आरोग्य खात्याचा माहिती, संपर्क विभाग मरणासन्न!

प्लेग, सार्स, लॅप्टोस्पायरोसिस, 26 जुलैची पूरपरिस्थिती त्यानंतर उद्भवलेला मलेरिया, डेंग्यू अशा विविध आपत्तीच्यावेळी मुंबईकरांच्या जीवाची काळजी घेणारं वेळोवेळी विविध पोस्टर्स, होर्डिंग, चित्रपटगृह, बस, रेल्वे अशा सर्व थरात पालिकेचा स्वत:चा आवाज असणारं आरोग्य खात्याचं माहिती संपर्क आणि शिक्षण विभाग ऐन गरजेच्यावेळी मरणासन्न अवस्थेत आहे.

Mumbai
BMC
मुंबई महानगर पालिका

जागतिक आरोग्य संघटनेमार्फत राबवण्यात आलेला आरोग्य प्रकल्प भारतात भारतीय लोकसंख्या – 5 (भालोप्र-5) या नावाने केंद्र सरकारच्या आरोग्य सेवेमार्फत भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये सुरू करण्यात आला. या प्रकल्पाला जागतिक बँकेने ४८ कोटींचे अनुदान दिले होते आणि मुंबई शहरात भालोप्र – 5 या नावाने मोठ्या वाजतगाजत सुरू झाला. या प्रकल्पाअंतर्गत मुंबईच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी, बालमाता व कुटुंबकल्याण लसिकरण, मलेरिया, विविध साथीचे रोग, झोपडपट्टीतील लोकांचं आरोग्य, मृत्यूदर कमी करणं अशा विविध सुविधेबरोबर भालोप्र – 5 च्या सेवेचा लाभ तळागाळापर्यंत सेवा आणि फॉलोअप घेण्यासाठी नवीन आरोग्यकेंद्रांची उभारणी आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत राबवण्यात आला होता. त्याचे मोठे श्रेय महिती, संपर्क आणि शिक्षण विभागाचे होते. आज त्या विभागाची गरज पदोपदी जाणवत असताना आरोग्य खात्याच्या अनेक निष्क्रीय सहाय्यक आरोग्य अधिकार्‍यांनीच या विभागाला मरणासन्न अवस्थेत आणल्याचे उघडकीस आलं आहे. याला मुख्य कारण आहे या विभागामार्फत वर्तमानपत्र, चित्रपटगृह, बसेस, रेल्वे आणि रस्त्यावर असणार्‍या होर्डिंग्जवर जनजागृतीसाठी लावण्यात येणार्‍या जाहिराती आणि त्यातून मिळणारे लाखो रुपयांचे कमिशन हे मुख्य कारण आहे.

भालोप्र – 5 आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कुटुंबकल्याण, बाह्यद्वार सेवा, एन. यु. एच. एम, आर. सी. एच. च्या मिळून मुंबईभरात 225 आरोग्यकेंद्र कार्यरत आहे. एक वैद्यकीय अधिकारी, 3 ए. एन. एम., 2 समन्वयक, 1 एफ. एफ. डब्लू आयाबाई मिळून 10 जणांचा कर्मचारी स्टाफ त्यांच्याबरोबर 20 सी. एच. व्ही. मुंबईकरांच्या जीवाची काळजी घेत असून अत्यावश्यक सेवेत समावेश केला आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेचा कुठलाही लाभ त्यांना प्रशासन आजमीतीस देत नाही. या सगळ्या गोतावळ्यास मार्गदर्शन, ट्रेनिंग, आरोग्य प्रचार साहित्य, पथनाट्य आरोग्य कर्मचार्‍यांना सतत सतर्क ठेवण्याचे मुख्य कार्य परळ येथील विभाग कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या अभिनंदन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आरोग्य खात्याच्या माहिती, संपर्क, शिक्षण विभागाचे हजार चौरस फुटाचे अद्ययावत प्रसार माध्यमांच्या सामुग्रीने सुसज्ज कार्यालय आतापर्यंत होत होते. याचा प्रमुख म्हणून एक सहाय्यक आरोग्य अधिकारी काम बघत होता त्या काळात चित्रपट, नाट्य, दिग्दर्शन, लेखक क्षेत्रातील नामांकित डॉ. अनिल बांदिवडेकर यांनी ‘माशिसंवि ‘या विभागाचं मुंबईकरांसाठी किती महत्त्वाचं आहे हे त्यांच्या प्रत्यक्ष कार्याने पटवून दिलं होत, मात्र त्यांच्या निवृत्तीनंतर आलेल्या कोणत्याही अधिकार्‍यांना या विभागाचे कुठलेही ज्ञान नव्हते आणि मुंबईकरांच्या जीवाशी काही देणेघेणे नव्हते आणि अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर यांच्या कारकिर्दीत माहिती, शिक्षण, संपर्क विभागाला ग्रहण लागायला सुरुवात झाली.सार्वजनिक आरोग्य खात्याच्या या माहिती, संपर्क, शिक्षण विभागत दोन कमर्शिअल आर्टीस्ट, चार प्रोजेक्टनिस, एक छायाचित्रकार, दोन हेल्थ एज्युकेटर, लिपीक, हेडक्लार्क, शिपाई, लेबर असा माहिती संपर्क शिक्षण विभाग सर्व कर्मचारी सर्वसोयी सुविधांनीयुक्त आणि कमर्शिअल अ‍ॅड एजन्सीला लाजवेल असा स्टाफ होता.

प्लेग, सार्स, लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, मलेरिया, दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणार्‍या साथरोगांबाबत जनजागृती करण्यासाठी जे साहित्य हवे असते म्हणजेच पोस्टर, पॅम्पलेट, जाहिरातीचे होर्डिंग, लघुपट निर्मितीचे काम या विभागातले कमर्शियल आर्टीस्ट करत होते. जे काम पालिका इनहाऊस प्रॉडक्शन करत होती यामुळे पालिका प्रशासनाच्या लाखो रुपयांची बचत होत होती. शिवाय आरोग्य केंद्र कर्मचार्‍यांना वस्तीपातळीवर जनजागृतीसाठी हवे असलेलं साहित्य चर्चा करून बनवण्यात येत असल्यामुळे एखाद्या आपत्तीच्यावेळी कर्मचार्‍यांना काम करताना अधिक उत्साह आणि कामात सुलभता येत होती. वस्तीपातळीवर शिवाय पालिकेची रुग्णालयं, आरोग्यकेंद्र, सुतिकागृहात जनजागृती करणारे लघुपट, माहितीपट, याच विभागातील प्रोजेक्टनिसामार्फत दाखवले जायचे. त्यासाठी प्रोजेक्टर, स्क्रीन, चित्रपटांची रिळे याच्या साहित्याची खरेदीही इथल्या आर्टीस्टच्या सल्यानुसार करण्यात येत होती. यासाठी पालिकेच्या गॅरेजमधून खास वाहनांची सोय तत्परतेने होत होती. आताच्या निष्क्रिय आरोग्य अधिकार्‍यांमुळे हे सगळं बंद पडलं आहे. यामुळे मुंबईकर जनतेच्या आरोग्याच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

तत्कालीन अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर यांच्या काळात सार्वजनिक आरोग्यखात्याच्या माहिती, संपर्क, शिक्षण विभागाला उतरती कळा लागून त्याची मरणासन्नतेकडे वाटचाल सुरू झाली. ‘माशिंसवि ’विभागाकडून येणारी कल्पकता असणारी आरोग्यजनजागृतीची कामे अतिरीक्त आयुक्तांनी इथली कामे त्यांच्या मर्जीतल्या अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीकडून करून घेण्याचे आदेश काढण्यात आले. त्या काळात एजन्सींची लाखो रुपयांची बिले फ-दक्षिण विभागातील अकाऊंट विभागाकडून कोणत्याही ‘क्वेरी’ न काढता पास केली जात होती. त्यामुळे पालिका प्रिटिंग प्रेसला मिळत असलेली छपाईची कामे बंद झाली. या विभागातील कमर्शिअल आर्टीस्टना कामे राहिली नाहीत. एजन्सीकडून छपाई करून आलेल्या साहित्याचे वाटप मुंबईभरातल्या आरोग्यकेंद्रांना, दवाखान्यांना, रुग्णालयांना करण्याचं काम इथल्या आर्टीस्टच्या माथी आले. खासगी अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीकडून मिळणारे बक्कळ कमिशनसाठी मग सहाय्यक आरोग्य अधिकार्‍यांची पावलेही एजन्सीकडे वळली तर नवल नाही.

तत्कालीन सहाय्यक आरोग्य अधिकारी असलेल्या डॉ. निलम कदम आता उपआरोग्य अधिकारी या पदावर बढती मिळालेली असून सध्या त्यांची नियुक्ती कोरोनाग्रस्तांची काळजी घेण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात केली आहे. माहिती, शिक्षण, संपर्क विभागाचं काडीचं ज्ञान नसलेल्या या डॉ. निलम कदम यांनी त्यांच्या काळात या विभागातील प्रोजेक्टर, स्क्रीन, महत्त्वाचे संदर्भ छायाचित्र, लेखी सामुग्री आणि साथरोग निवारण्याचे महत्त्वाचे दस्तऐवज चक्क भंगारच्या भावात विकून टाकले. खरं तर या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी आहे, पण कार्यकारी आरोग्य अधिकार्‍यांना यासाठी वेळच नाही किंवा त्यांचा या सगळ्या घडामोडींना पाठिंबा असणार. कारण या विभागातले दोन कमर्शिअल आर्टीस्ट, चार प्रोजेक्टनिस निवृत्त होऊन वर्ष दोन वर्षांचा काळ लोटला. मात्र, त्या महत्त्वाच्या असणार्‍या रिक्त जागाही अद्याप भरलेल्या नाहीत. शेड्युलवर असणार्‍या या जागा भरण्याकडे एजन्सींकडून मिळणार्‍या लाखो रुपयांच्या कमिशनमुळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेेले. त्या दोन वर्षांपासून रिकाम्या झालेल्या जागा त्वरित भरल्या असत्या तर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याला करोनापासून असणारं भय वाढणारी भीती रोखण्याची स्वत:ची इनहाऊस यंत्रणा कामाला आली असती. आज या माहिती संपर्क विभागाची आपल्याला मोठी उणीव भासत असल्याचे आरोग्य विभागातील अनेक डॉक्टर आणि आरोग्य केंद्र कर्मचारी सांगतात.

मुंबईभरात करोनाचा फैलाव होत असताना अनेक नामांकित कंपन्या, अ‍ॅड एजन्स्या, विविध माध्यमे, होर्डिंगद्वारे विनामूल्य प्रचार करत असताना चित्रपटगृह, रेल्वेत आरोग्यविभागाच्या आरोग्यविषयक लाखो रुपयांच्या जाहिराती पालिकेच्या पैशाची उधळपट्टी करून देण्यासाठी टेंडर काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणी चौकशी करून वेळीच रोखले तर आरोग्य अधिकार्‍यांचा भ्रष्टाचारही उघडकीस येईल. मात्र, काही लाख रुपयांच्या कमिशनच्या लालसेमुळे मुबईकरांच्या जीवाशी खेळ चालवला आहे. आरोग्य खात्याचा आवाज असणार्‍या माहिती, संपर्क, शिक्षण विभागाला मरणासन्न अवस्थेत पोहचवणार्‍या आरोग्यखात्यातल्या बिनडोक आरोग्य अधिकार्‍यांवर वेळीच कारवाई केली तर फिनिक्स पक्षाप्रमाणे मरणासन्न अवस्थेत असणारे माहिती, संपर्क, शिक्षण विभाग पुन्हा भरारी घेईल.