घरफिचर्समायमहानगर ब्लॉगसरकार गुन्हेगारांचे की सर्वसामान्यांचे?

सरकार गुन्हेगारांचे की सर्वसामान्यांचे?

Subscribe

कायद्याला घाबरून जगणार्‍या लक्षावधी लोकांच्या मनात अशा सातत्याने कायदा पायदळी तुडवणार्‍यांच्या हिमतीने भय निर्माण होते. त्याचा गुन्हेगार म्हणून दबदबा समाजात निर्माण होतो. हा दबदबा जितका मोठा, तितकी त्याची दादागिरी अधिक होत जाते. एका बाजूला अशा गुन्हेगाराचा वचक समाजात निर्माण होतो आणि दुसरीकडे त्याला शिक्षा देण्यासाठी सज्ज असलेल्या यंत्रणेला आपला अधिकार पोकळ वाटू लागतो. सहाजिकच कायदा व्यवस्था निकामी होत जाते. अशा निकामी व्यवस्थेचा जितका धाक सामान्य माणसाला असतो, त्यापेक्षा अधिक धाक कायदा मोडणार्‍याविषयी जनमानसात तयार होतो. त्याला कायदा काही करू शकत नाही.

“Good people do not need laws to tell them to act responsibly, while bad people will find a way around the laws.” – Plato (427-347 B.C.)

इसवीसनापूर्वी चार दशके प्लेटो नावाच्या विचारवंताने म्हणून ठेवलेले आहे की, चांगल्या लोकांना जबाबदारीने वागण्यासाठी कायदे बनवावे किंवा सांगावे लागत नाहीत. उलट वाईट लोकांना कायद्याचे भय नसते, कारण कायद्याला बगल देण्याचे मार्ग त्यांना नेहमीच ठाऊक असतात. प्लेटो या हजारो वर्षे जुन्या विचारवंताकडे कोणालाही आज ढुंकूनही बघावेसे वाटत नाही. तो काय सांगतोय हे समजून घेण्याची कोणाचीच इच्छा नाही. त्यामुळे कायदा आणि नियमांवरून सध्या देशभरात गदारोळ सुरू आहे. नव्या मोटार कायद्यानुसार रहदारीचे नियम मोडणार्‍यांवर अंकुश ठेवण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे. या कायद्यानुसार नियम मोडणार्‍या वाहनचालकांसाठी दंडाची रक्कम कितीतरी पटीने वाढवण्यात आली आहे. हा नवा कायदा करताना सरकारने आपला उद्देशही स्पष्ट केला आहे. दरवर्षी भारतात लाखो लोक रस्ता अपघातात मृत्युमुखी पडतात. वाहनचालकांनी मोडलेले नियम आणि कायदा एकतर त्याच्या जीवावर उलटतात किंवा ज्याची चूक नाही अशा निर्दोष व्यक्तीच्या मृत्यूला असे नियम कायदा मोडणारे कारणीभूत ठरत असतात. त्यामुळे वाहनचालकांना कायदा, नियमांचा धाक रहावा या हेतूने हा नवा मोटार कायदा अस्तित्वात आणण्यात आला आहे.

- Advertisement -

खरं म्हणजे कायदा, नियम पाळणार्‍यांना या वाढलेल्या दंडाचा धाक असण्याची गरज नाही. कारण ते अगोदरच कायदा आणि नियम पाळत आहेत. जे हे कायदा आणि नियम पाळत नाहीत, त्यांना कायद्याचा धाक असणे गरजेचंच आहे. त्यांना कायद्याचा धाक नसेल तर समाज स्वास्थच बिघडण्याची शक्यता असते. अशा नियम मोडणार्‍यांपुढे एखादे सरकार झुकत असेल तर ते सरकार नेमके कोणाचे? नियम आणि कायदा मोडणार्‍यांंचे की कायदा पाळणार्‍यांचे? मुंबईसह राज्यभरात वाहनचालक ज्या पद्धतीने गाडी चालवतात हे पाहून कोणाच्याही पोटात गोळा आल्याशिवाय राहणार नाही. सिग्नल असताना तो मोडून निघून जाणे, नो इंट्रीमध्ये बाईक घेऊन जाणे, ट्रिपल सीट बाईक चालवणे, पदपथावरून बाईक चालवणे, अशा गोष्टी मुंबईसारख्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत वाढल्या आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे बाईक, कार चालकांना ट्रॅफिक पोलिसांचा धाक राहिलेला नाही. आधीच मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये पोलिसांची संख्या कमी आहे. त्यामुळे प्रत्येक रस्त्यावर पोलीस असणे शक्य नाही. त्यातच ट्रॅफिक पोलिसांना पूर्वी असलेला जागेवर दंड करण्याचा अधिकारही हिरावून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता ट्रॅफिक पोलीस समोर असला तरी त्याच्या पुढ्यातून सिग्नल मोडून जाणारे वाहनचालक सर्रास दिसतात.

वाहनचालकांची ही मस्ती दिवसेंदिवस वाढत असताना पादचार्‍यांमध्ये त्यांची एक दहशत निर्माण झाली आहे. नियमानुसार सिग्नल असतानाही रस्ता ओलांडताना कुठून कसा बाईकवाला अथवा कारचालक येईल आणि ठोकर मारून निघून जाईल, याचा भरवसा राहिलेला नाही. पदपथावरून चालावे तर तेथेही हे बाईकस्वार अंगावर गाडी घेऊन येतात. हे का? ते चांगले, नियम-कायदा पाळणारे आहेत म्हणून? नाही त्यांना कायद्याचा, नियमांचा धाक नाही म्हणूनच ते अशा मस्तवाल स्थितीत जगत असून अनेकांसाठी साक्षात मृत्यूचे कारण ठरत आहेत. अशा लोकांच्या मनात कायद्याची दहशत निर्माण व्हायला नको का? की कायदा सर्वसामान्यांना दहशतीखाली ठेवण्यासाठी जन्माला घातला जातो?

- Advertisement -

माणूस समाजात वावरतो त्याला सर्व कायदे लागू होत असतात. त्यामुळेच अकस्मात त्याच्याकडून कायदा नियम मोडले गेल्यास, त्याला गुन्हा मानले जात असते. पण काही लोक असे असतात, जे सातत्याने कायदे नियम पायदळीच तुडवत असतात. किंबहूना कायदा राबवताना त्यांचे गुन्हे सिद्ध करण्याची कायद्याला फारच कटकट करावी लागत असते. अनेक सोपस्कार पार पाडावे लागत असतात. तेच तेच करताना कायदा यंत्रणेतील कर्मचार्‍यांनाही त्याचा कंटाळा येऊ लागतो. त्यामुळेच त्याच त्याच गुन्हेगाराला पकडून पुन्हा जामिनावर सुटताना बघून वा पुन्हा तसाच काही गुन्हा करताना बघून; कायद्याच्या अंमलदाराचाही कायद्याच्या धाकावरचा विश्वास डळमळीत व्हायला लागतो.

आज ट्रॅफिक पोलिसांचे तेच झाले आहे. कारण दंडाची रक्कम इतकी कमी आहे की ती सहज भरून कोणीही आपली सुटका करून घेऊ शकतो. इतकेच कशाला वाहनचालकाने अपघात करून एखाद्याचा बळी जरी घेतला तरी त्याला लगेचच जामीन मिळतो. अपघात करून मृत्यूस कारणीभूत झालेल्या वाहनचालकाला किमान जन्मठेपेची शिक्षा झालीय असे कुठे ऐकले आहे का? मग कायद्याचे भय निर्माण कसे होईल? दुसरीकडे कायद्याला घाबरून जगणार्‍या लक्षावधी लोकांच्या मनात अशा सातत्याने कायदा पायदळी तुडवणार्‍यांच्या हिमतीने भय निर्माण होते. त्याचा गुन्हेगार म्हणून दबदबा समाजात निर्माण होतो. हा दबदबा जितका मोठा, तितकी त्याची दादागिरी अधिक होत जाते. एका बाजूला अशा गुन्हेगाराचा वचक समाजात निर्माण होतो आणि दुसरीकडे त्याला शिक्षा देण्यासाठी सज्ज असलेल्या यंत्रणेला आपला अधिकार पोकळ वाटू लागतो. साहजिकच कायदा व्यवस्था निकामी होत जाते. अशा निकामी व्यवस्थेचा जितका धाक सामान्य माणसाला असतो, त्यापेक्षा अधिक धाक कायदा मोडणार्‍याविषयी जनमानसात तयार होतो. त्याला कायदा काही करू शकत नाही, हा धाक कायद्यापेक्षाही मोठा असतो.

कोणताही कायदा वा नियम निर्माण करण्याचा हेतू कुणावरही अन्याय होऊ नये किंवा दुर्बलाला धटींगणांनी त्रास देऊ नये, असाच असतो. अन्य कोणी वरचढ असणे किंवा सबळ असणे, इतक्या पुंजीवर समाजातील अन्य कोणाला पिडा वा अन्यायाचा बळी पडायची वेळ येऊ नये, असा कायदा वा नियमाचा मुख्य हेतू असेल, तर त्याच व्यवस्थेचा लाभ उठवून अन्याय वा त्रास कसा होऊ शकतो? त्यामुळे केंद्राने केलेल्या नव्या मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी राज्यात न करून गुन्हेगारांना प्रोत्साहन देणारे राज्य सरकार गुन्हेगार नाही का? कायदा, नियम पाळणार्‍यांना नव्या मोटार वाहन कायद्याचा धाक असण्याची गरजच नाही. आज या कायदाविरोधात जे बोलत आहेत, त्यांना नियम, कायदे मोडण्याची परवानगी हवी आहे. त्यांच्यासाठी राज्य सरकार झटत असेल तर हे सरकार सर्वसामान्यांचे मानता येणार नाही. सरकारचे काम हे सर्वसामान्यांचे जगणे सुसह्य करण्याचे आहे. मात्र, सर्वसामान्यांचे जगणे असह्य करणार्‍यांना सरकार साथ देत असेल तर या सरकारला काय म्हणायचे? कायदा मोडू इच्छिणार्‍यांच्या दबावापुढे सरकार झुकत असेल तर या सरकारच्या मागे सर्वसामान्यांनी का उभे रहायचे? प्लेटो म्हणतो तसे जो कायदा मोडत नाही त्याला नियमांचा, कायद्याचा धाक नसतो. कायदे, नियम कितीही कडक केले तरी त्यांना त्याची चिंता नसते. मात्र, ज्यांना नियम, कायदा मोडायचेच असतात ते कसेही या नियमांना बगल देतात. त्यांच्यात धाक निर्माण करणे हा सरकारचा मुख्य हेतू असायला हवा, पण त्याकडेच दुर्लक्ष केले जात आहे.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -