घरफिचर्समायमहानगर ब्लॉगमतलबी वारे... कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या!

मतलबी वारे… कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या!

Subscribe

ज्या पक्षाच्या जोरावर एवढी वर्षे निवडून आलो त्याला मध्येच अडचणीच्या काळात वार्‍यावर सोडून सत्तेची उब घेण्यासाठी कधी सत्ताधार्‍यांचे उपरणे गळ्यात आले तेच कळेनासे झालेय लोकप्रतिनिधींना. 2014 पर्यंत काँग्रेस आघाडीत येण्यासाठी लागलेली चढाओढ आता 2019 साली सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेत येण्यासाठी पाहायला मिळते. बरे जे आमदार आता भाजपत किंवा शिवसेनेत प्रवेश करीत आहेत त्यांनी 10 ते 15 वर्षांपूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत प्रवेश घेतला होता हा इतिहास नेते विसरलेत. पण सूज्ञ जनता विसरलेली नाही. मतदार राजा तर विसरलेला नाही, हे सरड्याप्रमाणे रंग बदलणार्‍या लोकप्रतिनिधींनी लक्षात ठेवावे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीचे वारे पक्षापक्षांत वाहू लागल्यानंतर दीडशे वर्षांची परंपरा असलेली काँग्रेस आणि जाणता राजा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती, घरघर थांबण्याचे काही नाव घेत नाही. दरदिवशी सत्ताधारी भाजपत आणि मित्रपक्ष शिवसेनेत विरोधी पक्षांकडून येणार्‍या आमदारांची, माजींची रांग लागली आहे. यावरून राज्यात विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिल्लक राहील की नाही, हाच प्रश्न राजकीय वर्तुळात ऐकायला मिळतो. लोकभावनेमध्ये पडू लागलेल्या फरकाचा आणि विरोधी पक्षाप्रती चिडेचा अंदाज मुरलेल्या राजकारण्यांना लगेच येत असतो. त्यामुळे निवडणुका जवळ आल्या की पक्षांतराचे मतलबी वारे जोरात वाहू लागतात. याचाच प्रत्यय राज्यातील जनता सध्या घेत असून, आपण ज्या पदाधिकार्‍याच्या मागे मागे फिरतोय त्याचा नक्की पक्ष कोणता असा प्रश्न झेंडेकरी हजारो कार्यकर्त्यांना पडला आहे.

अलीकडच्या काळात पक्षांतर हा सत्तांतराचा प्रमुख आधार आणि त्यापेक्षा हत्यार बनले आहे. आपण ज्या पक्षाच्या जोरावर एवढी वर्षे निवडून आलो त्याला मध्येच अडचणीच्या काळात वार्‍यावर सोडून सत्तेची उब घेण्यासाठी कधी सत्ताधार्‍यांचे उपरणे गळ्यात आले तेच कळेनासे झालेय लोकप्रतिनिधींना. 2014 पर्यंत काँग्रेस आघाडीत येण्यासाठी लागलेली चढाओढ आता 2019 साली सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेत येण्यासाठी पाहायला मिळते. बरे जे आमदार आता भाजपत किंवा शिवसेनेत प्रवेश करीत आहेत त्यांनी 10 ते 15 वर्षांपूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत प्रवेश घेतला होता हा इतिहास नेते विसरलेत. पण सूज्ञ जनता विसरलेली नाही. मतदार राजा तर विसरलेला नाही, हे सरड्याप्रमाणे रंग बदलणार्‍या लोकप्रतिनिधींनी लक्षात ठेवावे. यापूर्वी काँग्रेस हा देशातील प्रमुख सत्ताधारी पक्ष असताना अनेक राज्यांतून घाऊक प्रमाणात पक्षांतरे होत होती. त्यातूनच आयाराम गयाराम संस्कृती उदयास आली असेच म्हणावे लागेल.

- Advertisement -

झेंड्याचा रंग बदलला असला, तरी तो झेंडा धरणारे हात तेच होते. सत्तेच्या बाजूला असणे हा पक्षांतराचा मुख्य उद्देश असतो हे वेगळे सांगायची गरज नाही. यात मग मुख्यमंत्रीपद वा अधिक महत्त्वाचे मंत्रीपद मिळवणे, खासदारकी वा आमदारकीची उमेदवारी मिळवणे आलेच. स्वपक्षाकडून ती मिळत असूनही अनुकूल मतदारसंघात मिळत नाही आणि केवळ सत्तेच्या बाजूला जाऊन भविष्यात काही स्वार्थ साधण्यासाठी अशी बरीच कारणे असू शकतात. खुर्चीसाठी नगरसेवक, आमदार, खासदार पक्षांतर करतात; पण त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे हक्काचे मतदार आणि सर्वसामान्य जनता याच्याकडे कसे पाहतात? यावर सारं काही अवलंबून असते. अवधूत गुप्ते यांच्या ‘झेंडा’ चित्रपटात नेत्यांनी बाजू-बदल आणि भूमिका-बदल केल्याने कार्यकर्त्यांची झालेली फरफट नि उद्ध्वस्त झालेली नाती चांगल्या पद्धतीने मांडली आहे.

सत्तेचे वारे विरोधी दिशेने वाहू लागले, पुढचे सत्ताधारी वेगळे असतील याचा अंदाज आला, की कार्यकर्तेही नेत्यावर पक्ष बदलासाठी दबाव आणू लागतात. नेत्याला स्वपक्षात हवे ते सत्तास्थान मिळत नाही म्हटल्यावर ते जिकडे असतील, तिकडे आम्ही सोबत असू, अशी जाहीर विधाने करत नेत्याला पक्षांतरास उद्युक्त करतात. राजकारणात मात्र सत्ताप्राप्ती हीच ध्येयसिद्धी असल्यामुळे कभी इधर, तो कभी उधर असा पक्षांतराचा सिलसिला सुरूच राहत असल्याचे पहायला मिळते. निवडणुकांच्या काळात या प्रक्रियेला भलताच वेग येतो. सरडा आपले रंग बदलतो तसं निवडणुका आल्या की राजकीय कार्यकर्ते आणि नेते आपापले रंग बदलत असतात. लोकसभा निवडणुकीत आलेल्या मोदीरुपी त्सुनामीने अनेक पक्ष व नेते यांना होत्याचे नव्हते केले. साहजिकच भारतीय जनता पक्ष व त्यांचे मित्र पक्ष हे आता चलनी नाणे बनले आहे. हे नाणे चालविण्यासाठी या पक्षांकडे भरती जोरात सुरू झाली आहे. मात्र निसर्ग नियमाप्रमाणे भरतीनंतर ओहोटी सुध्दा असते. त्यामुळे भरतीत आलेले नेते ओहोटीपर्यंत भाजप शिवसेनेत टिकले म्हणजे झाले.

- Advertisement -

दलबदलू पुढार्‍यांनी पक्ष बदलले नाही तर त्यांच्या पोटावरच टाच येईल, असे काही नसते. मात्र ‘ज्याची चलती, त्याची धरावी काठी’, या न्यायाने केवळ स्वार्थासाठी अनेक जण टोप्या बदलत असतात. सहसा निवडणूक काळात पक्षांतराचे पेव फुटते. उमेदवारी न मिळणे हा त्यातील कळीचा मुद्दा असला तरी त्यासाठी माझ्यावर अन्याय झाला असे तकलादू कारण पुढे केले जाते. निवडणुकीच्याच तोंडावर या दिग्गज नेत्यांवर एकाचवेळी अन्याय होतो बरा. आता लोकसभा निवडणूक पश्चात आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे मतलबी वारे वाहू लागले आहेत. महायुतीचेच चलती नाणे वाजणार, युतीचेच चांगभलं होणार याची कुणकूण लागल्याने सर्वत्र भगवामय असे भारावलेले वातावरण दिसत आहे. दलबदलू, स्वार्थी आणि सत्तापिपासू लोकप्रतिनिधींचा हा लोंढा जेव्हा भाजप, शिवसेनेच्या पक्षात घुसेल तेव्हा या पक्षांचे काय होईल? तंबूत शिरलेल्या उंटासारखी गत भाजप, सेनेची न होवो म्हणजे मिळविली. याचे कारण म्हणजे दोन्ही पक्षांनी 288 पैकी युतीला 220 पेक्षा जागा मिळणार आणि मुख्यमंत्री आमचाच होणार असे पालूपद आळवायला सुरुवात केलीच आहे. भाजपने आणि शिवसेनेने मतदार राजाला गृहीत धरलेले दिसते. त्या राजाला गृहीत धरल्यावर काय होते याचे प्रत्यंतर 1999 साली भाजप आणि शिवसेनेला केंद्रात आणि राज्यातही आले होते. हा इतिहास आहे.

विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून किंबहुना लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती, घरघर काही थांबण्याचे नाव घेत नाही. राज्यातील आघाडी सरकारचे आमदार असलेल्या बर्‍याच मतदारसंघात साधारणतः हे वातावरण दिसून येत आहे. महत्त्वाकांक्षी नेत्यांबरोबर हौशे-नवशेही आता भाजप, सेनेची वाट धरू इच्छित आहेत. सत्ता आणि पदाचा हव्यास हा जिवात जीव असेपर्यंत कधीच सुटत नाही, हेच या पक्षांतराचे गणित आहे. माझा पक्ष, माझी वैचारिक भूमिका याला बदलत्या राजकीय ट्रेंडमध्ये थारा नाही. पुन्हा युतीचंच सरकार येणार! किंबहुना शिवसेना-भाजपत दाखल झालेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक ही किमया करून दाखवणार, हा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना असल्याने अर्धी लढाई जिंकल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीतून दररोज एकएक करून उडणार्‍या नेत्यांचे पक्ष प्रवेशसोहळे पाहणे, हीच विधानसभा निवडणुकीची खरी रंगत आहे. पक्षसोहळ्याचे फलीत ऑक्टोबर मध्ये दिसेल,हीच आशा आहे

दगाबाज दलबदलू, राह में तू ना बिखरना लक्ष्य से तू ना विचलना, देखती है तुझको मंझ़िल तू उसीकी ओर चलना… हिंदी कवी संदीप द्विवेदी यांची ही कविता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचा हा तर केवळ ट्रेलर आहे. अद्याप पूर्ण पिक्चर तर बाकीच आहे. एवढ्या लवकर दलबदलू सक्रीय झाल्याने निवडणूक जवळ आल्यावर तर जिल्ह्या जिल्ह्याच्या राजकारणात उलथापालथ होऊ शकते. निसर्गाच्या वातावरणातील प्रक्रियेत खारे वारे आणि मतलई वारे असतात. मात्र सध्या राज्याच्या राजकारणात सर्वत्र मतलबी वारे वाहताना दिसतात. काहि झाले तरी आपली खुर्ची टिकली पाहिजे यासाठी तर राज्यात आपलीच सत्ता पुन्हा आली पाहिजे यासाठी शिवसेना आणि भाजपात सध्या खेळ सुरू आहे. कुणी गोविंद घ्या… कुणी गोपाळ घ्या… असेच म्हणावेसे वाटते.

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -