Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग अपयशाला कोणी धनी नसतो!

अपयशाला कोणी धनी नसतो!

Related Story

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. नीचांकी धावसंख्येने गमावलेल्या या कसोटीमुळे भारतीय संघावर चोफेर टीका होत असून आता तर प्रतिस्पर्धी कांगारू उरलेल्या तीन कसोटी सामन्यात भारत पराभूत होऊन त्यांना व्हाईटवॉश कसा मिळेल, या पुड्या सोडण्यात मश्गुल आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2018 ला कांगारूंना खडे चारले होते. ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायभूमीत प्रथमच गारद करण्याचा पराक्रम कोहलीच्या संघाने केला होता. या पराभवाचे शल्य कांगारूंना टोचत होते. त्याची भरपाई करण्यासाठी ते उत्सुक असताना गुलाबी चेंडूने त्यांना हात दिला. हा हात होता त्यांच्या तीन जलदगती गोलंदाजांचा. स्टार्क, कमिन्स आणि हेझलहूडचा.अचूक टप्पा, वेग आणि स्विंग याचा अप्रतिम मिलाफ करत त्यांनी भारताला 36 धावांत गुंडाळले. पानिपत या एकाच शब्दात या पराभवाचे वर्णन करता येईल. सौरव गांगुली कर्णधार होण्याआधी भारतीय संघ परदेशात कायम पराभूत होऊन यायचा. मात्र दादाने परदेशात भारताची मान उंचावली.

गांगुलीने रचलेल्या पायावर आधी धोनी आणि नंतर कोहलीने कळस चढवताना ‘घर में शेर, परदेश में ढेर’ ही भारताची प्रतिमा बदलली. विशेष म्हणजे कसोटी मालिकेचे विजेतेपद आणि कसोटी रँकिंगमध्ये अव्वल क्रमांक अशी भव्य कामगिरी केल्यानंतर भारतीय संघावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. कोहलीच्या आक्रमतेचे गुणगान गायले गेले. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडसारख्या आक्रमक प्रतिस्पर्ध्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणारा विराटसारखा कर्णधार भारताला मिळाल्याने आज भारत सकारात्मक दृष्टीकोन ठेऊनच मैदानात उतरताना दिसत आहे. मुख्य म्हणजे त्याचे निकालही भारताच्या बाजूने लागताना दिसत आहेत. या कसोटीपूर्वीही भारताचे पारडे जाड होते आणि पहिल्या डावात आघाडी घेऊन ते सिद्धही झाले. पण, तिसर्‍या दिवशी सकाळी कांगारूंचा जलदगती मारा अपेक्षेपेक्षा प्रभावी ठरला आणि भारताचे होत्याचे नव्हते झाले. एखादा संघ वरच्या स्थानी असताना अचानक तो गडगडला म्हणून त्याचे महत्व कमी होत नाही. पण, अपयशाला कोणी धनी नसतो. हे मोठे दुःख निमूट सहन करत पुढे जावे लागते. पराभवाच्या अंध:कारातून यशाचा मार्ग शोधावा लागतो आणि तेच कोहलीच्या अनुपस्थितीत आता अजिंक्य रहाणेला करावे लागणार आहे.

- Advertisement -

म्हणूनच पराभवानंतर भारताचा महान कसोटीपटू आणि समीक्षक सुनील गावस्करने केलेले विश्लेषण पाहणे योग्य ठरेल. भारताच्या फलंदाजांवर टीका करण्यापेक्षा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे कौतुक करणे योग्य ठरेल. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताच्या दुसर्‍या डावात ज्याप्रकारे गोलंदाजी केली ते पाहता, दुसरा एखादा संघही 36 धावांवर नाही, पण 80-90 धावांवर गारद झाला असता. जॉश हेझलवूड आणि पॅट कमिन्सने फारच उत्कृष्ट गोलंदाजी केली. मिचेल स्टार्कनेही दिवसाच्या सुरुवातीला तीन षटके चांगली टाकली होती. या तिघांनीही भारतीय फलंदाजांना बरेच प्रश्न विचारले. त्यामुळे भारतीय फलंदाजांना दोष देणे, त्यांच्यावर टीका करणे योग्य ठरणार नाही. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी उत्कृष्ट खेळ केला आणि त्यांचे कौतुक झाले पाहिजे. गावस्करची ही टिप्पणी सर्वात योग्य वाटते. बाकी भारतीय संघावर आताच टोकाची टीका करणे योग्य होणार नाही. कसोटी मालिकेचे अजून तीन सामने बाकी आहेत. मुख्य म्हणजे ते गुलाबी चेंडूने ना खेळता नेहमीच्या चेंडूने खेळले जाणार आहेत. यामुळे भारताला तो नीचांकी पराभव विसरून नवी विटू, नवा दांडू असा विचार करून दुसर्‍या कसोटीला सामोरे जावे लागेल.

फलंदाजांच्या तंत्रात अभाव, खालावलेली वैयक्तिक कामगिरी, त्यातच प्रमुख फलंदाज आणि कर्णधार विराट कोहली उर्वरित कसोटी मालिकेसाठी अनुपलब्ध. अशा सर्व आव्हानात्मक बाबींचा सामना करून मुंबईकर अजिंक्य रहाणे 26 डिसेंबर रोजी भारताचे नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरेल. त्यामुळे मेलबर्न येथील ‘बॉक्सिंग डे’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या दुसर्‍या कसोटीत रहाणेच्या नेतृत्वाची खरी कसोटी पाहायला मिळेल. रहाणेच्या नेतृत्वक्षमतेविषयी तशी फारशी चर्चा रंगलेली कधीच पाहायला मिळालेली नाही. परंतु यंदा कोहली पितृत्वाच्या रजेमुळे कसोटी मालिका अर्धवट सोडूनच मायदेशी माघारी परतणार असल्याने रहाणेकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले आहे. रहाणेच्या दृष्टीने दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पहिल्या कसोटीत नेहमीच्या शैलीत फलंदाजी करणार्‍या कोहलीला धावचीत करण्यात त्याचाच हातभार होता. कारण तेथूनच सामन्याचा नूर पालटला. त्यामुळे आता दुसर्‍या कसोटीत रहाणेच्या नेतृत्वाबरोबरच तो फलंदाजीत संघाला कसे सावरतो, याकडेही तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. सुनील गावस्कर, इयान चॅपेल यांनी रहाणेच्या नेतृत्व कौशल्याचे कौतुक केले असून कसोटी मालिकेपूर्वी झालेल्या दोन्ही सराव सामन्यातदेखील रहाणेने कर्णधार म्हणून छाप पाडल्याचे दिसून आले होते.

- Advertisement -

शांत आणि संयमी स्वभावाचा रहाणे समाजमाध्यमांवरही अन्य खेळाडूंप्रमाणे फारसा व्यक्त होत नाही, परंतु खिलाडूवृत्तीमध्ये तो नेहमी अग्रेसर असतो. 2015 मध्ये झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्यावेळचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी तसेच कोहलीला विश्रांती देण्यात आल्यामुळे रहाणेला प्रथमच भारताचे नेतृत्व करण्याची संधी लाभली. रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश मिळवले. तर दोन सामन्यांच्या ट्वेन्टी-20 मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी पत्करली. त्यानंतर 2017 मध्ये धरमशाला येथील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीपूर्वी कोहलीच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे रहाणेकडे भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. रहाणेने या लढतीत कुलदीप यादवला खेळवण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि कुलदीपच्या फिरकीपुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. पहिला बळी मिळवल्यानंतर भावुक झालेल्या कुलदीपने रहाणेला दिलेले आलिंगन आजही अनेक चाहत्यांच्या स्मरणात आहे. अफगाणिस्तानविरुद्ध 2018 मध्ये झालेल्या एकमेव कसोटीसाठी कोहलीला विश्रांती देण्यात आल्यामुळे नेतृत्वाची धुरा पुन्हा रहाणेच्या खांद्यावर सोपवण्यात आली.

या कसोटीत भारताने अफगाणिस्तानवर सहज वर्चस्व गाजवले. परंतु कसोटी प्रकारातील पहिलाच सामना खेळणार्‍या अफगाणिस्तान संघातील सर्व खेळाडूंना रहाणेने मालिकाविजयाच्या चषकासह छायाचित्र काढण्यासाठी आमंत्रित करून चाहत्यांची मने जिंकली. नुकताच ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धच्या सराव सामन्यातसुद्धा डोक्यावर चेंडू आदळल्यामुळे जायबंदी झालेल्या विल पुकोवस्कीची विचारपूस करण्यासाठी दिवसाचा खेळ संपल्यानंतर रहाणे ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रूमजवळ गेल्याची चित्रफीत काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर पसरली होती. कसोटी संघातील महत्त्वपूर्ण फलंदाज असणारा 32 वर्षीय रहाणे तब्बल तीन वर्षे एकही कसोटी शतक न झळकावू शकल्यामुळे एक वेळ निवृत्ती पत्करणार की काय, अशी शंकाही चाहत्यांच्या मनात निर्माण झाली होती. परंतु गतवर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध आणि त्यानंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक ठोकून रहाणेने दमदार पुनरागमन केले. विदेशी खेळपट्ट्यांवरील त्याची कामगिरी नेहमीच उत्तम झालेली आहे. त्यामुळे रहाणेकडून नेतृत्वाबरोबरच फलंदाजीतही क्रिकेटप्रेमींना फार अपेक्षा आहेत. या अपेक्षांवर रहाणे खरा उतरेल, अशी आशा बाळगू.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनी पहिल्या कसोटीतील पराभवानंतर चिंता व्यक्त केली असून यामधून सावरण्याची रणनीती आखली जात आहे. संबंधित अधिकारी टीम मॅनेजमेंटसोबत संपर्कात आहेत. रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या भारताच्या मुख्य फलंदाजांना सूचना देण्यात आल्यात. या दोघांनी आपली कामगिरी सुधारून जबाबदारी घेण्याची गरज असल्याचे त्यांना कळवण्यात आले आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने तरुण खेळाडूंची फळी तयार करण्यावर भर देण्याचे ठरवले असून शुभमन गिल, ऋषभ पंत यांना संधी तर मिळेलच, पण के.एल.राहुल आणि रवींद्र जडेजा या अनुभवी खेळाडूंचा समावेश करून भारताची ताकद वाढवली जाईल. फलंदाजी, क्षेत्ररक्षण यात साफ निराशा करणार्‍या पृथ्वी शॉच्या जागी राहुल, विराटच्या चौथ्या क्रमांकावर स्वतः कर्णधार रहाणे, पाचव्या क्रमांकावर शुभमन गिल, त्यानंतर पंत, जडेजा आणि दुखापतग्रस्त शमीच्या जागेवर सिराज किंवा सैनी असे मोठे बदल भारतीय संघात अपेक्षित आहेत. या बदलाबरोबर आत्मविश्वास घेऊन भारतीय संघ दुसर्‍या कसोटीला सामोरे गेला तरच पराभवाचे उट्टे फेडता येईल.

- Advertisement -