घरफिचर्समायमहानगर ब्लॉगफादर तुम्ही कुठे आहात ?

फादर तुम्ही कुठे आहात ?

Subscribe

उस्मानाबाद येथे १०,११,१२ जानेवारी २०२० ला झालेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे कोरोना विषाणूमुळे सगळे जग, भारत आणि महाराष्ट्र गेले दहा महिने ढवळून निघत असताना आहेत कुठे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यात प्रामुख्याने पत्रकार, साहित्यिक, मराठी वाचक आणि अगदी सर्वसामान्य माणसांचा समावेश आहे. फादर दिब्रिटो यांचे व्यक्तिमत्व हे अतिशय प्रेमळ, अभ्यासू आणि उदारमतवादी आहे. कोरोनाचा कहर देशाची राजधानी असलेल्या मुंबईसह महाराष्ट्रात पसरला आणि त्यात अनेकांना आपले जीव गमवावे लागले. कोरोनावरील उपचारांसाठी खासगी हॉस्पिटल्स आणि डॉक्टरांनी रुग्णांची अतोनात लूट केली. कोरोना संसर्गातून पसरणारा आजार असल्यामुळे माणसांना एकमेकांना भेटणेही अवघड होऊन बसले. लोकांनी आपल्या इमारती, विभाग, गावे बाहेरच्या लोकांसाठी इतकेच नव्हे तर जवळच्या नातेवाईकांसाठी बंद केली. ज्याला त्याला स्वत:चा जीव वाचवायचा होता.

कोरोनापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळता पाळता लोकांनी जणूकाही एकमेकांवर बहिष्कारच टाकला होता. आपल्या जवळच्या माणसांपासूनही लोक दूर राहू लागले. लॉकडाऊनमुळे संचारबंदी आली. उद्योगधंदे ठप्प झाले. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले. लोक बेकार झाले. अनेकांच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न अधिक अवघड झाले, कारण आनलॉईन शिक्षणासाठी आवश्यक असलेली आधुनिक साधने सगळ्यांकडे नव्हती. लॉकडाऊनमुळे व्यवहार ठप्प झाल्यामुळे अनेकांसमोर आता जगायचं कसं, असा प्रश्न पडला. अनेक लोकांनी आपल्या गावचा रस्ता धरला. अनेक लोक कोरोना होऊन मेले तर अनेक कोरोनाने उपजीविकेची साधने हिरावल्यामुळे मेले. गेले वर्षभर कोरोनारुपी राक्षसाचे असे हे मृत्यूचे तांडव सुरू असताना अखिल मानवजातीला आशेचा सूर्य दाखवणार्‍या प्रभू येशूंच्या शिकवणीत मोठे झालेले फादर कुठे आहेत, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. कोरोना हा असा विचित्र आजार आहे की, त्याने केवळ माणसांची घरेच बंद केली नाही, तर विविध धर्मांच्या देवांची घरेही बंद केली. तिथे माणसांना जायची सोय राहिली नाही. अशा वेळी कोरोनामुळे मनाने खचलेल्या लोकांना मानसिक आधार देण्याचे काम धार्मिक आणि आध्यात्मिक उपदेशकांचे असते.

- Advertisement -

अनेक वर्षे आपली व्याख्याने, पुस्तके आणि जनसंपर्क यातून अखिल मानवजातीच्या कल्याणाचा उपदेश देणारे, ईश्वरी शक्तीची महत्ता आणि महत्व लोकांना पटवून सांगणारे फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे सगळे पाहत शांत कसे काय बसले आहेत. हे सर्व प्रश्न विचारण्यामागे कारण आहे. फादर हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. हे आपण लक्षात घ्यायला हवे. त्यामुळेच त्यांच्यावर वेगळी जबाबदारी आहे. फादर हे सध्या सगळ्या मराठीजणांच्या सांस्कृतिक व्यासपीठाचे प्रमुख आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून अशा आरोग्यविषयक आणीबाणीच्या काळात मोठी अपेक्षा होती आणि आहे. फादर दिब्रिटो हे केवळ धर्मगुरू असते तर त्यांनी काय करावे, हा त्यांचा प्रश्न होता. कारण अनेक धर्मगुरू, उपदेशक, पंडित, मुल्ला मौलवी आहेत. त्यांनी कोरोना काळात त्यांच्या धर्मियांना कोरोनाचा धोका समजावून सांगून धार्मिकस्थळे काही काळासाठी बंद ठेवण्यासाठी लोकांची मने वळवली. असे करणे आवश्यक होते. त्यामुळे ते संपूर्ण समाजाच्या प्रशंसेस पात्र ठरत आहेत. त्यांनी लोकांना संयम बाळगायला सांगितला, सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला. सरकारने केलेल्या नियमांचे पालन केले. त्यामुळे कोरोनाच्या प्रसारावर बर्‍याच प्रमाणात नियंत्रण मिळविता आले. त्याचीच फलनिष्पत्ती म्हणून वातावरण काही प्रमाणात निवळल्यामुळे नियम पाळून सगळी धर्मस्थळे पुन्हा सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे पुन्हा माणसांची देवांशी भेट होऊ लागली आहे.

कोरोनाने जसा माणसांवर हल्ला केला, तसेच त्याच्यामुळे कागदाविषयी संशय निर्माण झाला. कागदामधून कोरोना पसरतो, अशी अफवा उठल्यामुळे लोकांनी जिथे जिथे कागद आहे. त्यावर जणू बहिष्कारच घातला. त्याचा फटका छापील पुस्तके आणि वर्तमानपत्रांना बसला आहे. वर्तमानपत्रे आणि पुस्तके ऑनलाईन उपलब्ध होण्याची सोय आहे. पण ते कितीजणांसाठी सोयीचे आहे. कितीजणांना उपलब्ध होेऊ शकतात, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे जनमानसाला सुज्ञ करणार्‍या, सामाजिक प्रबोधन करणार्‍या, जनजागृती करणार्‍या या छापील साहित्यसृष्टीवर कोरोनाने घाला घातला आहे. गर्दीमुळे कोरोना वेगाने पसरत असल्याने लोकल गाड्या बंद करण्यात आल्या होत्या, तशी मानवी जीवनाचे सांस्कृतिक अंग असलेली सिनेमागृहे आणि नाट्यगृहे बंद ठेवण्यात आली होती. आता ती काही अटींसह आणि सुरक्षित अंतर ठेवून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण हे त्यांच्या चालकांना परवडत नाही. त्यामुळे गेले दहा महिने हा व्यवसाय बंद आहे. सिनेमा आणि नाटकांचा थेट आस्वाद न मिळाल्यामुळे जशी लोकांची सांस्कृतिक कोंडी झाली आहे, तशीच या व्यवसायाशी संबंधित लोकांची आर्थिक कोंडी झाली आहे.

- Advertisement -

अशा वेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असलेल्या फादर दिब्रिटो यांनी खरे तर कोरोनामुळे झालेल्या या कोंडीच्या वेळी सांस्कृतिक व्यासपीठाचा प्रमुख या नात्याने आपली काही ठोस भूमिका मांडणे अपेक्षित होते. पण फादर दिब्रिटो यांनी या बिकट परिस्थितीबाबत काहीही विधान केले नाही, ना त्यांनी लोकांना काही आवाहन केले, ना लोकांच्या झालेल्या बिकट परिस्थितीबाबत राज्य आणि केंद्र सरकारला काही सूचना केली. फादरांनी सांस्कृतिक क्षेत्राला कोरोनाच्या या बिकट काळात दुर्लक्षित का केले, असा प्रश्न पडलो. निवड समितीच्या सदस्यांनी मोठ्या मनाने आणि व्यापक दृष्टीकोनातून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड केली खरी, पण दिब्रिटो हे ख्रिती धर्मगुरू असल्यामुळे त्यांच्या निवडीला प्रामुख्याने काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला. दिब्रिटो यांचे मराठी साहित्य क्षेत्रात असे कुठले योगदान आहे. त्यांनी ख्रिती धर्माच्या प्रसाराकरिता काल्पनिक कथा लिहिल्या आहेत, असे अनेक आक्षेप घेण्यात आले. पण महाराष्ट्रातील लोकांनी त्या विरोधाचे समर्थन केले नाही. उलट, फादर दिब्रिटो यांचे मोठ्या कौतुकाने स्वागत केले. कारण दिब्रिटो हे जरी ख्रिती धर्मगुरू असले तरी त्यांनी मराठी संतसाहित्याचा अभ्यास केलेला आहे. केवळ अभ्यासच नव्हे तर त्या संतसाहित्याविषयी त्यांना मनापासून आस्था आणि आपलेपणा आहे, हे त्यांनी मान्य केलेले आहे.

इतर ख्रिती धर्मप्रसारक आणि फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यामध्ये हाच मूलभूत फरक आहे, त्यामुळेच मराठीजणांनी आपला साहित्य आणि सांस्कृतिक व्यासपीठाचा प्रतिनिधी म्हणून दिब्रिटो यांचे स्वागत केले. पण साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या आदल्या दिवशी फादर दिब्रिटो यांची प्रकृती बिघडली आणि मोठ्या मुश्किलीने ते संमेलनाच्या ठिकाणी पोहोचले. त्यांना ग्रंथदिंडीतही सहभागी होता आले नाही. अशा सगळ्या घटना घडल्या. त्यावरून काही शंकाकुशंकाही व्यक्त करण्यात आल्या. पण तरीही मराठीजणांनी फादर दिब्रिटो यांच्या मोठेपणावर विश्वासच ठेवला. असे असताना कोरोनाकाळात साहित्य संमेलनाचा अध्यक्ष या नात्याने हा मोठेपणा त्यांनी का व्यक्त केला नाही? फादर यांचे वय जास्त आहे. त्यामुळे कोरोना काळात त्यांना महाराष्ट्रभर दौरा करता येणे अवघड आहे, हे मान्य असले तरी त्यांना अनेक लोक जसे ऑनलाईन फेसबुक लाईव्ह, तसेच थेट टेलि कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लोकांशी आणि सरकारशी संपर्क साधता आला असता. आपल्या मौलिक सूचना देऊन सरकार आणि लोकांना मार्गदर्शन करता आले असते. पण तसे आजमितीस काही दिसून आले नाही. म्हणून अशा आपत्कालीन स्थितीत विचारावेसे वाटते, फादर तुम्ही कुठे आहात?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -