले हॉस्पिटल आहे. मला ऍडमिट करताना ग्लोबलमध्ये व्यवस्थापना कडून सांगण्यात आले आता तुम्ही जराही काळजी करू नका आता तुम्ही ग्लोबलचे पेशंट आहात असं सांगून मला आश्वासित केलं गेलं.

प्रोटोकॉल प्रमाणे माझी स्लीपरही कपड्यासह टाकून देण्यात आली आणि सांगण्यात आले आता आम्ही तुम्हाला सर्व सुविधा पुरवणार.

पण प्रत्यक्षात माझा मोबाईलही काढून घेण्यात आला. त्यामुळे मला कोणाशीच संपर्क करता येत नव्हता. पुढील तीन दिवस मला साधी दात साफ करण्यासाठी टूथपेस्टही मिळाली नाही आणि स्लीपरही मिळाली नाही. मी फक्त हतबल होऊन बेडवर पडून होतो. तिथे मिळणाऱ्या सूचना पाळत होतो. जवळ जवळ तीन दिवसांनी मला मोबाईल उपलब्ध झाला आणि हायसे वाटले. मी सर्वप्रथम नाना पालकरचे व्यवस्थापक श्री कृष्णा महाडिक यांना संपर्क करून टूथ पेस्ट आणि टॉवेल मला आणून देण्यास सांगितले. मोठ्या मुश्किलीने माझ्यासाठी पाठवलेली टूथपेस्ट, टूथब्रश आणि टॉवेल माझ्यापर्यंत आले. आणि मी चार दिवसांनी दात घासून तोंड धुतले.

हे सारे अती किळसवाणे होते पण इलाज नव्हता.

त्या नंतर ग्लोबलचे खरे रूप उलगडायला सुरुवात झाली. पहिल्या दिवसापासून जेवण, नाष्टा, सूप ह्याचे कोणतेही वेळापत्रक आणि दर्जा ही नव्हता. चौकशी केली तर येणार तेव्हा देणार असे बेमुर्वतखोर उत्तर मिळाले. रुग्णाला गरम गरम चहा प्यायला द्यावा असे निर्देश असताना सुद्धा कधीच गरम चहा मिळाला नाही. दिवसभरात कधीही टेबलवर चहा आणून ठेवला जायचा. चहा आणून ठेवला आहे हे सांगण्याची तसदी कर्मचारी घेत नव्हते. माझ्या माहिती नुसार प्रत्येक पेशंटच्या पैशातून त्या पेशंटकरता लागणारे किट वापरून सेवा देतात. पण येथे साधे हॅन्ड ग्लोव्ह्ज पण बदलायची तसदी घेत नव्हते. शेजारच्या पेशंटला ज्या हाताने गोळ्या किंवा औषधं दिली जात त्याच हाताने मलाही ग्लोव्ह्ज न बदलता देत होते. सर्वच सेवेचा अभाव होता.

दोन दिवसांनी कपडे मिळत होते आणि एकदा तर टॉवेल म्हणून मला उशीचे कव्हर ऑफर करण्यात आले. एकदाही खोकला नसताना तीन वेळा माझा छातीचा एक्सरे काढण्यात आला. मला हे समजण्यापलिकडचे होते. माझ्या शेजारी ग्लोबलचा स्टाफ श्री सतीश कोकमकर, रहाणार मुलुंड हेही अॅडमिट होते. ते मात्र वरचे वर स्टाफला हॅन्ड ग्लोव्ह्ज चेंज करण्यासाठी सांगत होते. तेव्हा त्यांची एकदा तर सब स्टाफ बरोबर बाचाबाचीही झाली.

मी मात्र निमूट पणे सर्व मानसिक खच्चीकरण सहन करत होतो.

या सर्वात कहर म्हणजे स्वॅब रिपोर्ट लवकर मिळत नाही आणि माझ्या मते तरी कोणालाही ते सांगत नाही जो पर्यंत त्यांचं आर्थिक पॅकेज पूर्ण होत नाही तो पर्यंत ते सांगतच नाहीत याचा मला अनुभव मिळाला. मला शुक्रवारी दिनांक २२.५.२०२० रोजी सांगण्यात आले की तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आम्ही तुम्हाला उद्या डिस्चार्ज देण्याचे प्लॅनिंग करत आहोत.

मी खुश झालो त्यांना विचारले साधारण किती वाजता मला डिस्चार्ज देण्यात येणार आहे ते मला कळवा म्हणजे तसे मला नातेवाईकांना सांगावे लागेल. तुमची सर्व बिल पेमेंट करावी लागतील. पण त्यांनी सांगितले की ते आम्ही उद्याच सांगू.

मी पुन्हा शांत राहिलो ठीक आहे उद्या बघू. पुन्हा आनंदावर पांघरूण घालून झोपलो.

शनिवार दिनांक २३.५.२०२० उजाडलं. मी पुन्हा आनंदी झालो. आज डिस्चार्ज मिळणार! पण ग्लोबल हॉस्पिटलच्या मनात काही वेगळंच चाललं होतं. त्यांची एक स्टाफ नर्स आली आणि तिने मला सांगितलं सर तुमचा स्वॅब घ्यायचा आहे. आता माझे सर्व पेशन्स संपले आणि मी त्यांना विचारले मला तुम्ही काल सांगितलं की तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि आता पुन्हा काय नवीन चाचणी करायला सांगताय. त्यावर ती म्हणाली आम्हाला तसं सांगण्यात आलं आहे.

आणि त्यानंतर मी मात्र शांत बसू शकलो नाही. त्यांना सांगितलं कोण तुमचे डॉक्टर आहेत कोण तुमचे डायरेक्टर आहेत त्यांना आत्ताच्या आता बोलवा नाहीतर मी तमाशा करेन. हे माझे रूप पाहिल्यावर सर आज तुमचा डिस्चार्ज आहे असे सांगण्यात आले आणि दुपारी डिस्चार्जची प्रक्रिया पूर्ण करून घरी निघताना त्यांनी सांगितले तुम्हाला तळ मजल्यावर इमर्जन्सी मध्ये औषधे मिळतील. मी खाली आलो, खाली तर हडतुडची वागणूक होती. मी उपचार घेऊन बरा झालेला सर्व सामान्य माणूस होतो. पण वागणूक पेशन्टचीच होती. मला काही औषधं दिली नाहीत. मी तसाच जवळ जवळ ४ लाख १० हजार रुपयांचे बिल भरून घरी आलो.

ह्याच किंवा ह्याहूनही नरकयातना काहींनी भोगल्या असणार याची खात्री आहे म्हणूनच याला कुठेतरी वाचा फुटावी म्हणून हे लिखाण मी स्वानुभवाने केले आहे..

एक विनंती करतोय. ह्या रोगात आजारापेक्षा आपल्याला विषाणूबाधा झाली आहे ह्या मानसिक धक्क्यानेच माणूस आणि त्याचे नातेवाईक अर्धमेले होत आहेत. त्यांचं मानसिक संतुलन तुटत आहे. आणि नंतर त्यांचं पूर्णपणे मानसिक खच्चीकरण होत आहे. म्हणून त्याला खऱ्या अर्थाने मानसिक आधार द्या.


लेखक किरण विश्वनाथ करलकर, रहाणार १२०८, श्री साई सहकारी गृहनिर्माण संस्था, मर्यादित, आर. बी. चांदोरकर मार्ग, आग्रीपाडा, मुंबई – ४०००११. संपर्क नंबर – ८१६९८४११०५

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -