Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग तब तक ढिलाई नही...

तब तक ढिलाई नही…

कोरोनासोबतची शर्यत अजून काही संपलेली नाही. हेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना टीव्हीवर येऊन सांगावं लागलं. ‘जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही’ हा नवा मंत्र त्यांनी दिलाय. कोरोनाची महामारी संपलेली नाही. पण लोकंच इतके कंटाळलेले आहेत की त्यांना आता याची भीती वाटेनाशी झालेली आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि जगभरातील वैद्यकीय संशोधकांना जो निष्कर्ष काढता येत नाही, तो निष्कर्ष सामान्य माणूस काढून मोकळा होतो. ‘काही होत नाही रे’ हा तो निष्कर्ष. पण हा निष्कर्ष त्याला पुन्हा गोत्यात आणू शकतो. कारण कोरोनाचा प्रभाव थोडा कमी झाला असला तरी दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Story

- Advertisement -

माझा दैवावर विश्वास नाही. पण काही संकेत असे असतात की त्यांना ‘दैवी संकेत’ हा शब्द अतिशय चपखल बसतो. मनुष्याचा आदिम इतिहास हा दैव, त्याचे संकेत, त्याचा कोप, त्याची कृपा याच संकल्पनांच्या अवतीभवती गुरफटलेला होता. विज्ञानवादाचे जग सुरू झाल्यापासून दैवावरचा अनेकांचा विश्वास हा प्रार्थनेपुरता मर्यादित राहिला. अनेकांची गाढ श्रद्धा आहेच. पण मी फक्त दैवी संकेतापुरताच बोलतोय. नास्तिक असल्यामुळे या विषयात फार काही भाष्य करणार नाही. तर सध्या एक दैवी संकेत इंटरनेटच्या दुनियेत कमालीचा चर्चेला आलेला आहे. नुकतंच जन्माला आलेलं लहान मुल डॉक्टराच्या तोडांवरचा मास्क ओढून घेतं. त्या इवल्याशा बाळाचे हात थेट मास्कवर पोहोचल्यामुळे डॉक्टरलाही हसू आवरत नाही आणि एक झक्कास फोटो जगाला मिळतो. या फोटोतील हे बाळ मास्क ओढून ‘बस झाला कोरोना, आता मोकळा श्वास घ्या’, असा तर संकेत देत नाहीये ना? याबाबतीत आस्तिक आणि नास्तिक सर्वांचं एकमत झालेलं आहे. सर्वांनाच हा फोटो सकारात्मक वाटतोय. एकदाचं हे कोरोनाचं सावट संपावं, असं प्रत्येकालाच वाटतंय.

दुबईतील स्त्री रोगतज्ज्ञ म्हणून काम करत असलेले डॉ. समेर चैब यांचा हा फोटो आहे. त्यांनीच तो काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोखाली काही हजारो कमेंट्स पडलेल्या आहेत. अनेकांनी विविध विचार प्रकट केलेत. काहींना हे बाळ प्रेषितापेक्षा कमी वाटत नाहीये. कारणही तसंच आहे. जगातील प्रत्येकाला आता हा मास्क नकोसा झालाय. प्रत्येकाला उर भरून मोकळा श्वास घ्यायचाय. डॉ. समेर यांनी हा फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली. “विज्ञानावर आपण सर्वच विश्वास ठेवतो. तरीही या नवजात बाळाने ज्या पद्धतीने मास्क ओढून काढला. त्यात मला दैवी संकेत दिसतोय. आता कोरोना जाणार, यापुढे आपल्याला मास्कची गरज नाही.”

- Advertisement -

खरंतर मागचे जवळपास आठ महिने आपण सर्वच कोरोनाच्या विळख्यात अडकलेलो आहोत. लाखो नागरिक बाधित झाले, हजारोंना प्राण गमवावे लागले. तर हजारो नागरिक मृत्यूच्या दारातून परत आले आहेत. प्रत्यक्ष कोरोनाबाधितांपेक्षाही कोरोना न झालेले नागरिकही कोरोनाच्या तडाख्यात सापडले. कोरोनामुळे लादल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळं अर्थव्यवस्था, बेरोजगारी, मंदी, महागाई याचे परिणाम आता हळूहळू दिसायला लागले आहेत. जसे २०१६ च्या नोटबंदीनंतर काही वर्ष भारताचा चलनी बाजार मंदावला होता. त्याप्रकारे या लॉकडाऊचे परिणाम पुढचे वर्ष तरी आपल्याला भोगावे लागणार आहेत.

नाही म्हणायला देशात अनलॉक सुरू झालाय. पण कोरोनासोबतची शर्यत अजून काही संपलेली नाही. हेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टीव्हीवर येऊन सांगावं लागलं. ‘जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही’ हा नवा मंत्र त्यांनी दिलाय. कोरोनाची महामारी संपलेली नाही. पण लोकंच इतके कंटाळलेले आहेत की त्यांना आता याची भीती वाटत नाही. जागतिक आरोग्य संघटना आणि जगभरातील वैद्यकीय संशोधकांना जो निष्कर्ष काढता येत नाही, तो निष्कर्ष सामान्य माणूस काढून मोकळा होतो. ‘काही होत नाही रे’ हा तो निष्कर्ष. याच निष्कर्षाच्या आत्मविश्वासातून पुन्हा आपल्या भाकरीची जुळवाजुळव करण्यामध्ये भारतीय माणूस कामाला लागलाय. त्याच्याकडे दुसरा पर्याय तो काय?

- Advertisement -

कोरोना काळात आपण आर्थिक विवंचनेत अडकलो असलो तरी आरोग्याच्यादृष्टीने कोरोनाने आपल्याला चांगलंच जागरूक केलंय. ते म्हणतात ना, जोपर्यंत तुमच्या गळ्यापर्यंत येत नाही, तोपर्यंत गांभीर्य कळत नाही. स्वच्छता, व्यायाम, चांगला आहार, शिस्तबद्ध जीवनशैलीबाबत भारतीय योगशास्त्रात हजारो वर्षांपूर्वीच लिहून ठेवलंय. आधुनिक वैद्यकीयशास्त्र देखील हेच सांगतं. पण शहरातल्या एसीच्या थंडाव्यात आपण शिथिल झालो होतो. वरुन गुबगुबीत असलेलो आपण आतून प्रतिकारशक्ती कमी असल्याची जाणीव कोरोनाने करुन दिली. त्यामुळेच आता अनेकजण आरोग्याची काळजी घेताना दिसत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. मध्यंतरी सायकलीच्या बाबतीत एक बातमी आली होती. मागच्या काही वर्षात सायकलची जेवढी विक्री झाली नव्हती, ती मागच्या पाच महिन्यात झालेली आहे. सायकल मिळवण्यासाठी लोकांना वेटिंगवर राहावं लागतंय. कोरोना काळ संपल्यानंतरही हे खुळ लोकांच्या डोक्यात टिकलं पाहिजे.

मी यावर्षीच्या जानेवारी महिन्यापासून मॅरेथॉनची तयारी करण्यासाठी रनिंगची सुरुवात केली होती. माझ्या घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका सर्विस रोडवर मॅरेथॉनचे प्रशिक्षण देणारा एक ग्रुप मी जॉईन केला होता. मार्चपासून लॉकडाऊन झाल्यानंतर तिथे अतिशय तुरळक धावपटू दिसायचे. मात्र आता अनलॉक झाल्यापासून लोकांचा राबता वाढलाय. अगदी लहान शाळकरी मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकजण सकाळ संध्याकाळ वॉकिंग, रनिंग आणि सायकलिंग करताना दिसतात. आपलं शरीर तंदुरुस्त असेल तर कोणताही आजार आपलं वाकडं करु शकणार नाही, ही जाणीव लोकांमध्ये वाढायला लागली आहे. मलाही प्रत्यक्षात हा अनुभव आला. जून महिन्यात जेव्हा मला स्वतःला कोरोनाची लागण झाली, तेव्हा माझीही भीतीने चाळण उडाली होती. घरात दोन व्यक्ती कोरोनामुळे दगावल्यामुळे आणखीनच तणाव वाढला होता. पण मागचे चार-पाच महिने नित्यनियमाने रनिंग करत असल्यामुळे माझ्या शरीरावर फार ताण आला नाही. कोरोना पॉझिटीव्ह जरी असलो तरी ताप, खोकला अशी कोणतीही लक्षणे माझ्यात दिसली नाहीत, मी सहीसलामत त्यातून बाहेर आलो.

कोरोनातून मुक्त झाल्यानंतर माझा पूर्णतः दृष्टीकोन बदलून गेलाय. अनेक बाबतीत. आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे प्रयोजन काय? असा प्रश्न माझ्या मनात येतो. माणसाच्या आयुष्यात प्रयोजन असायला हवं. निदान काही बाबींमध्ये तरी असायलाच हवं. प्रयोजन नसताना केलेल्या गोष्टींमधून जो अपेक्षित आनंद मिळायला हवा, तो मिळत नाही किंवा जो आनंद मिळतोय, असे आपल्याला वाटतं, तो नक्कीच फसवा किंवा इतरांच्या आनंदात आपण आनंदी असल्यासारखा नकली आनंद असावा. असली आनंद मिळवण्यासाठी प्रयोजन ठरवा, उद्देश ठरवा. जगण्यातली मजा त्यातच आहे. असले बोलबच्चन आता मी माझ्या मित्रांना देत असतो.

दुबईतल्या या नवजात बालकाने दिलेला दैवी संकेतही प्रत्येकाला वेगळा वाटू शकतो. मला त्यात दिसतंय की, हे दिवसदेखील जातील. वेळ ही जाण्यासाठीच असते आणि परिवर्तन हा जगाचा नियम आहे, अशी शिकवण भगवान श्रीकृष्णाने गीतेतून दिलेली आहे. विषय एवढाच आहे की, या गेलेल्या किंवा घालवलेल्या वेळातून आपण काय धडा घेतला? खरंच धडा घेतला की आपण फक्त वेळ कठीण होती म्हणून जाऊ दिली? कारण वेळ पुन्हा येणार आहेच. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. सध्या आपल्याकडे कोरोना स्लो झाला असला तरी थंडीच्या दिवसांत तापमान २० अंश सेल्सियसच्या खाली गेल्यानंतर कोरोना पुन्हा तेजीत येऊ शकतो, असे काही संशोधकांचे मानने आहे. त्यामुळे मोकळा श्वास घेत असतानाच थोडे दिवस तरी आपल्याला मास्क तोडांवरच ठेवावा लागेल.

- Advertisement -