राज दरबार

मनसे प्रमुख राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी तारणहार ठरू लागले आहेत. सरकार, प्रशासकीय यंत्रणा ऐकत नाहीत. फिर्याद केली तरी दाद देत नाहीत. त्यामुळे राज्यातील जनता पिचली असताना कोणी तरी निदान गार्‍हाणे ऐकून घेते. मंत्री, सरकारी अधिकार्‍यांना फोन करते. झालंच तर त्वरीत दिलासा देते, हे जनतेला भावले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या दरबारी नाडल्या गेलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला राज ठाकरे यांचा करिष्मा जितका जबाबदार आहे तितकाच सरकार आणि प्रशासकीय यंत्रणांचा नाकर्तेपणा. पण त्याकडे लक्ष द्यायला ना सरकारला वेळ आणि नाही प्रशासकीय अधिकार्‍यांना. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे दुसरे सत्ता केंद्र राज्यात निर्माण होऊ लागले आहे. मातोश्रीनंतर आता कृष्णकुंज. गेल्या महिन्याभरात शिक्षक, पालक, कलाकार, कोळी बांधव, कर्मचारी असे शेकडो लोक कृष्णकुंजवर आपल्या अडचणी घेऊन गेले. त्यापैकी अनेकांच्या अडचणींची तड लागली आणि राज ठाकरे हेच बाळासाहेबांचे खरे वारसदार, हे जनतेच्या मनावर ठामपणे रूजू लागले.

गेल्या सहा महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात खूप उलथापालथी चालू असताना राज ठाकरे मात्र त्यात अजिबात पडले नाहीत. कोरोनापासून सुशांत सिंह राजपूतच्या संशयास्पद मृत्यूपर्यंत एकाहून एक खळबळजनक घटनाक्रमाची रांग लागलेली असताना राज ठाकरे गप्प होते. त्यांनी आपली आणि आपल्या पक्षाची सर्व ऊर्जा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लावली. कोरोनाच्या बाबतीत शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना झालेला भोंगळ कारभार किंवा लोक इतके संकटात असताना रस्त्यावर कुठेही शिवसैनिकांची धावाधाव नसणे. शिवसेना व ठाकरे परिवारावर थेट तोफा डागल्या जात असताना किती काहुर माजले असते? कधीकाळी अशी कडवी बोचरी टीका झाल्यावर शिवसैनिकांचे हल्ले झाल्याच्या बातम्या वाचायला ऐकायला मिळायच्या. पण त्याचा मागमूस गेल्या काही महिन्यात कुठे दिसलेला नाही.

उलट आजकाल शिवसैनिक बाजूला पडलेले असून, काही प्रमाणात काँग्रेस व आक्रमकपणे राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेचा बचाव मांडताना दिसतात. ही बाब चमत्कारिक होती. फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील असतानाही शिवसेना व शिवसैनिक जितका आक्रमक दिसलेला होता, त्याचाही कुठे मागमूस दिसला नाही. शिवसेना म्हणजे उसळत्या रक्ताचे उत्साही तरूण, हीच तिची ओळख होती. काही वर्षांपूर्वी खुद्द शरद पवारांनीही आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्याचा दाखला दिला होता. सत्ता कोणाचीही असली तरी शिवसैनिक पोलीस ठाण्यात गेला तर अधिकारी वचकून असतात, त्याची दखल तात्काळ घेतली जाते, म्हणून संघटना तशी असायला हवी, असे शरद पवार म्हणाले होते. तिचा मागमूस आज कोणाला दिसला नाही.

तीन पक्षांचे सरकार बनवताना वा दोन्ही काँग्रेससोबत सत्तेसाठी जाताना शिवसेनेने ठराविक मतदारांच्या सदिच्छांना लाथ मारलेली आहेच. परंतु मुख्यमंत्रीपद मिळवताना केलेल्या तडजोडींनी अनेक स्वपक्षीयांनाही नाराज केलेले आहे. राष्ट्रवादी वा काँग्रेसच्या कार्यकर्ते नेत्यांमध्ये जशी सत्ता झिरपलेली आहे, तशी ती शिवसेनेच्या तळागाळापर्यंत झिरपू शकली नसल्यामुळे नाराजी आहेच. पण कोरोनाचे आव्हान पेलताना संघटनेचा पुरता अभाव समोर आला आहे. त्यांच्या तुलनेत मनसेची शक्ती कमी असली तरी आपापल्या विभागात मनसेचे तरूण खूप धावपळ करताना लोकांना आढळत आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे अनेक जुनेजाणतेही आपापल्या घरात निष्क्रीय बसलेले आहेत. अशा प्रसंगात लोकांची मने जिंकणारा पराक्रम करण्याची क्षमता व इच्छा असलेल्या त्या शिवसैनिकाला नेतृत्व वा चालना देण्यात उद्धव ठाकरे अपयशी ठरले आहेत. असा तरूण किंवा जुना उत्साही शिवसैनिक नेतृत्वासाठी आशाळभूत असतो आणि तो पुन्हा नेत्याचा शोध घेत असणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तो भाजपा किंवा अन्य पक्षात जाऊ शकत नाही, तर शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेशी जुळणार्‍या दिशेने वळू शकतो. तो पक्ष मनसे आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांत अनेक तरुण कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे.

मध्यंतरीच्या कालखंडात मोदीयुगाचा आधार घेऊन शिवसेनेने निवडणुकीत मोठे लक्षणीय यश मिळवल्यावर मनसे मरगळली होती. कारण त्या दोन्ही पक्षांचे प्रभावक्षेत्र मराठी अस्मिता व हिंदुत्व असेच होते. काही वर्षांपूर्वी रझा अकादमीने मुंबईत मोर्चा काढून आझाद मैदानाजवळ अमर जवान ज्योत स्मारकाची विटंबना केल्यावरही शिवसेना शांत होती आणि राज ठाकरे यांनी पोलीसबंदी झुगारून निषेधाचा मोर्चा काढलेला होता. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराचा वाद असो किंवा इतिहासकार मेहंदळे यांच्यावर झालेला हल्ला असो, तिथेही रस्त्यावर उतरण्याची तात्काळ भूमिका मनसेने घेतलेली होती. त्यामुळे हिंदुत्व त्यांच्यासाठी नवे नाही. मात्र मध्यंतरीच्या काळात शिवसेना युतीत असल्याने मनसेला राजकीय जागा वा पोकळीच सापडत नव्हती. म्हणून राज यांनी पवारांचे ‘बोट पकडून’ आपल्या पक्षासाठी जागा संपादन करण्याचा प्रयत्न चालविला होता. पण लागोपाठच्या लोकसभा विधानसभा निवडणुकांनी तो फोल ठरला आणि आता अचानक विधानसभेत मार खाल्लेला असताना मनसेला नवी जागा सापडलेली आहे. शिवसेनाच दोन्ही काँग्रेसच्या सोबत जाताना आपले हिंदुत्व किंवा मराठी अस्मिता गुंडाळायला सिद्ध झाल्याने ती पोकळी तयार झालेली आहे. त्यामुळे एका बाजूला हिंदुत्वाच्या दिशेने आपली विचारसरणी नेताना राज ठाकरे यांनी लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा, त्यासाठी प्रसंगी खळखट्ट्याक करण्याचा इशारा देण्याचा चंग बांधला.

राज ठाकरे यांचे मंत्र्यांना, अधिकार्‍यांना फोन गेल्यावर लोकांच्या समस्या सुटू लागल्या. त्यामुळे मातोश्रीप्रमाणे कृष्णकुंज हे नाडलेल्या लोकांसाठी आशेचा किरण ठरू लागले. कोरोना लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही राजकारणात न गुंतता फक्त आणि फक्त लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांच्या मदतीला धावून जाण्यासाठी राज ठाकरे आणि मनसे झटली. कधी काळी जे काम शिवसेना करत होती, ते काम लॉकडाऊनच्या काळात राज ठाकरे यांनी केले. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. शिवसेना सेक्युलरवादाकडे झुकत असताना लोकांना भावणारी, रस्त्यावर उतरून, प्रसंगी राडा करून जनतेला न्याय देणार्‍या मनसेने राज्यातील अनेक लोकांच्या मनात घर केले आहे. त्याचे दृश्य परिणाम राज्याच्या, मुंबईच्या राजकारणात लवकरच दिसणार आहेत. शिवसेना मवाळ झाली असताना तिची रग अजूनही अंगात असलेल्या तरुणाला मनसेच जवळची वाटणार आहे. त्यामुळे राज दरबारी आता जे काही घडतंय तो राज्यातील राजकारणाचा भविष्यात केंद्रबिंदू ठरणार आहे. या दरबारातील घडामोडीच राज्याच्या राजकारणाची दिशा निश्चित करणार आहेत.