घरफिचर्समायमहानगर ब्लॉगफिटो अंधाराचे जाळे, व्हावे मोकळे आकाश

फिटो अंधाराचे जाळे, व्हावे मोकळे आकाश

Subscribe

निराशेचे मळभ जुन्या वर्षात मागे सरले..नवे वर्ष नवी उमेद आनंदाच्या आशावादाने भरलेले आहे. मागील वर्षात केलेल्या चुका दुरुस्त करण्याची नव्या वर्षात संधी आहे. मागील वर्षाने जे शिकवले त्यातून धडा घेऊन नव्या वर्षाचे स्वागत व्हायला हवे. मागील वर्षातील कोरोनाच्या अंधाराचे जाळे फिटून जाईल आणि नव्या वर्षात नव्या आकांशांचे आकाश मोकळे होईल, अशी आशा बाळगूया. श्रद्धास्थाने बंद असल्याने जिवंत माणसातला देव शोधण्याची संधी गेल्या वर्षाने दिली. जे खळांची व्यंकटी सांडो, केवळ सत्कर्माची शिकवण मागील वर्षाने दिली. नव्या वर्षात विश्वधर्माचा सूर्योदय झालेला आहे. पसायदान माणसांजवळच पिढ्यानपिढ्या होतेच, सरलेल्या वर्षाने त्याचे महत्व अधोरेखित केले इतकेच.

काळाच्या शाळेत जे अनुभव शिकता येतात, ते कुठल्याही विद्यापीठात शिकता येत नाहीत. प्रेम, मैत्रीभाव आणि माणुसकीची जाण ही वैश्विक मूल्ये माणसांना शिकवली आहेत. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आधीही अनेक आपत्ती, अडचणी आल्या. काळाच्या ओघात जीवनाने बरेच काही आयुष्याला शिकवले. माणसांनी प्रगतीच्या नावावर समाज घटकातील इतर गटांची निर्मिती केल्याने असीम जीवनापासून माणसांची फारकत झाली. उत्क्रांतीतून जाणारा मानवी समुदाय जीवनापासून विलग होऊन आयुष्याच्या चाकोरीत अडकला. हा प्रवास असीम जीवनतत्वाच्या विरोधात सुरू झाला होता. त्यामुळे निसर्गाचा अवरोध टाळता येणारा नव्हताच. जीवनातून आयुष्यात रमल्यामुळे माणूस व्यक्तीगत झाला.

हे व्यक्तीपण हजारो वर्षापासून संकुचित होत गेले, मात्र माणूस ही अक्षम्य चूक मानायाला तयार नव्हता. चूक टाळता येणे शक्य होते, परंतु गटवादाच्या सामजिक अहंकाराने भरलेले माणसाचे मन आपली चूक मानायला तयार नव्हते. या चुकीची भरपाई मानवी समुदायाला करणे भागच होते. गेलेल्या वर्षातील आजाराच्या साथीत अनेक जीव गमावून ही भरपाई माणसाला करावी लागली आहे. एकीकडे या आजारावरील लस निर्मितीमुळे माणूस पुन्हा विज्ञानाच्या आधारे निसर्गावर मिळवलेला विजयोन्माद नव्या वर्षाच्या स्वागतासह साजरा करत असताना जुन्या आजाराच्या नव्या स्वरुपबदलामुळे नव्याने मानवजातीसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. विजयाचा हा उन्माद माणसांना पुन्हा अहंकाराकडे आणि जीवनातून आयुष्याकडे नेणारा आहे.

- Advertisement -

बदल निसर्गाचा नियम आहे. काळ बदलणारा असतोच, गेलेले वर्ष पुन्हा कधीही येणार नाही. पण हा बदल होत असताना निसर्गाचे मूलतत्व कायम असते. त्यात कधीही बदल होत नाही. धर्माने त्याला चेतनेचे आणि उर्जेचे नाव देऊन देवत्व बहाल केले. हे देवत्व बहाल करताना निसर्गाच्या अनुनयापेक्षा त्याच्या भक्तीचे दरवाजे उघडले गेल्याने मानवाचा प्रवास हा चुकीच्या वाटेने जाणार हे निश्चित होते आणि हजारो वर्षांपासून वाट चुकलेल्या माणसांचा जत्था फिरून त्याच वळणावर पायपीट करून पुन्हा पुन्हा येत आहे. ही वळणे धोकादायक असतात, या वळणांवर स्वर्ग, नर्काची वाट दाखवणार्‍या चुकीच्या मार्गांच्या दिशादर्शक पाट्या माणसांनी हजारो वर्षांपासून रोवून ठेवलेल्या आहेत. गेलेल्या वर्षात संपूर्ण जगालाच आजारपणाच्या वाटेवर नेणार्‍या सरलेल्या काळाने माणसांची वाट चुकल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही निर्मितीचा मानवी अहंकार माणसे सोडायला तयार नाहीत. नव्या वर्षात नव्याने बदललेल्या आजाराचे जगासमोरील प्रश्नचिन्ह ठळक झालेले आहे. अशा परिस्थितीत गटवादी अस्मिता बाजूला ठेवून खर्‍या अर्थाने माणूस म्हणून एकत्र येण्याची गरज आहे.

श्रद्धा, विश्वासामुळे मानवी समुदाय सकारात्मक होतो. हे खरेच पण श्रद्धेचा अविवेकी अतिरेक आणि अंधविश्वास संकटाची सुरुवात असते. धर्म म्हणजे हीच श्रद्धा मानल्यास धर्माच्या नावावर होणारी हिंसा, शोषण आणि पिळवणूक ही अंधश्रद्धाच म्हणायला हवी. विवेक आणि विज्ञान हे जागतिक धर्माचे आधार व्हावेत. काळाच्या चाकाचा वेग रोखण्याचा आतताईपणा संस्कृतीच्या नावाखाली करणं धोक्याचं असते. गेलेल्या वर्षात फ्रान्समध्ये धर्माच्या नावावर माणसांच्या झालेल्या हत्या हा याच आततायीपणाचा भीषण परिणाम होता. आशिया क्षेत्रात परंपरागत युद्धखोरीची भाषा होत असताना साथीच्या आजाराने माणसांचा अहंकार उतरवला. ज्या वेगाने कोरोना पसरला त्याच वेगाने जगात माणुसकी पसरण्याची गरज आहे. राजकारण सत्तेची गरज असते, जिथे धर्म राजकारणाचा पाया होतो. तिथे तो धर्म राहात नाही. धर्मयुद्ध ही मुळीच फसवी संकल्पना आहे. धर्म असतो तिथं युद्ध होत नाही. तिथं द्वंद्व नसते, त्यामुळे कुठल्याही धर्माच्या नावावर होणारे युद्ध ही सत्तेच्या राजकारणाने केलेली स्वच्छ फसवणूकच असते.

- Advertisement -

वसुधैव कुटुंबकम किंवा हे विश्वची माझे घर ही वाक्ये याच वैश्विक धर्माला साद घालणारी असतात. माणूस भवतालपेक्षा कधीही विलग नसतो. कुठलाही जीव भवतालपेक्षा वेगळा असूच शकत नाही. ज्यावेळी माणूस स्वतःला इतरांपेक्षा वेगळा समजू लागतो, त्यावेळी समाजाच्या नावाखाली सत्तेचे राजकीय सत्तेची ती सुरुवात असते. वेगळेपण हे सत्तेसाठी आवश्यक असते. समुहाचे नेतृत्व करणारा नेतृत्व करणा-यांपेक्षा गुणात्मक दृष्टीने वेगळा असायला हवा, असे इतिहासाने आपल्याला शिकवलेले असते. त्याशिवाय नेतृत्व यशस्वी होत नाही, असेही इतिहासाच्या पुस्तकाने विविध दाखले देऊन सांगितलेले असते. संघर्ष, युद्धखोरीची भाषा राजकीय सत्तेसाठी आवश्यक असते. माणसांना युद्धाची गरज नसावी, हिंस्त्र टोळ्यांच्या संघर्षवादी मानसिकतेतून माणसाने बाहेर पडायला हवे. एका माणसावर दुसर्‍या माणसाची मालकी ही निसर्गानियमाच्या विरुद्धच असते. मालकी हक्काचे परिणाम म्हणूनच मानवी समाजव्यवस्थेत पहायला मिळतात. या मालकीतूनच जात, धर्मव्यवस्थेचे विकृत रुप समोर येते.

माणसांनी माणसासाठी राबवलेली राज्यव्यवस्था म्हणजे लोकशाही, या व्याख्येतील माणसाला गाळून लोकशाही यशस्वी होत नसते. सामाजिक व्यवस्था लोकशाहीच्या विसंगत असल्यास तिथे लोकशाहीच्या नावाखाली अराजकीय शक्ती सत्ता हातात घेतात. कोरोनाने सर्व गट भेद नाकारून माणसाला माणूसपणाचा धडा शिकवलेला आहे. हा धडा पहिल्या आणि दुस-या महायुद्धाने शिकवलेल्या धड्यापेक्षा, देशातील स्वातंत्र्यलढ्यातील अनुभवापेक्षा, फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध, छोटी मोठी युद्धे, लढाया आणि आफ्रिकेतील वंशवादी शोषणविरोधी क्रांतीहून बरेच काही नवे शिकवणारा आहे. एकाचे माणूसपण नाकारून दुसरा माणूस समाज म्हणून जगूच शकत नाही, हे नव्या आजाराने शिकवलेले आहे. या आजारावर संपवण्यासाठी होणार्‍या लढाईत जगातील प्रत्येक माणसाने माणूस म्हणून सहभागी व्हायला हवे, त्यासाठी माणसांनी मैत्री, प्रेम आणि मानवतेशी फारकत घेता कामा नये, भूता परस्परे जडो, मैत्र जीवाचे, हेच खरे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -