घरफिचर्समायमहानगर ब्लॉगभारतीय लशींचा जागतिक वरचष्मा !

भारतीय लशींचा जागतिक वरचष्मा !

Subscribe

जगभऱातील देश सध्या भारतावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. भारतासारख्या विकसनशील देशाने एका वर्षातच कोरोनावर प्रभावी ठरणार्‍या कोविशिल्ड आणि कोवॅस्किन या दोन लशी विकसित कराव्या आणि त्या मिळवण्यासाठी अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाने भारतापुढे हात पसरावेत हे तसं पचनी पडण्यासारखं नाही. पण तसं झालंय हे खरं आहे. यामुळेच आम्हा भारतीयांची मानही जगभऱात नक्कीच उंचावली आहे. कोरोनाला जन्म घालून जगाची भंबेरी उडवून देणार्‍या चीनकडून त्यांनी विकसित केलेली लस घ्यायला कुणी तयार नाही, त्यामुळे चीनचा जळफळाट सुरू झालेला आहे.

सध्या 72 देशांना भारताकडून कोविड लशींचा पुरवठा होत आहे. त्यातही शेजारील देशांना भारत भेटस्वरुपात कोरोना लसींचा पुरवठा करत आहे. यात, बांग्लादेश, भूतान, मालदिव आणि नेपाळचाही समावेश आहे. यात डॉमनिकन रिपब्लिकचाही समावेश झाला आहे. या देशाचे पंतप्रधान रूझवेल्ट स्कैरिट यांनी कोरोना लसीचे 70 हजार डोस मदत म्हणून पाठवावेत असे विनंती पत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलं आहे. यामुळे भारत या देशालाही लस पुरवठा कसा करता येईल यावर विचार करत आहे. एकीकडे आपल्या देशातही लसीकरणास सुरुवात झाली आहे.

लशीकरणाच्या पहिल्या दिवशी भारतात एकूण 2,07,229 कोरोना योद्ध्यांना लस देण्यात आली. दिवसभरात सर्वाधिक लोकांना लस दिल्याचा हा जागतिक विक्रम ठरला आहे. यात अमेरिका, इंग्लड आणि फ्रान्स या आघाडीच्या देशांनाही भारतानं मागे टाकलं आहे. यामुळे अनेक देशांच्या नजरा भारताची लस आपल्यापर्यंत केव्हा पोहचेल याकडे लागल्या आहेत. पण एकीकडे दुसरे देश भारताच्या कोवॅक्सिन आणि कोविशिल्डवर एवढा विश्वास ठेवून असतानाच आपल्या देशात मात्र या लसींबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोवॅक्सिन नको तर कोविशिल्डवर डॉक्टरांनीच अधिक विश्वास व्यक्त केल्याने सामान्य नागरिक मात्र लस घ्यावी की घेऊ नये या विवंचनेत पडले आहेत. त्यातच लसीकरणाची सुरूवात होण्याआधी कोविशिल्डची निर्मिती करणार्‍या सिरम आणि कोवॅक्सिनची निर्मिती करणार्‍या भारत बायोटेकमध्ये लशींच्या योग्यतेवरून रंगलेला वादही जनतेच्या लक्षात आहे. नंतर पंतप्रधानांनी कानपिचक्या दिल्यानंतर दोन्ही कंपन्यांनी आपसात हा वाद मिटवला असला तरी त्यामुळे जनता मात्र त्यांच्या लशींना धास्तावली आहे. यामुळे जगभरात भारताच्या लशीला मागणी होत असताना देशात मात्र लस घ्यायला कोणी पुढे येईना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisement -

याच पार्श्वभूमीवर सध्या राज्याराज्यात नागरिकांना लस सहज उपलब्ध व्हावी व लशीबद्दल त्यांच्या मनात असलेल्या शंकाकुशंका दूर व्हाव्यात यासाठी उपाययोजनाही करण्यात येत आहेत. एकंदर पाहता देशात लस आहे पण ती घेण्यासाठी माणंसच नाहीत अशीच आजची परिस्थिती आहे. यास कारणही तसंच आहे. सीरमच्या कोविशिल्डने लसीकरण चाचणीचे सर्व टप्पे पार केले असून त्यात त्यांना लस कोरोनाला प्रतिबंध करू शकत असल्याचे निदर्शनास आले आहे. तर कोवॅक्सिनने चाचण्या कमी केल्याचं काहींचं म्हणंण आहे. यामुळेच या लशीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तशातच ज्यांनी लस घेण्यासाठी कोविन अ‍ॅप घेतले आहे. त्यांनाच ही लस देण्यात येणार आहे. पण देशातील साक्षरतेचे प्रमाण पाहता या अ‍ॅपबद्दल कितीजणांना ज्ञान अवगत असेल हा प्रश्नच आहे. तशातच काहीजणांना लस घेतल्यानंतर त्रास झाल्याचेही समोर आले आहे. तसेच जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील कोरोनामृतांचा आकडा कमी असून दिवसेंदिवसे कोरोनामुक्तांचे प्रमाणही वाढत आहे. यामुळे कोरोनासारख्या आजाराशी लस न घेताही लढता येऊ शकते असा विचार नागरिक करत आहेत. हे देखील देशवासीयांचे लस घेण्यास अनुत्सुक असण्याचे कारण आहे.

लशीबद्दल भीती व साशंकता फक्त आपल्याच देशातील नागरिकांमध्ये नाही तर अनेक देशांमध्येही स्वदेशी लस घेतल्यानंतर वेगळंच आगळीक घडते आहे. डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात तर कोरोनाची लस घेतलेले 216 रुग्ण एड्स पॉझिटिव्ह झाल्याची धक्कादायक घटना घडली. ज्या 216 लोकांना लस दिली गेली. त्यांच्यात एड्सची लक्षणं विकसित झाली. नंतर त्यातील काहींची रक्ताची तपासणी करण्यात आली. त्यात त्यांच्यात एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले. यामुळे तूर्तास ऑस्ट्रेलियाने नागरिकांना सबुरीचा सल्ला दिला असून पुन्हा एकदा लशींच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. इंग्लंडमध्येही लस दिल्यानंतर नागरिकांना त्रास झाल्याचे समोर आले. तर नॉर्वेमध्येही फायझरची लस घेतल्यानंतर 23 जणांचा मृत्यू झाला आहे. पण त्या तुलनेत भारताची लस सुरक्षित असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तशातच आपल्याच देशात कोरोना रुग्ण असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतर देशांना कोरोना लस देण्यास सुरुवात केल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोदी यांची छबी अधिकच उजळली असून त्यांनी दाखवलेल्या औदर्याचे जगभरात कौतुक होत आहे.

- Advertisement -

मात्र याचदरम्यान कोविड-19 लस घेतलेल्या लोकांपासून इतरांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असा खळबळजनक दावा इंग्लंडच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी केला आहे. लशीमुळे कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिकारशक्ती निर्माण होते. पण त्यासाठी किमान 3 आठवडे लागतात. यामुळे यादरम्यान लस घेतलेल्या व्यक्तीपासून इतरांना लागण होऊ शकते. असेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे भारतच नाही तर अनेक देशांच्या लशींभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे लस निर्मितीत भारताने बाजी मारल्याने चीनचा तीळपापड झाला आहे. भारताआधीच चीननेही कोरोना लस तयार केली असली तरी चीनकडून लस घेण्यास इतर देश उत्सुक नसल्याने चीनची गोची झाली आहे. पाकिस्तानलाही चीन चढ्या दराने कोरोना लस देण्याच्या तयारीत असल्याने खायचे वांधे असलेलं पाकिस्तान मूग गिळून गप्प आहे. इतर देशांप्रमाणे भारताकडून जर पाकिस्तानने लस मागितली तर चीन नाराज होईल ही भीती पाकिस्तानला आहे. तसेच लस निर्मिती करणे पाकिस्तानला शक्य नसल्याने पाकिस्तानसाठी इकडे आड तर तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे.

तर चीनने भारताच्या याच लसीकरणावर राग काढण्यास सुरुवात केली आहे. लडाख, सिक्कीम येथील सीमारेषेवरून घुसखोरी करणं, भारतीय सैनिकांना चिथावणं चीनी सैनिक करत आहेत. चीनची ही कुरघोडी संपूर्ण जग बघत असून लशीमुळे भारत आता जगाचा लाडका देश ठरला आहे. मोदी सरकारने कोविड लस आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून दिल्याने इतर देशांबरोबर भारताचे संबंध अधिक दृढ झाले आहे. येत्या काही काळात कोरोना लशींच्या निर्यातीतून भारताला आर्थिक बळ प्राप्त होईल हे निश्चित आहे. यामुळे जगाला चढ्या दराने लस विकून कोरोना काळात झालेले आर्थिक नुकसान भरुन काढण्याचा चीनचा डाव फसला आहे. कोरोनाला जन्माला घालून संपूर्ण जगालाच कोरानाच्या संकटात टाकणार्‍या चीनबरोबर अनेक देशांनी आर्थिक संबंध तोडले आहेत. यामुळे लस निर्मिती करून दूर गेलेल्या देशांना जवळ आणण्याचा चीनचा डाव फसला आहे. तर भारत मात्र जगाच्या गळ्यातला ताईत बनला आहे.

दरम्यान, सध्या जरी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भारताच्या लशीकरण मोहिमेवरून मोदींची तारीफ करत असले तरी येणार्‍या काळात भारत अमेरिकेलाही टक्कर देऊ शकतो याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेला त्यांच्याहून दुसरे कोणी श्रेष्ठ राष्ट्र असावे असे अजिबात अपेक्षित नाही. यातूनच चीनबरोबरचा त्यांचा वादही जुना आहे. पण आता भारताने कोरोनाकाळात लस निर्मिती व त्याचा जगभरात पुरवठा करून अमेरिकेचेही कान टोचले आहेत. अमेरिकन लस महाग असल्याने कोणेतही राष्ट्र ती घेण्यास धजावत नाही. पण भारताने याच संधीचे सोने केले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर बिगुल फुंकले आहे. यामुळे फक्त कोवॅक्सिन की कोविशिल्ड असे न करता त्यामागची गणितही सामान्यांनी समजून घ्यायला हवीत. आपल्या देशातील लस ही आपल्यासाठी आहे आपल्या सुरक्षिततेसाठी आहे. त्याला घाबरण्याचे कारण नाही. जी लस घेण्यास जगभरातील देश प्रतीक्षा यादीत आहेत. तिथे ही स्वदेशी लस घेण्याची धास्ती न बाळगता ती घ्यायला हवी. देशातीलच नाही तर जगातीलही संशोधकांचे मनोबल यामुळेच वाढेल आणि कोरोना पळेल.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -