घरफिचर्समायमहानगर ब्लॉगरात्र वैर्‍याची, हाक ऐका उद्याची!

रात्र वैर्‍याची, हाक ऐका उद्याची!

Subscribe

यंदा पावसाने जाता जाता जो काही महाराष्ट्राला दणका दिला तो भयंकर आहे. कोरोनाच्या महाभयंकर संकटाशी दोन हात करताना आधीच सामान्य माणसे मेटाकुटीला आलीत. हाताला नोकरी नाही, नोकरी आहे, पण कधी जाईल याची खात्री नाही. असली तर हातात निम्मा पगार. मुलाबाळांची शिक्षणे, वाढता खर्च आणि गगनाला भिडणारी महागाई अशा विपरीत परिस्थितीत गड्या अपुला गाव बरा करत शेती हीच शाश्वत वाटत असताना बेभरवशाच्या हवामानामुळे माणसाच्या जीवनाचे रहाटगाडे उलटेपुलटे करून टाकले आहे. हातातोंडाशी आलेली पिके डोळ्यादेखत पाण्यात गेलीत आणि बळीराजा विचारतोय, ‘सांगा राजे आम्ही जगायचे कसे’. पंचनामे होतील, तुटपुंजी मदत मिळेल, पण यावर तो अंतिम तोडगा असू शकत नाही. आपली बहुतांश शेती-बागायती त्या-त्या हवामानामध्ये उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसुविधांवर अवलंबून आहे.

आपली पिके ही खरीप, रब्बी व उन्हाळी पिकांच्या चौकटीत बसलेली आहेत. आणि या चौकटीतला बदल शेतकर्‍याला संकटात टाकतो आणि ही खरी ग्यानबाची मेख आहे. गेल्या दशकामधील पावसाळा, हिवाळा व उन्हाळ्याच्या तर्‍हेचा आलेख बघितला तर अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, अवकाळी गरमी व थंडी यांचे प्रमाण वाढते आहे. संशोधकांनी भले ते अल् निनो किंवा अल् निना किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे होत असल्याचे सांगो, पण शेतकरी मात्र त्यामध्ये चिरडला जात आहे. या परिस्थितीमुळे ‘शेतीतून समृद्धी’ ही त्याच्यासाठी फार दूरची गोष्ट आहे. पण निरुपाय म्हणून तो त्याच व्यवसायात राहतो. त्याला सहसा वाटत नाही की, त्याच्या मुलांनी पण तसेच राहावे. डॉक्टरचा मुलगा डॉक्टरी शिकेल, वकिलाचा मुलगा वकिली पेशा पत्करेल; पण शेतकर्‍याचा मुलगा क्वचित अशाश्वत शेतीच्या व्यवसायात लक्ष देईल. म्हणूनच सध्याच्या परिस्थितीत बदलत्या हवामानाला सामोरे जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था तयार करणे फार गरजेचे आहे.

- Advertisement -

वाढते प्रदूषण तसेच अन्य कारणांनी हवामान बदलाचे मोठे संकट उभे राहिले आहे. या बदलाचे अनेक क्षेत्रांवर होत असलेले दुष्परिणाम समोर येत आहेत. त्यातील कृषीक्षेत्रावरील दुष्परिणाम हा गांभीर्याने विचार करण्याजोगा मुद्दा आहे. त्यामुळे या संकटाचा सामना करण्यासाठी आतापासूनच उपाय योजायला हवेत. त्यादृष्टीने बदलत्या हवामानात तग धरणार्‍या आणि अधिक उत्पादन देणार्‍या वाणांच्या निर्मितीवर भर द्यायला हवा. वाढत्या प्रदूषणाचे पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम दिसू लागले आहेत. त्यातून हवामानातही कमालीचे बदल घडत आहेत आणि ही परिस्थिती शेती, कृषी उद्योग आणि इतर उद्योगधंदे यांच्यासाठी अतिशय बाधक ठरणारी आहे. तसेच ही परिस्थिती कीड-रोग यांच्या उत्पत्तीला अनुकूलसुद्धा आहे.

सृष्टीच्या हवामानात वेगवेगळे घटक असतात, त्यातील कमी-जास्तपणा म्हणजेच हवामान बदल होय. परंतु अशा बदलांमागील कारणे, त्याचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाय यावर संशोधन करणे आणि त्यानुसार पावले उचलणे ही सध्याच्या काळाची प्रमुख गरज बनली आहे. खरे तर हवामानबदल ही ताबडतोब घडणारी किंवा परिणाम दाखवणारी बाब नाही. ती सातत्याने बदलणारी गोष्ट आहे. मानवाने स्वत:च्या विकासासाठी नैसर्गिक बाबींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. थोडक्यात निसर्गचक्रात ढवळाढवळ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला तेव्हापासूनच हवामान बदलाच्या संकटाचे बिगुल वाजले, असे म्हणावयास हरकत नाही. त्याचे परिणाम आता कुठे दिसू लागले आहेत. त्यामुळे आता तरी हवामान बदल कशामुळे होतो, त्यावर नियंत्रण कसे मिळवता येईल आणि झालेल्या दुष्परिणामांचा सामना कसा करायचा, यावर गंभीरपणे विचार करावा लागत आहे.

- Advertisement -

हवामान बदलाच्या दुष्परिणामांपासून पशुपक्षीसुद्धा सुटले नाहीत. काही भागात 45 अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमान वाढल्याने गाभण जनावरांचा गर्भपात झाल्याचे दिसून आले आहे. तसेच जनावरांच्या हृदयाचे ठोके वाढणे, श्वासोच्छवासाचा वेग वाढणे, भूक मंदावणे, जनावरांची हालचाल मंदावणे, प्रजोत्पादनात 20 ते 25 टक्के घट होणे असे परिणाम दिसण्यास सुरूवात झाली आहे. तसेच शेळ्या-मेंढ्यामंध्ये लोकर गळणे आणि कोंबड्यांचा मृत्यूदर वाढणे अशा परिणामांनाही सुरूवात झाली आहे. या बदलामुळे रोग आणि कीड निर्मितीस पोषक ठरेल अशी परिस्थिती निर्माण होते. वनस्पतींच्या पृष्ठभागावरील प्रकाशाची तीव्रता, तापमान, आर्द्रता असे घटक वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकत्रित परिणाम दाखवत नाहीत. उदा. खरिपातील तूर, एरंडी पिकांची वाढ खूप वाढली आणि शेंगा तसेच बोंडे कमी लागली. काही ठिकाणी रब्बी ज्वारीतील पानातील हरितद्रव्य नाहीसे होऊन पाने लाल-पिवळी पडून वाळत चालली आहेत. त्यामुळे ज्वारीचा उतारा कमी आला. फळपिकांमध्ये फूलगळ आणि फळगळीचे प्रमाण असाधारणरित्या वाढले. आतापर्यंत बर्‍यापैकी नियंत्रण मिळवले गेलेले किरकोळ नुकसान करणार्‍या वर्गात मोडणारे कीड आणि रोग आता भरपूर प्रमाणात नुकसान करत आहेत. तसेच नियंत्रण करणार्‍या औषधांनासुद्धा ते दाद देत नाहीत. फळांचा राजा आंबा बदलत्या हवामानात इतका बेभरवशाचा झालाय की आता महागड्या औषधांना तो दाद देत नाही. यामुळे कोकणातील शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे.

अशा परिस्थितीत नेहमीच्या संशोधन पद्धतीत बदल करून हवामानातील बदल आणि पाणी उपलब्धतेनुसार पीक उत्पादनाचे तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासोबत कमी, मध्यम तसेच जास्त कालावधीच्या हवामान अंदाजाची अचुकता आणि व्याप्ती वाढवणे, हवामान बदलासंदर्भात शेतकर्‍यांमध्ये जागृती निर्माण करणे, जैवतंत्राचा उपयोग करून हवामान बदलाला सहन करू शकतील असे वाण निर्माण करणे, बदलत्या हवामानाला तोंड देणारे वाण विकसित करणे अशा उपयायोजना करायला हव्यात.

प्रत्येक शेतकर्‍याची व्यवस्थापनाची पद्धत किंवा त्याच्या जमिनीची ठेवण वेगवेगळी असते. त्यामुळे शेतमालकाचे त्या परिस्थितीमधले निर्णय त्याने घ्यायचे असतात. निसर्ग बदलतो आहे म्हणून त्रागा करण्यापेक्षा आपण निसर्गाच्या बदलाला कसे सामोरे जातो हे महत्त्वाचे असते आणि आपण त्यानुसार निर्णय घ्यावे लागतात. हवामानात बदल होतच राहणार. आपण पण त्याच्या बरोबरीने नवीन पद्धती वापरून आपली शेती-बागायती चालू ठेवली पाहिजे. निसर्गाची अशी अवकृपा गेल्या 100 वर्षात पाहिली नाही, असे जगातिक हवामान अभ्यासक सांगत आहेत. केरळमध्ये गेल्या वर्षी पाऊस पडला तो असाच होता आणि त्याने होत्याचे नव्हते करून टाकले. भीषण संकटामागे निसर्गाचा प्रकोप जरी असला तरी तो होण्यासाठी मानवाची प्रचंड लालसा हेही महत्त्वाचे कारण आहे. निसर्गाची वारेमाप लूट करण्याच्या मानवी लालसेला आवर घातला नाही तर भविष्यात महाराष्ट्रावरही असे भीषण संकट ओढवू शकते, असा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. राक्षसी वेगाने होत असलेले शहरीकरण, त्या अट्टहासामुळे होणारी बेसुमार जंगलतोड, अधिकाधिक पैसा कमावण्याच्या लालसेपोटी विकासकांकडून केले जाणारे अनिर्बंध खोदकाम आणि धरणांच्या देखभालीकडे स्थानिक प्रशासनाकडून होणारी अक्षम्य डोळेझाक आदी कारणांमुळे महाराष्ट्रावरही भविष्यात अशी भीषण परिस्थिती ओढवू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रात छोटी-मोठी मिळून एकूण 3 हजार 264 धरणे आहेत. या धरणांची देखभाल योग्यरीत्या होत नाही. धरणांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. पूर नियंत्रण रेषेचेही भान बिल्डर आणि विकासक ठेवत नाहीत. या पूर नियंत्रण रेषेच्या आत जर बांधकामे झाली, तर त्यामुळे भविष्यात जर अतिवृष्टी झाली तर परिस्थिती अत्यंत गंभीर बनू शकेल. मुंबई, ठाणे आणि नांदेड यांसारख्या वेगाने बांधकामे होत असलेल्या शहरांना हा धोका अधिक आहे, असे तज्ज्ञ सांगतात. या 3 हजार 264 धरणांपैकी एकट्या कोयना धरणाचा अपवाद वगळल्यास अन्य कोणत्याही धरणाला ‘कॅरी ओव्हर’ची सुविधा नाही. धरण पूर्ण भरल्यानंतरही जर पाऊस पडत असेल तर धरणातील अतिरिक्त पाणीसाठा वळता करण्याची व्यवस्था म्हणजेच ‘कॅरी ओव्हर फॅसिलिटी’ होय. अशी सुविधा फक्त कोयना धरणाला आहे. एकूणच बदलत्या हवामानाचा विचार करता राज्यात असो किंवा देशात आज रात्र वैर्‍याची, हाक ऐका उद्याची अशी परिस्थिती समोर उभी राहिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -