घरफिचर्समायमहानगर ब्लॉगमुंबईकर नावाचं मशीन आणि माणूस

मुंबईकर नावाचं मशीन आणि माणूस

Subscribe

पावसात खोळंबा होणं, वाहतूक कोंडीत अडकणंं, सखल भागातल्या घरात पाणी शिरणं आणि या घटनाही मुंबईकरांचं रोजचं जगणं झालं आहे. या अशा जगण्यातली हतबलताही जगण्याचा भाग बनली आहे. या हतबलतेचं स्पिरीटच्या नावाखाली कौतुक करण्याचं मुंबईकरांनी आता बंद केलंय. पावसात तुंबलेल्या पाण्यातून लोक एकमेकांच्या आधाराने मानवी साखळी करून आपापलं घर गाठतात. या वेळी मुंबईकरांना आधार असतो तो त्याच्यासारख्याच सामान्य मुंबईकराचा. लोकल ट्रेनमध्ये पायावर पाय पडल्यावर आपसूक तोंडात शिवी येणारा मुंबईकर अशा संकटाच्या वेळी अपार करुणेने भरलेला असतो.

मुंबई परवा पुन्हा पाण्याखाली गेली. महापालिका, सरकारी यंत्रणांनी पुन्हा पाऊस आला मोठ्ठा म्हणत आपली जबाबदारी पावसाच्या ढगांवर ढकलली. कमी वेळेत किंवा तासाभरात कसा महिनाभराचा पाऊस झाला, याची आकडेवारी दिली जाऊ लागली, पण हा पाऊस आजच झालेला नाही. यंदा उशिराने दाखल झालेल्या पावसाने मुंबई तिसर्‍यांदा तुंबवली आहे. बुधवारीही मुंबईतल्या सोसायट्यांमध्ये पाणी साचल्यानंतर मुंबईवर दाटलेल्या काळ्या ढगांनी दीड दशकांपूर्वीच्या २६ जुलैच्या पुन्हा या काळ्याकुट्ट आठवणी जाग्या केल्या. त्या जीवघेण्या पावसानंतर मुंबईतूनही मिठी नावाची नदी वाहते याचा साक्षात्कार आपल्याला झाला. तोपर्यंत या नदीचा नालाच होता. नदीचा नाला होईपर्यंत आपण आणि आपल्या सरकारी यंत्रणा ढिम्म होत्या.

मुंबईतील कुर्ला, बैलबाजार परिसरात बुधवारी बेस्ट बसेसच्या खिडक्यांपर्यंत पाणी आले होते. येथील बैठ्या घरांची वाताहत झाली. शीव, कुर्ला, ठाणे स्टेशन नेहमीप्रमाणे पाण्याखाली गेले होते. हिंदमाता, मिलन सबवे, माटुंगा, दादर भागात नेहमीप्रमाणे पाणी साचले. याबाबतच्या हेडलाईन्स छोट्या पडद्यावर दिसू लागल्या. लोकल सेवेचा बोजवारा उडाला. नेहमीप्रमाणे लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द झाल्या. सामान्य मुंबईकर अडकून पडला, पण हे अडकणं, बुडणं, तुंबणं आता नित्याचंच आहे. मुंबईकरांनी या शहर बुडण्याशी कधीचाच समझोता केला आहे. २६ जुलै २००५ साली मुंबई बुडाल्यावर सत्ताधार्‍यांनी आणि पालिकेने मुंबई पुन्हा तुंबणार नाही? यासाठी काही उपाययोजना आखल्या होत्या. त्यासाठी निधी आणि इतर गोष्टींची तातडीने तजवीज करण्यात आली. या उपाययोजनांचे काय झाले? हा प्रश्न त्यानंतरही कायम आहे. मुंबईला या बेपर्वाची आता सवय झाली आहे. मुंबईकर कायम हतबल असतो. ज्या वेळी परिस्थिती दुरुस्त होण्याच्या पलीकडे बिघडते तेव्हा ती हतबलताच बनते. अशा हतबलतेवर माणूस एक तर भेसूर हसतो किंवा त्याचं अतिव दुःख करतो. मुंबईकरांनी त्याला स्पिरीटचं नाव देऊन यातून आपली पाठ कधीचीच सोडवून घेतली आहे, पण ही हतबलता मुंबईकरांच्या खांद्यावरून कधीच उतरलेली नव्हती.

- Advertisement -

रोजच्या गरजा, बदलत्या आर्थिक जगातील आलेले कमालीचे अस्थैर्य, नोकरी जपण्याची गरज, मुंबईने मुंबईबाहेर ढकलून दिल्यावर वसई, विरार, कसारा, कर्जतकडे नाईलाज म्हणून फेकला गेलेला नोकरदार, कामगार वर्गच खर्‍या अर्थाने मुंबईचे चाक चालवणारा आहे. गिरणीची चाकं फिरायची बंद झाल्यावर आणि भोंगे थंडावल्यानंतर मुंबई आणि मुंबईकर दोन्हीही थंड पडत गेले. संयुक्त महाराष्ट्र आणि मुंबईचा लढा लढणारा सामान्य मुंबईकर स्वकियांच्या तहात पराभूत झाला. मुंबई त्याने नकाशावर मिळवली खरी, पण लोकलच्या तिसर्‍या सीट पलीकडे त्याच्या पदरात फारसं काही पडलंच नाही. ही हतबलता सोबत पूर्ण जोर लावून सामान्य मुंबईकर पावसात अडकलेली मुंबई पूर्ण जोर लावून बाहेर खेचून काढतो. ज्या उंचच उंच इमारतींना जागा देण्यासाठी मुंबईचा भूगोल बदलण्यात आला, त्या पैकी कोणत्या इमारतीत किती जागा सामान्य मुंबईकरांना मिळाली, हा प्रश्न आहे. कोट्यवधींच्या घरात गेलेल्या घरांमध्ये राहण्यासाठी आणि हे सुपर हायक्लास लाईफस्टाईल जगण्यासाठी आवश्यक असलेलं आर्थिक पाठबळ इथल्या सामान्य मुंबईकरांनी मिळवलंय की गमावलंय? सामान्य मुंबईकरांच्या श्रमावर कमावलेलं हे पाठबळ इथले नेते, राजकीय पक्ष आणि राजकारण्यांमुळे मुंबईकर कायमच गमावत राहिला, कधी बॉम्बस्फोटात तर कधी पावसाळ्यातल्या खुल्या मेनहोलमध्ये…कालच्या पावसातही तेच झालं. मुंबई तुंबली, पण आता ही तुंबलेली मुंबई सामान्य मुंबईकरांची राहिलेली नाही. सरकारी यंत्रणांना याबाबत जाब विचारायचं मुंबईने बंद केलंय.

कोलमडणार्‍या लोकल कोंडवाड्याशी मुंबईकरांनी अलिखित समझोता करून ठेवला आहे. लोकल वाढत नाही, नव्या लाईनचे काम पुढे सरकत नाही, अशी स्थिती असताना बुलेट ट्रेन आणि मेट्रो, मोनो सुरू करून सामान्य चाकरमानी असलेल्या मुंबईकराने काय मिळवलं. हा प्रश्न आहेच. मुंबई याआधीही तुंबली होती. दरवर्षी पावसाळ्यात ती तुंबतेच. ऋतुचक्र एक महिन्याने पुढे सरकल्याचा हा धोका समजून घ्यायला हवा. मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी मध्य रेल्वेची लोकलसेवा पश्चिम रेल्वेच्या तुलनेत कायमच कोलमडलेली असते. २० ते २५ मिनिटांनी उशिरा येणारी लोकल हा आता बातमीचा विषय राहिलेला नाही. हा लेटमार्क रोजच्या जगण्याचा भाग झालेला आहे. पावसात खोळंबा होणं, वाहतूक कोंडीत अडकणंं, सखल भागातल्या घरात पाणी शिरणं आणि या घटनाही मुंबईकरांचं रोजचं जगणं झालं आहे. या अशा जगण्यातली हतबलताही जगण्याचा भाग बनली आहे. या हतबलतेचं स्पिरीटच्या नावाखाली कौतूक करण्याचं मुंबईकरांनी आता बंद केलंय. पावसात तुंबलेल्या पाण्यातून लोक एकमेकांच्या आधाराने मानवी साखळी करून आपापलं घर गाठतात. या वेळी मुंबईकरांना आधार असतो तो त्याच्यासारख्याच समान्य मुंबईकराचा.

- Advertisement -

लोकलट्रेनमध्ये पायावर पाय पडल्यावर आपसूक तोंडात शिवी येणारा मुंबईकर अशा संकटाच्या वेळी अपार करुणेने भरलेला असतो. ही करुणा त्याच्या सवयीचा भाग झालेली असते. मुंबईला विळख्यात घेतलेल्या भांडवलदारांच्या कंपन्यांतील बायोमेट्रिक मशीनला या हतबलतेशी काहीही देणे घेणे नसते. मासिक खर्चाची आकडेवारी, वेळ, तारखांच्या शिस्तीत जगणारा मुंबईकर स्वतःच मशीन झालेला असतो. मात्र, आपत्काळात या मुंबईकर नावाच्या मशीनरूपी देहात लपलेला माणूस केवळ माणसाच्या मदतीसाठी बाहेर पडतो. कारण मदत देणारा आणि मदत घेणार्‍यांनाही परस्परांशिवाय कोणीच विश्वासाचे नसते. सरकारी यंत्रणांवरील विश्वास पावसाच्या पाण्यात खुल्या केलेल्या मेनहोलमधून कधीचाच वाहून गेलेला असतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -