Blog: पुण्याच्या कोविड सेंटरमध्ये अनास्था; पण मुंबईच्या कोविड सेंटरची होतेय प्रशंसा

mulund jumbo covid center
मुलुंड येथील कोविड केअर सेंटर

एकदाचा मुलुंडच्या कोविड सेंटरला पोहचलो. मनातून नाराज होतो. तिथे आल्यानंतर त्यांनी माझी पूर्ण आरोग्याची माहिती घेतली. सध्याची लक्षणे आणि त्रास विचारला. मला काहीच लक्षणे आणि त्रास होत नव्हता, त्यांना मी तसे सांगितले. कुठल्याही प्रकारची रांग नव्हती. समोरच्या Cubical मधून Intercom वरून डॉक्टर्स माहिती घेत होते. इथे मी नमूद करू इच्छितो मीडियाने जो काही प्रकार ४-५ महिने दाखवला त्याचा इथे लवलेश ही नव्हता. अत्यंत सौम्य भाषेत सगळं समजावून सांगत होते. माझ्या मनातील पूर्वग्रहामुळे मी जरा बावरलो होतो. मला त्यांनी माझा बेड क्रमांक सांगितला आणि आत जायला सांगितले आणि मी आत प्रवेश केला. आश्चर्याचा सुखद धक्का बसला. काही वेळ बघतच राहिलो. अत्यंत सुनियोजित रचनाबद्द पद्धतीने पूर्ण सुविधा पुरविणारे अत्यंत कमी वेळात सिडकोने हे सेंटर बांधले आहे. खासगी हॉस्पिटल झक मारेल अशा सुविधा बीएमसीने इथे दिल्या आहेत.

हे संपूर्ण कोविड सेंटर २४ तास वातानुकूलित (Air-Conditioning) आहे. प्रत्येक बेड रिकामा झाला की Sanitize करतात. नवीन बेडशीट, नवीन चादर वापरतात. हे सगळे अश्यक्य वाटते ना.. पण या सर्व सुविधा त्यांनी दिल्या आहेत. प्रत्येक बेडच्या बाजूला ऑक्सिजनची सुविधा केली आहे. प्रत्येक बेडला सध्या अतिशय आवश्यक असणारा मोबाईल चार्जर पॉईंट दिलेला आहे. प्रत्येक बेडला लॉक अँड कीचे टेबल दिलेले आहे. एक खुर्ची दिलेली आहे. संपूर्ण सेंटर रोज तीन वेळा sanitize केले जाते. अत्यंत स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवले आहे. पिण्यासाठी गरम आणि थंड पाण्याची व्यवस्था आहे. नैसर्गिक विधीसाठी अत्यंत स्वच्छ टॉयलेट आणि बाथरूमची व्यवस्था केली आहे. आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था केली आहे. मुलुंड येथील शिवसेनेचे नेते संजय म्हशीलकर यांनी खेळण्यासाठी कॅरम बोर्ड, चेसची व्यवस्था केली आहे. संपूर्ण कोविड सेंटर cctv कॅमेराच्या देखरेखीखाली आहे. प्रत्येक कोविड सेंटरला एक वॉर रुम आहे. मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी सगळ्या रुग्णांवर लक्ष ठेवतात. माझा माझ्या डोळ्यावर विश्वास बसेना हे सगळं आपली महानगर पालिका आणि महाराष्ट्र शासन करते आहे. प्रत्येकजण आल्या आल्या सेंटरचे व्हिडीओ शूटिंग करून घरी दाखवतात.

carrom board in covid center

आता राहिला प्रश्न पोटाचा तर त्याचीही व्यवस्था केलेली आहे. सकाळचा नास्ता, दोन्ही वेळेचे जेवण, संध्याकाळी चहा बिस्कीट. तुम्हाला घरून जेवण किंवा फळे मागवायचे असल्यास मागवू शकता. फक्त नाव आणि बेड क्रमांक लिहायचा आणि गेटवर ठेवून द्यायचे. नातेवाईक किंवा मित्र या पैकी कोणालाही तुम्हाला भेटता येणार नाही. त्याची कारणेही सगळ्यांना माहिती आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे तुम्ही कमीतकमी १४ दिवस येथे राहता.

आता राहिली बाब कोविडच्या ट्रेटमेंटची, ती ही व्यवस्था महाराष्ट्र शासनाने आणि मुंबई महानगर पालिकेने चोख केली आहे. महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने एक पॅटर्न ठरवून तुमच्यावर उपचार केले आहेत. त्यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिनच्या वेगवेगळ्या गोळ्या, अँटिबायोटिक्सचे डोस, ब्लड पातळ होण्याची इंजेक्शन, ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज त्यांना ऑक्सिजन. रुग्णांच्या रेग्युलर ब्लड टेस्ट करून उपचार ठरवले जातात. हे सगळे तज्ञ्ज डॉक्टरांच्या देखरेखीखाली केले जाते. ठाण्यातील आशा कॅन्सर हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर आणि रुग्णसेविका आपल्या सेवेसाठी येथे जीवाचे रान करीत आहेत. दिवसातून तीन वेळा ते तुमची तपासणी करतात. या डॉक्टर, रुग्णसेविका, रुग्णसेवक, वॉर्डबॉय, हाऊस किपिंगचे कर्मचारी यांच्यावर मी स्वतंत्र लेख लिहिणार आहे. या सगळ्या कोविड वारियर्सना शतशः नमन. त्यांच्या सेवेला तोड नाही. त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. या कोविड सेंटरचा उत्तम मानांकनामध्ये यांचा 100 टक्के वाटा आहे. या कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

सगळ्यात महत्वाचे ही सगळी सेवा महाराष्ट्र शासनाने आणि मुंबई महानगर पालिकेने सर्वांसाठी मोफत दिली आहे. तुम्ही घरातून निघाल्या पासून ते डिस्चार्ज होईपर्यंत तुमच्या खिशातून एक पैसाही खर्च होत नाही. संपूर्ण भारतामध्ये अशा तऱ्हेचे कोविड सेंटर आणि उत्तम सेवा कुठल्याही राज्याने केली असेल, असे मला वाटत नाही. खरंच मला अभिमान आहे माझा जन्म मुंबईमध्ये झाल्याचा. अभिमान आहे महाराष्ट्र शासनाचा त्यांनी हे करून दाखवले. आज या कोविड महामारीच्या साथीत महाराष्ट्र शासनाने आणि मुंबई महानगर पालिकेने जे कार्य केले आहे त्यांना त्रिवार अभिवादन.


या ब्लॉगचे लेखक भालचंद्र रामपूरकर हे स्वतः मुलुंड जंबो कोविड सेंटर येथे उपचारासाठी दाखल आहेत. त्यांनी फेसबुकवर आपले अनुभव शेअर केले आहेत.