Blog: ‘बुलेटवर बसून हॉस्पिटल गाठले, कोरोनातून बरा होऊन बुलेटनेच घरी आलो’

Mumbai
mumbai police coronavirus fight

कोरोना विरोधातील लढ्यात पोलीसही मोठ्या प्रमाणात योगदान देत आहेत. राज्यात २ हजाराहून अधिक पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. काही पोलिसांना या विषाणूमुळे प्राण गमवावे लागले आहेत. तर काहींनी यावर यशस्वी मात केली आहे. यापैकीच एक आहेत पोलिस निरीक्षक अमर कांबळे… त्यांनी आपला अनुभव WhatsApp च्या माध्यमातून व्हायरल केला होता. त्यांच्या या मेसेजमधील हा संपादित भाग.


मी १५ एप्रिल रोजी कोविड टेस्ट केली. दोन दिवसांनी १७ एप्रिल रोजी माझा रीपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे समजले. नंतर वरिष्ठांच्या निर्णयाने आणि मेडिक्लेम असल्याने सर्व निर्णयाअंती हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचे ठरले. पोलीस गाडी असून कोणीही सोडायला येण्यास तयार नव्हते. म्हणून स्वतःच्या बुलेटने हिंदुजा हॉस्पिटल गाठले. हॉस्पिटलमध्ये फक्त गरम पाणी, २ वेळचा नाश्ता आणि २ वेळचे जेवण असे ५ दिवस चालले. कोणतेही औषध दिले नाही. ५ दिवसांनी टेस्ट केली, पुन्हा पॉझिटिव्ह निघाली. माझ्या एकूण ३ टेस्ट पॉझिटिव्ह आल्या.

सहाव्या दिवशी डॉक्टरला विचारले की, काही औषध तरी द्या म्हणजे रिपोर्ट निगेटिव्ह येईल. पण डॉक्टर म्हणाले, काही औषध नाही, तुम्ही स्वतःहून बरे होणार. मग मी विचार केला की, दररोज विना औषध १५,०००/- चार्ज करतात ते कसले? एकूण बिल ८९ हजार झाले. म्हणून तेथून २६ एप्रिलला डिस्चार्ज घेऊन लालबाग येथील हिरामोनी हॉटेलमध्ये क्वारंटाईन राहण्याबाबत ठरविले. पण हॉस्पिटल ऍम्ब्युलन्स देत नव्हते. म्हणून परत बुलेटने लालबाग गाठले.

२६ एप्रिल पासून परत ३ दिवस तिथे क्वारंटाईन राहिलो. पण उपचार काहीच नसल्याने पुन्हा ३ दिवसांनी २९
एप्रिल रोजी गुरुनानक हॉस्पिटल येथे दाखल झालो. तिथे स्वतःच्या पैशाने हॉस्पिटलमधला पहिला आणि माझा चौथा रिपोर्ट काढला. पुन्हा पॉझिटिव्ह आला. ८ दिवस तिथे उपचार घेतले आणि पुन्हा स्वतःच्या पैशाने माझा पाचवा रिपोर्ट काढला. तो निगेटिव्ह आला. उपचारासाठी नेण्यापासून ते घरी येईपर्यंत हेच समजले की कोणी कोणाचा नसतो. मित्र त्यांच्या मुलाबाळांना काही होईल म्हणून घाबरत असतो आणि शेजारी हे शेजारी राहत नाहीत.

 

हॉस्पिटलमधील उपचार म्हणजे

 

तीन वेळा गरम पाणी, हळद टाकून दूध

तीन वेळ मिठाच्या पाण्याच्या गुळण्या

एक चमचा सुंठ, तीन वेळ

लिंबू पाणी, तीन वेळ

गरम पाण्याची वाफ

सदर आजारात मानसिक आणि शारीरिकरित्या तंदुरुस्त राहणे, मेडिटेशन, योगा आणि सकारात्मक विचार करणे, जगण्याची अफाटशक्ती आवश्यक आहे. कोणी मित्र बदलला असे समजू नये कारण मरणापेक्षा जास्त भीती कसलीच नसते म्हणून ते बदलतात. म्हणून ते मनावर घेऊ नये. आपले वरिष्ठ आणि आपले पद इथे कुठेच कामाला येत नाही. मित्रांनो, आपणच आपले जीवन वाचवायचे आहे. जपा स्वतःला, स्वतःची उत्तम काळजी घ्या…