घरफिचर्समायमहानगर ब्लॉगजाणत्या राजाचा (अ) जाणतेपणा

जाणत्या राजाचा (अ) जाणतेपणा

Subscribe

दिल्लीत होणारा रामलीला महोत्सव हा खूपच प्रसिद्ध आहे. दहा दिवस रंगणार्‍या या रामलीला उत्सवामध्ये पहिल्या दिवशी रामाची भूमिका करणारा कलाकार दुसर्‍या दिवशी लक्ष्मण असतो तिसर्‍या दिवशी भरत असतो चौथ्या दिवशी सुग्रीव किंवा पाचव्या दिवशी बाली. रावणाची भूमिका सोडून राम भूषवणार्‍या कलाकारांच्या भूमिका सतत बदलत असतात, पवारांच्या राजकारणाचंही तसंच आहे.

संसदेच्या अधिवेशनात वादग्रस्त शेती विधेयकाच्या चर्चेच्या वेळी देशाचे माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अनुपस्थिती राखली. राष्ट्रवादीच्या खासदारांनीही सभात्याग केला. चर्चेवेळच्या गदारोळात पवारांची संसदेतील अनुपस्थिती आणि राष्ट्रवादीचा शेतकर्‍यांबाबतचा पवित्रा यामुळे एरवी बळीराजाचा कैवारी असलेल्या पवारांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मोदी सरकारच्या कृषी विधेयकाला दोन बाजू असल्या तरी गेली ५० वर्षांहून अधिक काळ देशाच्या राजकारणात वावरणार्‍या शरद पवारांच्या विश्वासार्हतेची बाजू मात्र सपशेल उघडी पडली आहे. पंतप्रधान मोदींचे राजकीय विरोधक असल्याचं भासवणार्‍या शरद पवारांनी मात्र आपल्या अनुपस्थितीने आणि खासदारांच्या सभात्यागाने आपल्या गूढ राजकारणाचीच री ओढली आहे. पवारांनी संसदेत अनुपस्थित राहण्याचे तरंग राज्यातही उमटले आहेत. त्यामुळेच मंगळवारी दुपारी आपल्या एकदिवसीय अन्नत्यागाबाबत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी घोषणा केली. संसदीय लोकशाहीच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम राज्यसभेत केलं गेलं असा आरोप यावेळी पवारांनी केला. प्रत्यक्षात मात्र पवारांचं एकूणच राजकारण हे विश्वासार्हतेला तिलांजली देण्याचंच असल्याबाबत दिल्लीपासून राज्याच्या राजकारणात बोललं जातंय. पवारांनी त्यावर पुन्हा एकदा स्वत:चं शिक्कामोर्तब केलंय.

शरद पवार यांनी आपल्या कारकिर्दीत आपला संपूर्ण बाज हा गूढपणे राजकीय खेळी करण्यावरचा ठेवला आहे. इंदिरा गांधींना असलेला विरोध त्यानंतर राजीव गांधी यांच्यासमोर विरोधानंतर पत्करलेली सपशेल शरणागती, सोनिया गांधींच्या विदेशी असण्याचा मुद्दा, त्याआधी राज्यात शिवसेना आणि भाजप युतीची १९९५ ला आलेली सत्ता आणि त्याला पवारांचा असलेला आशीर्वाद, तुलनेनं अगदी फुटकळ क्रिकेट बोर्डाच्या स्वत:च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सोनिया गांधींकडे मदतीसाठी केलेली मनधरणी, युपीएमध्ये सहभागी होताना सोनिया गांधींच्या विरोधाला घातलेली मुरड, राज्यात फडणवीस सरकार बनविण्यासाठी न मागता केलेली अदृश्य हातांची मदत, राज ठाकरेंचा करून घेतलेला वापर, मग महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करताना हिंदुत्ववाद्यांशी हात मिळवताना धर्मनिरपेक्षता पायदळी तुडवण्याचा केलेला प्रयत्न या सगळ्या टप्प्यांवर जर आपण पाहिलं तर पवारांनी व्यक्तिगत फायद्या तोट्याच्याच राजकारणाचीच गणितं मांडण्यात स्वारस्य राखल्याचं दिसून येतंय. हे करत असताना गेल्या पाच दशकात त्यांच्याकडून जी राजकीय अविश्वसनीयता जपली गेली त्यालाच ते ‘पॉलिटिकल स्मार्टनेस’ म्हणतात.

- Advertisement -

आणि पवारांचे भक्त त्यावर ‘जाणता राजा’ म्हणत टाळ्या वाजवतात. राष्ट्रीय राजकारणाच्या कॅनव्हासवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा म्हणजेच प्रादेशिक पक्षाचे प्रमुख म्हणून शरद पवार ओळखले जातात. पण तसं पाहिलं तर त्यांचा खरा वरचष्मा हा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातच दिसून येतो. त्यामुळे काही खडूस राजकीय विश्लेषक त्यांना ‘उपक्षेत्रीय नेता’ म्हणूनच उल्लेखतात. त्यांचं राज्यातल्या संख्याबळाने त्यावर शिक्कामोर्तब होतं. पश्चिम महाराष्ट्रात पवारांचा वरचष्मा आहे. त्याचं सगळ्यात मोठं कारण हे मराठा समाज आहे. एकूण लोकसंख्येच्या 31 टक्के मराठा समाज महाराष्ट्रात आहे. शेती, साखर कारखाने आणि सहकार यांच्यामुळे तो पवारांची वोटबँक म्हणूनच स्थान राखून आहे. या आपल्या हुकूमी वोटबँकेला घेऊन पवारांनी राजे राजवाड्यांचंच राजकारण करण्यामध्ये स्वारस्य राखल्याचं दिसून येतंय. राजेराजवाड्यांच्या काळात महाराजाला अभिप्रेत असंच त्याच्या मांडलिकांनी, सुभेदारांनी वागावं असा प्रघात होता. तोच कायम ठेवण्याचा प्रयत्न पवार आजही करत आहेत. कृषीविधेयकाच्या दिवशी दांडी मारून नमो राजाला जे हवंय तेच त्यांनी केलंय. पवारांच्या संपूर्ण राजकारणाची शैली हीच मुळी आपला स्वार्थ साधून घेणे अशी राहिलेली आहे आणि त्यामुळे आज संपूर्ण देशात त्यांच्या इतका जबरदस्त अनुभवी, मुरब्बी आणि चाणाक्ष राजकारणी नसतानाही ते राष्ट्रीय राजकारणात सक्षम विरोधी नेत्याची जागा घेऊ शकलेले नाहीत हे कटू असेल तरी वास्तव आहे. विशेषत: दक्षिणेकडची मंडळी ही पवारांवर विश्वास ठेवायला किंवा विसंबून राहायला केव्हाच तयार नसतात.

पवार सदासर्वकाळ कोणाचेही मित्रही नसतात आणि शत्रूही नसतात. आपले रंग ते राजकीय गरजेनुसार आणि काळानुरूप बदलत असतात. त्यामुळेच जे रविवारी कृषी विधेयकाच्या बाबतीत घडलं तेच पवारांनी सीएए आणि तीन तलाक बाबतीतही केलं होतं. अर्थात हे करत असताना आपल्या राजकीय वाटचालीत त्यांनी व्यक्तिगत मैत्री मात्र नीट टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. किंबहुना अडचणीत असलेल्या आपल्या व्यक्तिगत मित्रांना त्यांना देता होईल तेवढी साथ देण्याचा प्रयत्नही केल्याचं आपल्याला जुन्या उदाहरणांवरून म्हणता येऊ शकतं. याबाबतीत वाय एस जगन रेड्डी आणि नरेंद्र मोदी या दोघांची उदाहरणं देता येतील. काँग्रेसशी या दोघांचं पटत नव्हतं त्यावेळेलाही या दोघांशी व्यक्तिगत मैत्री सांभाळत पवारांनी त्यांना साथ दिल्याचं आपल्या लक्षात येईल. वायएसआर जगन रेड्डी हे तर तुरुंगात असताना आपल्या एका जवळच्या मित्राकरवी पवारांनी जगन रेड्डींना मोठी आर्थिक मदत केल्याचं दिल्लीच्या वर्तुळात सांगितलं जातं. जी गोष्ट राजकारणात तीच व्यवसायात. मुंबईत एसआरए संदर्भात पुनर्वलोकन समिती बनविण्यात आलीय. पवारांनी त्यात सीबीआयच्या केसेस दाखल असलेल्या विनोद गोयंका आणि शाहिद बलवा या बांधकाम क्षेत्रातील आपल्या बदनाम मित्रांना घुसवलं आहे. मामला सरळ आहे मित्रांचं आणि ओघानं आपलंही हित जपण्याचा.

- Advertisement -

दिल्लीत होणारा रामलीला महोत्सव हा खूपच प्रसिद्ध आहे. दहा दिवस रंगणार्‍या या रामलीला उत्सवामध्ये पहिल्या दिवशी रामाची भूमिका करणारा कलाकार दुसर्‍या दिवशी लक्ष्मण असतो तिसर्‍या दिवशी भरत असतो चौथ्या दिवशी सुग्रीव किंवा पाचव्या दिवशी बाली. रावणाची भूमिका सोडून राम भूषवणार्‍या कलाकारांच्या भूमिका सतत बदलत असतात, पवारांच्या राजकारणाचंही तसंच आहे. आपण घेतलेल्या कुठल्याही पवित्र्याचं ते नीट स्पष्टीकरण देत नाहीत आणि आपल्या राजकीय हालचालींबद्दल धडाधडा बोलत नाहीत. जे बोलायचं ते करायचं नाही आणि जे करायचं आहे ते बोलायचं नाही. हीच त्यांची गेल्या अनेक वर्षांतील राजकीय शैली आहे. त्यामुळे अनेक राजकीय पंडितांना पवारांचा अंदाजच लागू शकलेला नाही. आपल्यापैकी अनेकांनी त्यांचं हे वागणं अनुभवलं असेल. काहींनी पाहिलेलं असेल किंवा वाचलेलं असेल. मात्र, पहिल्यांदा सक्रिय राजकारणात उतरून थेट मुख्यमंत्रीपदाला गवसणी घालणार्‍या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना येत्या काही दिवसांत पवार यातला नेमका कोणता रंग दाखवतात त्यावर राज्याचं राजकारण बर्‍याच अंशी अवलंबून आहे.

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री राहतात की जातात अशी परिस्थिती विरोधकांनी निर्माण केली होती. पण काही प्रमाणात बाजी पलटवण्यात मुख्यमंत्री ठाकरे यांना यश आलेलं आहे. पण हे यश निर्भेळ आहे का? याचा फैसला मात्र किंगमेकर पवारांच्या हाती असणार आहे. याचं कारण शेतकरी विधेयकाच्या अनुपस्थितीबाबत पवार नेमकं मोदींकडे काय मागणार आणि काय मिळवणार याच्यावर बरीच राजकीय गणितं आणि राष्ट्रवादीचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
कोरोनाच्या महामारीत सरकारकडून आणि प्रशासनाकडून अनेक चुका झाल्या असताना त्या चुका दाखवून सत्ताधार्‍यांना धारेवर धरण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच सहकारी थोडेफार यशस्वी ठरत आहेत. त्या विरोधामध्ये ठाकरे सरकारला सत्तेपासून खाली खेचण्याचं सामर्थ्य सध्यातरी दिसत नाहीये. आणि त्यातही सत्तेसाठी लागणारी आकडेमोड ही सध्यातरी विरोधकांच्या आकलना पलिकडची आहे. ते संख्याशास्त्र आवाक्यात येण्यासाठी शरद पवार नेमकं काय करतात यावर सगळा खेळ अवलंबून आहे. अर्थात ते जे काही करतील त्याचा अंदाज कदाचित आकाशातील देवही बांधू शकत नाही हेच खरं. पण राज्यात राजकीय भूकंप झालाच तर त्याचं कारण मात्र, शरद पवारांचं गूढ व्यक्तिमत्व आणि अनाकलनीय राजकीय चाली हेच असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -