घरफिचर्समायमहानगर ब्लॉगनाराज नाथाभाऊंचे राष्ट्रवादीला नमन !

नाराज नाथाभाऊंचे राष्ट्रवादीला नमन !

Subscribe

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा गेले काही महिने सतत चर्चेत असलेला राष्ट्रवादीतील प्रदेश बुधवारी अखेर निश्चित झाला. शुक्रवारी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृतपणे प्रवेश करतील. त्यांचा हा राष्ट्रवादीमधील प्रवेश भाजपसाठी आणि राजकीय वर्तुळासाठी अपेक्षित असला तरीही तो निश्चितच धक्कादायक आहे. तसेच तो भविष्यात महाविकास आघाडीच्या सत्तेच्या सारीपाटावर काही महत्वपूर्ण बदल घडवणारादेखील आहे. त्यामुळे केवळ भाजप नव्हे तर सत्ताधारी महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि काँग्रेस या दोन घटक पक्षांनीही खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाकडे अधिक गंभीरपणे बघण्याची गरज आहे.

तसे बघायचे झाल्यास एकनाथ खडसे भाजपचे तळागाळातील कार्यकर्त्यांशी घनिष्ट संबंध असलेले नेते म्हणून ओळखले जातात. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर या विधानसभा मतदारसंघातून खडसे हे विधानसभेवर सातत्याने निवडून येत होते. याला अपवाद तो केवळ 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीचा. फर्डे वक्ते, प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास, प्रश्न मांडण्याची हाताळण्याची आणि तो सोडवण्याची हातोटी, प्रशासनाकडून कामे करून घेण्याचा हातखंडा आणि याबरोबरच विरोधकांबरोबर त्यावेळी युतीत असलेल्या शिवसेनेला अंगावर घेण्याची नाथाभाऊंची आगळीवेगळी हिंमत यामुळेच भाजपचे तत्कालीन दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे यांनी खडसे यांना राजकारणात लिफ्ट दिली. 1995 सली जेव्हा राज्यात पहिल्यांदा शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले आणि मनोहर जोशी व गोपीनाथ मुंडे हे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री झाले तेव्हा या मंत्रिमंडळात गोपीनाथ मुंंडेंच्या आग्रहामुळे भाजपने एकनाथ खडसे यांनादेखील पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी दिली.

- Advertisement -

स्वतःच्या कर्तृत्वावर एकनाथ खडसे यांनी युती सरकारमध्ये मिळालेल्या संधीचे ही सोने केले. मात्र 1999 साली महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार जाऊन पुन्हा काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आल्यानंतर ते 2014 पर्यंत राज्यात भाजपचे सरकार येईपर्यंत खडसेंनी भाजपची खिंड प्रतिकूल परिस्थितीतही अखंडपणे लढवत ठेवली. भाजपात जोपर्यंत प्रमोद महाजन यांचा दबदबा होता आणि महाराष्ट्रामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा शब्द अंतिम होता तोपर्यंत एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे या नेत्यांची भाजपमध्ये चलती होती. मात्र 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात आणि भाजपामध्ये मोदीयुग अवतरले आणि या मोदी युगाने विरोधकांबरोबरच भाजपातील काही प्रस्थापित नेते मुळापासून उखडले गेले. त्यामध्ये प्रमुख नाव म्हणून एकनाथ खडसे यांचा उल्लेख करावा लागेल. मोदीपर्व सुरू झाल्यावर महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस या तरुण नेतृत्वाचा उदय झाला.

अर्थात भाजपामध्ये फडणवीस आणि खडसे यांच्यातील वादाचे मूळ हे मोदी युग अवतरण्याच्या पूर्वीपासूनचे आहे. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांची निवड जवळजवळ अंतिम झाली होती. मात्र भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याकडून फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत नव्हते. अखेरीस गोपीनाथ मुंडे यांची मनधरणी करून फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी गळ घातली. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षाही एकनाथ खडसे यांचा दबदबा अधिक होता. तसेच ते भाजपचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते होते. त्यामुळे राजनाथ सिंह यांनी जोपर्यंत एकनाथ खडसे यांचा देवेंद्र फडणवीस यांना प्रदेशाध्यक्ष करण्यास हिरवा कंदील मिळत नाही, तोपर्यंत फडणवीस यांची नियुक्ती स्थगित ठेवली. अखेरीस स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी फडणवीस यांना प्रदेशाध्यक्षपदाची माळ गळ्यात घालण्याकरता एकनाथ खडसे यांना राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याशी बोलण्यास सांगितले. कारण फडणवीस यांना प्रदेशाध्यक्ष करण्यास एकनाथ खडसे आणि राज्यातील काही भाजपा नेत्यांचा विरोध होता. मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहामुळे अखेरीस खडसे यांनी राजनाथ सिंह यांना दूरध्वनी करून फडणवीस यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा मार्ग मोकळा करून दिला. त्यानंतर लोकसभा निवडणुका झाल्या. देशात व महाराष्ट्रात मोदी लाट होती. त्यामुळे राज्यात भाजपला घवघवीत यश मिळाले. सहाजिकच प्रदेशाध्यक्ष म्हणून त्याचे श्रेय तरुण तडफदार देवेंद्र फडणीस यांच्या अकाउंटला जमा झाले.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे, त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या आणि संघ परिवाराशी घट्ट नाळ जुळलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे भाजपातील वर्चस्व मोदी आणि शहा यांच्या पाठबळामुळे महाराष्ट्रात प्रचंड वाढत गेले. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात जेव्हा भाजपचे सरकार येणार हे निश्चित झाले तेव्हाही एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार अशा वरिष्ठ भाजप नेत्यांचा त्यामध्ये प्रमुख दावा होता. मात्र मोदी आणि शहा यांनी तसेच संघ परिवाराने ही अन्य सर्व भाजपा नेत्यांना काट मारत तुलनेने नवख्या असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला प्राधान्याने प्रथम पसंती दिली. त्यावेळीही नाथाभाऊंनी आपली नाराजी उघड करत बहुजनांचे आपणच मुख्यमंत्री आहोत असे ठणकावून सांगितले होते.

भाजपात तुलनेने ज्युनियर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करून मोदी आणि शहा यांनी जरी त्यांच्या सोयीचे राजकारण केले असले तरी प्रत्यक्षात महाराष्ट्रात काम करताना देवेंद्र फडणवीस यांना ज्येष्ठ नेत्यांना बरोबर घेऊन काम करणे हे दिवसेंदिवस अवघड होऊ लागले. आणि मग त्यातूनच महाराष्ट्र भाजपामध्ये देवेंद्र फडणवीसविरुद्ध एकनाथ खडसे, फडणवीसविरुद्ध पंकजा मुंडे, फडणवीसविरुद्ध तावडे, फडणवीसविरुद्ध चंद्रशेखर बावनकुळे असे पक्षांतर्गत शह-काटशह सुरू झाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे त्यांना पूर्ण पाठबळ असल्यामुळे 2014 ते 2019 या भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्रात आणि दिल्लीत फडणवीस म्हणतील तीच पूर्व दिशा होती. मोदी आणि शहा यांच्या पाठबळावर ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचे तख्त मिळालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणार्‍या राज्यातील भाजप आणि त्यांचे पंख छाटण्यात सुरुवात केली. त्यामध्ये सर्वात पहिला फटका सर्वात ज्येष्ठ नेते असलेल्या एकनाथ खडसे यांना बसला.

एकनाथ खडसे यांच्यावरती दाऊदच्या पत्नीशी असलेल्या संभाषणाचा आरोप झाला. खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुणे भोसरी येथील एमआयडीसीची जागा स्वस्त दरात स्वतःच्या पदरात पाडून घेतल्याचा आरोप झाला. खडसे यांच्या पीएला मंत्रालयातच तीस लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. एकूणच खडसे यांच्या भाजपातील उतरत्या काळाला सुरुवात झाली. त्यामुळे एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. फडणवीस यांनी अन्य मंत्र्यांना क्लिनचीट दिली, मात्र खडसे यांच्या बाबतीत जाणीवपूर्वक चौकशी सुरूच ठेवली. सप्टेंबर 2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्येही भाजपने खडसे यांना त्यांच्या परंपरागत बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारली आणि अचानक त्यांच्या कन्येला रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. मात्र त्यानंतरही त्यांच्या कन्येचा पराभव झाला. आपल्या कन्येचा पराभव हा फडणवीस यांनी विरोधकांना छुपी मदत केल्यामुळे झाल्याचा आरोप खडसे यांनी केला.

मात्र भाजपच्या दिल्लीतील श्रेष्ठींनी खडसे यांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांकडे सोयीस्कर प्रत्येक वेळी कानाडोळा केला. त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे राज्यातून भाजपची सत्ता गेली मात्र तरीही खडसे यांना दिल्लीतील भाजप श्रेष्ठींकडून राज्यसभेवर अथवा त्यानंतर झालेल्या विधान परिषदेवर संधी मिळण्याची शेवटची आशा होती. मात्र खडसेंना दूर ठेवण्यात आले. भाजपने आपल्याला पूर्णपणे अडगळीत टाकले असून आता पुन्हा भाजपमध्ये आपल्याला राजकीय भवितव्य नाही याची खात्री खडसे यांना पटल्यामुळे त्यांनी अखेरीस बुधवारी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत येत्या शुक्रवारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचे दूरगामी परिणाम भाजपच्या राज्यातील राजकारणावर होणार आहेतच, मात्र त्याचबरोबर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात अधिकाधिक सक्षम होणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या पक्षीय बलाबलामध्ये केवळ दोन अंकांचा फरक आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये भाजपमधील नाराजांचे असेच इन्कमिंग सुरू राहिले तर राष्ट्रवादी कोणत्याही क्षणी राज्यांमध्ये शिवसेनेच्या पुढे निघून जाईल. परिणामी सध्या तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाला धोका नसला तरी भविष्यात मात्र राष्ट्रवादी मुख्यमंत्री पदावर दावा करू शकेल, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्याचा अधिक गंभीरपणे विचार शिवसेनेला करावा लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -