नाराजी की बंड?

ज्याप्रमाणे जमिनीतील भूंकपांची पशुपक्षांना पूर्वकल्पना मिळत असते, त्याचप्रमाणे राजकारणातील भूकंपाचेदेखील पूर्वसंकेत मिळत असतात. त्यानुसार पदाधिकारी, कार्यकर्ते, पाठीराखे यांच्यात दबक्या आवाजात चर्चा सुरू होते. मात्र योग्य वेळ आल्याशिवाय साहेब किंवा मॅडम बोलणार नाहीत, अशी ते एकमेकांची समजूत काढतात. अशाच आणखी एका राजकीय भूकंपाचे संकेत प्राप्त झाले असून त्याचा केंद्रबिंदू यंदा पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. पुढील शुक्रवारी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या दिनी त्यांची कन्या, माजी महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे ह्या त्यांच्या मनातील खदखद उघड करणार आहेत, त्यावेळी त्या काय निर्णय घेतात, याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Mumbai

21 ऑक्टोबर, 24 ऑक्टोबर, 12 नोव्हेंबर, 23 नोव्हेंबर, 26 नोव्हेंबर आणि 28 नोव्हेंबर या सहा तारखा 2019 या वर्षात फार महत्त्वाच्या ठरल्या. 21 ऑक्टोबरला राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि 24 ऑक्टोबरला निवडणुकीचे निकाल लागले. मात्र निवडणुकीपूर्वी एकत्र लढलेले भाजप आणि शिवसेना या दोघांनीही निवडणुकीनंतर वेगवेगळे मार्ग पत्करल्याने राज्यात 12 नोव्हेंबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती राजवट लागली. केवळ दोन आठवड्यात राष्ट्रपती राजवट उठवून 23 नोव्हेंबरला रामप्रहारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तीन दिवसातच फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने अखेर 28 नोव्हेंबर रोजी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र विकास आघाडीने सरकार स्थापन करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर शपथ घेतली. त्यामुळे निवडणुकीनंतर सव्वा महिन्यांनी राज्यात सरकार अस्तित्वात आले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. तसे म्हटले तर वरील सहा तारखांना ज्या घटना घडल्या, त्या राजकीय भूकंपच होते.

‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन…’अशा घोषणा देणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अतिआत्मविश्वास नडला आणि 30 वर्षांचा नैसर्गिक मित्र असलेला शिवसेना सत्तेत जाऊन बसला. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केल्याने सर्वात जास्त हानी कुणाची झाली असेल तर भाजपची. कारण राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष असूनही, 105 आमदार निवडून आल्यानंतरही पक्षातील वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेतल्याने, त्यांची तिकिटे कापल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांना वर्षा बंगला सोडावा लागला. त्यांच्याप्रमाणे पक्षातील वरिष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे आणि राज पुरोहित यांना वन मॅन फडणवीस यांनी घरी बसवले आणि त्याचाच सर्वाधिक फटका पक्षाला बसल्याचे आता टीम देवेंद्रचेच सदस्य बोलू लागले आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना त्यांचाच चुलत भाऊ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पराभव केल्याने पंकजा फार दु:खी झाल्या. आपला पराभव होवूच शकत नाही, किमान डझनभर आमदार निवडून आणण्याची क्षमता असलेल्या पंकजा यांंचा घात कुणी केला, यावर खोलात जाऊन विचार केला असता पंकजा यांच्या समर्थकांना यामागे देवेंद्र फडणवीस यांनीच रसद पुरवल्याचे समजले. त्यामुळे माझ्या पराभवास पक्षातील वरिष्ठ नेतेच जबाबदार असल्याची खदखद त्यांनी भाजपतील भीष्माचार्य म्हणून ओळख असलेले एकनाथ खडसे यांच्याकडे बोलून दाखवली. त्यामुळे आपण पक्षात एकटे पडल्याची भावना जशी पंकजा यांना सतावत होती तशीच केविलवाणी स्थिती सध्या एकनाथ खडसे यांची झालेली आहे. नाथाभाऊंनी तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर बाण सोडत आम्हाला सोबत घेतले असते तर किमान 25 ते 30 जागा जास्त निवडून आल्या असत्या, असा टोला लगावला. तसेच आपली मुलगी रोहिणी खडसे हिच्या पराभवास कारणीभूत असलेल्या पक्षातील दोन नेत्यांंची पुराव्यासहित माहिती दिल्यानंतरही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कारवाई करत नाही, अशी खंतही बोलून दाखवली. तसेच माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची ही अवस्था असेल तर पंकजा ताईंबद्दल न बोललेलेच बरे, असे सांगण्यासही खडसे विसरले नाहीत आणि त्यांनीही मनातील खदखद बाहेर काढली.

मुळात विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्या पद्धतीने किमान दोन डझनभर आयारामांना फडणवीस यांंनी पक्षात आणले आणि त्यांना तिकिटे दिली त्याच वेळी याचा कधीतरी स्फोट होणार हे दिल्लीतील भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांच्या लक्षात आले असणार.आता फडणवीस यांना अपेक्षेप्रमाणे 125 ते 130 आमदार संख्या गाठता न आल्याने दिल्लीतूनही फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले आहे. राज्यात सत्ता स्थापनेचा प्रयत्न फोल ठरल्यानंतर भाजपमध्ये भूकंपाचे हादरे जाणवू लागले आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सातत्याने स्वपक्षीयांवर टीका करत आहेत. त्यात आता माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून राजकीय मार्ग बदलण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी ट्विटर बायोही बदलला आहे. गेल्या काही दिवसांत पंकजा यांनी शिवसेनेचे कौतुक करणारे ट्विट केले आहे. त्यामुळे पंकजा शिवसेनेत जाणार का? अशी शंकेची पाल राजकीय वर्तुळात चुकचुकली.

तेव्हापासून पंकजा यांच्याविषयी तर्कविर्तक लढवण्यास सुरुवात झाली आहे. पंकजा मुंडे भाजप सोडणार अशी जोरदार चर्चा सुरू असतानाच आता पंकजा मुंडे यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली आहे. मी व्यथित जरूर आहे. पण भाजपवर नाही तर चुकीच्या बातम्या देणार्‍या माध्यमांवर,असा खुलासा केला. मी भाजपतच असून माझ्या पक्षनिष्ठेबद्दल प्रश्नचिन्ह घेतल्यामुळे मला दुःख झाले. तसेच १२ डिसेंबरपर्यंत थांबा, तेव्हा मी सर्व बोलेन, असे सांगत पंकजा यांनी सस्पेन्स वाढवला आहे.

वर्ष 2011मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समवेत पंकजा आणि त्यांचे सहकारी भाजप सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत होते, असा गौप्यस्फोट दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. त्यावेळी गोपीनाथ मुंडे हे लोकसभेत भाजपचे उपनेते होते, त्यांंचे विश्वासू सहकारी पाशा पटेल, माधुरी मिसाळ, प्रकाश शेंडगे, पंकजा मुंडे असे चार-पाच आमदारही मुंडेंसोबत पक्ष सोडणार होते. मात्र अशाप्रकारे पक्ष फोडायचा नसतो, असे त्यावेळीचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी मुंडे यांना समजावत काँग्रेस पक्षात घेण्यास नकार दिला. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज यांनीही त्यांची समजूत काढली आणि मुंडेंनी निर्णय बदलला, असा दावा अजित पवारांनी केला होता.

पंकजा यांच्या पराभवानंतर तसेच राज्यात भाजपचे सरकारही न आल्याने त्यांना विधान परिषदेवर जाण्यासाठी ताटकळत राहावे लागणार आहे. त्यातच त्यांच्यासोबत असणारे खडसे, तावडे, मेहता यांचेही पंख फडणवीस यांनी कापले आहेत. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मर्यादीत स्वरूपात मदत मिळेल, अशा सर्व पार्श्वभूमीवर नाराज पंकजा यांनी त्यांच्या मनातील खदखद फेसबूक पोस्टद्वारे मांडली. त्यानंतर मात्र भाजप नेत्यांनी पंकजा यांच्या भेटी घेतल्या, त्या नाराज नाहीत, आम्ही त्यांच्या सोबत आहोत, असे माध्यमांना येऊन सांगू लागले. पंकजा यांना सत्तांतर करून फायदा होईल का, याचे उत्तर सध्या तरी ‘नाही’ असेच आहे. कारण मूळ पक्ष सोडून इतर पक्षात गेल्यास मिळणारा जनाधार कमी होतो याचा अनुभव नारायण राणे, छगन भुजबळ, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे-पाटील, उदयनराजे भोसले यांसारख्या दिग्गजांना आला आहे. त्यामुळे तीच चूक पंकजा मुंडे करणार नाही, असे दिसते. मात्र नाराजीनाट्य कायम ठेवत विधान परिषदेत जाण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू असणार. फडणवीस यांचा करिष्मा संपत चालला आहे. त्यानंतर भविष्यात कोण? याचा विचारही त्यांच्या मनात डोकावत आहे. चंद्रकांत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत, मात्र त्यांच्यामागे जनाधार नाही, म्हणून प्रदेशाध्यक्ष पदावरही काही नेते डोळा लावून बसले आहेत. अशा सर्व पार्श्वभूमीवर खरेच पंकजा मुंडे यांनी बंड केले, तर दिल्लीतून त्यावर काय प्रतिक्रिया येते, यावरच त्यांचे राजकारणातील भवितव्य अवलंबून असणार आहे. कारण अजित पवार यांचे फसलेले बंड राज्याने नुकतेच अनुभवले आहे. त्यामुळे पंकजा यांच्यासोबत किती जण शेवटपर्यंत राहतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कारण दिल्लीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही जोडी बंड मोडून काढण्यात पटाईत आहेत.