घरफिचर्समायमहानगर ब्लॉगआठवणीतील विकास सबनीस...

आठवणीतील विकास सबनीस…

Subscribe

दै. ‘मुंबई तरुण’ भारतमध्ये २००० साली सबनीस यांचा आबा आणि माझ्याशी परिचय झाला. त्यावेळी त्यांनी ‘तरुण भारत’साठी कार्टुन काढायला सुरुवात केली होती. आमची नोकरीची ठिकाणं बदलत राहिली, पण सबनीसांशी जडलेला स्नेह कायम राहिला. आमच्यापेक्षा ते सर्वच बाबतीत मोठे होते. पण अगदी बरोबरीच्या मित्राप्रमाणे वागत. आबांनी त्यांना कार्टुन काढण्याची संधी दिली. त्यांच्या कठीण काळात त्यांना सांभाळून घेतलं. तसंच सबनीसांनीही तरुण भारत आणि महानगरच्या कठीण काळात आम्हा मंडळींची साथ सोडली नाही. आबांविषयी त्यांना विशेष प्रेम आणि जिव्हाळा होता. आम्हा मंडळींचे त्यांच्याशी घरोब्याचे संबंध होते. ते म्हणायचे आबा शांत आणि संयमी आहेत. तुम्ही चमत्कारिक आणि भडक आहात. तुम्हाला प्रेमात यायलाही वेळ लागत नाही आणि रागात यायलाही वेळ लागत नाही.

सबनीसांची विविध क्षेत्रातील अनेक मोठ्या लोकांशी ओळख होती. त्यांनी माझी काही मोठ्या लोकांशी ओळख करुन दिली. त्यांच्या नावाचा ब-याच ठिकाणी उपयोगही होत असे. मी बऱ्याच वेळा त्यांच्या घरी जेवूनही आलेलो आहे. त्यांच्या पत्नी भारतीताई आणि मुलगा परिमल हेदेखील घरी गेल्यावर आपलेपणाने बोलत असत. माझा आणि सबनीसांचा हॉटेलमधील खास मेन्यू कोंबडी वडे हा असायचा. महानगरमध्ये आले की, मला म्हायचे की, राणे आपल्याला कोंबडी वड्यासाठी बसायचं आहे. पण मला संध्याकाळी नंतर वेळच मिळाला नाही.

- Advertisement -

आमच्या ऑफिसमधील बऱ्याच जणांनी सबनीसांकडून स्वतःची व्यंगचित्रे काढून घेतली. मी म्हणालो, सर, माझंही एक व्यंगचित्र काढा. त्यावर ते नंतर बघू. तुम्ही कुठे जाताय असं म्हणत. मी नंतर पुन्हा आग्रह केला. तर ते म्हणाले, तुमचं आणि माधुरी दीक्षितचं व्यंगचित्र काढणं अवघड आहे. कारण दोघांचेही चेहरे गुळगुळीत आहेत. व्यंगचित्र काढायला
चेहऱ्यावर लटकायला व्यंगचित्रकारासाठी जागा असावी लागते. तुम्हा दोघांच्या चेहऱ्यावर ती नाही.

अलीकडे सबनीस खूप आजारी पडल्यानंतर मी त्यांना दादरला त्यांच्या घरी भेटायला गेलो होतो. जाताना संदेश मिठाईवाल्याकडची त्यांची आवडती मिठाई, सोनचाफ्याची फुले आणि लांब दांडी असलेला फुगवलेला फुगा घेऊन गेलो होतो. आजारपणामुळे खूप थकले होते. माझ्याकडची गिफ्ट्स बघून म्हणाले, राणे मी म्हणतो ना, तुम्ही चमत्कारिक आहात. काय कराल सांगता येत नाही. अहो हा फुगा कशाला? मी म्हणालो थांबा सांगतो, त्यांच्या हातावर मिठाई दिली. ती त्यांनी थोडीशी खाल्ली. म्हणाले, पोटात काही टिकत नाही. फार वेळ बसता येत नाही. आडवा पडून राहतो. मन खूप उदासीन झालंय. मग मी त्यांच्या हातात सोनचाफ्याची फुलं देऊन त्याचा वास घ्यायला सांगितलं. तो मन भरुन घेतल्यावर त्यांना खूप प्रसन्न वाटलं. मग दांडीचा फुगा त्यांच्या हातात दिला. तेव्हा त्याच्यातलं लहान मुल जागं झालं. फुगा घेऊन हसायला लागले. तास दीडतास बऱ्याच गप्पा मारल्या. मी म्हणालो, आता आराम करा. मी निघतो. मी येताना त्यांना आलिंगन दिले. त्यांना म्हणालो, फिर मिलेंगे. त्यांना गहिवरुन आले. पण आता पुन्हा शरीररुपाने भेटणे शक्य नाही. पण मनाने सबनीस पुन्हा पुन्हा भेटतच राहतील यात शंका नाही.

- Advertisement -

ते देव आनंदचे मोठे फॅन होते. देवानंदला भेटण्याची त्यांची फार इच्छा होती. पण ती अपूर्ण राहिली असे ते म्हणत असत. देवानंदला भेटण्यासाठी त्यांनी काही वेळा प्रयत्न केले. पण ते शक्य झाले नाही. त्यांच्या भेटीचा योग नव्हता असेच म्हणावे लागेल. ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुँवे मे उडाता चला गया’, हे सबनीसांचं आवडतं गाणं. सबनीससाहेब या गाण्याप्रमाणेच तुम्ही जीवन जगलात. तुम्हाला त्रिवार वंदन. श्रध्दांजली वाहिली तर म्हणाल, काय राणे तुम्ही माझी चेष्टा करताय. मी तर तुमच्यासोबतच आहे. आणि हो… आपली कोंबडी वड्याची पार्टी अजून बाकी आहे.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -