घरफिचर्समायमहानगर ब्लॉगकाटेरी खुर्चीवरची कसरत

काटेरी खुर्चीवरची कसरत

Subscribe

मी इथे यायचा विचारच केला नव्हता. तसं तर मला यायचंही नव्हतं. पण काही गोष्टी अशा घडल्या आणि यावं लागलं. मला तर या सगळ्या घटना घरी बसून टीव्हीवर पाहायच्या होत्या, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत रविवारी बोलून दाखवलं. त्याआधी छगन भुजबळ म्हणाले होते, ‘‘जगेन असं वाटलं नव्हतं; पण आता मंत्री झालो आहे. त्यानंतर भुजबळांना त्यांचा जुना रामटेक बंगला नव्यानं मंत्री झाल्यावर शासकीय निवासस्थान म्हणून मिळाला आहे. या दोन मोठ्या नेत्यांच्या भावना ऐकल्यानंतर आणि वास्तव पाहिल्यानंतर नियती किती बलवान आहे हे सांगण्यासाठी पुरेशा आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर ज्या पद्धतीचं सरकार आणि ज्या तर्‍हेनं बनलेलं आहे ते पाहिल्यानंतर त्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन चाकांच्या गाडीसारखं असलेलं सरकार असंही हेटाळणीच्या सुरात म्हणून पाहिलं. पण कोणी काहीही म्हणालं तरी ‘पॉलिटिक्स में राईट और राँग कुछ नही होता’ हेच खरं.

उद्धव यांनी मुख्यमंत्री व्हावं हा पवारांचा आग्रह सुरुवातीला अनेकांच्या लक्षात आला नव्हता.ठाकरेंच्या तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी हे पद घेऊ नये असं काही शिवसेना पदाधिकारी आणि सामान्य शिवसैनिकांनाही वाटत होतं. त्याचं कारण हे फक्त ठाकरे यांच्या तब्येतीची काळजी आणि त्यांच्या अंगचा सुसंस्कृतपणा हेच होतं. त्याचवेळी पक्षाच्या प्रमुखांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यामुळे अनेक समस्यांची मात्रा कमी झालीय किंबहुना काही समस्या उद्भवल्याच नाही. विशेषत: शिवसेना पक्षामध्ये उद्धव यांच्या व्यतिरिक्त दुसर्‍या कुणालाही हे पद दिलं असतं तर त्या व्यक्तीचं जगणं मुश्किल करणारा एक वेगळा समूह पक्षात दबा धरून बसलेला होता. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याबद्दल तर न बोललेलं बरं. या मंडळींना हाताळण्यासाठी उद्धव ठाकरे हाच उत्तम पर्याय होता. विश्वासदर्शक ठरावाच्या पहिल्या दोन दिवशी अधिवेशनात त्याची चुणूक काही प्रमाणात ठाकरेंनी दाखवून दिली. विधान भवनामध्ये फडणवीस आणि ठाकरे या दोघांमध्ये जी जुगलबंदी रंगली होती ती ऐकल्यानंतर गडी तयारीने उतरला असल्याचंच लक्षात आले; पण खरा मुकाबला तर पुढेच आहे. कारण मुख्यमंत्रीपदावर बसणार्‍या व्यक्तीला दिवसभरात अनेक बैठका, शेकडो अभ्यागत, अनेक अधिकारी, अनेक पत्रकार, भिन्न प्रश्न, त्यामागच्या वेगवेगळ्या समस्या या सगळ्यांचाच मुकाबला करावा लागतो आणि ते करत असताना आपलं मन, शरीर याची काळजी घ्यावी लागते. उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखेच निर्व्यसनी, शांत, संयमी आणि विनम्रही आहेत. प्रश्न आहे वैद्यकीय फिटनेसचा. अर्थात या फिटनेसचा विशेष कस लागत असलेला बॅडमिंटन हा उद्धव यांचा आवडता खेळ आहे. वयाच्या 35 व्या वर्षी त्यांनी तो गांभीर्याने खेळायला सुरुवात केली आणि त्यामध्ये ते कमालीचे पारंगत झाले. त्यांच्यासाठी तीच गोष्ट सत्तेच्या बाबतीतही होऊ शकेल. वयाच्या साठीच्या जवळ असताना त्यांनी संसदीय राजकारणात प्रवेश केलाय आणि ते थेट मुख्यमंत्री झालेत. मुख्यमंत्री पदावर बसून काम करताना आणि विशेषत्वाने राज्यातील जनतेला न्याय देताना उद्धव ठाकरे यांच्यासारख्या संवेदनक्षम आणि शांत नेत्याला अनेक कसोट्यांवर खरं उतरावं लागणार आहे. कोणत्याही संघटनेमध्ये युवक, महिला आणि पालक हे जसे तीन टप्पे असतात तसे ते आता शिवसेनेतही झालेले आहेत. आणि शिवसेनेतला युवकांचा वर्ग अर्थात युवासेना अधिक ऊर्जावान आणि त्यातही सत्तेच्या मुख्य प्रवाहात सूर मारण्यासाठी काहीसा आतुरलेला आहे. साहजिकच सत्ता आणि सत्तेचे केंद्र असलेल्या मंत्रालयात या तरुण मित्रांचा वावर लक्षणीय असणार आहे. त्यामुळे या तरुण मित्रांकडून सत्तेतले मंत्री अधिकारी आणि नेते यांच्याकडे जाऊन काम करून घेणे, समस्यांचा निपटारा करणे यासारख्या गोष्टी ओघानेच घडणार आहेत. हे करत असताना या मंडळींकडून पक्षाचा सर्वोच्च नेता हा मुख्यमंत्रीपदावर बसलेला आहे. त्यामुळे आपण निवडलेलं काम आणि आपण हाती घेतलेला प्रश्न मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणणार नाही याची सगळ्यात पहिल्यांदा काळजी घ्यावी लागणार आहे.

आदित्य यांच्या समोर खूप मोठी कारकीर्द आहे. त्यांचा समज आणि समजूतदारपणा याच्या जोडीला त्यांनी संसदीय अभ्यासात पारंगतता मिळवली तर त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. त्यासाठी मात्र त्यांनी आपल्या वडिलांच्या – राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नियमबाह्य बसणं टाळायला हवं. वाजपेयी पंतप्रधान असताना प्रमोद महाजन यांना त्यांचा ‘राजकीय सल्लागार’ करून बैठकीत बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचं वेतन-भत्तेही त्यांना मिळत होते. पुढे निवडणुकीत हीच गोष्ट त्यांना लाभाचं पद म्हणून अडचणीचं ठरलं. जशी सत्ता येते तसे सत्तेच्या भोवतीचे भाटही येतात. गेल्या काही काळात राज्याच्या अनेक मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये आणि वर्षा निवासस्थानी मागच्या मुख्यमंत्र्यांकडेच असणारी लाळघोटी मंडळी ‘कॅरी फॉरवर्ड’ होतं आलीत. सरकार कोणाचेही असू द्या, या मंडळींची चलती असते.अशाच काही मंडळींकडून गेल्या काही काळात अनेक मुख्यमंत्री बदनाम झालेत. त्याची यादी मोठी आहे. देवेंद्र फडणवीस यांनाही अशा काही मंडळींनी घेरलं होतं. अर्थात देवेंद्र स्वतः खूपच चाणाक्ष-बुध्दीमान असले तरी त्यांचा संसदीय अभ्यास उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा नक्कीच जास्त होता. फाईल वाचण्यापासून ते आदेश देण्यापर्यंत त्यांची स्वतःची मांडणी होती. फडणवीस यांना झालेली अति आत्मविश्वासाची बाधा आणि अपरिपक्व, पोरकट मंडळींना सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात मिळालेलं अवास्तव महत्त्व, जोडीला टॉप-१२ अधिकार्‍यांकडून प्रशासकीय प्याद्यांची हलवाहलव या सगळ्या गोष्टींमुळे फडणवीस अडचणीत आले. देवेंद्र फडणवीस यांना त्यांचं कमी वय आणि मोठे यश यामुळे पक्षात विरोधक निर्माण झाले होते. ती भीती उद्धव ठाकरेंना दिसत नाही. कारण ते पक्षाचे सर्वेसर्वा आहेत; पण त्याच वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडून उद्धव पूर्णपणे सुरक्षित आहेत असं समजण्याचं काही कारण नाही. कारण अनेक वर्षे सत्तेत असल्यामुळे या मंडळींचे अनेक हितचिंतक प्रशासकीय अधिकार्‍यांमध्ये आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठका त्यातले निर्णय आणि सहकारी मंत्र्यांनी आणलेले प्रस्ताव हे समजून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांना स्वतःची एक वेगळी यंत्रणा उभारावी लागेल. कारण यात चूकभूल झाली तर सरळ पक्षाच्या डोलार्‍याला धक्का बसू शकतो.

- Advertisement -

मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव म्हणून सीताराम कुंटे यांची नियुक्ती झालेली आहे. हे कुंटे ज्येष्ठ तरीही अबोल आहेत. याच कुंटेंकडून मुंबईच्या विकास आराखड्याबाबत जो कमालीचा गोंधळ घालण्यात आला होता तो पाहता उद्धव यांना सावध पावलं टाकावी लागणार आहेत. ज्यांच्या आशिर्वादाने उद्धव ठाकरे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी थेट विराजमान झालेले आहेत ते शरद पवार हे प्रशासनाचे खंदे अभ्यासक आहेत. अधिकार्‍यांशी कसं, किती किंवा काय बोलावं हे अगदी देशभरातल्या ज्या काही मोजक्या नेत्यांना कळतं त्यापैकी शरद पवार एक आहेत. पवारांशी अनेकांचे राजकीय मतभेद असतील आणि असू शकतील; पण पवारांना जो संस्था आणि रचनात्मक काम करण्याचा ध्यास आहे तो पाहता उद्धव यांनी या सर्वोच्च पदावर बसून तो कित्ता गिरवायला हरकत नाही. त्यात उध्दव यांची एक जमेची बाजू आहे ती म्हणजे उद्धव यांच्या अवतीभवती लाळघोटेपणा करणारे गॉसिपबाज मित्र कधीच नव्हते. पण ती कामगिरी पक्षातील काही मंडळी करणार नाहीत याची खात्रीही देता येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच आपल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी राहायला जातील अशी अपेक्षा आहे. त्यांनी ते लवकर जावं. कारण गेली पन्नास वर्षे ते ज्या ‘मातोश्री’त निवास करत आहेत ते निवासस्थान मंत्रालयापासून खूपच लांब आहे. त्यामुळे प्रवासाला लागणारा वेळ अधिकार्‍यांची होणारी धावपळ, उद्धव यांची होणारी शारीरिक दमछाक आणि मुख्य म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेमुळे आणि त्यांच्या ताफ्यातील वाहनांच्या संख्येमुळे शहरातील रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी या सगळ्याला पूर्णविराम देण्यासाठी उद्धव यांनी अधिकाधिक वेळ मंत्रालयानंतर वर्षावर थांबणं हेच योग्य ठरणार आहे. गेली अनेक वर्षे उद्धव ठाकरे यांना पाहतो आहे आणि समजून घेतोय.

यश मिळालं म्हणून डोक्यात हवा गेली असल्याचं त्यांच्याकडे पाहिल्याचे कधी लक्षात येत नाही, ते सतत निर्विकार चेहर्‍याने काम करत असतात. पण जाता जाता एक गोष्ट महत्त्वाची वाटते ती म्हणजे प्रसार माध्यम आणि त्यांनी दिलेल्या बातम्या याकडे ठाकरे आणि शिवसेना कसे पाहतात आणि कसे व्यक्त होतात ते खूप महत्त्वाचं आहे. त्यातही आदित्य यांचा कल हा इंग्रजी माध्यमांकडे आहे. मराठमोळ्या महाराष्ट्रात मराठी भाषिक माध्यमं नेत्याचं ब्रँडिंग करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आपल्याविरुद्ध बातमी छापणारा – दाखवणारा हा आपला शत्रू आहे आणि तो ‘त्यांचा’ आहे असं बोलणारा एक वर्ग शिवसेनेमध्ये आहे. आपल्या विरोधात आलेली बातमी किंवा वृत्तमालिका हे काही सुधारण्यासाठी करण्यात आलेली आहे की मुख्यमंत्र्यांना-पक्षप्रमुखांना बाधित करण्यासाठी आलेली आहे हे समजण्याइतके उद्धव समजूतदार आहेत. कारण एका प्रतितथयश वृत्तपत्राचा संपादक होण्याची जबाबदारी उद्धव यांनी पार पाडली आहे. हे सगळं करत असताना जाहीर कार्यक्रम आणि पत्रकार परिषदा सुरू असताना मुख्यमंत्र्यांच्या किंवा पक्षप्रमुखांच्या कानात येऊन लगबगीने ‘काही’ सांगणारी मंडळी जणूकाही पाकिस्तानने भारतावर अण्वस्त्र डागण्याची वार्ता देत असल्याचं भासवत असतात आणि आपण किती उपयुक्त आणि ‘खास’ आहोत हे सांगण्याचा अट्टाहास या मंडळींकडून सुरू असतो. अशा सगळ्यांना आपल्या ठाकरी पद्धतीने हाताळण्याची गरज पडणार आहे. शिवसेनेचा तोंडवळा बदलून सत्तेच्या सर्वोच्च पदापर्यंत पोचलेले उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचाही चेहरामोहरा बदलण्यात यश येईल, अशी आशा करायला काहीच हरकत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -