घरफिचर्समायमहानगर ब्लॉगइव्हेंटबाज मॅरेथॉन, निष्काळजी आयोजक अन् हौशी स्पर्धक

इव्हेंटबाज मॅरेथॉन, निष्काळजी आयोजक अन् हौशी स्पर्धक

Subscribe

प्रत्येक मॅरेथॉनपूर्वी सहभागी होणार्‍या स्पर्धकांची शारीरिक वैद्यकीय तपासणी होणं गरजेचं आहे. त्यात उत्तीर्ण होणार्‍यांनाच स्पर्धेत सहभागी करून घ्यायला हवं. पण, आपल्या स्पर्धकांची संख्या वाढविण्यासाठी आणि ‘इतिहासात’ नाव कोरण्यासाठी या मूळ बाबींकडे दुर्लक्ष करून संख्या वाढीवर भर दिला जातो. अनेक रुग्णांनाही मॅरेथॉनमध्ये प्रवेश दिला जातो. त्यातून पुढे अघटीत असं काहीतरी घडतं.

ग्रीकमधील एका शहरात इ.स. पूर्व ४९० साली एक मोठं युद्ध झालं. हे युद्ध दोन-अडीच हजार सैन्य असलेल्या अ‍ॅथेन्स आणि दहा हजारांच्या आसपास सैन्य असणार्‍या पार्शियन लष्करामध्ये लढलं गेलं. यात अथेन्सचे सैनिक युद्ध हरणार असंच भाकित वर्तविलं जात होतं. प्रत्यक्षात युद्धात आश्चर्यकारकरित्या पार्शियन सैन्याचा पराभव झाला. हे युद्ध जेथे लढलं गेलं त्या टेकडीपासून राजधानी अथेन्स ३३० मैल अंतरावर होती. (प्रत्यक्षात आज या शहरांतील अंतर ३० मैल आहे.) या राजधानीत विजयाचा निरोप वेळेत पोहचणं गरजेचं होतं. त्यासाठी फिडीपाईडस नावाच्या एका सैनिकास ही कामगिरी सोपवण्यात आली. कुठेही न थांबता फिडीपाईडस अ‍ॅथेन्सपर्यंत पोहोचला.

दरबारात जाऊन आपला विजय झाला एवढेच बोलून त्याने प्राण सोडले. त्याने पळण्याची सुरुवात ज्या टेकडीपासून केली, त्या टेकडीचं नाव मॅरेथॉन. अशी ही हृदयस्पर्शी, भावनाशील घटना ग्रीस लोकांच्या मनात खोलवर रुजली. या कथेला पिढ्यान् पिढ्या शौर्यगाथा म्हणून सांगितले जाऊ लागले. पुढे मॅरेथॉन नावाच्या जागतिक धावण्याच्या स्पर्धेची सुरुवात झाली. हा इतिहास सांगण्याची गरज यासाठी भासली की, शारीरिक क्षमतेपेक्षा अधिक धावला म्हणून फिडीपाईडसचा मृत्यू झाला. मात्र, २५१० वर्षानंतरही ही बाब आपण समूजनच घेतली नाही. आजही ठिकठिकाणी होणार्‍या मॅरेथॉन स्पर्धेत अनेकांना हृदयविकाराचा झटका येतो, तर काहींचा त्यातच मृत्यू ओढावतो. शारीरिक क्षमतेचा अंदाज न घेता आणि रोजच्या सरावापेक्षा अधिक धावण्याचा प्रयत्न झाल्यावर अशा दर्दैवी घटना घडू शकतात. सध्या राज्यभरात विविध शहरांमध्ये अशा मॅरेथॉन होत आहेत. विविध कॉर्पोरेट्स यामध्ये समाविष्ट होताना दिसतात. ही बाब आरोग्य संवर्धनाचा संदेश सर्वदूर पोहोचवण्याच्या दृष्टीने स्वागताहर्र्च आहे. पण, त्याचाच अतिरेक झाला तर मूळ उद्देशालाच छेद जातो. निरामयी, निरोगी जीवन जगण्याचा संदेश मॅरेथॉन देत असते. त्यामुळे प्रत्येक मॅरेथॉनमध्ये शारीरिक क्षमतेची कसोटी लागते.

- Advertisement -

झेपेल तेवढंच धावलो तर मॅरेेथॉनचा आनंद लुटता येतो. पण, क्षमतेपेक्षा अधिक पळण्याचा प्रयत्न केला तर त्यातून हृदयविकाराचा झटका येऊ शकतो वा तत्सम व्याधी निर्माण होऊ शकतात. त्यासाठीच मॅरेथॉनमध्ये आपण का सहभागी होत आहोत, याची खुणगाठ आधीच मनाशी बांधणं गरजेचं असतं. दुर्दैवाने शारीरिक क्षमतांचा वा सरावाचा विचार न करता काही मंडळी अचानकपणे धावण्याच्या या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छितात आणि त्यातून पुढे गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. खरं तर, प्रत्येक मॅरेथॉनचा उद्देश उदात्तच असतो. पण, त्याच्या आयोजनाला आलेलं इव्हेंटचं स्वरूप चिंताजनक असंच आहे. बहुतांश मॅरेथॉन आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाच्या हेतूनेच आयोजित केल्या जातात. पण, या मॅरेथॉनची सुरुवातच जर कानठळ्या बसवणार्‍या डीजेने होत असेल तर आरोग्य आणि पर्यावरणाचे संवर्धन डोंबलाचं होणार? त्यात अनेक ठिकाणी मॅरेथॉनपूर्वी वातावरणनिर्मितीसाठी बाईक रॅली काढण्यात येते. यात पेट्रोलचा महामोर वापर अन् प्रदूषणाचा राक्षसही उभा ठाकतो. भरपेट खाऊन-पिऊन मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार्‍यांची संख्याही कमी नाही. त्यातूनच पुढे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. मॅरेथॉनमध्ये सहभाग घेण्यापूर्वी ‘वॉर्म अप’ महत्त्वाचा ठरतो. व्यावसायिक धावपटू ‘वॉर्म अप’शिवाय अशा स्पर्धांमध्ये सहभागही घेत नाहीत. इतकंच नाही तर ते धावण्याचा मार्ग, वातावरण, हवामान यांचा अभ्यास करून अशा मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतात. आपल्याला पोषक वातावरण नसेल तर वेळप्रसंगी ते सहभाग काढूनही घेतात. परंतु, सर्वसामान्य धावपटूंमध्ये मात्र सदैव ‘पी.टी. उषा’ संचारलेली असते. कोणताही ‘वॉर्म अप’ न करता, सराव न करता ते थेट स्पर्धेत उतरतात. अनेकांनी जिद्द आणि चिकाटीच्या कहाण्या वाचलेल्या असतात. या कहाण्या वाचून सराव न करताच धावायला निघालेली मंडळी पुढे नक्कीच अडचणीत सापडतात.

बर्‍याचशा मॅरेथॉनमध्ये मोठ्यांबरोबर चिमुरड्यांचीही फरफट बघायला मिळते. काही मॅरेथॉन तर केवळ बालकांसाठी असतात. अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी बालकेही उत्सुक असतात. पण, त्यांना तरी त्यांच्या शरीराची कल्पना असते का? बालवयात कुणाचेही स्नायू परिपक्व नसतात. सरावाअंतीही ते परिपक्व होतील याची शाश्वती नसते. असे असताना त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक काम त्यांच्याकडून करून घेतल्यास निश्चितच त्याच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. सेल्फीसाठी मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार्‍यांची संख्याही लक्षणीय असते. सेल्फी हा आजकाल मानसिक आजार झाला आहे. अशा ‘सेल्फी’श लोकांमुळे व्यावसायिक धावपटूंना पळताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

- Advertisement -

मॅरेथॉनचे आयोजक आपली जबाबदारी कितपत पार पाडतात याबाबतही शंकाच आहे. वेगवेगळ्या कंपन्यांकडून मॅरेथॉनसाठी निधी जमा करणं, वितरणासाठी टी-शर्ट आणि अन्य साहित्याची खरेदी करणं, रस्त्यावर पांढर्‍या पट्ट्या मारणं आणि उद्घाटन आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमाचं नियोजन करणं याकडेच अधिक लक्ष पुरविणार्‍या आयोजकांचे मूळ नियोजनाकडेच दुर्लक्ष होताना दिसतं. खरं तर, प्रत्येक मॅरेथॉनपूर्वी सहभागी होणार्‍या स्पर्धकांची शारीरिक वैद्यकीय तपासणी होणं गरजेचं आहे. त्यात उत्तीर्ण होणार्‍यांनाच स्पर्धेत सहभागी करून घ्यायला हवं. पण, आपल्या स्पर्धकांची संख्या वाढविण्यासाठी आणि ‘इतिहासात’ नाव कोरण्यासाठी या मूळ बाबींकडे दुर्लक्ष करून संख्या वाढीवर भर दिला जातो. अनेक रुग्णांनाही मॅरेथॉनमध्ये प्रवेश दिला जातो. त्यातून पुढे अघटीत असं काहीतरी घडतं. सायकल मॅरेथॉन वा सायकल वारीचेही फॅड आपल्याकडे अलीकडे वाढलं आहे.

पाच-सहा वर्षांच्या चिमुरड्यांपासून वयोवद्धांपर्यंत सर्वच यात सहभागी होताना दिसतात. तीनशे-पाचशे किलोमीटर अंतर ही मंडळी सायकल चालवून पार पाडतात. एका ‘इव्हेंट’पोटी अशा सायकल चालवणार्‍यांचा जीव जाऊ शकतो, याचा कुणीच कसा विचार करीत नाही, याचं नवल वाटतं. रस्त्यावर अपघाती परिस्थितीत प्रसंगावधान राखून निर्णय घेण्याची क्षमता लहान मुलांमध्ये उपजत असते का? शेकडो किलोमीटर प्रवास सायकलवर करण्याची ताकद या छोट्याशा जीवात कशी असेल? पालकही अशा जीवघेण्या उपक्रमांत लहान मुलांना कसे पाठवतात? पालकांच्या प्रोत्साहनाने त्यात जोश भरला जाईल. पण, ताकद यायला त्याला पुरेसा अवधी तर द्यायला हवा ना. भारतासारख्या देशात निर्धोकपणे सायकल चालवण्यासारखे रस्ते तरी आहेत का? आणि त्याही उपर महामार्गावर सायकल चालवणे कितपत संयुक्तीक आहे.

शारीरिक व्यायामासाठी सायकलचा पर्याय उत्तम आहे, हे कोणीही मान्य करेल. पण, असा व्यायाम सायकल ट्रॅक किंवा मोकळ्या मैदानावर होऊ शकतो. जास्तीत जास्त जवळपासच्या एखाद्या स्थळापर्यंतचा प्रवास सायकल चालवून होऊ शकतो. पण, त्यासाठी महामार्गाचा अवलंब करणे ही घोडचूकच म्हणावी. कुठे झुंडीने तर कुठे एकटे-दुकटे सायकलपटू येणार्‍या परिस्थितीला चकवे देत आपापल्या परीने हेलकावे खात असतात. या स्पर्धेत कोणीही कुठेही थांबते. सायकल चालवत असतानाच एका हाताने मोबाईल कानावर लावून गप्पा सुरू असतात. वळणावर थांबले जाते. विशेष म्हणजे अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयोजकांपैकी कुणीही नसते ही अधिक संतापजनक बाब.

इव्हेंटबाज मॅरेथॉन, निष्काळजी आयोजक अन् हौशी स्पर्धक
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -